विशेष
अच्युत पालव
अक्षर हा केवळ आकार नसून तो एक ‘श्वास’ आहे; तंत्रज्ञानाच्या युगातही हाताने लिहिण्यातील ओलावा जपणं हीच खरी कलासाधना आहे.
पंधरा एप्रिल अर्थात ‘जागतिक कला दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र एक सुलेखनकार म्हणून मी या दिवसाकडे आणि एकूणच कलेच्या विषयाकडे अत्यंत डोळस आणि एका वेगळ्या नजरेने पाहत आलो आहे. गेली पंचेचाळीस वर्षे मी या क्षेत्रात सतत कार्य करतोय. माझ्या या प्रवासाची सुरुवात १९७३ साली फळ्यावर नाव लिहिण्यापासून झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत माझ्या हातातली लेखणी किंवा ब्रश थांबलेला नाही, मी सतत लिहितच आहे. मुळात लिहिणं, वाचणं आणि वाचून जे समजलं ते पुन्हा एकदा कागदावर उतरवणं, ही एक अतिशय सुंदर प्रक्रिया आहे आणि हीच ‘प्रोसेस’ मी अनेक वर्षांपासून अनुभवतोय. जेव्हा मी या प्रक्रियेकडे पाहतो, तेव्हा ती एक ‘कला’ म्हणून कशी दिसेल, यापेक्षाही ती जास्त देखणी कशी होईल आणि लोकांच्या मनात ती कायमचं घर कसं करून राहील, याकडे माझा ओढा जास्त असतो. आज जेव्हा संपूर्ण अक्षर कलेकडे एक जागतिक दृष्टिकोन ठेवून पाहत आहे, तेव्हा प्रकर्षाने जाणवतं की, आपल्या भारतामध्ये कलांचा केवढा मोठा अनमोल ठेवा आहे. आपल्याकडे प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र कला आहे, प्रत्येक वाद्याचा एक विशिष्ट रंग आणि पोत आहे. अगदी तसाच, भारताकडे समृद्ध अशा विविध लिप्यांचा वारसा आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तुम्ही फिरलात तर पावलापावलावर तुम्हाला एका वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण लिपीचा अनुभव येतो. मला मनापासून असं वाटतं की, या सगळ्या वैविध्यपूर्ण लिप्यांचं कुठेतरी योग्य पद्धतीने डॉक्युमेंटेशन व्हायला हवं. हे वैभव लोकांपर्यंत पोहोचायला हवं. लोकांना कला म्हणजे काय, हे केवळ शब्दांत सांगण्यापेक्षा त्यांनी ती प्रत्यक्ष वाचली, पाहिली आणि अनुभवली तर त्यात जास्त मजा येईल.
आपण स्वतःला ‘कलाकार’ म्हणवून घेण्यापेक्षा कलेशी एक घट्ट नातं जोडणं जास्त महत्त्वाचं आहे. महान साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येकाने जगण्यासाठी किमान एका कलेशी तरी स्वतःला जोडून घेतलं पाहिजे. जर तुम्ही कलेशी असं नातं जोडलंत, तर तुमचं जगणं अधिक समृद्ध, छान आणि सुंदर होऊ शकतं. आजच्या या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला असं वाटायला लागलं आहे की, फक्त एक बटन दाबलं की सगळं काही सहज मिळतं, पण वास्तवात तसं नाहीये. कला ही केवळ बटन दाबून मिळत नाही; ती शिकावी लागते, तिचा अनुभव घ्यावा लागतो आणि प्रत्यक्ष कृतीतून ती साकारावी लागते. ती कला चांगली आहे की वाईट, या वादात पडण्यापेक्षा तुम्ही तिचा आनंद कसा घेता आणि तो अनुभव इतरांना कसा देता हे जास्त महत्त्वाचं आहे.
आजच्या डिजिटल युगात अक्षरकलेचं स्वरूप किती बदललं आहे, हे आपण पाहतोच. तंत्रज्ञानामुळे गोष्टी सोप्या झाल्या आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की बोटाच्या एका क्लिकवर सगळं साध्य होईल. परंतु, तंत्रज्ञानात एक प्रकारची कृत्रिमता असते. कलाकृतीमध्ये ती कृत्रिमता नसून ‘जिवंतपणा’ असायला हवा आणि हा जिवंतपणा जर आणायचा असेल, तर हाताने काम करणं अनिवार्य आहे; हे मी ठामपणे सांगतो.
एखादं अक्षर म्हणजे नेमकं काय असतं? त्या अक्षराची उभी रेषा, त्याची आडवी रेषा, त्याचे वळणदार कर्व्हज्, त्याची जाडी-बारीक असण्याचं प्रमाण हे सगळं जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने अनुभवत नाही, तोपर्यंत तुम्ही संगणकाच्या पडद्यावर त्याचा खरा आनंद कधीच घेऊ शकणार नाही.
आज चॅट जीपीटीसारख्या तंत्रज्ञानामुळे कोणालाही असं वाटू शकतं की, आपल्या आईला पत्र लिहायचं असेल तर पाच मिनिटांत लिहून मिळेल. तंत्रज्ञान तुम्हाला शब्द देईलही, पण त्या शब्दांत आईच्या, बाबांच्या, भावाच्या किंवा मित्राच्या आठवणींमधला तो ओलावा आणि जिवंतपणा कुठून येणार? त्या आठवणी केवळ आपल्याला माहीत असतात, त्या चॅट जीपीटीकडे नसतात. डिजिटल जगात आपण इतके अडकलो आहोत की प्रत्येक गोष्ट ‘डिलीट’ करत सुटतो. ही ‘डिलीट’ करण्याची वृत्ती इतकी वाढली आहे की, एका दिवशी आपण स्वतःच डिलीट होऊन जाऊ की काय, अशी भीती वाटते. कारण आपल्याला नेमकं काय हवंय हेच आपण विसरून जातोय. मात्र, यामुळे मानवी सौंदर्य धोक्यात आलंय असं मला वाटत नाही. उलट, तुमच्याकडे असलेल्या मानवी सौंदर्याच्या जाणिवेतून जर तुम्ही संगणकाला योग्य फीडबॅक दिलात, तर त्यातून अधिक चांगल्या गोष्टी नक्कीच घडू शकतात.
तंत्रज्ञानामुळे आज असंख्य फॉन्ट्स उपलब्ध झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण मराठीच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी आहे; मराठीत अजूनही तुलनेने खूप कमी फॉन्ट्स आहेत. आता प्रत्येकाला वाटतं की माझं लिखाण हाच माझा फॉन्ट होऊ शकतो, जे एका मर्यादेपर्यंत शक्यही आहे. पण एखादी गोष्ट हाताने गिरवण्यात जो मानवी स्वभाव उतरतो आणि त्यातून जो सौंदर्याचा आविष्कार होतो, तो अनन्यसाधारण असतो. मी गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे रोज एक अक्षर गिरवत आहे आणि या सातत्यपूर्ण सरावात, गिरवण्यात एक वेगळाच आनंद दडलेला आहे. कधी एखादी कविता असते, कधी एखादा सुंदर परिचय असतो, कधी शेक्सपिअरचं एखादं अजरामर वाक्य असतं, तर कधी कुसुमाग्रजांच्या ओळी असतात. हे सगळं वाचून, त्यातला आनंद घेऊन जेव्हा मी ते पुन्हा लिहितो, तेव्हा मला त्यातील बारकावे आणि कधी कधी स्वतःच्या उणिवाही जाणवतात. हे गिरवणं तुम्हाला कलेचा आस्वाद घेण्यापासून कधीच रोखत नाही, उलट अधिक जवळ नेतं.
माझ्या मते, एक अक्षर हा केवळ आकार नसून तो एक श्वास आहे. लिपीचा आत्मा किंवा कलेचा आत्मा हा तुमच्या उच्चारामध्ये दडलेला असतो. तुम्ही एखादं अक्षर कसं उच्चारता, त्याच लयबद्ध पद्धतीने ते कागदावर उतरवावंसं वाटतं. मी जेव्हा ‘व्हेरिएशन ऑफ देवनागरी’ कार्यशाळा घेतो, तेव्हा हेच सांगतो की, स्केच पेनने लिहिलेलं वेगळं असतं, मार्करने लिहिलेलं वेगळं असतं आणि ब्रशने उमटवलेलं अक्षर वेगळं असतं. हेच तर खरं सौंदर्य आहे. हे सौंदर्य तेव्हाच व्यक्त होतं जेव्हा शब्दांमधला आत्मा लेखणीतून प्रकट होतो. उदाहरणार्थ, ‘नभं उतरू आलं, चिंब थरथरवलं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात’ असं पावसाचं वर्णन करणारी कविता असेल, तर ती लिहिताना त्या शब्दांमधला ओलावा आणि आनंद मला माझ्या अक्षरातून व्यक्त करता आला पाहिजे. हीच सुलेखनाच्या व्याकरणाची खरी भाषा आहे. प्रत्येक माणूस हे अनुभवत असतो, फक्त ते व्यक्त करण्याचं धाडस किंवा संधी त्याला मिळत नाही. जर या व्यक्त होणाऱ्या भावनेला आनंदाची जोड दिली, तर सुलेखन एका वेगळ्याच उंचीवर जाईल.
काळानुसार तंत्रज्ञान बदललं आहे. पूर्वी एखादं पोस्टर करायचं असेल तर प्रत्येक साइजसाठी वेगळी मेहनत घ्यावी लागायची, त्यामुळे हातांना काम मिळायचं आणि वेळही लागायचा. आज तंत्रज्ञानामुळे एका पोस्टरच्या हजारो साइजेस क्षणात होतात. काही लोकांना वाटतं की, यामुळे कामगार वर्ग बेकार झाला आहे, ज्यांनी तंत्रज्ञान आणि हस्तकला यांचा योग्य मेळ घातला आहे, त्यांच्याकडे जग एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. आज माझ्या पेंटिंगच्या हव्या तेवढ्या रिप्रिंट्स मी काढू शकतो आणि अनेकांना देऊ शकतो, ही तंत्रज्ञानाची जमेची बाजू आहे. कलेचं स्थान आजही तेच आहे, फक्त आपण त्याकडे पाहण्याचं आपलं स्वरूप बदललं पाहिजे. आजच्या तरुण पिढीला मात्र सगळं काही दोन तासांत किंवा दोन मिनिटांत शिकायचं असतं. आम्ही जेव्हा सुरुवात केली, तेव्हा ‘ब्राम्हणे बाळबक्षरी घडसून करावे सुंदर’ या तत्त्वावर काम करायचो. म्हणजे प्रत्येक अक्षर घासून-पुसून, मेहनत घेऊन सुंदर करण्यावर आमचा भर असायचा.
माझ्या मते अक्षर हे जिवंत असतं आणि ते चिरंतर जिवंतच राहणार आहे. ‘अ’ आणि ‘क्षर’ म्हणजेच ज्याचा कधीच नाश होत नाही, ते ‘अक्षर’. या अक्षरांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जर आपण बदलला, त्यांच्याशी मैत्री केली, नियमित वाचन आणि लेखन केलं, तर त्यातील अर्थाचा खरा शोध लागेल. आज आपण तंत्रज्ञानाच्या ओघात आपली मातृभाषा लिहिणं कुठेतरी विसरत चाललो आहोत आणि तंत्रज्ञान म्हणजे सर्वकाही, हा जो भाव निर्माण झाला आहे तो चुकीचा आहे. तंत्रज्ञानाची गरज नक्कीच आहे, पण तंत्रज्ञान आणि आपली मानवी सर्जनशीलता यांचा मिलाफ झाला तर खूप छान काम उभं राहू शकतं. जागतिक कला दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की- नियमित लिहा, नियमित वाचा आणि तुमच्या भावनांना अक्षरांच्या रूपात कागदावर उतरवा.
लेखक पद्मश्री पुरस्कारप्राप्त असून जगप्रसिद्ध सुलेखनकार आहेत.