डोळस भटकंती
शंतनु परांजपे
मंदिराच्या भिंतींवर केवळ देवताच नाहीत, तर मंदिर उभारणाऱ्या कारागिरांचाही इतिहास कोरलेला आहे. अंबरनाथचे शिवमंदिर म्हणूनच स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासासाठी अनमोल ठेवा ठरते.
मुंबई महानगराच्या विस्तारात अंबरनाथ हे आज एक परिचित शहर आहे. मात्र, या आधुनिक नगररचनेच्या मध्यभागी उभे असलेले प्राचीन शिवमंदिर मध्ययुगीन महाराष्ट्राच्या स्थापत्यवैभवाची साक्ष देते. अकराव्या शतकातील पश्चिम भारतीय मंदिर स्थापत्याचा विचार करताना अंबरनाथच्या देवालयाला विशेष महत्त्व आहे. काळ्या दगडातील भव्य रचना, गुंतागुंतीची जंघा, सूक्ष्म शिल्पकाम, उन्नत शिखर आणि मंडपातील कलाकुसर यांमुळे हे मंदिर लक्ष वेधून घेते. त्याचे खरे वैशिष्ट्य केवळ शिल्पसौंदर्यात नसून वास्तुशास्त्र, शैवोपासना आणि मंदिरनिर्मितीमागील विचारप्रक्रियेच्या एकत्रित दर्शनात आहे. हे मंदिर शिलाहार राजवटीच्या काळात उभारण्यात आले. मंदिरातील शिलालेखावर शके ९८२ अर्थात इ.स. १०६० ही तारीख असून त्यात ‘अमरनाथ देवकुल’ आणि चित्तराजदेव यांचा उल्लेख आहे. यावरून चित्तराजाच्या कारकीर्दीत मंदिरनिर्मितीला सुरुवात झाली आणि मुम्मुणीच्या काळात ती पूर्ण होऊन देवालयाची प्रतिष्ठापना झाली असावी, असे मानले जाते.
साधारण इ.स. १०३५ ते १०६० हा मंदिरनिर्मितीचा कालखंड असावा. हा शिलालेख मंदिराच्या इतिहासाचा महत्त्वाचा पुरावा ठरतो. मंदिराच्या स्थापत्यरचनेतील एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृह आणि मंडप यांच्या छपरांमधील सुमारे दोन फुटांचे अंतर. या जागेत पूर्वेकडे खिडकीसदृश उघडण आणि पश्चिमेकडे अरुंद दरवाजासारखी रचना आहे. ही व्यवस्था केवळ प्रकाश आणि वायुवीजनासाठी नसून मंदिरनिर्मितीशी संबंधित धार्मिक विधींशी तिचा संबंध असावा, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. ‘समरांगणसूत्रधार’, ‘अपराजितपृच्छा’ आणि ‘ईशानशिवगुरुदेवपद्धती’ यांसारख्या वास्तुशास्त्रीय ग्रंथांत मंदिर उभारणीच्या विविध टप्प्यांवर होणाऱ्या विधींचे वर्णन आहे. भूमिपूजन, शिलान्यास, मापन, द्वारशाखा, पद्मशिला, प्रासादपुरुष, आमलक, कलशारोहण आणि ध्वजारोहण अशा प्रत्येक टप्प्याला धार्मिक महत्त्व होते.
‘अपराजितपृच्छा’ या ग्रंथात सात प्रतिष्ठा आणि चौदा शांतिविधींचे वर्गीकरणही आढळते. या पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या मंदिरातील काही शिल्पपटांकडे पाहिले, तर ते केवळ अलंकरण नसून मंदिरनिर्मितीच्या विधींचे दृश्यरूप असावेत, असे लक्षात येते. सभामंडपाच्या उत्तरेकडील भागातील एका शिल्पपटात मध्यभागी कलशासारखी रचना आणि तिच्याभोवती बसलेली मंडळी दिसतात. या दृश्याचा संबंध कलशारोहण विधीशी जोडला जातो. शिल्परत्नाकरातील कलशरचनेच्या आकृत्यांशी त्याची तुलना केल्यावर हा तर्क अधिक दृढ होतो. विशेष म्हणजे, याच परिसरात मंदिराचा शिलालेखही होता. त्यामुळे मंदिराच्या बांधकामाच्या अंतिम टप्प्याशी या शिल्पाचा संबंध असण्याची शक्यता आहे. सभामंडपातील मध्यवर्ती चार स्तंभांवरील शिल्पपट मंदिराच्या निर्मितीप्रक्रियेवर अधिक प्रकाश टाकतात. एका दृश्यात तीन व्यक्ती बसलेल्या असून त्यांच्या हातात उघडी हस्तलिखिते आहेत. शुभमुहूर्त निश्चित करण्यासाठी पंचांग पाहिले जात असावे, असा त्यामागील अर्थ लावला जातो. दुसऱ्या दृश्यात आचार्य किंवा स्थापत्यतज्ज्ञ शिष्यांना आराखडा समजावून सांगताना दिसतो. यावरून मंदिर उभारण्यापूर्वी वास्तुरचनेचे नियोजन आणि शास्त्रीय अभ्यास केला जात असल्याचे स्पष्ट होते. आणखी एका शिल्पात दोन कारागीर समोरासमोर बसून साधनांच्या सहाय्याने दगडावर काम करताना दिसतात. त्यांच्या मागे काही व्यक्ती निरीक्षण करत आहेत. मध्ययुगीन मंदिरशिल्पांमध्ये कारागिरांच्या प्रत्यक्ष कामाचे असे चित्रण दुर्मिळ असल्याने या शिल्पाला विशेष महत्त्व आहे.
मंदिर जणू स्वतःच्या निर्मितीची कहाणीच दगडात सांगत आहे. मंदिरनिर्मितीत सहभागी असलेल्या यजमान, आचार्य आणि सूत्रधार या तीन प्रमुख घटकांचेही संभाव्य चित्रण येथे आढळते. एका प्रतिमेत हातात मापनदंड आणि पुस्तक असलेली व्यक्ती दिसते. तिची ओळख मुख्य स्थापत्यकार किंवा सूत्रधार अशी करण्यात आली आहे. मापनदंड त्याच्या प्रत्यक्ष कामाचे, तर पुस्तक त्याच्या शास्त्रीय ज्ञानाचे प्रतीक मानता येते. दुसऱ्या प्रतिमेत दाढी-मिशा, तिलक आणि यज्ञोपवीत धारण केलेली व्यक्ती दिसते. तिची ओळख आचार्य म्हणून सुचवण्यात आली आहे. यावरून मंदिरनिर्मितीत धार्मिक मार्गदर्शन आणि स्थापत्यकौशल्य या दोन्हींचे महत्त्व अधोरेखित होते. मंदिराच्या अंतर्भागातील आणि बाह्यांगातील शिल्परचनेतही नियोजनबद्ध सुसंवाद दिसतो. सभामंडपातील स्तंभांवर कोरलेल्या सोळा शैव प्रतिमा बाहेरील जंघेवरील सोळा प्रतिमांशी अनुरूप आहेत. यावरून मंदिराच्या प्रत्येक भागाची रचना स्वतंत्रपणे नव्हे, तर संपूर्ण वास्तूचा विचार करून करण्यात आली होती, हे स्पष्ट होते. अंबरनाथचे शिवमंदिर त्यामुळे केवळ प्राचीन धार्मिक स्थळ राहत नाही. त्याच्या शिल्पांमध्ये देवतांसोबत स्थापत्यकार, आचार्य, आश्रयदाते, कारागीर आणि मंदिरनिर्मितीचे विविध विधीही जिवंत झाले आहेत. अकराव्या शतकातील स्थापत्यज्ञान, धार्मिक परंपरा आणि शिल्पकौशल्य यांचा हा दुर्मिळ संगम आहे. मंदिराचे शिखर आणि शिवलिंग पाहण्याबरोबरच त्याच्या भिंतींवरील सूक्ष्म शिल्पांकडे लक्ष दिले, तर दगडात नोंदवलेला मध्ययुगीन महाराष्ट्राचा स्थापत्य इतिहास उलगडत जातो..
sdparanjpe@gmail.com
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,