Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

'भुलेश्वरचा राजा'ची २२ फुटांहून अधिक उंचीची भव्य गणेशमूर्ती आगमन सोहळ्यासाठी नेली जात असताना अचानक तिचा तोल गेला अन्...
Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO
Published on

मुंबई : भुलेश्वर परिसरात शनिवारी (दि. २२) रात्री गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. 'भुलेश्वरचा राजा'च्या गणेशमूर्तीचा अचानक तोल जाऊन ती भाविकांच्या अंगावर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन लहान मुलींचाही समावेश आहे. रात्री सुमारे ९.५० वाजता घडलेल्या या घटनेनंतर परिसरात मोठी धावपळ उडाली. भाविकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत मूर्तीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना शनिवारी रात्री सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास भुलेश्वरमधील बलराम मर्चंट रोडवरील कबुतरखाना, जय अंबे चौकाजवळ घडली. 'भुलेश्वरचा राजा'ची २२ फुटांहून अधिक उंचीची भव्य गणेशमूर्ती आगमन सोहळ्यासाठी नेली जात असताना अचानक तिचा तोल गेला आणि मूर्ती खाली कोसळली. मूर्ती खाली पडताच भाविकांमध्ये घबराट पसरली.

भाविकांची मदतीसाठी धाव

मूर्ती कोसळल्यानंतर काही भाविक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मूर्तीखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. व्हायरल व्हिडीओमध्ये घटनास्थळी निर्माण झालेली धावपळ आणि नागरिकांकडून बचावकार्य करण्याचे प्रयत्न दिसत आहेत.

दोन जणांचा मृत्यू

दुर्घटनेनंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातील माहितीनुसार, संकेत नेवशे (३३) आणि बृजेश हेमंत जोशी (३०) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. संकेत नेवशे हे गणेश मंडळाचे अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन चिमुकल्यांसह पाच जखमी

या दुर्घटनेत वैभव घेनंद (३८), पवन चौरसिया (२५), लावण्या गणेरे (५), दिव्या गणेरे (७) आणि कुणाल काशीद (२६) हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना जीटी आणि जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि महापालिकेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.

मूर्तीचा तोल का गेला?

मूर्ती नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, मूर्तीला आधार देणाऱ्या लोखंडी फ्रेममधील वेल्डिंग किंवा जोडणीमध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता तपासली जात आहे. मूर्ती पंडालजवळ पोहोचण्याच्या काही अंतरावर असताना ही दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. मात्र, अपघाताचे अंतिम कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

पोलिसांकडून चौकशी सुरू

या दुर्घटनेप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मूर्तीची वाहतूक करताना सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, मूर्तीला आधार देणाऱ्या फ्रेमची स्थिती काय होती आणि दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याचा तपास केला जात आहे.

VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

या दुर्घटनेनंतर घटनास्थळावरील गोंधळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये मूर्ती कोसळल्यानंतर भाविकांची झालेली धावपळ आणि मूर्तीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न दिसत आहेत. या घटनेमुळे गणपती आगमन सोहळ्याच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in