भूत भगिनी 
अक्षररंग

भूत भगिनी

भूत-भूत खेळता खेळता नेहाला आईचाच आवाज दोन ठिकाणांहून ऐकू आला... आणि क्षणात सगळं घर एका रहस्यमय गूढात हरवून गेलं.

नवशक्ती Web Desk

कथा

ईशान पुणेकर

भूत-भूत खेळता खेळता नेहाला आईचाच आवाज दोन ठिकाणांहून ऐकू आला... आणि क्षणात सगळं घर एका रहस्यमय गूढात हरवून गेलं.

“आपण भूत-भूत खेळूया!” नेहा म्हणाली.

“चालेल! मज्जा!” रिया म्हणाली.

खरं तर यात नवीन काहीच नव्हतं. हा त्यांचा नेहमीचा खेळ होता. नेहाच्या आईला तो अजिबात आवडत नसे. “हा कसला घाणेरडा खेळ? शी बाई!” असं ती वैतागाने नेहमीच म्हणायची आणि या दोघी तरीही तो खेळ नेहमीच खेळायच्या. लहानांचे खेळ मोठ्या मंडळींना बऱ्याचदा आवडतच नाहीत.

रिया नेहाच्या शेजारी राहायची. ती एक रो-हाऊसेसची कॉलनी होती. रो-हाऊस म्हणजे एका रांगेतली, एकसारखी घरं. त्यांची घरं तीन मजली होती.

नुकताच अंधार पडला होता. आईचं काही काम चालू होतं. रिया आणि नेहा सगळ्यात वरच्या मजल्यावर गेल्या. तिथल्या खोल्या मोठ्या होत्या. भरपूर खिडक्या, तेवढेच पडदे आणि भरपूर फर्निचर तिथे होतं. म्हणजे खेळायला आणि लपायला एकदम मस्त मस्त जागा आणि दुसऱ्याला घाबरवायलासुद्धा!

खिडक्या लावायच्या, पडदे लावायचे. अंधार करायचा. जितका अंधार जास्त तितकी मजा जास्त. मग पडद्यामागे किंवा कपाटाच्या आडोशाला लपायचं. हालचाल करायची नाही. एकदम शांत. अंगावर एखादी चादर घ्यायची अन् समोरच्याला जाम घाबरवायचं. अंधारात चित्रविचित्र आवाज काढले की, भीती ही वाटतेच. असाच तर त्यांचा खेळ होता.

रिया कुठे लपली कुणास ठाऊक?

नेहा तिला शोधू लागली. बापरे! ती सापडेचना. आता ती केव्हाही धप्पकन तिच्यासमोर येणार होती… भूत-भूत म्हणून ओरडत! नेहा घाबरली.

त्याचवेळी खालच्या मजल्यावरून आईचा आवाज आला. “नेहा, खाली ये. तुझ्या आवडीची चॉकलेट्स आणली आहेत.” झालं! चॉकलेट्स म्हणल्यावर, नेहा खेळ सोडून पळाली खाली. ती दुसऱ्या मजल्यावर आली आणि कोणीतरी तिचं तोंड दाबलं. एकदम घट्ट!

हा काय प्रकार रियाचा? ती ओरडली, “रिया सोड सोड. पण नाही. ती पकड तशीच राहिली.”

बापरे! हे काहीतरी भयंकर होतं. कोणीतरी तिचं तोंड असं दाबलं होतं की, ते हलवणं शक्य नव्हतं की ओरडणं. मग ते होतं तरी कोण? एखादं भूत की रिया? पण ती बारकुडी तर वर होती अन् तिच्या अंगात तेवढी शक्तीच नव्हती. नेहाने धडपड करण्याचा खूप प्रयत्न केला, ओरडण्याचा खूप प्रयत्न केला. पण नाही! काहीच उपयोग झाला नाही. मग मात्र ती खरंच घाबरली.

त्याचवेळी तिला आवाज ऐकू आला. अगदी जवळून.

“मुळीच खाली जाऊ नकोस! तो आईचा आवाज

मीही ऐकलाय.”

ही तर आई बोलत होती कानापाशी आणि तीच सांगतीये, खाली जाऊ नकोस. तो आईचा आवाज मीही ऐकलाय म्हणून. भयंकर! फारच भीतीदायक होतं हे सगळं. म्हणजे तोंड आईने धरलं होतं तर. ती आपल्या शेजारीच आहे. तिने तो आवाज ऐकलाय, तर मग खाली कोण आहे? आईच्या आवाजात बोलणारं भूत? ती घाबरली. पण घाबरायचं कशाला? आई होती ना शेजारी. पण आईने तोंड असं का दाबलं? अन् तेही एवढ्या जोरात? शेजारी असलेली आई तरी खरी आहे का?...

म्हणजे भूत आहे हे नक्की. पण ते तळमजल्यावर आहे की आपल्या शेजारी? आता मात्र तिची भीतीने पूर्णच गाळण उडाली. तिच्या छातीतली धडधड वाढली.

रिया एका भल्यामोठ्या फुलदाणीमागे लपली होती. तिला नेहा खाली गेल्याचं जाणवलं. ती तिला शोधत वरून खाली आली. नेहाच्या आईने तिला दबक्या आवाजात हाक मारली,

“रिया रिया..”

आणि त्या बोलण्यात नेहाच्या तोंडावरचा हात बाजूला झाला. तिने झटकन वळून मागे पाहिलं. तिची आईच तर होती मागे. पांढऱ्या रंगाच्या कोऑर्ड ड्रेसमध्ये. पण तोपर्यंत वेडी रिया, खालच्या मजल्यावर पळाली होती. आता ती नक्कीच खाली असलेल्या भुताच्या तावडीत सापडणार होती.

“आई - रिया रिया-” धपापत्या आवाजात ती आईला म्हणाली. तेवढ्यात खालून आवाज आला, “अरे नेहा बेबी..” आईचा आवाज- पुन्हा आईचा आवाज!

मग तिच्या शेजारची आई ओरडली, “ए, सोड तिला! नेहाला तर मी धरलंय!” हादेखील आईचाच आवाज.

खालचं भूत रियाला नेहा समजलं होतं तर आणि मग खाली एक अन् वर दुसरं अशी दोन दोन भुतं होती की काय? तसं असेल तर मग वाटच लागली. अरे देवा!... दोन भुतं दोन गरीब बिचाऱ्या मुलींना धरणार होती अन् आई?... ती कुठे गेली?... फुल भुताटकी!

आणि मग शेजारची आई हसू लागली. जोरजोरात हसू लागली. नेहाला तर काही कळेच ना. नक्की चाललंय तरी काय? मग आईने नेहाला तळमजल्यावर नेलं. तिथे हॉलमध्ये एक अनोळखी बाई बसलेली होती. मग ती बाई म्हणाली, “नेहा बेबी, ओ कम माय डियर!”

बाब्बा! हे भूत तर पार इंग्लिशमध्ये बोलतंय अन् मुलांना फसवायला वर चॉकलेटची लालूच दाखवतंय की काय?... नेहा डोळे विस्फारून, घाबरून तिच्याकडे नुसती पाहतच राहिली. साहजिकच आहे ना.

पण एक होतं- ती बाई दिसायला अजिबात म्हणजे अजिबातच डेंजर नव्हती. डोळेबिळे वटारलेले नव्हते, केसही पिंजारलेले नव्हते. पांढरी साडी वगैरे असं काहीच नाही. उलट ती दिसायला एकदम गोंडस, गब्दुल बाई होती. तिच्यासारखाच बॉबकट असलेली. चक्क निळ्या-जांभळ्या फुलांचा फ्रॉक घातलेली.

भलतंच भूत होतं ते! तिला वाटलं होतं तसं डेंजर काहीच नव्हतं. मग आईने सांगितलं, “अगं, ही माझी सख्खी चुलतबहीण शमा. अमेरिकेत असते. पहिल्यांदाच आली आहे आपल्या घरी. तुला भेटायला. तुला तिने याआधी कधी पाहिलेलं नाही ना.”

आणि त्या मावशीबाई म्हणाल्या, “बरं का नेहा बेबी, गंमत अशी आहे की, आमच्या दोघींचा आवाज अगदी सेम टू सेम आहे!” ते अगदी खरंही होतं. कारण हे सगळं ती आईच्याच आवाजात बोलत होती. दोघी बहिणी दिसायला अगदीच वेगळ्या. पण दोघींचा आवाज मात्र सेम! देव पण ना गमतीच करतो.

मावशीबाई पुढे म्हणाल्या, “मग तुझी आई म्हणाली की, या पोरी ना भुताचा खेळ खेळतात. तिला ते अजिबात आवडत नाही. मग मी तिला म्हणाले, आपण या दोघींची मजा करू या अन् त्यांना भीती दाखवू या. त्यांच्याच पद्धतीने, भूत बनून.”

अशा रीतीने सगळा उलगडा झाला. दोन्ही छोट्या पोरी हसू लागल्या. त्यांनी मावशीने आणलेली भारी चॉकलेट्स खाल्ली. त्यावेळी नेहा म्हणाली, “आई, किती जोरात तोंड आवळलंस गं माझं.”

त्यावर आई म्हणाली, “चुकून गं राणी” आणि तिने तिला लाडाने जवळ घेतलं. तेव्हा नेहाला खूप बरं वाटलं.

रियाला वाटलं की, वरच्या मजल्यावर पडद्यामागे ही मावशी आली ना अंधारात तर- तिच्या तोंडावर चादर टाकून तिला चांगली भीती दाखवली असती! आम्हाला अशी छळते काय? पण ती काही बोलली नाही. चॉकलेट खात ती गप्प बसली.

तेव्हा नेहा म्हणाली, “आई, ही आयडिया भारी आहे हं! लोकांना घाबरवण्याची. आपण हीच ट्रिक वापरूया आणि बाबा आले की त्यांना घाबरवू या.”

त्यावर आई आणि मावशी दोघी हसू लागल्या.

“नको गं बाई. ते नाही फसणार. त्यांना हे सगळं माहिती आहे- आमच्या आवाजाची गंमत. उलट ते आमच्या दोघींना नेहमीच चिडवतात भूतभगिनी म्हणून. बाबांनी हा शब्द तुझ्या आजोबांचा ढापलाय” आणि त्यांना एकदम त्यांच्या लहानपणीची आठवण आली.

त्यावेळी आई अन् मावशी, दोघी एकदमच लहान मुलींसारख्या ओरडल्या. एकाच आवाजात- भूतभगिनी!

मोठ्यांनी काय- काहीही केलं तरी चालतं.

ज्येष्ठ साहित्यिक

Bip499@hotmail.com

Mumbai : ठाकरे बंधूंची आज दादरमध्ये विजयी सभा; तरुणांनी भीती घालवली - उद्धव ठाकरे

Mumbai : मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून १३६.१० कोटींचे उत्पन्न

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईत तस्करीपेक्षा अमली पदार्थ सेवनाचे गुन्हे अधिक; ड्रग्जविरोधात पोलिसांचे युद्ध

Mumbai : जन्म दाखल्यासाठी सॉफ्टवेअर आणणार; मानखुर्द, कुर्ल्यातील दाखल्यांचा तत्काळ निपटारा करा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश