हितगुज
डॉ. शुभांगी पारकर
माणसांचे नातेसंबंध आणि व्यवहार अनेकदा वेगवेगळ्या गृहितकांवर आधारित असतात. ही गृहितकं पूर्वग्रहांवर आधारित असतात. त्यांना वास्तवाचा, सत्याचा आधार फार कमी असतो. याचा परिणाम घरापासून ते कार्यालयातील परस्पर संबंधांवर होत असतो. म्हणूनच एखादी गोष्ट गृहित धरण्याआधी वास्तवाची पडताळणी करणं आवश्यक आहे.
कोणतंही मानवी नातं, मग ते प्रेमाचं असो किंवा मैत्रीचं असो, कौटुंबिक असो वा व्यावसायिक असो, ते तग धरतं ते संवादाच्या आदानप्रदानावर. संवाद म्हणजे दोन व्यक्तींमधील भावना, हेतू आणि समज यांचा एकमेकांना जोडून ठेवणारा साकव. अनेक वेळा हा साकव उघड संघर्षामुळे किंवा दुर्लक्षामुळे नव्हे, तर एका सूक्ष्म आणि नकळत होणाऱ्या गोष्टीमुळे कोसळतो. ती म्हणजे ‘गृहित धरणे’. आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या विचारांविषयी किंवा भावनांविषयी कितीही खात्री वाटत असली, तरी अनेकदा आपले वाटणे हे वस्तुस्थितीपासून खूप दूर असते. कारण आपण वास्तवाचं आकलन आपले वैयक्तिक अनुभव, पूर्वग्रह आणि भावना यांच्याद्वारे करतो. त्यामुळे अनेकदा दोन व्यक्ती एकच परिस्थिती वेगवेगळ्या प्रकारे अनुभवतात. त्यामुळे आपला हेतू जरी कोणाला दुखावण्याचा नसला तरी आपण इतरांच्या वागण्याचं आणि हेतूचं आकलन चुकीच्या पद्धतीने करत असतो. हेच घनिष्ट नात्यांमध्येही घडतं. आपण आपल्या जोडीदाराच्या हेतूबाबत, कृतींबाबत काही गृहितकं मनात बाळगतो. त्यांच्या शब्दांचा किंवा कृतींचा अर्थ थेट त्यांना विचारण्याऐवजी स्वतःच त्याबाबत अंदाज लावतो. दुर्दैवाने, हा थेट संवादाचा अभाव कधी राग, तर कधी गैरसमज निर्माण करतो आणि कालांतराने नात्यातील विश्वास नष्ट होण्याची शक्यता वाढते.
प्रत्येकजण कधी ना कधी आपल्या जोडीदाराच्या भावना आणि वागणुकीबाबत वास्तवाशी फारकत घेतलेल्या कथा मनात रचत असतो. अशा कल्पित कथांमुळे आपल्याला दुःखी, रागावलेले किंवा घाबरलेले वाटू लागते. मग आपण या ‘कल्पित कथां’वरील प्रतिक्रिया म्हणून दुसऱ्याला दोष देतो किंवा दूर जातो. परिणामी समस्या सुटण्याऐवजी वाढत जातात. एक निरोगी नातं म्हणजे कोणत्याच समस्या नसलेलं नातं नव्हे, तर जेव्हा समस्या येतात, तेव्हा त्या दोघांनीही प्रामाणिकपणे एकमेकांशी संवाद साधावा आणि नैसर्गिकरीत्या निर्माण होणाऱ्या गृहितकांवर एकत्र काम करावं, हेच खऱ्या अर्थाने निरोगी नात्याचं लक्षण आहे.
गृहितक म्हणजे काय?
गृहित धरणे म्हणजे कोणतीही खात्री न करता किंवा संवाद न साधता, उघड पुरावा नसताना स्वतःच्या मनाने हवा तसा निष्कर्ष काढणे. ही आपल्या विचारांमधील, विचार करण्याच्या प्रक्रियेमधील एक मानसिक रचना आहे. हिचा वापर करून आपण आपल्या सभोवतालच्या जगाचा अर्थ लावत असतो. एकूण मानसशास्त्रात, ही गृहितकं समजणं महत्त्वाचं आहे. कारण ती आपल्या दृष्टिकोनाचा, वागणुकीचा आणि अगदी आत्मभानाचाही पाया असतात. यांना मानसिक शॉर्टकट्स सुद्धा म्हणता येतं. कारण ही गृहितकं आपल्या आयुष्यभराच्या अनुभवांमधून आणि सांस्कृतिक प्रभावांतून तयार झालेली असतात.
काही गृहितकं दु:खद प्रतिक्रिया टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. उदा. माझा मुलगा असा वाह्यात वागूच शकत नाही हे गृहितक आपल्याला मुलाच्या वाईट वर्तनामुळे होणाऱ्या दु:खापासून काही काळ दूर ठेवेल. परंतु ते तेवढ्यापुरतं मर्यादित राहत नाही. अनेकदा असे गृहितक आपल्याला खरी माया, प्रेम आणि समोरच्याशी गहिरा भावनिक संबंध निर्माण करण्याच्या संधीपासूनही दूर ठेवतात. उदाहरणार्थ, एखाद्या मित्राने मेसेजला उत्तर दिलं नाही की, आपण गृहित धरतो की तो रागावला असेल. पण कदाचित त्यावेळी तो कामात व्यस्त असेल, त्रासात असेल किंवा विसरला असेल. पण न बोलता निष्कर्ष काढल्यामुळे नातं मात्र तणावग्रस्त होतं.
जोडीदारांमधील चुकीची गृहितकं
इथे आणखी एक मुद्दा आहे. जेव्हा जोडीदार स्पष्टपणे काय घडतंय हे सांगत नाही, तेव्हा दुसरी व्यक्ती ही रिकामी जागा आपल्या कल्पित कथांनी भरून टाकते. या कथा अनेकदा वास्तवापेक्षा भीती आणि भूतकाळातील अनुभवांनी आकाराला आलेल्या असतात. उदाहरणार्थ, पूर्वी फसवणूक झाल्याचा अनुभव असलेल्या व्यक्तीला, सध्याच्या नात्यांमध्येही त्याच प्रकारची भीती वाटते, दूरवरूनही संबंध नसला तरीही भूतकाळात झालेली दुखापत सध्याच्या जोडीदारांवर गैरसमजाच्या रूपात उमटते. जोडीदारांमध्ये चुकीची गृहितकं निर्माण होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्पष्ट संवादाचा अभाव. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ही गृहितकं अनेकदा ‘स्वत:ला सिद्ध करणारी भविष्यवाणी’ ठरतात. म्हणजेच, ज्या गोष्टीची भीती वाटते तीच वास्तवात घडते. त्यामुळे नात्यातील विश्वासाचे बांध तुटू लागतात. म्हणूनच, ‘गृहित धरणं’ हा नातं तोडण्याचा एक खात्रीशीर मार्ग ठरतो.
गृहितकं आणि वास्तव यांमध्ये नेहमीच अंतर असतं आणि हे अंतरच नात्यांमध्ये तणाव निर्माण करतं. स्पष्टता, प्रामाणिकपणा आणि खुलेपणा नसेल तर गृहितकं एकतर्फी निष्कर्ष काढून संवादाची जागा हिरावून घेतात. त्यामुळे चुकीच्या समजुती, अपूर्ण संवाद आणि भलत्याच अपेक्षा तयार होतात. एखादी व्यक्ती दुसऱ्याचं मन वाचल्यासारखं त्या व्यक्तीला गृहित धरते, त्यावेळी ती त्याचं खरं मत ऐकून घेण्याची गरज नाकारत असते. परिणामी संवाद बंद होतो. त्यातून न सांगितलेल्या अपेक्षा निर्माण होतात आणि त्या पूर्ण न झाल्याने दुःख निर्माण होतं. शिवाय, आपल्या मनातील भीती दुसऱ्यावर लादल्यामुळेही शंका आणि गैरसमज वाढतात. म्हणूनच नातेसंबंधात वास्तव स्वीकारून संवाद साधणं अत्यंत आवश्यक ठरतं.
नकारात्मक गृहितकांचे प्रकार
हेतू गृहित धरणे :
या उदाहरणांमध्ये समोरच्या व्यक्तीच्या भावना किंवा हेतू गृहित धरले जातात. शांतता, विसराळूपणा किंवा झालेलं दुर्लक्ष आपल्याला मुद्दामच चुकीचं वाटू शकतं. पण सत्य यापेक्षा वेगळं, निरुपद्रवी असू शकतं. जसं की त्या व्यक्तीला आलेला ताण, थकवा किंवा झालेलं साधं दुर्लक्ष. उदाहरणार्थ, ‘ती आज काही बोलली नाही, म्हणजे ती रागावली आहे.’ ‘तो वाढदिवस विसरला, म्हणजे त्याला माझं महत्त्वच वाटत नाही.’ यात चुकीच्या पद्धतीने वर्तनामागचा हेतू गृहित धरला आहे.
समजून घेतलं असावं, असं गृहित धरणं :
हा दीर्घकालीन नात्यांमध्ये दिसणारा सामान्य प्रकार आहे. लोकांना वाटतं की, त्यांचा जोडीदार, मित्र किंवा सहकारी त्यांना काय वाटतंय, त्यांना काय म्हणायचं आहे ते समजून घेत असेल. पण कितीही जवळचं नातं असलं, तरी कोणीही समोरच्याचं मन वाचू शकत नाही. ‘मला मदतीची गरज आहे हे तुला माहित नव्हतं का?’, ‘मला वाटलं की, तू मुलांना घ्यायला जाणार आहेस.’ या उदाहरणांमधून समजून घेण्याबाबतचे गैरसमज दिसून येतात.
एखाद्याचा स्वभाव किंवा वागणूक कायम राहील असं गृहित धरणं
अशा गृहितकांमुळे माणसं एका ठरावीक ओळखीत अडकतात आणि त्यांची वाढ खुंटते. हे वर्तन क्षमा, बदल आणि नात्यांच्या उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेली दारं बंद करतं. उदाहरणार्थ, ‘तो कधीच बदलणार नाही’, ‘ती आधी असंच वागली, ती पुन्हा तशीच वागेल’, असं मानणं आणि त्यानुसार वागत राहणं.
वाईट गृहितक आणि नकारात्मक प्रतिक्रिया
आपण दुसऱ्याचे हेतू जितके वाईट समजतो, तितकेच आपण स्वत: कटू बनतो आणि यामुळे नातं खरंच बिघडण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ, ‘ती उत्तर देत नाही, म्हणजे ती मला टाळते.’ ‘त्यांनी मला बोलावलं नाही, म्हणजे त्यांना मी नको आहे.’, हे असं मानून आपण स्वत: कडवट बनतो.
गृहित धरण्याच्या प्रवृत्तीमागे भीती, असुरक्षितता, भूतकाळाचे अनुभव, अहंकार आणि संवादकौशल्याचा अभाव ही सूक्ष्म पण प्रभावी कारणं असतात. सत्य समजल्याने आपण स्वत: किंवा समोरची व्यक्ती दुखावली जाईल या भीतीने आपण प्रश्न न विचारताच आपल्याला सोयीचे निष्कर्ष काढतो. भूतकाळातील जखमा नव्या नात्यांवर लादल्या जातात आणि प्रत्येक कृती आपल्याला संशयास्पद वाटते. अहंकारामुळे चूक मान्य करणं जड जातं, तर संवादकौशल्य नसेल तर भावना व्यक्त करता येत नाहीत. परिणामी, गृहितकं वाढत जातात आणि नात्यांमध्ये अंतर निर्माण होतं.
या गृहितकांचा भावनिक परिणाम खूप खोलवर होत असतो. गैरसमज वाढतात. एकमेकांवरील विश्वास हळूहळू कमी होतो. थेट संवादाऐवजी गृहितकांवर आधारित संवादामुळे वादविवाद निर्माण होतात आणि नात्याचं खऱ्या अर्थाने पोषण होण्याऐवजी त्यात तणाव वाढतो. उदाहरणार्थ, एका स्त्रीला तिचा जोडीदार खूप शांत वाटतो. यातून ती गृहित धरते की तो तिच्यावर प्रेम करत नाही. दोघंही परस्परांशी काही बोलत नाहीत आणि नातं थंडावतं. मात्र जेव्हा प्रत्यक्ष संवाद होतो, तेव्हा समजतं की तो आपल्या नोकरीतील असुरक्षित वातावरणामुळे चिंतेत होता. कार्यालयातही हेच घडतं. एक कर्मचारी वाट बघते की, बॉस तिच्या कामाची दखल घेतील. तसं होत नाही तेव्हा ती कामात कमी रस दाखवते. वस्तुस्थिती अशी असते की, बॉस स्वतः वैयक्तिक समस्यांमुळे गोंधळलेले होते. तसंच घरातही होतं. पालक गृहित धरतात की, मुलगा आळशी आहे. कारण तो सतत खोलीत एकटाच असतो. पण प्रत्यक्षात तो मानसिक तणावात असतो आणि आपली भावना शब्दांत मांडण्यात अयशस्वी ठरतो. या तिन्ही उदाहरणांमध्ये एक गोष्ट ठळकपणे दिसते - संवादाऐवजी काही गृहितकं मनात बाळगल्याने नातं कमजोर होत जातं. माणसं परिपूर्ण नसतात. पण स्पष्ट संवादामुळे त्यांच्यात प्रेम, सन्मान, समज, बदल आणि जवळीक वाढते.
गृहित धरणं टाळण्यासाठी
गृहित धरणं टाळण्यासाठी जागरूक आणि संवेदनशील राहणं आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम, मनातल्या मनात एखादा निष्कर्ष काढण्याऐवजी प्रश्न विचारण्याची सवय लावावी. ‘तू असं का केलंस?’ हा साधा प्रश्न अनेक गैरसमज दूर करू शकतो. आपल्या गृहितकांना वास्तवाचं अधिष्ठान आहे का, हे स्वतःला विचारणं महत्त्वाचं.
संवादात प्रामाणिकपणा ठेवावा - ‘मला वाईट वाटलं की तू फोन केला नाहीस’, अशा प्रकारे भावना स्पष्टपणे मांडल्यास समोरच्याला आपली स्थिती समजेल.
भावनिक समज वाढवावी - आपल्या भावना ओळखून त्या दुसऱ्यावर लादू नयेत.
प्रत्येक वेळी माणसाला नवीन दृष्टिकोनातून समजून घेण्याची तयारी ठेवावी - ‘तो नेहमीच असाच असतो’, असं पालुपद लावणं चुकीचं ठरू शकतं. कारण काळ आणि प्रसंग यातून माणसं सतत बदलत असतात.
हे उपाय अंमलात आणल्यास नाती अधिक प्रामाणिक, सुसंवादपूर्ण आणि विश्वासार्ह होतील.
‘गृहितकं’ हे नात्यांमधील न बोलणारे शत्रू आहेत. ते संवाद नष्ट करतात, विश्वास हरवतात आणि नातं संपवतात. त्यामुळे गृहित धरणं टाळून जाणीवपूर्वक संवाद साधणं हेच प्रत्येक नातं टिकवण्याचं गुपित आहे.
मनोचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता.