'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

कोकणातला शिमगा

झी -५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देवखेळ नावाची वेबसिरीज अलीकडेच प्रदर्शित झाली आणि कोकणामध्ये संतापाची लाट उसळली.

नवशक्ती Web Desk

विशेष

योगेश बांडागळे

झी -५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देवखेळ नावाची वेबसिरीज अलीकडेच प्रदर्शित झाली आणि कोकणामध्ये संतापाची लाट उसळली. शंकासुराला या वेबसिरीजमध्ये खुनी दाखवला आहे, त्यामुळे भाविकांमध्ये कमालीची नाराजी पसरली. शंकासुर खरंतर असूर आहे, मग त्याला देवाचं रूप कसं मिळालं? नक्की हा शंकासुर कोण आहे? कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. पालखी खांद्यावर नाचवली जाते. इतकाच शिमगा आहे का? तर नाही. कोकणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. होळीच्या वेगळ्या परंपरा आहेत, होमाच्या वेगळ्या परंपरा आहेत, पालखी नाचवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोकणातील हा शिमगा म्हणजे कोकणातील गणेशोत्सवापेक्षा अगदी महत्त्वाचा सण मानला जातो. कोकणातील माणूस मुंबई, पुण्यात अगदी पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असला तरी कोकणात येतो, कारण वर्षभर ज्या ग्रामदेवतेच्या मंदिरात आपण जातो तो देव प्रत्येकाच्या घरी येतो. हे एक वेगळेपण कोकणातील शिमगा उत्सवाचं आहे. असं कुठेही घडत नाही; ते केवळ कोकणातच घडतं. होळी, आपल्या ग्रामदेवतेची पालखी अंगा-खांद्यावरून नाचवणं आणि त्यात बेधुंद होणं, हीच आजची परंपरा आहे. डीजे-डॉल्बी आली तरी ढोल-ताशांच्या गजरात पालखी नाचवणं, होळी अंगावर खेळवणं, ही परंपरा आजही कोकणातील माणसांनी जपली आहे. सादर होणारे नमन-खेळे हे तर आणखी वेगळं वैशिष्ट्य आहे. याच कोकणातील शिमगा उत्सवाची एका वेगळ्या पद्धतीने ओळख करून देण्याचा हा प्रयत्न....

कोकणातील शिमगा उत्सवाला खऱ्या अर्थाने फाग पंचमीला सुरुवात होते. फाग पंचमीपासून छोटे-छोटे होम सहाणेवर लावले जातात. या ठिकाणी गावातील तरुण मंडळी आट्यापाट्याचा खेळ खेळतात. नव्या पिढीला आट्यापाटीचा खेळ माहीत नाही, कदाचित त्यांच्या कानावर हे नावही पडलं नसेल; परंतु आजही अनेक गावांमध्ये खेळ रंगतो. रात्री उशिरापर्यंत तो चालू राहतो. चपळपणा आणि आपली शक्ती दाखवण्याचा हा एक खेळ आहे. यातून तरुण मंडळींची एक चांगली कसरत होते. जुन्या पिढीने त्या पद्धतीने या खेळाची रचना केलेली आहे. सर्वत्र फाका मारल्या जातात; अर्थात त्या काही ठिकाणी वाईट असतात, परंतु देवाच्या नावाने चांगल्या प्रकारेही फाका मारल्या जातात. “हुरा रे हुरा, आमच्या देवाचा सोन्याचा तुरा”, “होळी रे होळी, पुरणाची पोळी” अशा फाका मारल्या जातात. बोंबा मारल्या जातात.

खरंतर वर्षभर आपली ग्रामदेवता ही देवळामध्ये असते; परंतु तेथील पाषाणमूर्तीप्रमाणे त्याचे रूप तयार केले जाते. मग ते मुखवटे चांदीचे असतात, सोन्याचे असतात किंवा अगदी पितळेचे असतात. ही देवतांची रूपे पालखीत बसवली जातात, सजवली जातात आणि मंदिरातील देव हा पालखीत येतो. वर्षभर देव मंदिरात असतो; परंतु शिमगा उत्सवात तो गावातील सहाणेवर असतो. अनेक गावांतील ग्रामदेवतेची मंदिरं जंगलात आहेत. या ठिकाणी देवराई आहेत. आज अनेक ठिकाणच्या देवराया नष्ट होत चालल्या आहेत; मात्र काही ठिकाणच्या देवराया आजही तशाच आहेत. मग गावातील मध्यभागी ठिकाणी सहाण बांधली जाते, चौथरा बांधला जातो. गावातील मंडळी त्या ठिकाणी जमतात. शेणाने सारवण केलं जातं. सहाण साफ केली जाते आणि या ठिकाणी रूपे लावली जातात. मग सहाणेवर छोट्या होळ्या झाल्यानंतर होम प्रज्वलित केला जातो. होम लावण्यातही काही ठिकाणी पारंपरिकता दिसून येते. काहींचे होम रात्री लागतात तर काहींचे होम पहाटे लागतात. त्यांना “भद्रेचे होम” असेही म्हणतात.

गवताच्या वरंडी, कवळ, तोडलेला झाडपाला, मोठी-मोठी लाकडं आणली जातात. होम रचला जातो. या काळात होमासाठी लागणारं साहित्य काही गावांत लोक आणून देतात, तर काही ठिकाणी तरुण मंडळी चोरी करून हे साहित्य आणतात. असं म्हणलं जातं की, समजा चोरी केली तर त्याचं शिमग्यात पाप लागत नाही. त्यामुळे रात्रीच्या या कालावधीत अनेक ठिकाणी नारळ चोरणे, कलिंगड चोरणे, अशी कामंही तरुण मंडळी करतात आणि त्यात पाप लागत नाही, ही त्यांची ठाम श्रद्धा आहे.

आदल्या दिवशी होळी तोडली जाते. राजापूर वगैरे या भागात माडाची होळी असते. काही ठिकाणी शेवरा असतो, तर संगमेश्वरच्या पट्ट्यामध्ये आंब्याचे जुने झाड तोडून त्याची होळी तयार केली जाते. आधी त्या वृक्षाची पूजा केली जाते. मानकरी पूजा करतात, गाऱ्हाणे घालतात. मग हे झाड तोडलं जातं आणि त्याच्या शेंड्याला सजवून, नाचत-नाचत ही होळी सहाणेवर आणली जाते. साधारणपणे १२०० ते १५०० किलो इतकं तिचं वजन असतं. जानेवारीपासून मार्चपर्यंतच्या काळात शेतीची फारशी कामं नसतात. तरुणांची जी शक्ती असते, त्याच्या अंगातील बळ कुठेतरी कमी करण्याची गरज असते. अशासाठीच बहुदा जुन्या मंडळींनी होळी नाचवण्याची, पालखी नाचवण्याची रचना केली असावी. बेभानपणे होळी नाचवली जाते, पालखी नाचवली जाते आणि तरुणांच्या अंगात असलेली रग, शक्ती थोडी कमी कशी होईल, याचा विचार केला जातो. होळी नाचवत सहाणेवर आणली जाते. तिथे ती उभी केली जाते. दुसऱ्या दिवशी होम प्रज्वलित केला जातो. होम प्रज्वलित होत असताना मानकरी मंडळी मानाप्रमाणे पूजा करतात. होम प्रज्वलित होतो. पालखी त्या होमाला पाच प्रदक्षिणा घालते. याचवेळी गावातील नवीन लग्न झालेली जोडपी होमामध्ये नारळ टाकतात. त्यामुळे संपूर्ण गावामध्ये कोणाचं नवीन लग्न झालेलं आहे, याची ओळख त्या ठिकाणी जमलेल्या अख्ख्या गावाला होते. लग्न झालेला प्रत्येक तरुण या ठिकाणी आपल्या पत्नीला घेऊन नारळ अर्पण करण्यासाठी आलेला असतो. मग ग्रामस्थ मंडळी या होमाला नारळ अर्पण करतात. चिपळूणसारख्या ठिकाणी इतके नारळ धरून फेकले जातात की, काहीजण जखमी होतात; पण त्याचं कुणाला दुःख नसतं. मग पालखी नाचवली जाते. होमाच्या दिवशी छोटीशी जत्रा भरते.

मग सहाणेवर पालखी एक ते दोन दिवस बसते. देवाला जागवलं जातं. जुन्या मंडळींनी देवाला जागवायचं कसं, तर त्यासाठी नमन-खेळे हे लोककला प्रकार आणले. पूर्वी टीव्ही नव्हता, मनोरंजनाची साधनं नव्हती; त्यामुळे गावातील लोकच आपली कला सादर करायचे. देवाला जगवण्यासाठी नमन असेल, जाकडी असेल, भजन असेल, या लोककला पुढे प्रचलित झाल्या. गावातील नमन किंवा बाहेरच्या गावातील नमन सादर होतं आणि गावातील मंडळींचं मनोरंजन होतं. रात्रभर जागरण केलं जातं. सहाणेवर सजवलेली पालखी असते. काही ठिकाणी पालखीचा डोलारा असतो, तर काही ठिकाणी आयताकृती पालखी असते. काही ठिकाणी लाकडी, आता तर काही ठिकाणी धातूची पालखी तयार केली जाते.

काही होम रात्री लागतात, तर काही पहाटे लागतात. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा असतात. चिपळूणमधल्या सावर्डे येथे “व्हलटे होम” प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दोन्ही वाडीतील लोक समोरासमोर येतात. होमातील पेटती लाकडं हातात घेतली जातात आणि एकमेकांना या लाकडाने मारलं जातं. एकमेकांवर व्हलटे फेकले जातात; परंतु यात कोणीही जखमी होत नाही. ही परंपरा सावर्डे गावाने जपलेली आहे. ढोल-ताशे वाजवले जातात. दोन गट समोरासमोर येतात. मान-पानाप्रमाणे बोंब मारली जाते आणि व्हलटे फेकले जातात. दापोलीतील केळशी येथे अशीच एक आगळी-वेगळी परंपरा आहे. या ठिकाणी होमातील लाकूड काढून ते जमिनीवर आपटलं जातं आणि त्यातून फटाक्यासारखा आवाज निघतो. त्याला “रानटी फटके” असे म्हणतात.

सहाणेवर काही दिवस पालखी बसल्यानंतर ती घरोघरी पूजा घेण्यासाठी जाते. यातही वेगवेगळ्या परंपरा आढळतात. पालखीने कोणाकडे वस्तीला राहायचं, कोणाकडे निवेद्य घ्यायचा, हेही मानाप्रमाणे ठरलेलं असतं. काही ठिकाणी घरे जास्त असल्यामुळे पालखी रात्रभर फिरते, रात्रभर पूजा घेतली जाते. नवस फेडले जातात. पालखी घरात ज्या दिवशी येणार असेल, त्या दिवशी शेणाने सारवण केलं जातं, सडा घातला जातो, रांगोळी काढली जाते. पालखी घरात आली की हातभेटीचा नारळ दिला जातो. माहेरवाशिणी ओटी भरतात. नवस केले जातात, नवस फेडले जातात. आपलं ग्रामदैवत आपल्या इच्छा पूर्ण करतं, अशी भावना आजही आहे. नवस बोलणं आणि फेडणं हे काम गावातील मानकरी करतात. प्रत्येक ठिकाणी गाऱ्हाणं घालण्याची पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी देवाला जाप लावला जातो. त्याचीही वेगळी शैली कोकणामध्ये दिसून येते. काहीजण “होय महाराज” म्हणत गाऱ्हाणे घालतात.

घरोखरी पालखी दर्शन घेत असते आणि अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडून येतं. मुस्लिम बांधवांच्या घरीही पालखी जाते. मुस्लिम बांधवांना पूजेचा अनेक ठिकाणी मान आहे. काही ठिकाणी छबिना होतो. रात्रभर पालखी डोक्यावर घेऊन नाचवली जाते; त्याला छबिना म्हणतात. चिपळूणमधल्या पाग येथील सुकाई देवीचा असाच छबिना प्रसिद्ध आहे. चिपळूण शहराला अनेक गावं जोडली गेली आहेत, त्यामुळे ती नगर पालिकेत आली आहेत. त्यामुळे महालक्ष्मी, सुकाई, जुना कालभैरव, नवा कालभैरव, करंजेश्वरी अशा पाच पालख्या या ठिकाणी असतात. बाजार पालखी हा महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला विषय आहे. बाजारात पालखी येते तेव्हा, बाजारपेठेत डीजे लावला जातो, गुलालाची उधळण केली जाते. रात्रभर तरुण मंडळी नाचत असतात.

अनेक ठिकाणी खूप जुन्या परंपरा अजूनही तशाच आहेत. संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे आणि कनकाडी या पालख्यांची भेट होते. अनेक ठिकाणी अशी पालख्यांची भेट घडते. या वेळी दोन्ही पालख्यांमधील तांदूळ आणि नारळ यांची अदलाबदल होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक जुनी माणसं याविषयी सांगतात.

ग्रामदेवतेची पालखी दारात येते, त्याबरोबर पालखीची निशाणी येते. या निशाणीलाही मान आहे. निशाणी म्हणजे देवाचा ध्वज. त्यासाठी रांगोळी काढली जाते. निशाणीला हार घातला जातो. पालखीसोबत ही निशाणी नाचवली जाते. पालखीला पासोडा दिला जातो. त्याने पालखी सजवली जाते. आज अनेक ठिकाणी पालखीच्या नृत्यस्पर्धा होतात. पालखीला वेगवेगळ्या प्रकारची प्रकाशयोजना केली जाते; पण आजही तीच भावना, तीच भक्ती, तीच शक्ती कायम आहे.

चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथील श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगा उत्सव हा शेरणी काढण्याच्या परंपरेमुळे ओळखला जातो. संपूर्ण महाराष्ट्रभर तो प्रसिद्ध आहे. भाटण येथे करंजेश्वरीची पालखी येते. या ठिकाणी ठरलेल्या जागी भाविक आपली शेरणी लपवतात, म्हणजे आपल्या मनातील जी इच्छा असेल ती एका कागदावर लिहायची. त्यासोबत एक नारळ असतो आणि तो एका रंगीत कपड्यात बांधूनआपल्याला हव्या त्या ठिकाणी भाटण या जागेत पुरून ठेवायचा. पालखी या ठिकाणी येते. आपल्या खुराणी ही शेरणी शोधते. जवळपास दरवर्षी ३५ ते ४० शेरणी शोधण्याचं काम करंजेश्वरीची पालखी करते. ज्यांची शेरणी शोधली जातात त्यांचा नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो भाविकांची गर्दी होते. या ठिकाणी जत्रेचे रूप प्राप्त होते.

चिपळूणमधील श्री देव जुना कालभैरव आणि नवा कालभैरव यांचे शिमगा प्रसिद्ध आहेत. जुना कालभैरवाचा चव्हाटा भरतो. या चव्हाट्यावर नवस फेडले जातात, मानवले जातात. आजही काही ठिकाणी नमन होत असलं, तरी काही ठिकाणी लावणी आणि तमाशाचे कार्यक्रम सादर करण्याची परंपरा कायम आहे. जुना कालभैरव, नवा कालभैरव येथे असाच लावणीचा कार्यक्रम होतो. ही परंपरा कायम आहे. हजारो प्रेक्षक हा लावणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी येतात. त्यानंतर होम प्रज्वलित केला जातो. लावणी-तमाशा करणारे फड पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येतात आणि शिमगा उत्सवानंतर गुढीपाडव्यापर्यंत त्यांचे कार्यक्रम शिमगोत्सवानंतरही अनेक गावांच्या जत्रांमध्ये सुरू असतात.

कोकणातील शिमगासह अनेक वेगवेगळ्या परंपरा आहेत. ग्रामदेवतेचा गुरव म्हणजेच पुजारी सणाचे शिंपण घरामध्ये शिंपडतो. अनेक ठिकाणी वानखरणी होतात. संगमेश्वरच्या पट्ट्यामध्ये प्रत्येक घरामध्ये पालखी येते, त्यावेळी त्या घरातील कर्त्या पुरुषाच्या नावाने वानखरणी डफ वाद्याच्या तालावर म्हटल्या जातात. ज्या ठिकाणी पालखी सहाणेवर किंवा कुणाच्या घरी वस्तीला असेल त्या ठिकाणी वानखरणी होतात. वानखरणी म्हणजे एक प्रकारे आपल्या ग्रामदेवतेची केलेली आरती किंवा प्रशंसा असते. यावेळी तरुण मंडळी या वानखरणीच्या तालावर नृत्य करतात. हा देखणा सोहळा असतो. आज अनेक गावांत जुनी वानखरणीची गाणी जपली गेली आहेत. काही ठिकाणी आज महिलाही पालखी नाचवतात; परंतु काही ठिकाणी आपली परंपरा आजही कायम ठेवून महिलांच्या खांद्यावर पालखी दिली जात नाही.

गुहागरमध्ये शंकासुर प्रसिद्ध आहे. येथील शिमगा उत्सव आगळावेगळा आहे. या ठिकाणी भोवणीसाठी खेळे बाहेर पडतात. त्यांच्यासोबत शंकासुर असतो. या खेळामध्ये एका पुरुषाला बाईच्या रूपात सजवलं जातं आणि घराघरात जाऊन गाणी म्हणत, नृत्य करत भोवणी मागितली जाते. त्यांच्यासोबत शंकासुर असतो. शंकासुर म्हणजे तो असुरांचा राजा होता; परंतु त्याच्याकडे असलेले वेद ही त्याची संपत्ती होती. हे वेद, ज्ञानाचं भांडार घेऊन तो समुद्रातील एका शंखात लपला होता. तेव्हा भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून त्याचा वध केला; परंतु या शंकासुराने ज्ञानाचं भांडार बहुजनांसाठी, सर्वसामान्यांसाठी खुलं केलं होतं. त्यामुळे तो असूर असला आणि त्याचा वध विष्णूंनी केलेला असला, तरी तो खलनायक नव्हे तर खरा हिरो आहे. तो असूर असला तरी ग्रामदेवतेचं प्रतीक म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याला मान दिला जातो. शंखाच्या आकाराची टोपी, कमरेला घुंगरांचा चाळ, पांढरी दाढी, बाहेर आलेली मोठी जीभ, हातात वेठी आणि अनवाणी फिरणारा हा शंकासुर दिसतो. त्याला चिडवले जाते, कारण तो आपल्या मागे लागावा, आपल्या पाठीवर त्याने वेठी मारावी, हे आपल्यासाठी चांगलं असतं असं मानलं जातं. शंकासुराने वेठी मारली तर तो एक प्रकारचा देवीचा आशीर्वाद असतो, ही भावना आजही दापोली, दाभोळ, गुहागर, हेदवी, पालशेत, वेलंब या गावांमध्ये आहे. शंकासुर सुद्धा दानशूर राजा होता, त्यामुळे आजही त्याला देव म्हणून पूजलं जातं. अनेक नमनांमध्ये शंकासुर दाखवला जातो. कोकणातील लोककलांमध्ये गणपतीच्या आधी शंकासुराचा मान आहे. इतकं त्याचं स्थान मोठं आहे. हा शंकासुर नृत्य करतो, लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना आशीर्वाद देतो. त्याच्याकडे दैवी शक्ती असते. तो जळत्या निखाऱ्यांवरून चालतो आणि हे आजही एकविसाव्या शतकात अचंबित करणारं वास्तव आहे.

कोकणातील हा शिमगा आगळावेगळा आहे. त्यामध्ये पावित्र्य आहे, श्रद्धा आहे, परंपरा आहे. कोकणी माणसाच्या संस्कृतीचा तो एक भाग आहे. होळी, पालखी नृत्य यातून नृत्याची एक वेगळी ढब आपल्यासमोर येते. ढोल-ताशांच्या वादनातून कोकणी माणसाची वेगळी कला दिसते. निशाण नाचवणं ही एक वेगळी कला आहे. शक्ती आणि भक्ती अशा दोन्हींचा संगम असलेला हा सण आपल्याला शिमगोत्सवात दिसून येतो.

लेखक कोकणातील पत्रकार असून लोककलावंतही आहेत.

Iran Israel War : इराणच्या सर्वोच्च नेता निवडी‌वेळी इस्रायलचा हल्ला; लेबनॉनची राजधानी बैरूतवर हवाई हल्ले

Iran Israel War : आखाती भागातील १ कोटी भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य; परराष्ट्र खात्याचे प्रतिपादन

आखाती युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांनाही; JNPT त अडकले शेकडो कंटेनर; दुबई बाजारपेठ बंद असल्याने केळी, कांद्याची निर्यात ठप्प

मुंबईसह राज्यभर धुळवडीचा जल्लोष; राजकीय नेते, सेलिब्रिटीही रंगले रंगात

Ajit Pawar Plane Crash : 'एएआयबी'च्या अहवालावर छगन भुजबळांची शंका