प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या गार गोड चवीइतकाच गोड असायचा आमच्या लहानपणीचा आइसक्रीम सोहळा. तो केवळ पदार्थ नव्हता, तर कुटुंब-मित्रांच्या सहवासात रंगणारा एक अविस्मरणीय आनंदउत्सव होता.
जिभेवर ठेवताच क्षणात विरघळणारा आणि विविध स्वादानी जिभेला मनमुराद आनंद देऊन जाणारा पदार्थ म्हणजे आइसक्रीम. जो लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना प्रिय असतो. अनेकांना खाल्ल्यानंतर सर्दी खोकला याला सामोरं जावं लागतं, तरीही ते खाल्ल्याशिवाय काही राहवत नाही. दिल्लीमध्ये म्हणे ऐन कडाक्याच्या थंडीत आइसक्रीम खाण्यासाठी आइसक्रीमपार्लर बाहेर रांगा लागतात. आमच्या लहानपणी Joy आइसक्रीम हा एकच प्रसिद्ध ब्रँड होता आणि त्यात व्हॅनिला किंवा मँगो हा फ्लेवर असायचा. आज अक्षरशः अनेक आइसक्रीम ब्रँड आणि फ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत. अहो मिरचीचं आइसक्रीमसुद्धा मिळतं. मी मात्र अजूनही व्हॅनिला प्रेमीच आहे. आज दुकानात गेलं हवं ते आइसक्रीम आणलं, त्याचा आस्वाद घेतला आणि मोकळं झालं, इतकं सोपं झालंय आइसक्रीम खाणं. पण पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी, आइसक्रीम लाकडी पॉटमध्ये बनवलेलं असायचं. ते आइसक्रीम खाण्याची मज्जा काही औरच होती. तेव्हा हे पॉट भाड्याने मिळायचं. उन्हाळा सुरू झाला की, दोन तीन वेळा तरी कुटुंब आणि मित्रपरिवार एकत्र येऊन आइसक्रीम बनवण्याचा सोहळा पार पडायचाच.
जवळच्या दुकानात, जिथे हे पॉट भाड्याने मिळत त्याच्याकडे आधीच जाऊन पॉट बुक करून ठेवावा लागायचा, कारण त्याच्याकडे दोन किंवा तीन पॉट असायचे आणि उन्हाळ्यात त्यांना रोजची मागणी असायची. मग कुणीतरी बर्फाच्या खरेदीला आणि दुसरं कुणी खडे मीठ खरेदीला जाई. सकाळी भैय्याला जादा दूध सांगितलेलं असायचं. तापवून आणि थोडसं आटवून त्यात साखर आणि सगळ्यांच्या पसंतीचे फ्लेवर घालून दुधाचे दोन तीन टोप सज्ज असायचे. आणलेला बर्फ वितळू नये म्हणून एका पोत्यात गुंडाळून ठेवलेलं असायचं. सगळी आइसक्रीमप्रेमी मंडळी जमली की, रात्री साधारण आठ-साडेआठ वाजता या आइसक्रीम सोहळ्याचा आरंभ व्हायचा. लाकडी पॉटमधलं भिडाचं भांडं आणि त्यात फिरणारी रवी स्वच्छ धुवून पॉटमध्ये बसवायची, पहिला फ्लेवर कोणता हे सर्वानुमते ठरलं की, ते दूध भिडाच्या भांड्यात ओतून वरून झाकण लावून पक्क करायचं आणि त्यानंतर त्याच्या आजूबाजूने बर्फ आणि मिठाचा अगदी भांड्याच्या तोंडापर्यंत थर भरत जायचं. हे झाल्यावर भांड्याच्या रवीला फिरवणारं हॅण्डल जोडून पॉट सज्ज करायचं. हॅण्डल फिरवण्यासाठी उत्साही नंबर लागलेले असायचे. पाच पाच मिनिटं प्रत्येकजण आपला उत्साह भागवून घेत असे, तर दुसरे एक दोघं बर्फ आणि मिठाच्या पातळीवर लक्ष ठेवून असायचे. बर्फाचं पाणी पॉटच्या तळाला असलेल्या भोकातून बाहेर पडत असे. जसजसं आइसक्रीम तयार होत जाई, तसतसं हॅण्डल फिरवायला जोर लावावा लागत असे, त्यामुळे आता चार्ज तरुण मंडळींकडे यायचा. साधारणपणे चाळीस एक मिनिटात आइसक्रीम तयार होत असे. सगळ्यांच्या नजरा उघडल्या जाणाऱ्या पॉटवर खिळलेल्या असायच्या. वाट्या बाउल सज्ज असायचे. स्कुपने मलईदार सॉफ्ट आइसक्रीम प्रत्येकाच्या बाउलमध्ये घातलं जायचं. सगळी मेहनत फळाला यायची, ती पहिला घास तोंडात जाताच. डोळे मिटून प्रत्येकजण आइसक्रीमचा आनंद घेत असायचे. त्या दिवशी घरात स्वयंपाक केला जात नसे, तर बाहेरूनच काही हलकं-फुलकं खाणं आणलेलं असायचं. पोटात जागा फक्त आइसक्रीमसाठी ठेवायची. दोन दोन बाऊल आइसक्रीम हाणून पहिला पॉट रिकामा व्हायचा, मंडळी विसावायची आणि तरुण मंडळी दुसऱ्या फ्लेवरच्या आइसक्रीमची तयारी सुरू करायची. रात्री बारा एक वाजेपर्यंत हा पॉट आइसक्रीम सोहळा रंगत असायचा. जीभ थंडाव्याने जड झालेली असायची, त्यामुळे शब्द कुणाचेही नीट कळत नसायचे, पण प्रत्येकाच्या मुखावर आनंद दाटून आलेला असायचा. अगदी ज्येष्ठ मंडळी सुद्धा सूंऽऽ सूंऽऽ करत आइसक्रीमचा आनंद घेत असायची. तर असा हा मी प्रत्यक्षात अनुभवलेला आइसक्रीम सोहळा.
खरं सांगायचं तर, एखादा कार्यक्रम, समारंभ, मंगलकार्य, पार्टी, सहभोजन, हे तेव्हा खरोखरचे आनंदसोहळेच होते. कंत्राट देऊन आपण निर्धास्त व्हायचं, हे नव्हतंच, तर प्रत्येकजण उत्स्फूर्तपणे सोहळ्यात सामील होऊन, मेहनतीने आनंदाने ते पार पाडले जायचे. अहो, आमच्या ग्रुपमधल्या कुणा मित्राचे आईवडील इतर मंडळी बाहेरगावी गेलेली असली, की आम्हा मित्रांची धाड त्याच्या घरावर पडायची. मस्त मेजवानीचा बेत आखला जायचा पण हॉटेलमध्ये ऑर्डर करून नाही, तर स्वतःच्या हाताने करून. फार तर पोळ्या बाहेरून आणल्या जायच्या. मस्त पुलाव, कोशिंबीर, रस्सा भाजी सगळे मिळून बनवायचे. त्याच्या घरात असलेले पापड कुरडया, लोणचं असायचंच साथीला. तसा हा आइसक्रीम सोहळा.
आज ते पॉटही गायब झालेत आणि अगदी मिळतही असले, तरी आजची पिढी म्हणेल, कशाला एव्हढा त्रास घ्यायचा ? अगदी पाहिजे ते आइसक्रीम आत्ता घेऊन येतो.
पण ते नुसतं आइसक्रीम खाणं नव्हतं तर सगळ्यांसोबत रंगणारा तो एक आनंदसोहळा असायचा हे यांना कसं कळणार...?
लेखक, निवेदक, कवी
kprasad1959@gmail.com