विशेष
गीतेश गजानन शिंदे
विकास आणि विनाश यातील संघर्षात होरपळणाऱ्या निसर्गाचा मूक आक्रोश मांडणारा, झाडाशी असलेले आपले मखमली नाते उलगडणारा हा एक संवेदनशील ललित आविष्कार.
काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचली नि मी अस्वस्थ झालो. आमच्या भागातील सुमारे दीडशे वर्षं जुन्या वडाच्या झाडावर महापालिकेनं आणि कंत्राटदार कंपनीनं कुऱ्हाड चालवण्याचं ठरवलेलं होतं. का? तर रस्ता रुंदीकरणात ते झाड मध्ये येतंय म्हणून. परंतु खऱ्या अर्थानं आपणच झाडांच्या वस्तीमध्ये बेकायदेशीरपणे घुसलो आहोत. पर्यावरणप्रेमींनी नेहमीप्रमाणे निषेध नोंदवला, आंदोलनं केली परंतु या बहिऱ्या व्यवस्थेला निसर्गाचा आक्रोश मुळीच ऐकू येत नाही. ती तर विकासाचं गाजर दाखवून तुम्हाला विनाशाकडे ढकलण्यासाठी तयारच बसलेली असते.
नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि मुळासकट झाडे उखडण्याचे प्रकार घडले, ज्यामुळे पर्यावरण व वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले. पर्यावरणप्रेमींचा विरोधही या प्रशासकीय दबावापुढे फसला. एकीकडे कोट्यवधी वृक्षलागवडीच्या जाहिराती (उदा. सरकारी योजना किंवा आयपीएलचे डॉट बॉल अभियान) केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात या झाडांचे अस्तित्व कुठेच दिसत नाही. याउलट, विकासाच्या नावाखाली आहे तीच जंगले व निसर्ग नष्ट करण्याची वृत्ती व्यवस्थेमध्ये दिसून येत आहे.
भारतात विकासाच्या नावाखाली झाडांचे अशास्त्रीय पद्धतीने पुनर्रोपण केले जाते, ज्यामुळे बहुतांश झाडे जगत नाहीत. याउलट, जपानमध्ये ‘नेमावाशी’ (Nemawashi) या शास्त्रशुद्ध प्रक्रियेद्वारे शेकडो वर्षांची झाडे सुरक्षितपणे स्थलांतरित केली जातात. या पद्धतीत मुळांना कापडात बांधून, झाडाला नवीन वातावरणासाठी मानसिकदृष्ट्या तयार होण्यास वेळ दिला जातो आणि नंतर क्रेनच्या सहाय्याने त्याचे पुनर्रोपण होते. जपानमधील ‘शिंतो’ धर्मानुसार झाडांमध्ये देवत्व मानले जात असल्याने तिथे झाड तोडणे हा निसर्गाचा अपमान समजला जातो; कारण झाड केवळ फांद्या-मुळांचा संच नसून ते निसर्गाचे एक जिवंत महाकाव्य आहे.
कुठेतरी, कधीतरी एका अंधाऱ्या मातीच्या कुशीत एक छोटंसं बी विसावलेलं असतं. ते बी म्हणजे पृथ्वीचं एक सुप्त स्वप्न असतं. वरून पावसाचा पहिला थेंब त्या मातीला स्पर्श करतो, आणि जमिनीच्या पोटात एक अनामिक हुरहूर सुरू होते. ते बी स्वतःचा अहंकार, स्वतःचं कठीण कवच विरघळवून टाकतं. कारण त्याला माहीत असतं, स्वतःला संपवल्याशिवाय नवा जन्म घेता येत नाही. मग मातीची कूस उजळून निघते आणि एक मऊ, कोवळा, फिकट हिरवा अंकुर डोकं वर काढतो. दोन पानांची ही इवलीशी अंजली थेट आकाशाकडे पाहत असते. हा अंकुर म्हणजेच निसर्गानं पृथ्वीवर उमटवलेलं पहिलं कौतुक असतं. झाड निसर्गाच्या दरबारातील असा एक नर्तक आहे, जो काळाच्या तालावर आपले रंग बदलत फांद्यांच्या हस्तमुद्रांनी आपल्या मनातील भाव व्यक्त करत असतो.
उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना वाराही तप्त झालेला असतो. अशा वेळी झाडं स्वतःला जाळून घेतात, पण जगाला सावली देण्याचं व्रत सोडत नाहीत. अशाच एका तप्त दुपारी, गुलमोहर आपल्या अंगावर लालभडक रक्तासारखी फुलं पांघरून उभा राहतो, जणू काही तो निसर्गाचा क्रांतीवीर आहे! या वृक्षतोडीविरोधात तो पेटून उठलाय. तर दुसरीकडे बहावा आपल्या पिवळ्याधमक फुलांची झुंबरं अशा प्रकारे मिरवत उभा असतो, जणू काही धरित्रीच्या गळ्यात सोन्याचे हार घातले आहेत. कधी कधी भर उन्हात बहाव्याकडे पाहिलं तरी मनात गोडवा निर्माण होतो. त्यावेळी त्याची पिवळी फुलं म्हणजे पिवळ्या रंगाचे बत्तासे असल्याचा गोडसर भास होतो. मला या झाडांच्या फांद्या म्हणजे निसर्गाच्या धमन्याच असल्यासारख्या वाटतात. या फांद्यांवर उन्हाच्या जणू धामणी खेळत असतात. पानांच्या गाळणीतून ऊन गाळल्यावर मातीवर ऊन ठिपक्यांची जाळीदार रांगोळी काढलेली दिसते. त्या सावलीत ऊन स्वतःचं अस्तित्व शोधू लागतं. त्याचा दंभ मोडून पडतो आणि ते स्वत्त्व हरवून बसतं. खोडाकडे पाहिलं तर कळतं की त्याच्या रंगात मातीचा रंग आपसूकपणे मिसळला गेलाय. झाडाचा देह जरी रापलेला असला तरी उन्हानं त्याची संपूर्ण कांती उजळून निघालेली असते, जणू काही साक्षात्कारानं झाड अंतर्मुख झालेलं असतं. पण याच झाडाच्या एखाद्या फांदीत त्याचा सर्वनाश करण्याची ताकद असते. कारण शेवटी कुऱ्हाडीचा दांडाही लाकडाचाच बनलेला असतो ना! यावरून माझ्याच एका कवितेच्या ओळी मला आठवल्या,
कोण्या फांदीत दडली,
शोधा उन्हाची कुऱ्हाड
घाव घालण्याच्या आधी,
उगवावे नवे झाड...
पण हीच झाडं पावसात अभ्यंगस्नान करतात. पहिल्या पावसानंतर झाडांची अवस्था एखाद्या विरहातून मुक्त झालेल्या प्रेयसीसारखी होते. मेघांचे ताशे वाजतात, विजांच्या नृत्यासोबत कोसळणाऱ्या जलधारा जेव्हा झाडाच्या पानांवर पडतात, तेव्हा पानावरांवरून पडणारा प्रत्येक थेंब एक नवीन चाल रचतो. ‘टप… टप… टप…’ झाडाचं हे संगीत मनाला तृप्त करून जातं. वारा येतो आणि झाड आपल्या अथांग बाहूंनी त्यास कवेत घेतं. तेव्हा त्याची गदगद ही पागोळ्यांमधून व्यक्त होते. पानांची ती सळसळ म्हणजे जणू काही निसर्गानं गायलेली एक सुमधूर अंगाई असते. मला मात्र सर्वात जास्त भुरळ पाडते ती झाडाची पानगळ. हिवाळ्याच्या अखेरीस झाडावरची पानं पिवळी पडू लागतात. ती झाडाचा निरोप घेतात. एक-एक करून पान जमिनीवर पडतं, तेव्हा तो मृत्यू नसतो, तो एक शांत, संथ सोहळा असतो. झाडावरून गळणाऱ्या पानातही एक नजाकत असते. ते हवेत तरंगत, लयबद्ध गिरक्या घेत मातीच्या कुशीत विसावतं. सर्व पानं झडून गेल्यावर झाड उघडं पडतं, पण ते रडत नाही; कारण त्याला माहीत असतं, शून्यातूनच पुन्हा नव्या सृष्टीची सुरुवात होते. तो पाचोळाच अशावेळी झाडाचं खत ठरतो आणि नव्या सर्जनासाठी त्यास इंधन पुरवतो. या उघड्याबोडक्या, ध्यानस्थ उभ्या असलेल्या झाडाकडे पाहिलं की वाटतं, हा कोणीतरी हिमालयातला ऋषी आहे, जो केवळ आत्मज्ञानाच्या शोधात शांत उभा आहे.
झाडाची सावली म्हणजे निसर्गानं माणसासाठी विणलेला एक मखमली पडदा होय. तो केवळ प्रकाशाचा अभाव नाही, तर ती मायेची ऊब आहे. रणरणत्या उन्हात, सिमेंटच्या रस्त्यावरून चालताना जेव्हा पाय पोळू लागतात, अंगाची लहिलाही होते, तेव्हा लांबूनच वडाची किंवा पिंपळाची सावली दिसल्यावर पोळलेल्या मनावर फुंकर घातल्यासारखं वाटतं. त्या सावलीत पाऊल ठेवलं, की असं वाटतं जणू आईनं आपल्या उन्हानं तापलेल्या कपाळावर थंड पाण्याचा हात ठेवला आहे. त्या गारव्यात एक अद्भुत शांतता असते. तिथे पक्षी किलबिलत असतात, वाटसरू विसावा घेत असतात, आणि झाड मात्र वरून शांतपणे पाहत असतं— कोण आलं, कोण गेलं, याच्याशी त्याला काही देणंघेणं नसतं. कारण त्याचे हात फक्त देण्यासाठीच पसरलेले असतात.
प्रत्येक झाडाचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व असतं, एक वेगळी कविता असते. पिंपळाच्या पानाचा टोकदार आकार आणि वारा नसतानाही डोलण्याची त्याची सवय… असं वाटतं की पिंपळ चोवीस तास विश्वाशी गुंजन करत असतो. त्याच्या पानाच्या शिरांकडे पाहिलं की वाटतं, निसर्गाच्या हस्तरेषा जणू त्यावर उमटल्या आहेत. तर वडाचं झाड म्हणजे घरातील एखादा पांढऱ्या दाढीचा, प्रेमळ आजोबा. त्याच्या त्या जमिनीपर्यंत पोहोचलेल्या पारंब्या म्हणजे काळाच्या पाऊलखुणा आहेत. ज्या प्रत्येक क्षणी तुम्हाला आधार देतात. मागे एका कवितेत मी लिहिलं होतं,
सुरकुत्याच सुरकुत्या जाळीदार पानाला
पारंब्यांचा आधार होतो वटवृक्षाला
भिरभिरतेय माथ्यावर उन्हाची घार
अंगा-अंगाची काहिली सृष्टी बेजार
अशा वेळी होते मग झाडाची छत्री
उन्हाला कातरते फांद्यांची कात्री...
कित्येक पिढ्या या वटवृक्षानं खेळताना, हसताना, रडताना पाहिल्या आहेत. तो भूतकाळ आणि भविष्यकाळाला जोडणारा एक जिवंत पूल आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असं झाड असतं, जे आपल्या बालपणीचा साक्षीदार असतं. कोणाच्या अंगणात शेवग्याचं झाड असतं, कोणाच्या पाठीमागचं पेरूचं झाड, तर कोणाच्या शाळेच्या मैदानातला तो अवाढव्य वडाचा पारंब्यांचा गोतावळा. मला आठवतो माझ्या आजोळच्या घरासमोरील तो जुना, डेरेदार आंबा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आमचं हक्काचं घर म्हणजे तो आंबा असायचा. त्याच्या खांद्यावर (फांदीवर) पाय देऊन वर चढणं, एखादी कच्ची कैरी पाडून, ती शर्टालाच पुसून दातानं कुरतडण्यात जी मजा होती, ती आजच्या कोणत्याही महागड्या मॉलमध्ये नाही. झाडावर चढताना हाताला लागणारा त्याचा खडबडीत पापुद्रा, त्यातून निघणारा तो चिकाचा उग्र पण हवाहवासा वाटणारा सुवास… हे सगळं माझ्या मनात कुठेतरी खोलवर रुजलंय. त्या काळी झाडंच आपले खेळगडी होते. वडाच्या पारंब्यांना धरून झोके घेताना आपण हवेत झेपावायचो, तेव्हा तो वडाचा म्हातारा आजोबा आपल्याकडे पाहून पानांच्या टाळ्या वाजवून हसायचा. झाड आपल्याशी बोलायचं. वारा आला की त्याची होणारी सळसळ म्हणजे जणू काही बासरी वाजवत ते आपल्यालाच साद घालत असायचं.
झाडाचं आयुष्य हे परोपकाराची परिसीमा असतं. जिवंत असताना ते फुलं, फळं, सावली आणि श्वास देतंच; पण जेव्हा त्याचं आयुष्य संपतं, तेव्हाही ते आपली साथ सोडत नाही. वाळलेलं झाड कुणाच्या तरी घरात चूल पेटवून भूक भागवतं, कुणाच्या तरी घराची चौकट होऊन त्या घराचं रक्षण करतं, तर कधी एखाद्या कलावंताच्या हातात जाऊन एका सुंदर मूर्तीचं रूप घेतं. अगदी शेवटी, माणसाच्या अंतिम यात्रेतही लाकूडच माणसाला आपल्या कवेत घेऊन पंचतत्त्वात विलीन करतं. जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत, माणसाच्या आयुष्याची प्रत्येक ओळ झाडाच्या लाकडानंच लिहिलेली असते. आपण सिमेंट-काँक्रीटची घरं बांधतो, त्यावर हक्क सांगतो. पण झाड हे एक असं घर आहे, ज्याचे दरवाजे कधीच कोणासाठी बंद नसतात. ते एकाच वेळी हजारो जीवांचं आश्रयस्थान असतं. त्याच्या टोकावर गरुड किंवा घारीचं घरटं असतं, मधल्या फांद्यांवर सुगरण आपला सुबक खोपा विणते, तर ढोलीमध्ये एखादा घुबड किंवा खारीचं कुटुंब आरामात संसार करत असतं. झाडाच्या पानांखाली कितीतरी कीटक, मुंग्या आणि फुलपाखरांचे कोष विसावलेले असतात. झाडाच्या मुळाशी असणाऱ्या बिळात लहान प्राणी राहतात.
झाड कोणालाच ‘नाही’ म्हणत नाही. झाडावर दगड मारणाऱ्यालाही ते गोड फळच देतं. उन्हानं व्याकुळ झालेल्या गुराढोरांवर ते आपली सावली पांघरतं. निसर्गातील या अथांग औदार्याचं दुसरं नाव म्हणजे झाड. प्रसिद्ध साहित्यिक, कवी खलील जिब्रान झाडांविषयी म्हणतात की, ‘झाडं म्हणजे मातीनं आकाशाला लिहिलेली कविता आहेत. आपण ती तोडतो आणि आपल्या रिकामेपणाचा पुरावा देण्यासाठी तिचे कागद बनवतो.’
वैज्ञानिक संशोधनानुसार ‘Wood Wide Web’ द्वारे जंगलातील झाडे जमिनीखालील मुळांच्या व बुरशीच्या साहाय्याने एकमेकांशी संवाद साधतात, संकटाची पूर्वकल्पना देतात आणि मृत्यूपूर्वी तरुण झाडांना पोषक द्रव्ये सोपवून सामाजिक बांधिलकी जपतात. आज शहरांमधील सिमेंटच्या जंगलात निसर्ग हरवत चालला आहे आणि झाडांची कत्तल करून माणूस स्वतःचेच भविष्य धोक्यात आणत आहे. झाडे आपल्याला जीवनातील संकटांत टिकून राहण्याचे, मूल्यांशी जोडलेले राहण्याचे आणि सदैव बहरण्याचे संस्कार शिकवतात. शेवटी, एका ग्रीक म्हणीनुसार, खरा महान समाज तोच असतो जिथे वृद्ध लोक अशा झाडांची लागवड करतात, ज्यांच्या सावलीचा फायदा त्यांना स्वतःला कधीच मिळणार नाही हे त्यांना ठाऊक असते.
परंतु आजकालच्या धावपळीच्या युगात आपण ‘बोनसाय’ संस्कृतीकडे वळलो आहोत. मोठ्या झाडांना कुंड्यांमध्ये लहान करून घरात ठेवण्यात आपल्याला आनंद मिळतोय. पण विचार करा, ज्याची झेप आकाशात ढगांशी खेळण्याची आहे, त्याचा त्या लहानशा कुंडीत किती कोंडमारा होत असेल. माणसाचा हा संकुचितपणा निसर्गाला हळूहळू मारत चालला आहे. त्यामुळे संत तुकारामांची क्षमा मागून म्हणावसं वाटतं की, ‘वृक्षवल्ली आम्हा परके वनचरे...’
geeteshshinde@gmail.com
लेखक हे युवा कवी, अनुवादक, संपादक आहेत.