जगतवारी
मेधा आलकरी
माचूपिचू आणि नाझका रेषांमधून परिचित झालेला पेरूचा पूजनीय कोंडोर प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता आम्हाला कोल्का व्हॅलीपर्यंत घेऊन गेली. पहाटेच्या अंधारापासून सुरू झालेल्या या प्रवासात महाकाय कोंडोरची राजेशाही भरारी, खोल दऱ्या आणि अँडीजचा अद्भुत निसर्ग असे अनेक अविस्मरणीय अनुभव गाठीशी पडले.
पेरू देशातील माचूपिचूच्या अवशेषांमध्ये आणि नाझका रेषांमध्ये पाहिलेला, ३.२ मीटर इतका पंखाविस्तार असलेला, पेरूवासियांना पूजनीय कोंडोर पक्षी अजून अस्तित्वात आहे ही माहिती समजल्यावर त्याला याची देही याची डोळा बघण्याची प्रचंड उत्सुकता आमच्या मनात दाटून आली. कोल्का व्हॅली इथे सूर्योदयाच्या आसपास त्यांचा स्वच्छंद विहार पाहावयास मिळतो. मात्र त्यासाठी अरेकीपा या शहरी मुक्काम करून एक दिवसीय ट्रिप करावी लागते. एक दिवसीय म्हटलं तरी ती सुरु होते भल्या पहाटे अडीच वाजता.
छोट्या व्हॅनमधून केलेल्या या प्रवासात अर्धा वेळ डुलक्या खाण्यातच गेला. दिवस फटफटायला लागला तेव्हा आम्ही बारा हजार फुटांवरील नयनरम्य ‘ शिवाय’ शहरात येऊन पोहोचलो होतो. बऱ्यापैकी उंचीवर असल्यामुळे थंडी आपला प्रभाव दाखवू लागली होती. तासभर विश्रांती आणि नाश्ता करून पुन्हा प्रयाण केलं. दीड तासांनी म्हणजे आठ वाजता ‘क्रूझ देल काँडोर’ म्हटल्या जाणाऱ्या एका उंच कड्याशी आमची व्हॅन आम्हाला नेऊन पोहोचवणार होती. इथूनच आम्हाला तीन मीटरपेक्षा अधिक पंखपसार असणारे पंधरा किलो वजनाचे आणि सव्वा मीटर उंचीचे अँडियन कोंडोर आकाशात भरारी घेताना दिसणार होते. उडणाऱ्या पक्षांमधील हे सर्वात मोठे पक्षी ! इंका संस्कृतीत यांना सूर्यदेवाला पृथ्वीवासियांचे संदेश पोहोचवणारा ‘स्वर्गाचा दूत’ अशी मान्यता होती.
जागरणाने चुरचुरणाऱ्या डोळ्यांना हिरव्या कुरणाचे सज्जे दिसायला लागल्यावर कॅनियन जवळ आल्याची जाणीव झाली. प्रसिद्ध ऍमेझॉन नदीचा उगम ज्या डोंगरातून होतो ती जागा बघण्यासाठी आमची गाडी दोनच मिनिटं थांबली. नॅशनल जियोग्राफीकच्या एका पंचदेशीय चमूनं सन दोन हजारमध्ये जीपीएससारख्या आधुनिक उपकरणांचा वापर करून ‘नेवाडो मिसमि’ या पर्वतशिखरातून ऍमेझॉन नदीचा उगम होतो हे सिद्ध केलं. वाटेवरील पारंपरिक गावं आणि एकदोन नयनमनोहर देखावे असणाऱ्या जागांवर थांबून वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. उशीर होण्यास कोणतीही सबब चालणार नव्हती. परतीच्या प्रवासात त्यांना भेट द्यायची होती. प्रवेशाचे सगळे सोपस्कार आटोपून आम्ही वेळेआधीच ‘क्रूझ देल काँडोर’ ला येऊन पोहोचलो. अजून म्हणावी तशी पर्यटकांची गर्दी दिसत नव्हती. ग्रँड कॅनियनची आठवण करून देणारी विस्तीर्ण कोल्का व्हॅली पाहिली. विटकरी रंगाचा दगड आणि त्या खोल खोल दरीतल्या कपाऱ्या! कॅनियनच्या कडेकडेनं असलेल्या पायवाटेवरून फेरफटका मारला आणि त्या विशाल कॅनियनचं विलोभनीय दर्शन घेतलं. काही कडे इतके सरळसोट की खालचा तळ दिसत नव्हता. थोड्या रुंद जागेत मात्र इंकांपूर्व काळात खणलेल्या पायऱ्यांची शेती दिसत होती. अरेकीपापासून आमच्या बरोबर असलेला गाईड कॅनियनच्या तळाशी असलेल्या गावातला रहिवासी असल्यामुळे इत्यंभूत माहिती पुरवत होता. मी म्हटलं, “थोडा वेळ आहे तर जाऊन ये तुझ्या घरी” तो हसायलाच लागला. खालून वर चढत येण्यास पूर्ण दिवस लागतो म्हणे. कोल्का नदी ज्याच्या तळाशी वाहते तो हा कॅनियन बाराशे मीटर खोल आहे. जगातील सर्वात खोल कॅनियन कोणता यावर काही मीटरचा वाद आहे असं म्हणतात. तितक्या ‘खोलात’ न शिरता आम्ही कोंडोर कुठे दिसताहेत का ते पाहू लागलो.
सकाळी आठ ते दहाच्या सुमारास, दरीत सूर्यप्रकाश पडू लागला की उष्ण हवेचे प्रवाह वर येतात. या हवेवर आरूढ होऊन हे महाकाय कोंडोर पक्षी आकाशात झेप घेतात. एकही पंख न हलवता फक्त हवेत तरंगत हे दरीतून शेकडो फूट वर येतात. कोंडोर पक्षी इतका जड असतो की त्याला सतत पंख फडफडवणे शक्य नसते. त्यामुळे तो सूर्योदयानंतर दरीतून वर येणाऱ्या उष्ण हवेच्या प्रवाहांचा वापर करतो.
उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आमच्या डोळ्यासमोरून कोंडोरच्या एका जोड्यानं आकाशात झेप घेतली. जणू आकाशाला गवसणी घालायला निघाले होते. आमच्या डोक्यावरून अगदी काही मीटर अंतरावरून डौलानं विहरणारा तो जोडा पाहून आमचं भान हरपलं. एक नुकताच उडायला शिकलेला कुमार खडकावरच बसून होता. त्याची भरारी घ्यायची छाती होत नव्हती बहुदा. ( कल्पनाशक्ती नव्हे! गाईडनं पुरवलेली माहिती.) “मग आज उपाशीच राहणार का तो?” माझ्या मातृत्वाला पडलेली काळजी शब्दात उतरली. ‘उडेल उडेल’ असा आशावाद त्याच्या तोंडून ऐकून मी निश्चिन्त झाले. आम्ही जवळजवळ एक तास या भराऱ्या पाहत उभे होतो. ती भरारी जितकी मोहक तितक्याच मोहक आणि राजेशाही होत्या त्यांच्या घिरट्या, गिरक्या आणि शेवटी संथपणे पंख मिटून घेत खडकांच्या कपारीत परतणं. कोंडोर हे खरं तर गिधाडांच्या जातीत मोडणारे, मेल्या मांसावर गुजराण करणारे; परंतु इंका काळापासून पेरूवासीयांनी त्यांना गरुडाचा मान दिला आहे. भेदक डोळे, तीक्ष्ण चोच आणि पायांच्या नख्या या वैशिष्ट्यांमुळे दुर्बिणीतून घेतलेलं त्यांचं दर्शन जरा भीतीदायकच वाटलं मला. त्यापेक्षा उघड्या डोळ्यांना दिसणारा त्यांचा दिमाख मनाला भावला. हे पक्षी इतके स्वैरपणे आकाशात उडत असतात की त्यांना कॅमेऱ्यात कैद करायला प्रभावी भिंग हवं. बऱ्याच प्रयत्नांनंतर एक दोघांना कैद करून आणि बाकीच्यांना आकाशात स्वैर सोडून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
कोल्का कॅनियनला पोहोचताना आमची व्हॅन एक किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून गेली होती. परतताना मात्र गाईडच्या आग्रहावरून आम्ही तो बोगदा चालत पार केला. ‘टनेल दे चालूआन्का’ नावाचा हा बोगदा एका खडकाळ डोंगरातून खोदून काढलाय. आत विजेचे दिवे नाहीत. गच्च अंधार! आम्ही पुढे चालू लागलो तसा मागून येणार प्रकाश अंधुक होत गेला. आता आमच्या बरोबर होता मिट्ट काळोख, उघड्या खडकातून झिरपणाऱ्या पाण्याचं संगीत आणि पावलांचा घुमणारा प्रतिध्वनी. मला नेहमीच गुहेत जाण्याची भीती वाटते आणि एक अनामिक ओढही. बराच वेळ चालल्यानंतर दुसऱ्या टोकाच्या प्रकाशाचा ठिपका दिसताच ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल’ म्हणत मी सुटकेचा निश्वास टाकला.
१९७० च्या दशकापूर्वी कोल्का व्हॅली ही जगापासून जवळजवळ तुटलेली होती. अत्यंत दुर्गम पर्वतरांगांमुळे तिथे पोहोचणे कठीण होते. हा बोगदा आणि त्याच्या आसपासचा रस्ता तयार झाल्यानंतरच हा भाग अरेकीपा या शहराशी जोडला गेला. म्हणजे हा बोगदा नसता तर आम्हाला त्या नयनरम्य कोल्का कॅनियनचं आणि कोंडोर पक्ष्याचं दर्शन दुर्लभच होतं म्हणायचं! अर्थात याची निर्मिती काही पर्यटनासाठी झाली नव्हती. सत्तर ऐंशीच्या दशकात पेरू सरकारने कोल्का नदीचं पाणी या वाळवंटी भागाकडे वळवून तिथे शेती फुलवण्याचा प्रकल्प सुरु केला. अवजड मशिनरी आणि कामगारांची ने-आण करण्यासाठी डोंगर फोडून हा बोगदा तयार करण्यात आला होता.
कोल्का व्हॅलीला जाताना ज्या निसर्गरम्य गावांना परतीच्या वाटेवर पाहू असं ठरलं होतं ती गावं लागली. यांके शहरात गरम पाण्याचे नैसर्गिक झरे आहेत. त्या गावात सोळाव्या शतकातील स्पॅनिशांनी बांधलेलं बरोक शैलीतलं अत्यंत सुंदर आणि टुमदार असं पांढऱ्या रंगात रंगवलेलं चर्च आहे. चर्चच्या प्रवेशद्वारावर पेरुव्हियन लोकांच्या प्रथेप्रमाणे सूर्य आणि कोंडोर पक्षी कोरलेला दिसला. विणलेल्या कापडाचा पोशाख घातलेले हे आदिवासी आजही खणलेल्या डोंगरसज्जांवर मका, किनोवा यांची धान्यशेती करतात. यांकेच्या प्रमुख चौकात दररोज सकाळी मुलं आणि तरुण-तरुणी पारंपरिक रंगीबेरंगी पोशाख घालून ‘वितिती’ हे नृत्य सादर करतात. युनेस्कोने या नृत्याला जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिलेला आहे. या नृत्यामागे एक रंजक इतिहास आहे. दुसऱ्या जमातीतील मुलींना आकर्षित करण्यासाठी पुरुष लांब घागरा चोळीसारखे कपडे घालून नृत्य करत असत. आजही तीच परंपरा चालू आहे. गाईडच्या तोंडून ऐकलेल्या या गोष्टी ऐकून आमचं भरपूर मनोरंजन झालं. सकाळी जाताना आम्ही काही हे नृत्य पाहू शकलो नाही कारण व्हॅलीमधले कोंडोर आमची वाट पाहत होते.
या दोन गावातील लोकांबद्दल आणखी एक वेगळी आणि विचित्र माहिती कळली. इथल्या कोलागुआ आणि कबाना या दोन जमातीत पूर्वीपासून हाडवैर होतं. अगदी ‘रोटी-बेटी का रिश्ता’ही नव्हता. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या. अपर व्हॅलीमध्ये वसलेल्या यांके गावातील कोलागुआंची आयमारा तर माका या लोवर कोल्का व्हॅलीत वसलेल्या कबानांची केचुआ. एकमेकांसारखं दिसण्यासही आक्षेप असावा इतकं त्यांचं वितुष्ट! आपल्या जमातीची वेगळी छाप दिसावी म्हणून ते अगदी कोवळ्या वयात बालकांच्या कवटीला दगड, लाकडी पट्ट्या आणि कापडांनी घट्ट बांधून त्यांच्या डोक्याचा आकार बदलत असत. कोलागुआ जमातीत अशी मान्यता आहे की त्यांचा जन्म उंच बर्फाच्छादित पर्वतातून झालाय. त्यामुळे ते आपल्या डोक्याचा आकार लांबट आणि शंकूच्या आकाराचा करत असत. त्या उलट कबाना जमातीत मान्यता आहे की त्यांचा जन्म झालाय लहान टेकड्यांमधून. म्हणून ते लोक आपल्या डोक्याची रचना लहान टेकडीसारखी गोल आणि पसरट करत असत. हा विशिष्ट आकार म्हणजे त्यांच्या पर्वतदेवाचं अनुकरण ! पुढे स्पॅनिशांच्या राजवटीत ही अमानुष पद्धत कायद्याने बंद पाडण्यात आली. त्यानंतर आपली वेगळी ओळख टिकवण्यासाठी या जमातींनी विशिष्ट टोप्या वापरण्यास सुरुवात केली. आजही कबाना महिला अतिशय सुंदर पांढऱ्या रंगाच्या, सपाट आणि अत्यंत बारीक भरतकाम केलेल्या टोप्या घालतात तर कोलागुआ महिला गोल, पाठीमागे शालीसारख्या लटकणाऱ्या टोप्या घालतात. त्यावर रंगीबेरंगी फुलं आणि पक्षी कोरलेले असतात. आता एकविसाव्या शतकात दोन्ही जमातींमध्ये लग्नही होतात. प्रेमाला कुठलं बंधन? या विवाहबंधनातून जन्मलेल्या मुलाला मात्र मातृजमातीची ओळख बहाल होते.
अरेकीपाकडे परतताना सोळा हजार फुटांवरील ‘पतापांपा’ या व्ह्यू पॉइंटवर थांबलो. अँडीज पर्वतरांगा आणि दूरवर पसरलेले ज्वालामुखीचे धुमसणारे डोंगर असा विशाल निसर्गपट आमच्यासमोर उलगडून ठेवला होता. तिथे अल्पाका आणि लामांचे कळप मुक्तपणे चरत होते. त्यांच्या अंगावरील जाड उबदार लोकरीचा स्पर्श अनुभवायचा मोह मला आवरला नाही. वेगवेगळे अनुभव देऊन गेलेली ही पेरूची फोड फारच गोड!
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com