विशेष
शुभदा चौकर
प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाने मनोविकास, विवेकनिष्ठ विचार आणि मानसिक आरोग्य जागृतीच्या क्षेत्रातील एक संवेदनशील, कल्पक आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व हरपले. तर्कबुद्धी, सह-अनुभूती आणि आनंदी जगण्याचा संदेश देत त्यांनी हजारो लोकांच्या आयुष्याला दिशा दिली. लेखन, व्याख्याने, समुपदेशन, 'वेध' आणि 'बहुरंगी बहर'सारख्या उपक्रमांतून त्यांनी समाजाला मन समजून घेण्याची नवी दृष्टी दिली. त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा हा लेख.
डॉ. आनंद नाडकर्णी हे त्यांच्या नावाप्रमाणे आनंदी, उत्फुल्ल, स्नेहाळ व्यक्तिमत्त्व. तर्कबुद्धीच्या माणसांना डॉ. आनंद नाडकर्णी यांचा मोठा वैचारिक आधार होता. बुद्धिवादाची ठाम कास धरून आनंदी जगता येते, हा विश्वास त्यांनी समाजाला दाखवला. ना कधी कुणाची निंदानालस्ती, ना टीका, आपण आपला आनंद कसा मिळवत आणि तो सभोवती पेरत राहावा, सतत उन्नत कसे होत जावे, याचे वस्तुपाठ त्यांनी घालून दिले.
मानसिक आजारांना समाजाच्या अमान्यतेचा शाप आहे. तो दूर करायचा तर सामान्य लोकांना मन ही अदृश्य कुपी नीट उमगली पाहिजे. यासाठी हे डॉक्टर या प्रांतात सदैव विहारत राहिले. मन विषयक पुस्तके लिहिली. व्याख्याने दिली. गौतम बुद्ध, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधीजी, विनोबा भावे अशा अनेक महामानवांच्या व्यक्तिमत्त्वाची चिकित्सा मनोव्यापाराच्या दृष्टिकोनातून ते छान समजावत.
विचार, वर्तन, भावना यांचा संतुलित त्रिकोण त्यांनी आपल्या हातात एखाद्या होकायंत्राप्रमाणे दिला. आपल्या स्वभाव-विभावाला दिशा देण्याचे मंत्र शिकवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर बहुविध मार्गांनी भरपूर काम केले. डॉ. अल्बर्ट एलिस यांची REBT (Rational Emotive Behaviour Therapy) त्यांच्याकडून शिकलेल्या माझ्यासारख्या हजारो जणांना त्यांनी विवेकी वर्तनाचे मर्म जाणून वागण्याची दीक्षा दिली. ठाण्याच्या 'सप्तसोपान' या त्यांनीच विकसित केलेल्या रम्य वास्तूतील त्यांचे व डॉ. शुभा थत्ते यांचे REBT चे वर्ग म्हणजे मेजवानी असे. शाळेत पाठ करून मग पुढे त्याकडे पाठ फिरवलेली संतवाणी आपल्याला बुद्धी वापरण्याची कला कशी शिकवते बघा, म्हणत डॉ. नाडकर्णी ती सहज उलगडून सांगत. भावनांची ओळख पक्की करण्याची साधने म्हणून मराठी भावगीते आणि हिंदी चित्रपट गीते वापरत. लोकप्रिय नाटके, चित्रपटांतील प्रसंगांचे पृथक्करण ते मनोव्यापारच्या चष्म्यातून असे काही बेमालूमपणे करत की हे आपल्याला आधी कसे जाणवले नाही म्हणून आपण चकित होऊन जावे ! आपला दृष्टिकोन आणि विचारांची दिशा बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्यातल्या 'गुरू'मध्ये होते. मी सांगतो ते बरोबर असा हेका न बाळगता, स्वतःच्या विवेकबुद्धीला साद घालण्याची ताकद ते प्रत्येक विद्यार्थ्याला जाणवून देत. जगण्याचा ताल, तोल आणि लय सांभाळण्याचे मर्म अतिशय सोप्या, रसाळ पद्धतीने सांगत.
सुमारे ५० वर्षे त्यांना मी 'मनोविकास' याच क्षेत्रात काम करताना बघत आहे. मनोविकास या विषयाची खोली आणि व्याप्ती त्यांनी कवेत घेतली होती. के.ई.एम.मध्ये शिकतानाच ते लिखाण, नाटके सादर करू लागले होते. १९८७ च्या सुमारास त्यांची 'गर्दच्या विळख्यात' ही लेखमाला 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये प्रसिद्ध होत होती. तेव्हापासून ते समाजासमोर आले. अशा व्यसनाधीनांना वेळीच ओळखून उपचारापर्यंत नेण्याची समज त्यांनी वाचकांना करून दिली होती. मी ती लेखमाला नियमित वाचत असे. आम्ही रुपारेलमध्ये तेव्हा त्यांचे त्या विषयावर व्याख्यान ठेवले होते. तेव्हापासून त्यांचे व्यक्तिमत्त्व मनात ठसले. १९९० मध्ये 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये 'हवा कॉलेजची' सदर लिहिण्यासाठी माझी निवड झाली, तेव्हा तेथील वरिष्ठांनी त्याआधीच्या काही वर्षांत ते सदर कोणी कोणी चालवलेले आहे, याची यादी सांगून मोठ्या जबाबदारीची जाणीव करून दिली होती. त्यात डॉ. आनंद नाडकर्णी हे नाव ऐकून मलाही दडपण आले होते, कारण तोपर्यंत त्यांचे लेखक, मनोविकार तज्ज्ञ म्हणून चांगलेच नाव झाले होते.
तरुणपणापासून हरहुन्नरी असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू त्यांनी त्यांच्या अभ्यासूवृत्तीने खतपाणी घालत फुलवत नेले. समोरच्याच्या मनाला प्रेमाने हात घालून, दुखऱ्या मनाला समजून घेऊन त्यावर सह-अनुभूतीची फुंकर घालत उपचार करणारे डॉक्टर ही त्यांची खासियत होती. लोभस वाणी आणि प्रभावी लेखणी, उत्तम जनसंपर्क, आय.पी.एच. सारखी संस्थाबांधणी अशी अनेक कौशल्ये त्यांनी मन या विषयाची समाजाची समज वृद्धिंगत करण्यासाठी वापरली. लिखाण केले. मन विषयक चित्रपट साकारणाऱ्यांना मार्गदर्शन केले. तरुणाईला मनोविकासासाठी साह्यकारी असा 'वेध' उपक्रम महाराष्ट्रात ठिकठिकाणी राबवताना अथकपणे स्वतः मुलाखती घेतल्या. त्यांच्या मुलाखती लोकांना विशेष भावत. कारण एक तर ते त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाच्या पलीकडे त्याचे माणूसपण अतिशय लोकांसमोर आणत. त्यासाठी त्या व्यक्तीचे मन स्कॅन करून त्यातील उत्तमता हेरून ती प्रेक्षकांसमोर येईल, असे प्रश्न बेतत. ती प्रश्नोत्तरे न राहता, त्या आस्थेवाईक गप्पा होत. त्या पाहुण्याच्या मनाची तार प्रेक्षकांशी जुळली, त्याच्या उन्नत भावना सर्वांना कळल्या, की ती मुलाखत मनाचा ठाव घेणारी होई. सुमारे २५ वर्षे 'वेध' व्यासपिठावरून त्यांनी अशा असंख्य मुलाखती घेतल्या.
'वेध'च्या यशानंतर त्यांना वाटले की बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या शालेय मुलांना बहरत्या काळात हेरणारा आणि मार्गदर्शन करणारा उपक्रम साकारावा. त्यांनी त्यांची कल्पना मला सांगितली. तोपर्यंत आमचे वयम् मासिक चांगलेच नावारूपाला आले होते. आम्ही 'वयम्' आणि आय.पी.एच.तर्फे 'बहुरंगी बहर' प्रकल्प २०१६ पासून सुरू केला. डॉ. हावर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता असणाऱ्या महाराष्ट्रभरातील मुलांना लेखी प्रश्न, गटचर्चा व मुलाखत अशा तीन फेऱ्या घेऊन हुडकायचे आणि निवडक मुलांना उन्नतीसाठी मदत करायची, असा हा प्रकल्प होता. या उपक्रमाने आम्हाला विलक्षण समाधान दिले. यातील अनेक मुले आज उच्च शिक्षण घेताना त्यांचा हुन्नर जपत आहेत, तर्कशुद्ध विचारांची पाईक झाली आहेत. हा प्रकल्प साकारत असताना डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या सहवासाने आम्हीही उन्नत होत गेलो. मुलांच्या बुद्धीला, विचारांना साद घालणारे प्रश्न कसे विचारायचे, त्यांच्या त्यांच्या मनात कसे डोकावायला लावायचे, स्वतःच्या भावनांचा व विचारांचा ताबा घेण्याचे उत्तरदायित्व त्यांना कसे जाणवून द्यायचे, समाजशील होण्यासाठी त्यांना प्रवृत्त कसे करायचे, यावर आमच्या चर्चा व्हायच्या. सत्रे आखली जायची. डॉक्टरांचे काम एकदम आखीवरेखीव. ते कागदावर मुद्दे लिहायचे. बसण्याची रचना, स्टेज यांचे सुरेखन करायचे. पुढे पुढे त्यांच्या अनुपस्थितीत आम्हीही अशी कामे केली की शाबासकीही द्यायचे. त्यांच्या कल्पना पुढे नेल्या की उमदेपणाने आनंद व्यक्त करायचे. गेल्या वर्षी काही कारणांनी आम्हाला हा प्रकल्प बंद करावा लागला. डॉक्टरांनाही आमच्या इतकेच दुःख झालेच असणार. पण शोक व्यक्त करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. जरा विरामानंतर वेगळ्या स्वरूपात आपण पुढे चालवू हे काम, असे म्हणत त्यांनी आम्हाला दिलासा दिला. आठ वर्षांत बहुरंगी बहर प्रकल्पातील सुमारे ४०० तरुण मुलांवर आज त्यांच्या आनंदकाकांचा चांगलाच प्रभाव आहे.
वाचन, लेखन, भटकंती, संगीत, चित्रकला, डोळसपणे घेतलेले अनुभव, अनेक दिग्गजांशी मैत्र असे त्यांचे बहुरंगी व्यक्तिमत्त्व, प्रचंड ज्ञान, मराठीवर प्रभुत्व, वेदांतासह अनेक विषयांचा गाढा अभ्यास, मनन, चिंतन यांतून पोसलेला पिंड, जाणती संवेदनशीलता, कल्पकता आणि सतत समाजाला काहीतरी चांगले देत राहण्याची आस यांतून ते समाजाला खूप काही देऊ शकले. म्हणून ते दीर्घकाळ कार्यरत असायला हवे होते.
'लोक अलीकडे वाचत नाहीत, बघतात', असा ट्रेंड दिसू लागल्यावर त्यांनी 'आवाहन' हे डिजिटल व्यासपीठ सुरू केले. त्याही माध्यमावर प्रभुत्व मिळवले. मन विषयक त्यांचे पॉडकास्ट, मुलाखती यांच्या रूपात खूप मोठा खजिना निर्माण करून ठेवला आहे त्यांनी. पुस्तके, लेख यांतून साहित्यिक ऐवज तयार करून ठेवला आहे. आय.पी.एच. म्हणजे कोणत्याही मानसिक मदतीसाठी हक्काचे ठिकाण झाले आहे. तिथे त्यांच्या मुशीत घडलेल्या अनेक मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशकांची फौज आहे. वृद्धांसाठी व मानसिक विकलांग मुलांसाठी डे-केअर सुद्धा चालवले जाते या संस्थेतर्फे. तिथेही नुसता सांभाळ नाही, तर त्यांना उत्साह, उमेद देणाऱ्या कितीतरी गोष्टी सतत होत असतात.
मनासाठी आधार घेतोय हे ताठ मानेने सांगणाऱ्यांची संख्या आज वाढतेय. ही त्यांच्या कामाची मोठी पावती आहे. तनाच्या आजाराइतकाच स्वीकार मनाच्या विकारांना मिळावा, मनोरुग्णांच्या वाटेला अपमान, उपेक्षा येऊ नये, हा त्यांचा आग्रह होता. मनात आत्यंतिक कल्पकता ठासून भरलेली असल्याने ते या त्यांच्या आसक्तीला कल्पकतेने भिडले. मनोविकारांतून बाहेर आलेल्या शुभंकरांचा सन्मान करणारा भव्य कार्यक्रम, त्यांच्या काळजीवाहू कुटुंबीयांबद्दलचा-शुभार्थीचा कृतज्ञता सोहळा, भावनिक चित्रपटांच्या आस्वादाचा 'मनतरंग' उपक्रम असे किती आगळेवेगळे कार्यक्रम त्यांनी सादर केले. त्यांनी दिलेली नावेही छान समर्पक असत. भावूक कवितांचे निरुपण, भगवद्गीता, दासबोध अशा ग्रंथांची चिकित्सा, 'फोर्स वन' मधील संरक्षकांना मनोबलाचे प्रशिक्षण, शेतकऱ्यांना मनाची मशागत करण्याचे शिक्षण, शिक्षकांसाठी REBT, असे नानाविध उपक्रम ते करत असत. वाचकांची संवेदनशीलता वाढवणाऱ्या कथा, कादंबऱ्या, ललित लेख लिहिले. लाघवी स्वभावामुळे प्रत्यक्ष त्यांना भेटणारे त्यांचे चाहते व्हायचेच. पण त्यांचे वाचून, ऐकून, बघून चाहते झालेल्यांची संख्याही अफाट आहे. आजच्या भाषेत ते फार मोठे इन्फ्लुएन्सर होते. मनःस्वास्थ्य, स्वभाव, नातेबंध, प्रगती अशा विषयांचे इन्फ्लुएन्सर !
मनोविकास क्षेत्रातल्या या डेरेदार वृक्षाने मानसिक आघातांनी होरपळलेल्या अनेक जणांना शीतल छाया दिली. विवेकाच्या, संवेदनांच्या आणि कल्पकतेच्या खतपाण्याने रसरशीत झालेला हा वृक्ष होता. मनाचे कप्पे करत नियोजनपूर्वक भरपूर कामे करून हा वृक्ष सदाबहार टवटवीत झाला होता. हा आधारवड आता गेला. त्यांच्या आचार-विचारांची कास न सोडता जगायचे, इतकेच आता हातात आहे. कधी थबकलो, गोंधळलो, विसरलो तर त्यांच्याच शब्दांचा सावलीसारखा आधार घेऊन स्वतःला सावरायचे !
cshubhada@gmail.com