विजार, बाजार अन् रोबो! (Photo-kanerika)
अक्षररंग

विजार, बाजार अन् रोबो!

१९७६ मधील खरे गुरुजींची कडक शिस्त, २०२६ मधील खोटेगावकरांचा पैशांचा बाजार आणि २०५६ मधील एआय रोबोचे कोट्यवधींचे कंत्राट...तीन वेगवेगळ्या पिढ्यांमधील शिक्षणाचे वास्तव उघड करणारे वास्तववादी चित्रण.

नवशक्ती Web Desk

टपल्या आणि ठोसे

संदीप प्रधान

१९७६ मधील खरे गुरुजींची कडक शिस्त, २०२६ मधील खोटेगावकरांचा पैशांचा बाजार आणि २०५६ मधील एआय रोबोचे कोट्यवधींचे कंत्राट...तीन वेगवेगळ्या पिढ्यांमधील शिक्षणाचे वास्तव उघड करणारे वास्तववादी चित्रण.

१९७६

खरे गुरुजींना पाहून विजार ओली झाली नाही असा विद्यार्थी आमच्या शाळेत एकही नव्हता. शाळेची वेळ झाल्यावर खरे मास्तर शाळेच्या दरवाजात उभे राहायचे. चांदीसारखे सफेद केस, काळा वाटेल इतका सावळा वर्ण, सडसडीत अंगकाठी, डोळ्यावर चष्मा आणि हातात छडी. मास्तरांना व्यायामाची आवड असल्याने बरेचदा ते पोटावर ओढून घेतलेल्या हाफ पँटींत असायचे. उशीरा शाळेत आलेल्या, शर्ट बाहेर असलेल्या, केस न कापता शाळेत आलेल्या, मस्ती करणाऱ्या विद्यार्थ्यावर मास्तर अक्षरशः तुटून पडत. खरे मास्तरांची छडी पोठरीवर पडली की आईची आठवण काढावीच लागे. ओणवे उभे करुन पाठीवर ठेवलेली पट्टी पडली की, आता पाठ तिंबून घेण्याची घटीका समीप आल्याची जाणीव व्हायची. खरे मास्तरांनी चोपला हे घरी कळल्यावर कधीही घरातून समर्थन लाभले नाही. खरे मास्तर गणित आणि विज्ञान शिकवायचे. गणितामधील सूत्रे आणि विज्ञानाचे फॉर्म्युले घोकून घ्यायचे. मात्र तरीही गुरुजींना पाहिल्यावर भीतीपोटी मेंदूतून काही गोष्टी डिलीट व्हायच्याच आणि मग त्या विद्यार्थ्याच्या कानावरील त्याचा अधिकार संपुष्टात यायचा. बळी तो कान पिळी ही म्हण खरे मास्तरांच्या काळपिळीवरून प्रचलित झाली, असाच समज आमच्यात शालेय जीवनात होता. मात्र खरे मास्तरांनी शिकवलेले गणित आणि विज्ञान काळ समोर येऊन उभा राहिला तरी विसरणार नाही इतका फिट्ट डोक्यात बसलाय. खरे मास्तरांना एक मुलगा होता. सदानंद त्याचे नाव. शाळेतील एका व्रात्य मुलाशी भैरवशी त्याची मैत्री होती. भैरवचे वडील खंडुतात्या हे गावातील पुढारी. सत्ताधारी पक्षाचे नेते. साडेसहा फूट उंचीचे काळेकभिन्न खंडुतात्यांच्या कपाळावर कुऱ्हाडीचा घाव घातल्याची खूण होती. भैरव दहावीला होता तेव्हा खरे मास्तरांचा सदानंद नववीत होता. भैरवने अभ्यास केला नव्हता पण सदानंद अत्यंत हुशार होता. भैरवनी सदानंदला डमी म्हणून परीक्षेला बसवण्याचे ठरवले. शाळेतल्या काही विद्यार्थ्यांना याची कुणकुण लागली. गणिताच्या पेपरला सदानंद भैरवचा डमी म्हणून बसला. खंडुतात्यांनी भैरवची एका वेगळ्या वर्गात पेपरला बसण्याची व्यवस्था केली होती. खरे मास्तरांच्या कानावर हा प्रकार गेला. ते पोलिसांना घेऊन त्या वर्गात शिरले. त्यांनी सदानंदच्या हातातून पेपर हिसकावून घेतला. त्यात तो फाटला. खंडुतात्याला हे कळले तेव्हा त्याने खरे गुरुजींना आपल्या वाड्यावर बोलावून घेतले. तुम्ही स्वतः भैरवचा पेपर लिहा. माझं पोरगं पास झालं पाहिजे, अशी दमदाटी केली. पण खरे गुरुजी बधले नाहीत. भैरवला सहा महिन्याकरिता सुधारगृहात जावे लागले. सदानंदला घरातून बाहेर काढून मास्तरांनी मामाच्या घरी पाठवले. शाळेत एक मागासवर्गीय समाजाचा बुद्धभूषण नावाचा पोरगा होता. अत्यंत हुशार. सर्व विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळवणारा. खरे मास्तरांनी त्याला परीक्षेच्या अगोदर सहा महिने आपल्या घरी नेऊन ठेवले. ते त्याला दररोज शिकवत. चांगले चुंगले खायला घालत. बुद्धभूषण दहावीला बोर्डात आला. पुढे मोठा अधिकारी झाला. खरे मास्तर रिटायर्ड झाले. पण गावात फिरायला बाहेर पडल्यावर समोर येईल तो प्रत्येक विद्यार्थी त्यांना वाकून नमस्कार करायचा. खरे मास्तर गेले तेव्हा सारे गाव ढसाढसा रडले. मास्तरांनी सदानंदला अग्नी देऊ दिला नाही...

२०२६

गावात नवा मास्तर आलेला लगेच कर्णोपकर्णी होते. कारण प्रत्येक घरातील पोरगं आपल्या मास्तराबद्दल घरी जाऊन बरं-वाईट सांगतच. माधव खोटेगावकर हे आता गावातलं बडं प्रस्थ झालं होतं. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, आँडी, जग्वार नाव घ्याल ती मोटार खोटेगावकरच्या बुडाखाली होती. खोटेगावकरचा पोरगा आनंद डॉक्टर होणार होता आणि त्याच परीक्षेचा पेपर फोडल्याच्या आरोपाखाली खोटेगावकरला पोलिसांनी धरून नेला. खोटेगावकरचा इतिहास आणि त्याने घेतलेली झेप गावाला थक्क करणारी होती. खोटेगावकर शाळेत शिकवायला आला तेव्हा त्याच्याकडे एक बाईक होती आणि डोळ्याला रेबँनचा गॉगल लावून तो गावात फिरायचा. पाखरं हेरायची म्हणून मास्तर सदानकदा गॉग मारके घुमता है, अशी वदंता होती. खोटेगावकरने अल्पावधीत त्याच्यापेक्षा बारा वर्षांनी लहान असलेली पोरगी पटवली आणि लग्न केलं. तेव्हा गावात सॉल्लेड बोंबाबोंब झाली होती. पोरीचा बाप सत्ताधारी वर्तुळातला आणि खोटेगावकरही सहावा-सातवा वेतन आयोग कोळून प्यायलेला. मुलीने स्वमर्जीने पळून गेल्याचे सांगितल्याने खोटेगावकरवरील बालंट टळले. खोटेगावकरने गावात सावकारी सुरु केली. अडल्यानडल्यांना तो कर्ज द्यायचा. स्वतःच वसुली पण करायचा. रोज जीममध्ये व्यायाम केल्यामुळे एखाद्या बाऊन्सरसारखी त्याची बॉडी होती. खोटेगावकरला याच प्रवासात यशाची शिडी मिळाली. गावातील मंत्र्याच्या नातवाची खोटेगावकरने शिकवणी घेतली. मंत्र्याच्या नातवाला नव्वद टक्के मिळाले. खोटेगावकरचा गावात जाहीर सत्कार केला गेला. मंत्र्यांच्या मुलाशी खोटेगावकरची सलगी झाली. मंत्री पुत्राची लक्ष्मी आणि खोटेगावकची सरस्वती यांची महायुती झाली. खोटेगावकरनी डॉक्टर, इंजिनीअर बनवण्याची फँक्टरी सुरु केली. आजूबाजूच्या गावातून, मग शेजारपाजारच्या जिल्ह्यातून मुले फँक्टरीत शिकू लागली. डॉक्टर, इंजिनीअरची रांग लागली. खोटेगावकरच्या घरी लक्ष्मी पाणी भरु लागली. टीव्ही, पेपर, होर्डिंग्ज सगळीकडे खोटेगावकरचेच फोटो झळकायचे. टीव्हीवर मुलाखती, युट्युबचे व्हीडिओ, पुणे-मुंबईत मुलाखती खोटेगावकर सेलिब्रिटी झाला. मुंबईतच्या क्लासेसमध्ये तर बॉलिवुड नट-नट्यांची पोरं शिकू लागली. खोटेगावकर पेज-थ्री सेलिब्रिटी झाला. अमूक तमूक नटीच्या वाढदिवसाच्या पार्टीत खोटेगावकर यशाच्या फँक्टरीचे संचालक माधव खोटेगावकर... खोटेगावकरचा मुलगा मोठा झाला. आता मुलाला डॉक्टर करायचे. मेडिकल कॉलेज काढायचे आणि वेगवेगळ्या शहरांत फाईव्ह स्टार हॉस्पिटलची चेन सुरु करायची, याचा ध्यास खोटेगावकरने घेतला होता. मुलगा हमखास डॉक्टर करायचा म्हणून त्याने आपली सर्व राजकीय आणि मनी पॉवर पणाला लावली. पोराला पेपर मिळवून दिला. पण देअर इज नो पर्फेक्ट क्राईम असं म्हणतात तसच झालं. खोटेगावकरने पेपर फोडल्याचे वर तरंगून आलेच. खोटेगावकरला पोलिस धरुनबांधून घेऊन गेले. डॉक्टर, इंजिनीअर बनवण्याच्या फँक्टरीला टाळ ठोकलं गेलं. खोटेगावकर दीर्घ काळाकरिता गजाआड गेला. खोटेगावकर नावाचा मास्तर होता हेच पुढे गाव विसरुन गेले. डॉक्टर होण्याची स्वप्नं पाहणारा त्याचा मुलगा घराच्या खिडकीतून शून्यात पाहत बसायचा... निःशब्द... जणू दगडी पुतळा...

२०५६

किशोर आणि त्याचा मुलगा स्वप्निल काळतोंडे जेव्हा त्या क्लासमध्ये शिरले तेव्हा आपण एखाद्या महाकाय महाजालात प्रवेश केल्याची जाणीव त्यांना झाली. तुम्ही घरबसल्या डॉक्टर व्हा हीच त्यांची टँगलाइन होती. किशोर आणि स्वप्निल जेव्हा क्लासच्या संचालिका सोनाक्षी साखरदांडे यांच्या समोर जाऊन बसले तेव्हा त्या त्यांना म्हणाल्या की, अगदी थोडक्यात सांगायचे तर आमचा क्लास हा आयुष्यभराच्या शंभर टक्के यशाचा मार्ग आहे. किशोर आणि स्वप्निल यांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह ओळखून त्या म्हणाल्या की, कसे ते मीच तुम्हाला समजावून सांगते. त्यांनी त्या दोघांना एका खोलीत नेले. तेथे वेगवेगळे रोबो ठेवलेले होते. हे सगळे रोबो मेड टू आँर्डर आहेत. म्हणजे जो विद्यार्थी आमच्याकडे प्रवेश घेतो हुबेहुब त्याच्यासारखे दिसणारे, बोलणारे, विचार करणारे एआय रोबो. तुमचा हा मुलगा आणि हा रोबो अगदी हुबेहुब सारखे दिसणार. मिस्टर किशोर अगदी तुम्हाला वाटणार की, आपल्याला ट्विन्स झाली होती की काय? हा रोबोच मेडिकल एक्झामचे प्रीपरेशन करणार. आँनलाइन परीक्षा तोच देणार. हा रोबो अवघ्या सात मिनिटांत सगळा पेपर सोडवणार. कुणालाही संशय सुद्धा येणार नाही की, परीक्षा स्वप्निलने दिली नाही. कारण रोबो त्याची ओळख स्वप्निल अशीच सांगणार. अडीच कोटी ही त्याची किंमत आहे. किशोरने काही बोलण्याचा प्रयत्न करताच साखरदांडे म्हणाल्या की, तुमचा प्रश्न मी ओळखलाय. तुमचा स्वप्निल अभ्यास करणार नाही, परीक्षा देणार नाही तर डॉक्टरकीची डिग्री घेऊन काय करणार? किशोरनी होकारार्थी मान हलवताच साखरदांडे म्हणाल्या की, तो जेव्हा डॉक्टर होईल तेव्हा आम्ही त्याच्या स्पेशलायझेशननुसार नवा रोबो तयार करुन देणार. तो रोबोच तुमच्या स्वप्निलचे क्लीनिक किंवा हॉस्पिटल सांभाळणार. स्वप्निलने फक्त आयुष्यभर बसून पैसे कमवायचे. मजा करायची. रोबो तयार करुन देणे, त्यांना टेक्नॉलॉजिकली अपग्रेड करणे, काही अडचण आल्यास सर्व तांत्रिक सपोर्ट ही आमची जबाबदारी. मग ५० कोटींचे बेसिक कॉन्ट्रँक्ट करुया आपण? परिस्थिती बदलेल तसे हे रेट बदलू शकतात. ५०-७५ कोटी फार समजू नका. स्वप्निल २०० ते ५०० कोटी पाच-दहा वर्षांत असेच चुटकीसरशी कमवेल. साखरदांडे यांनी त्या खोलीमध्ये चुटकी वाजवताच त्या रोबोनीं चमकून त्यांच्याकडे पाहिले. डॉ. स्वप्निल काळतोंडे असा बोर्ड चढलेले हॉस्पिटल सुरु झाले. स्वप्निल गोल्फ खेळत असायचा किंवा बीअर पीत असायचा आणि किशोर काळतोंडे बँकेतील वाढता बँलन्स पाहत हरखून गेले होते...

pradhansandeep19@gmail.com

Mumbai : बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू; दुसऱ्या टीबीएमचे कटरहेड सावली शाफ्टमध्ये दाखल

Mumbai : मानसिक आरोग्याच्या मनमोकळ्या संवादाला चालना; पालिकेच्या सहकार्याने 'रिस्टार्ट' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

पाकिस्तानातील क्वेट्टा येथे भीषण स्फोट; रेल्वे ट्रॅकजवळील हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

संख्याबळ शिवसेनेकडे, पण तटकरेंची रणनीतीही मजबूत; तटकरे-गोगावले पुन्हा आमनेसामने?

Bhayandar : पोलिसांकडूनच वृक्षतोड; उत्तनमधील प्रकार, पर्यावरणप्रेमींनी केली तक्रार