जगतवारी
मेधा आलकरी
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पाऊल ठेवताच माणूस एका वेगळ्याच प्राणिजगतात प्रवेश करतो. इथले पिशवीवाले सस्तन प्राणी, उड्या मारणारे कांगारू, अंडी घालणारा प्लॅटिपस आणि ‘सुपर डॅड’ इमू यांच्या कथा केवळ रंजक नाहीत, तर निसर्गाच्या अफाट वैविध्याची मोहक ओळख करून देतात.
ऑस्ट्रेलियात वेगवेगळ्या प्रकारचे शंभरएक तरी प्राणी असावेत. त्यांच्या जगण्याच्या, संगोपनाच्या रंजक गोष्टी आपल्याला इथली वारी केल्यावरच कळतात. कांगारू आणि वॉलबी हे दोन वेगळ्या जातीचे प्राणी आहेत हे प्रथमदर्शनी आपल्याला कळतच नाही. मला तर वाटलं हा रेताड रंगाचा, आकारानं थोडा लहान, किशोरवयातील गोड दिसणारा कांगारूच आहे. तो हुबेहूब कांगारूसारखा दिसतो आणि उड्याही तशाच मारतो. पण वॉलबी असतो दीडफुट्या आणि वजनातही फक्त वीस-बावीस किलो आणि कांगारू चांगला ‘खातेपिते घर का’! नव्वद किलो वजन आणि जवळजवळ आठ फूट उंच. कांगारूच्या गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचं अंतर जास्त असतं. मोकळ्या रानावनात फिरण्यासाठी पायांची ही ठेवण कामी येते. वॉलबी मात्र दाट जंगलात राहतो, त्यामुळे झाडाझुडपात फिरण्यासाठी त्याच्या पायाची उंची कमी करून ईश्वरानं त्याला खूप चापल्य दिलं आहे. त्यांच्या काही प्रजाती तर कड्याकपाऱ्यांमध्ये राहतात. वॉलबी कांगारूसारखं कुराणातील ताजं गवत न खाता झाडांचा कोवळा पाला आणि फळं खातो. हे अन्न कुस्करून भरडण्यासाठी त्याला मिळाले आहेत सपाट दात. हा जंगलातील ‘माळी’ आपल्या विष्ठेमधून फळांच्या बिया जिथे फिरतो तिथे पसरवतो आणि वनीकरणाला नकळत हातभार लावतो. वॉलबीचं अंग छान तुकतुकीत आणि त्यावर वेगवेगळ्या रंगांच्या छटा असतात. कधी कधी तर त्यांच्या गळ्याभोवती पोपटाला असतो तसा लाल पट्टाही असतो. कांगारू आपला एकरंगी, भुरा नाहीतर राखाडी!
भुऱ्या रंगाचा शहामृगासारखा दिसणारा इमू नावाचा पक्षी हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे. हा जणू आफ्रिकेतील शहामृगाचा अनुज! जत्रेत हरवलेले आणि आता दोन खंडांवर विसावलेले भाऊ! त्यांच्यातही मूळ फरक आकाराचा, बाकी तोंडवळा अगदी सारखा. इमूची मान लांब निमुळती, पाय उंच किडकिडीत, डोकं तुळतुळीत गोटा. अगदी मानेवरही पिसं नाहीत. वजन पंचेचाळीस किलो, उंची सहा फूट, मुक्काम पोस्ट ऑस्ट्रेलिया! शहामृग मात्र उंचापुरा, पंख व शेपटीवर पांढरी पिसं असलेला गुबगुबीत आणि दिमाखदार! ताशी पन्नास किलोमीटर वेगानं पळू शकणाऱ्या इमूची नजर मात्र तीक्ष्ण आणि कान भलतेच तिखट असतात. यांच्या पायाला तीन बोटं असून, नखात माणसाचं पोट फाडू शकण्याची ताकद असते. त्याच्या लाथेनं लोखंडी कुंपणही उन्मळून पडू शकतं. पळतो वेगात तशी त्याची उडीही लांब. एका टांगेत चक्क नऊ फूट! यांच्या अंगात योद्ध्याचं रक्त आहे. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात १९३२ मध्ये झालेलं ‘इमू युद्ध’ हा एक अजबच किस्सा आहे. सुमारे वीस हजार इमूंनी पश्चिम ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांच्या गव्हाच्या पिकावर हल्ला केला. सरकारने त्यासाठी चक्क सैन्याला पाचारण केलं. पण इमू एवढे चपळ आणि हुशार की ते सैनिकांच्या गोळ्यांना चुकवून पळून गेले. त्यामुळे हे युद्ध पक्षी जिंकले अशी इतिहासात नोंद झाली.
इतका बलवान असला तरी पिल्लांच्या बाबतीत हा नर इमू अगदी मायाळू! हिरव्या रंगाची अंडी घालून मादी जाते निघून आणि हा तब्बल आठ आठवडे काही न खाता- पिता ती अंडी उबवत बसतो. पिल्लांचा जन्म झाल्यावरही हा ‘सुपर डॅड’ त्यांची काळजी घेऊन त्यांना जीवन जगण्याचे धडे देतो. ऑस्ट्रेलियातील अतिउष्ण वाळवंटी प्रदेशात आणि अतिथंड हिमप्रदेशात तो तग धरून जिवंत राहू शकतो. इमू हा पट्टीचा पोहणारा! खाद्याच्या शोधात तो एखादी नदी सहज पोहून पार करतो. कांगारूंसोबत तो तिथल्या राजचिन्हावर दिमाखानं झळकतो. एका बाजूस इमू अन् दुसऱ्या बाजूस कांगारू. हे दोनच प्राणी का बुवा? कारण त्यांच्या अवजड शरीर रचनेमुळे ते मागे चालू शकत नाहीत. सदैव सैनिका पुढेच जायचे! देशही असाच प्रगतिपथावर पुढे पुढेच जात राहील.
पिल्लांसाठी ओटीपोटाशी पिशवी असलेला आणखी एक सस्तन प्राणी म्हणजे वॉम्बॅट. आखूड पायांचा, मीटरभर लांबीचा, छोटीशी शेपटी असणारा, दिसायला गोंडस पण कर्माने नाठाळ असा हा प्राणी बिळात राहतो. उंदरासारख्या तीक्ष्ण दातांनी आणि मजबूत नखांनी जमीन खोदून बिळ बनवतो. त्याच्या पिशवीचं तोंड मागच्या बाजूनं उघडणारं असतं. कांगारूसारखं पुढच्या बाजूस उघडणारं असतं तर माती उकरताना ती पिल्लांच्या अंगावर नसती का पडली? अशी ही निसर्गाची किमया! वॉम्बॅट हा चौकोनी (cubical) विष्ठा असलेला जगातील एकमेव प्राणी आहे. आपली हद्द निश्चित करण्यासाठी तो दगडावर किंवा लाकडावर आपली विष्ठा टाकतो. गोल नसल्यामुळे ती गडगडत खाली पडत नाही. ऐकावे ते नवलच! त्याच्या पाठीची कातडी खूप जाड आणि हाडांनी मजबूत बनलेली असते. शत्रूपासून बचावासाठी बिळात शिरून तो आपले मागचे शरीर बिळाच्या तोंडाशी लावतो. शिकारी प्राण्याला त्याचा चावा घेणं अशक्यप्राय असतं.
वॉम्बॅट हे पालापाचोळा खाणारे प्राणी आहेत. काही टणक मुळं उकरण्यासाठी, झाडाची साल ओढून काढण्यासाठी त्यांच्याकडे अतितीक्ष्ण असे समोरील दात आहेत. शेतीला अपाय करणारे प्राणी म्हणून आजही त्यांची शिकार केली जाते. त्यामुळे उद्या हे निर्वंश होऊन नाहीसे होण्याचा धोका आहे.
बिळात निवारा असलेला आणखी एक विचित्र प्राणी म्हणजे प्लॅटिपस. विचित्र अशाकरिता की त्याचं तोंड बदकासारखं, शेपटी बिव्हरसारखी आणि पाय बेडकासारखे पातळ कातडीने जोडलेले असतात. याला सस्तन म्हणावं तर हा पिल्लांना जन्म न देता अंडी घालतो. त्याला इतर प्राण्यांसारखे स्तन नसतात. आईच्या पोटाच्या कातडीतून दूध घामासारखे पाझरते आणि पिल्लं ते चाटून पितात. नराच्या दोन्ही पायांवर आतल्या बाजूस पंधरा मिलिमीटरची एक अणकुचीदार विषारी नखी असते. सस्तन प्राण्यांमध्ये विष ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. त्याच्या दंशाने माणूस मेला नाही, तरी असह्य वेदना होतात. नदीजवळ बिळं असलेल्या प्लॅटिपसची शिकार करण्याची पद्धतही न्यारी! डोळे, कान, नाक बंद करून पाण्यात शिरल्यावर तो इतर जलचरांच्या शरीरातून येणाऱ्या विद्युत लहरींना आपल्या चपट्या चोचीद्वारे ओळखतो. केलेली शिकार चोचीमागील पिशवीत साठवून पृष्ठभागावर आल्यावर रवंथ करत खातो आणि तृप्ततेचा ढेकर देतो. खास त्याच्या दर्शनासाठी नदीवरील नौकाविहार करायला गेलो असता त्याने आमच्या धीराची परीक्षा पाहिली होती. वीस सेंटच्या नाण्यावर त्याचं चित्र पाहून समाधान मानू असा विचार करून तिथून निघणार तेवढ्यात त्याने आपली रवंथ करणारी चोच बाहेर काढून आमच्या धीराची गोमटी फळं आम्हाला चाखू दिली.
तस्मानियन डेव्हील या छोट्या कुत्र्याएवढ्या दिसणाऱ्या अन् प्रथमदर्शनी निरुपद्रवी वाटणाऱ्या प्राण्याला राक्षस का म्हणतात ते मला उमजेना. पिशवीवाला प्राणी असूनही हा पक्का मांसाहारी. थोडं निरखून पाहिल्यावर हा ठेंगणा, बसका, लठ्ठ, काळ्या कुळकुळीत कातडीचा, प्रमाणाबाहेर मोठ्या डोक्याचा, वाटोळ्या डोळ्यांचा आणि लाल कानांचा प्राणी मला क्रूर वाटायला लागला. तेवढ्यात त्याने त्याचा मोठा जबडा पसरला. तो म्हणे भक्ष्याची हाडे, कातडी आणि संपूर्ण शरीर चघळून खाऊन टाकतो. त्याच्या जबड्यापेक्षा भयानक त्याची रात्रीच्या अंधारात मारलेली किंचाळी असते. भीतीनं काळजाचा थरकाप उडतो. त्याची शेपटी शरीराच्या लांबीपेक्षा अर्धी आणि चांगली जाडजूड असते. सगळी चरबी त्यात साठवलेली.(पण उमद्या बैलाची परीक्षा शेपटी पिरगाळून करतो तसं करायची सोय नाही) त्याच्या मिशाही एकदम ‘नत्थुलाल’सारख्या! हा निशाचर जेव्हा अन्नाच्या शोधात निघतो तेव्हा या मिशा अँटिनाचं काम करतात. संतापलेल्या क्षुब्ध डेव्हीलच्या आसपास असणं म्हणजे वेगळ्याच संकटाला आमंत्रण! कारण अशावेळी त्याच्या अंगावाटे येणारा उग्र घाण वासच आधी तुमचे प्राण घेईल. डेव्हीलचा चावा हा सस्तन प्राण्यातील सर्वात पक्का असला तरी तो तसा आयतोबाचा आहे. जिवंत शिकारीच्या मागे धावण्यापेक्षा तो मृत शरीरावरच ताव मारतो. पोट तुडुंब भरल्यावर राक्षस महाशय एक मोठी जांभई देतात. अरेच्चा! हा पसरलेला जबडा त्याच्या भुकेची नव्हे; भरल्या पोटोबाची पावती असते तर.
या पिशवीवाल्या प्राण्यांच्या कथा खरंच खूप विलक्षण! त्यातील सर्वात गोड, अगदी उचलून कुशीत घ्यावा असा प्राणी म्हणजे कोआला. माकडासारखा हा नेहमी झाडावर राहतो. निलगिरीच्या झाडाच्या फांदीच्या बेचकीत सोयीची जागा हेरून, आपल्या गुबगुबीत शरीराचा कोंडाळा करून हा दिवसाचे बहुतेक तास झोपलेला असतो. चंचल माकडाच्या अगदी विपरीत! स्थानिक भाषेत याचं नाव आहे ‘गुला’! विदेशी लोकांनी केलेल्या अपभ्रंशानंतर ते कोआला झालं. धरुग या स्थानिक भाषेत कोआलाचा अर्थ होतो- न पिणारा. त्यामुळे कोआला पाणी पीत नाही असा एक गैरसमज आहे. खेळण्यातल्या टेडी बेअरसारखा गुबगुबीत दिसणारा हा राखाडी रंगाचा कोआला ‘बेअर’ कुटुंबातील नाहीच मुळी. पण युरोपियनांनी चिकटवलेलं बिरुद काही अजून सुटलं नाही.
कुरुंबियन पार्कमध्ये फोटोसाठी कोआलाला कडेवर घेतलं तेव्हा त्याच्या पायाची थोडीशी माती माझ्या फिकट जांभळ्या जॅकेटला लागली. तेव्हा तेथील प्रशिक्षकाने सांगितलं की कोआलाचे आणि माणसाचे हाताचे ठसे इतके सारखे असतात की मायक्रोस्कोपखाली बघूनही ओळखणं कठीण. तणावाखाली असला की म्हणे तो मनुष्याच्या बाळासारखा रडतो. कोआलाचा ‘जॉई’ पस्तीस दिवसात जन्मला, तरी सहा महिने आईचं दूध पीत तिथेच सुखात नांदतो. पिशवीतून बाहेर आला की आई त्याला ‘पॅप’ खाऊ घालते. आईच्या आतड्यातून बाहेर येणारा हा पदार्थ त्याला निलगिरीची विषारी पानं पचवण्यासाठी पुढील आयुष्यभर उपयोगी पडतो. मंद चयापचय शक्ती असल्यामुळे कोआला हा दिवसातले सोळा-सतरा तास झोपून असतो आणि या कुंभकर्णाची झोप कुणी मोडायचाच अवकाश, की त्याचा थयथयाट सुरू होतो. जागा असला की चांगली अर्धा किलो निलगिरीची पानं चावून चावून त्याचा लगदा पोटात रिचवला की पुन्हा झोपायला मोकळा.
पहिल्या वाढदिवशी माहेरचा उंबरठा ओलांडून कोआलांमधील ‘बालिका वधू’ आपल्यासाठी वेगळं झाड शोधून संसार थाटते. ‘माँ का लाडला’ मात्र दोन-तीन वर्षांचा होईपर्यंत आईच्या झाडांच्या वेटोळ्यातच राहतो. स्वतंत्र झाला की मग काही झाडांवर नखांची निशाणी आणि विशिष्ट गंध सोडून आपली हद्द निश्चित करतो.
ऑस्ट्रेलियाच्या भेटीत मी या अनोख्या प्राण्यांमध्ये खूप रंगून गेले. मनात लहानपणीचं बडबड गीत गुंजायला लागलं. शेपटीवाल्या प्राण्यांची… मी त्यात थोडा बदल केला.
पिशवीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा,
कांगारू होता सभापती मधोमध उभा….
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com