बेला गावच्या सरपंच शारदा गायधने.  
अक्षररंग

एक महिला सरपंच काय करू शकते?

'गाव करील, ते राव काय करील' असे उच्चारवाने बोलले जात असले तरी एक महिला सरपंच काय करू शकते हे पाहायचे असेल, तर महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील बेला या गावाला आवर्जून भेट द्यायलाच हवी. नवे काही करण्याची उर्मी मनात असेल व त्याला गावकऱ्यांची कृतिशील साथ असेल, तर 'आकांक्षांपुढती गगन ठेंगणे' होऊन जाते. या गावाने आपल्या कल्पक व नावीन्यपूर्ण प्रयोगातून हेच सिद्ध करून साऱ्या देशात नाव कमावले आहे...

नवशक्ती Web Desk

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

'गाव करील, ते राव काय करील' असे उच्चारवाने बोलले जात असले तरी एक महिला सरपंच काय करू शकते हे पाहायचे असेल, तर महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील बेला या गावाला आवर्जून भेट द्यायलाच हवी. नवे काही करण्याची उर्मी मनात असेल व त्याला गावकऱ्यांची कृतिशील साथ असेल, तर 'आकांक्षांपुढती गगन ठेंगणे' होऊन जाते. या गावाने आपल्या कल्पक व नावीन्यपूर्ण प्रयोगातून हेच सिद्ध करून साऱ्या देशात नाव कमावले आहे...

एकेकाळी बेला गावात महिला आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याच्या समस्या प्रकर्षाने जाणवत होत्या. महिलांमध्ये गर्भाशयाचे आजार, हिमोग्लोबिनची कमतरता आणि मुलींमधील शारीरिक बदलांमुळे उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न आढळून येत होते. त्यावर तज्ज्ञांशी चर्चा केल्यावर एक धक्कादायक वास्तव समोर आले, ते म्हणजे गावकऱ्यांच्या सर्व आरोग्याचे प्रश्न बिघडलेल्या हवामानाशी आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाशी निगडित होते. वाढत्या प्रदूषणाने गावात ऑक्सिजनची पातळी कमी होऊन कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले होते. त्याचा थेट परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होत होता. या अनारोग्य परिस्थितीवर मात करण्यासाठी एक सावित्रीची लेक पुढे आली. ती गावची सरपंच झाली आणि बघता बघता एका प्रदूषणग्रस्त गावाची आरोग्यदायी अन् निसर्गरम्य 'देवराई' झाली...

नागपूरपासून साधारण ६० किलोमीटर अंतरावर वसलेल्या बेला या गावाची लोकसंख्या १२ ते १३ हजारांच्या आसपास आहे. शहरालगत असूनही या गावाने आपली पर्यावरणाशी असलेली नाळ तुटू दिली नाही, उलट ती अधिक घट्ट केली आहे. या परिवर्तनाच्या मुख्य सूत्रधार ठरल्या आहेत, बेला गावच्या सरपंच शारदा गायधने. त्यांनी आपले माहेर-सासर एकच असलेल्या बेला गावाला आपल्या सामाजिक कार्यातून एक नवी ओळख करून दिली आहे. त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता त्या आपल्या गावाविषयी भरभरून बोलल्या. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण बोलण्यातून बेला गावाविषयीचा अभिमान ओसंडून वाहत होता. त्यांचे विचार व कार्य ऐकून एक महिला सरपंच सरपंचपदाची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी सर्वप्रथम गावच्या प्रदूषणमुक्तीसाठी थोरामोठ्यांचे विचार ऐकून तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. गावचा हरित विकास काय करू शकते याची नेमकी प्रचिती आली. साधण्यासाठी 'कार्बन न्यूट्रल कमिट्या' स्थापन केल्या. या समित्यांमधील प्रत्येक कार्यकर्त्याने अक्षरशः जीव ओतून काम केले. त्याचे दृश्य आणि अदृश्य परिणाम हळूहळू गावाला दिसायला लागले नाही, तर जाणवायलासुद्धा लागले आहेत.

बेला गावात आधी सात ते आठ हजार झाडे होती. गावात लोकसहभागातून 'प्राणवायू देणाऱ्या' झाडांच्या लागवडीवर प्रामुख्याने भर दिला. वड, पिंपळ, कडुनिंब, बांबू, करंज या देशी झाडांची लागवड केली. त्यासाठी काही नामी युक्त्या वापरल्या. प्रत्येक कुटुंबाला दहा झाडे दत्तक देण्यात आली. जे कुटुंब अधिक झाडे जगविल, त्यांच्यासाठी बक्षिसे जाहीर करण्यात आली. हळदी-कुंकू कार्यक्रमात इतर वस्तू देण्याऐवजी रोपे भेट देण्यास प्रारंभ केला. नवीन लग्न झालेल्या दाम्पत्याने गृहप्रवेशापूर्वी लग्नाची आठवण म्हणून झाड लावणे, वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करणे, कुटुंबातील व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'स्मृती वृक्ष' लावणे अशा नवनव्या उपक्रमांमुळे झाडे लावणे ही एक ग्रामचळवळ बनली. त्यातून वृक्षराजी बहरली व नातीगोतीही फुलली.

बेला गावात पेट्रोल, डिझेलच्या गाड्या खूप. या गाड्या गावच्या प्रदूषणात कमालीची भर घालत होत्या. या संकटाचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतःपासूनच सुरुवात केली. या ग्रामपंचायतीने आपल्या कचरावाहू घंटागाडीला 'ई-व्हेईकल' चा पर्यावरणपूरक पर्याय दिला. त्यानंतर गावातील दुचाकीस्वार, रिक्षावाले, टेम्पोवाले यांच्याशी हितगुज करून त्यांचेही मन वळविण्यात आले. बहुसंख्य रहिवाशांनी 'ई-वाहनांना' पसंती दर्शवल्यानंतर गावात सहा चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली. परिणामी, पेट्रोल-डिझेलवरचा दैनंदिन खर्च अगदी शून्यावर आल्याने गाडीवानदादांचा आनंद द्विगुणित होऊन नफ्यासोबतच शुद्ध हवेचा आनंदही बेला गावच्या रस्त्यावरून ओसंडून वाहू लागला आहे...

बेला गाव सोलरयुक्त गाव करण्याचा दृढनिश्चय केला. गावातील सरकारी इमारतीवर सोलर यंत्रणा बसविण्यात आली. जो कुणी 'रुफटॉप सोलर' लावेल, त्याला मोफत 'ट्रॉली बॅग' देण्याची योजना यशस्वी झाली. परिणामी, गावातील २७०० घरांपैकी २००० घरांचे रुपडे 'सोलर रुफटॉप' ने झगमगून उठले. बघता बघता गावातील अंधारमय रस्ते सौरदिव्यांनी उजळून निघाले. पायवाटा प्रकाशल्या. एका मनाने दुसरे मन उजळून मनामनातील, घराघरातील अंधःकार दूर होतो तो असा...

गावातील प्रत्येक घरात ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी दोन कचराकुंड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरच्या घरी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण होत आहे. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार केले जात असून ते वृक्षलागवडीसाठी वरदान ठरत आहे. तसेच, गावात टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात आहे. टाकाऊ प्लास्टिकचा वापर रस्त्यांच्या सपाटीकरणासाठीही केला जात आहे. गावच्या चौका-चौकांमध्ये टाकाऊ रबर, प्लास्टिक अथवा पोलादाचा पुनर्वापर करून आकर्षक सजावट केली आहे. कचरा ही समस्या नसून अनेकांच्या उपजीविकेचे साधन व जगण्याचा आधार बनला आहे आणि तो गावच्या सौंदर्यातही भर घालत आहे, हे विशेष.

बेला गावात श्रमदानातून खेळाचे मैदान विकसित करण्यात आले आहे. मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. गावात फटाक्यांवर बंदी असल्याने ध्वनिप्रदूषणाला आळा बसला आहे. प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्या सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, कापडी पिशव्या तयार करण्याचे काम गावातीलच महिला बचत गटांना देण्यात आले आहे. काही महिलांना रिक्षा चालवण्याचे, तर काहींना संगणक प्रशिक्षण देण्यात आले आहे. महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धाही भरवली जात आहे. २५ एप्रिलच्या 'राष्ट्रीय पंचायत' दिनी ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार गावातील विद्यार्थ्यांकडे सोपवून त्यांना समाजकार्याचे बाळकडू पाजण्यात येत आहे. एवढेच काय, गावातील हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनाची गोडी वाढवण्यासाठी त्यांना ग्रामपंचायतीमार्फत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची ('इस्रो') ज्ञान-विज्ञानमयी विमान सफर घडवून आणली जात आहे. आजवर आठ विद्यार्थ्यांना 'इस्रो'चे कार्य जवळून पाहण्याची संधी मिळाली आहे. ही गुणवंतांची हवाई वारी ठरलीय 'सबसे न्यारी.'

बेला गावाला आजवर अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. 'माझी वसुंधरा' अभियानात १.२५ कोटी रुपये आणि 'राष्ट्रीय पंचायत कार्बन न्यूट्रल पुरस्कारा'द्वारे १ कोटी रुपयांचे पारितोषिक गावाला मिळाले आहे. अवघ्या अडीच वर्षांत या गावाने विविध स्पर्धांतून एकूण ३.२५ कोटी रुपयांच्या रोख बक्षिसांची कमाई केली आहे. आज बेला गाव केवळ स्वच्छ, सुंदर, हरितच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या अधिक स्वावलंबी झाले आहे. एक महिला सरपंच लोकसहभागातून काय साध्य करू शकते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या स्फूर्तिदायी विचार-कार्याला मनोमन प्रणाम.

prakashrsawant@gmail.com

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचाच विजय! युगेंद्र पवारांचा २ लाखांहून अधिक मताधिक्याचा दावा

सूर्य कोपतोय! राज्यात आज उष्णतेची तीव्र लाट; २३ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Mumbai : एशियाटिक निवडणुकीचा मार्ग मोकळा; निवडणुकीच्या प्रस्तावित प्रक्रियेचा कालबद्ध आराखडा सादर करण्याचे निर्देश

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अमीर हमजावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार; लाहोरमधील जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी