साधक-बाधक
क्रांती गोडबोले-पाटील
मूकपटाच्या कृष्णधवल पडद्यावर शब्दांशिवाय जगाला हसवणारा आणि रडवणारा चार्ली चॅप्लिन हा मानवी संघर्षातून उमललेला एक अजरामर आणि वैश्विक हास्य-किमयागार आहे.
मानवी भावनांच्या अथांग महासागरात हास्य आणि आसू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं म्हटलं जातं. पण शब्दांचा आधार न घेता जगाला एकाच वेळी खळखळून हसवणारा आणि डोळ्यांच्या कडा ओल्या करायला लावणारा एकच किमयागार या पृथ्वीतलावर होऊन गेला, तो म्हणजे चार्ली चॅप्लिन! चार्ली चॅप्लिन हे नाव जरी उच्चारलं, तरी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटल्याशिवाय राहत नाही. मूकपटाच्या दुनियेतील या सम्राटानं जगाला पोटभर हसवलं, तेही कुठल्याही संवादाशिवाय. केवळ देहबोली आणि चेहऱ्यावरील निरागस भाव या दोनच गोष्टींच्या बळावर प्रेक्षकांशी कसं घट्ट नातं जोडता येतं, याचा वस्तुपाठच चार्लीनं जगाला घालून दिला. मूकपटांच्या कृष्णधवल चौकटीतून बाहेर पडून हा अवलिया आजही आपल्या डिजिटल पडद्यांवर तितक्याच दिमाखात वावरतोय, हीच त्याच्या कलेची खरी ताकद आहे.
चार्लीला हे यश काही सहजासहजी मिळालं नव्हतं. ज्या माणसाने जगाला हसवण्याचा विडा उचलला, त्याचं स्वतःचं बालपण मात्र गरिबीच्या, अभावाच्या आणि कष्टाच्या गडद काळोखात होरपळून निघालं होतं. १६ एप्रिल १८८९ रोजी जन्मलेल्या चार्लीला रंगभूमीचा वारसा त्याच्या आई-वडिलांकडून मिळाला होता. पण नियतीचा खेळ मोठा विचित्र असतो. वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे आणि अकाली निधनामुळे अवघ्या १२ व्या वर्षी चार्लीच्या डोक्यावरचं छत्र हरवलं. त्यानंतर त्याच्या आईनं पोटासाठी केलेले अपार कष्ट चार्लीच्या बालमनावर खोलवर कोरले गेले होते. आईचा आवाज गेल्यामुळे तिची रंगभूमी सुटली आणि तिथूनच चार्लीचा खरा संघर्ष सुरू झाला. लंडनच्या रस्त्यांवर पोटासाठी केलेली धडपड आणि रंगभूमीवरील सुरुवातीचा संघर्ष यातूनच पुढे एका महान कलाकाराचा जन्म झाला. त्याच्या वाट्याला आलेलं हे दुःखच कदाचित त्याच्या विनोदाचं मूळ होतं. तो नेहमी म्हणायचा, “मला पावसात भिजायला आवडतं, कारण तिथे माझे अश्रू कुणाला दिसत नाहीत.” ज्याच्या वाट्याला इतकं रडणं आलं, त्यानेच जगाला निखळ हसणं दिलं, हा मानवी इतिहासातील एक विलक्षण आणि प्रेरणादायी विरोधाभास आहे.
चार्लीची ओळख सांगणारी त्याची विशिष्ट ‘स्टाईल’ आजही जगभरात तितकीच लोकप्रिय आहे. डोक्यावरची ती गोल हॅट, हातातली केनची लवचिक काठी आणि ती जगप्रसिद्ध हिटलर बाजाची मिशी! वास्तविक हिटलरच्या चेहऱ्यावर जी मिशी क्रूरतेचं आणि दहशतीचं प्रतीक वाटायची, तीच मिशी चार्लीच्या चेहऱ्यावर मात्र कमालीची निरागस दिसायची. डाव्या हाताने ती काठी फिरवणं आणि उजव्या हातानं हॅट काढून अदबीनं वाकणं, हे चार्ली इतक्या सहजतेनं करायचा की तीच त्याची जागतिक ओळख बनली. अंगातलं ते घट्ट जॅकेट आणि कमरेत खोचलेली ढगळपगळ पॅन्ट... हा अवतारातला गबाळेपणा त्याच्या चेहऱ्यावरच्या भावविभोर अभिनयाला अधिकच उठाव द्यायचा. त्याच्या चालण्याची ती विशिष्ट ढब आणि संकटात सापडल्यानंतरही त्यातून लीलया बाहेर पडण्याची त्याची कला प्रेक्षकांना वेड लावून जायची. त्यातूनच तो प्रेक्षकांना कधी पोट धरून हसायला लावायचा, तर कधी एका क्षणात भावनाविवश करून सोडायचा. एकाच प्रसंगात हास्य आणि कारुण्य यांचा असा सुंदर मिलाफ साधणारा दुसरा कलाकार होणे केवळ अशक्य!
मूक चित्रपटांच्या काळात जेव्हा तंत्रज्ञान बाल्यावस्थेत होतं, तेव्हा चित्रपटांमध्ये आवाज नसायचा. पण चार्लीसाठी हा आवाज नसणं हेच वरदान ठरलं. त्याने संवादाशिवाय संवाद साधण्याची एक अनोखी भाषा विकसित केली- जी केवळ डोळ्यांना दिसत नव्हती, तर थेट हृदयाला भिडत होती. ‘मेकिंग अ लिव्हिंग’पासून सुरू झालेला त्याचा प्रवास ‘द किड’, ‘द सर्कस’, ‘सिटी लाइट्स’ आणि ‘द ग्रेट डिक्टेटर’सारख्या अजरामर कलाकृतींपर्यंत पोहोचला. ‘द किड’मध्ये त्यानं रस्त्यावरच्या एका अनाथ मुलाला ज्या मायेनं आधार दिला, ते पाहून आजही प्रेक्षकांचे डोळे ओलावतात, तर ‘द ग्रेट डिक्टेटर’मध्ये हिटलरची नक्कल करताना त्यानं हुकूमशाहीवर जे मार्मिक भाष्य केलं, ते आजही जगाला शांततेचा संदेश देतं. चार्लीने केवळ विनोद केला नाही, तर युद्ध, गरिबी, बेरोजगारी आणि सामाजिक विषमतेवर आपल्या अभिनयातून प्रखर भाष्य केलं. म्हणूनच तो केवळ मनोरंजन करणारा विदूषक उरला नाही, तर तो सर्वसामान्यांचा जागतिक हिरो बनला.
आजच्या २१ व्या शतकात, जेव्हा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि हाय-डेफिनिशन ग्राफिक्सच्या युगात आहोत, तेव्हा प्रश्न पडतो की, चार्ली चॅप्लिन आजच्या काळात कालबाह्य झालेत का? किंवा आजच्या रील्स आणि शॉर्ट फिल्म्सच्या जमान्यात तो आपल्याला आजही हसवू शकला असता का? या प्रश्नाचा वैचारिक उहापोह करताना असं लक्षात येतं की, चार्लीची गरज आजच्या काळाला पूर्वीपेक्षाही अधिक आहे. आजचं मानवी जीवन अत्यंत तांत्रिक, कृत्रिम आणि धकाधकीचं झालं आहे. अशा काळात चार्लीचा तो निरागस ‘ट्रॅम्प’ आजही आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करतो. यंत्रयुगात अडकलेल्या माणसाची व्यथा मांडणारा त्याचा ‘मॉडर्न टाइम्स’ हा चित्रपट आजही तितकाच प्रासंगिक वाटतो. आज माणूस मोबाईल आणि सोशल मीडियाच्या यंत्रात अडकला आहे, त्याची अवस्था चार्लीच्या त्या यंत्रातील कामगारासारखीच झाली आहे. त्यामुळे चार्ली आजच्या काळात असता, तर त्याने या डिजिटल गुलामगिरीवर आपल्या मिश्किल शैलीत नक्कीच भाष्य केलं असतं.
चार्लीची कला ही कोणत्याही भाषेची किंवा भौगोलिक सीमेची गुलाम नव्हती. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात राहणारा माणूस, ज्याला इंग्रजी येत नाही किंवा जो लिहायला-वाचायला जाणत नाही, तो सुद्धा चार्लीचे सिनेमे पाहून खळखळून हसतो. हीच ती ‘युनिव्हर्सल लँग्वेज’ आहे, जी चार्लीने साध्य केली होती. आजच्या काळात जिथे विनोदाच्या नावाखाली अनेकदा अश्लिलता किंवा कुणाचे तरी व्यंग काढले जाते, तिथे चार्लीचा विनोद हा अत्यंत सुसंस्कृत आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारा वाटतो. त्याने स्वतःच्या चुकांवर, स्वतःच्या पडण्यावर आणि स्वतःच्या गरिबीवर विनोद केला. स्वतःला कमी लेखून जगाला मोठे करण्याचं कसब त्याच्याकडे होतं. म्हणूनच आजही जगभरात चार्लीसारखे दिसण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात आणि लोक मोठ्या उत्साहाने त्यात सहभागी होतात.
ऑस्करच्या लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित झालेला हा कलाकार केवळ पडद्यावरचा अभिनेता नव्हता, तर तो एक प्रतिभावान दिग्दर्शक, संपादक आणि संगीतकारही होता. आयुष्याच्या उत्तरार्धात राजकीय वादळांमुळे त्याला अमेरिका सोडावी लागली आणि तो स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाला. अखेर २५ डिसेंबर १९७७ च्या ख्रिसमसच्या रात्री, जेव्हा संपूर्ण जग आनंदाच्या उत्सवात होतं, तेव्हा या हास्याच्या जादूगाराने झोपेतच जगाचा निरोप घेतला. पण जाताना त्याने एक अत्यंत मोलाचा विचार मागे ठेवला- “माझं दुःख कुणाच्या तरी हसण्याचं कारण असू शकतं, पण माझं हास्य कुणाच्या दुःखाचं कारण कधीच असू नये.”
आजच्या जागतिक कला दिनाच्या निमित्ताने चार्लीच्या या जीवनप्रवासाकडे पाहताना असं वाटतं की, चार्ली कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. उलट, जोपर्यंत मानवी मनात हळवेपणा जिवंत आहे, जोपर्यंत माणसाला दुःखातून बाहेर पडण्यासाठी हास्याची गरज आहे, तोपर्यंत चार्ली चॅप्लिन आपल्या मनात जिवंत राहील. तो विसाव्या शतकातील मूकपटांचा बादशहा होताच, पण एकविसाव्या शतकातील नैराश्यावर मात करण्यासाठी तो एक उत्तम ‘थेरपिस्ट’देखील आहे. त्याचं ते कृष्णधवल जग आपल्याला आजही रंगीन स्वप्न बघण्याची ताकद देतं. चार्ली चॅप्लिन हे केवळ एक नाव नसून, ते मानवी अस्तित्वातील चिरंतन आनंदाचं, संघर्षाचं आणि निखळ निरागसतेचं एक वैश्विक प्रतीक आहे! अशा या महामानवाला आणि कलेच्या अवलियाला मानाचा मुजरा!
krantip183@gmail.com