

पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास युवा नेते युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. बारामतीकरांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येत दिवंगत अजित पवारांना खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी सुनेत्रा पवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रचारादरम्यान बोलताना युगेंद्र पवार यांनी मतदानाची टक्केवारी वाढल्यास मताधिक्य दोन लाखांच्या पुढे जाऊ शकते, असेही नमूद केले. या निवडणुकीत पवार कुटुंबातील तरुण पिढी मोठ्या संख्येने प्रचारात उतरली असून रोहित पवार, जय पवार आणि इतर सदस्य गावोगावी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. कौटुंबिक एकीचे दर्शन घडवत सर्वजण एकाच उमेदवारासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसने उमेदवार माघारी घेतला असून भाजपने पाठिंबा दर्शवल्यामुळे निवडणूक सुनेत्रा पवारांसाठी तुलनेने सोपी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र अनेक उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
भाजपवर रोहित पवारांचा निशाणा
आमदार रोहित पवार यांनीही प्रचारात उतरत भाजपवर टीका केली. करुणा मुंडे यांच्या उमेदवारीवरून भाजपच्या डावपेचांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बारामतीतील मतदार राजकीय समीकरणे ओळखून योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी १३ उमेदवार मतदारसंघाबाहेरील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भूतकाळात बारामतीच्या राजकारणात हस्तक्षेप न करण्यामागील कारण स्पष्ट करताना, खासदार सुप्रिया सुळे आणि दिवंगत अजित पवार यांच्यासारखे सक्षम नेतृत्व असताना तिसऱ्या पिढीने हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती, असे त्यांनी नमूद केले.
डीजीसीएच्या प्राथमिक अहवालावर शंका
दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीबाबतही युगेंद्र पवार यांनी प्रश्न उपस्थित करत डीजीसीएच्या प्राथमिक अहवालावर शंका व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य मुख्यमंत्रीपदाबाबत युगेंद्र पवार म्हणाले की, अशी संधी मिळाल्यास त्याचे स्वागतच केले जाईल आणि पक्षाकडून पूर्ण पाठिंबा दिला जाईल.