चौकटीपलीकडचा पाऊस 
अक्षररंग

चौकटीपलीकडचा पाऊस

श्रीमंतीच्या चौकटीतून बाहेर पडून निसर्गाच्या कुशीत खऱ्या बालपणाचा आनंद शोधणाऱ्या एका लहानग्याची आणि त्याच्या संवेदनशील आईची ही भावस्पर्शी कथा.

नवशक्ती Web Desk

कथा

हार्दिका

श्रीमंतीच्या चौकटीतून बाहेर पडून निसर्गाच्या कुशीत खऱ्या बालपणाचा आनंद शोधणाऱ्या एका लहानग्याची आणि त्याच्या संवेदनशील आईची ही भावस्पर्शी कथा.

अकराव्या मजल्याची ती चकचकीत गॅलरी, हातात महागडं गेमिंग गॅझेट आणि डोळ्यांत मात्र समोरच्या मैदानातली धूळ... आठ वर्षांच्या विनीतची ही रोजचीच दुपार होती. विनीतला लाडाने विनू म्हणायचे. विनू, त्याचे आई-बाबा एका मोठ्या, आलिशान सोसायटीमध्ये अलीकडेच राहायला आले होते. विनू श्रीमंत आई-बाबांचा एकुलता एक मुलगा. घरात खेळायला जागा होती, महागडी खेळणी होती, पण त्या खेळण्यांना विनूचा एकटेपणा काही दूर करता येत नव्हता.

विनू आठ वर्षांचा होता. विनूला अनेकदा वाटायचं की, आपणही इतर मुलांसारखं मातीत खेळावं, बागडावं. गाडीतून जाता-येता रस्त्यावर खेळणारी मुलं दिसली की तो आईचा हात ओढून सांगायचा, “आई, मला पण असं खेळायचंय गं!” पण आई लगेच म्हणायची, “अरे विनू, तिथे किती घाण असते, इन्फेक्शन होईल ना बाळा! आपण संध्याकाळी मस्त मॉलमधल्या ‘प्ले झोन’मध्ये जाऊ, तिथे खेळ छान.” त्या वातानुकूलित, कृत्रिम जगात विनीत जायचा खरा, पण तिथल्या रबरी खेळण्यांमध्ये त्याला तो खराखुरा आनंद कधी सापडलाच नाही.

त्यांच्या या टोलेजंग सोसायटीच्या थोडं पुढे जुन्या चाळी होत्या. अकराव्या मजल्यावरून विनूला त्या चाळीतली आणि आजूबाजूची मुलं स्पष्ट दिसायची. त्या चाळीसमोरच एक छोटं, उघडं-बोडकं मैदान होतं. तिथे रोज संध्याकाळी मुलांचा नुसता दंगा असायचा. गोट्या, लगोरी, पकडापकडी... काय काय खेळायचे ते सगळे! त्यात भर म्हणजे दोन छोटी, गोंडस कुत्र्याची पिल्लं त्या मुलांच्या मागे-मागे शेपूट हलवत बागडायची. विनीतचे आई-बाबा दोघंही मोठ्या हुद्द्यावर कामाला होते. त्यामुळे ते सकाळीच ऑफिसला निघून जायचे. मग सुट्टीच्या दिवशी विनू गॅलरीत उभा राहून तासनतास हेच दृश्य पाहत राहायचा.

घरात त्याला सांभाळायला उमा मावशी होती. विनू रोज उमा मावशीकडे हट्ट करायचा, “मावशी, प्लीज गं... मला फक्त अर्ध्या तासासाठी त्या समोरच्या मैदानात ने ना खेळायला! बघ ना, ती पिल्लं किती गोड आहेत.” पण उमा मावशी घाबरायची. ती म्हणायची, “नको रे विनू, आई-बाबांना समजलं तर ते मला कामावरून काढून टाकतील. आपण घरातच लपाछपी खेळू या हवं तर.” विनू मान खाली घालून निघून जायचा.

त्या दिवशी हवेत सकाळपासूनच एक वेगळा गारवा होता. आभाळ गच्च भरून आलं होतं आणि बघता बघता वर्षातला पहिला कडकडणारा पाऊस सुरू झाला. पावसाचा तो पहिला सुवास हवेत दरवळला आणि विनीतच्या गॅलरीतून एक वेगळंच दृश्य दिसलं. समोरच्या मैदानातली ती सगळी मुलं पावसात चिंब भिजत नाचत होती. एकमेकांवर चिखल उडवणं, साचलेल्या पाण्यात उड्या मारणं सुरू होतं. ती कुत्र्याची पिल्लंही अंगावरचं पाणी झटकत मुलांच्या अंगावर उड्या मारत होती. मुलांचा तो खळखळून हसण्याचा आवाज अकराव्या मजल्यापर्यंत पोहोचत होता.

आता मात्र विनूला स्वतःवर ताबा ठेवणं अशक्य झालं. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. तो धावत उमा मावशीकडे गेला आणि तिचा हात धरून रडू लागला, “मावशी, आज मला अडवू नकोस. मला फक्त एकदा त्या पावसात भिजायचंय. आईला नाही सांगणार मी, प्लीज मला घेऊन चल.”

विनूचा तो रडवेला चेहरा आणि डोळ्यांतली आर्तता पाहून उमा मावशीचं काळीज वितळलं. तिने आजूबाजूला पाहिलं, एक सुस्कारा सोडला आणि म्हणाली, “चल, पण लवकर यायचं हं!”

विनू धावतच खाली गेला. पाय मैदानात पडताच, पहिल्यांदाच त्याच्या पायाला मऊ, ओल्या मातीचा स्पर्श झाला. तो स्पर्श इतका सुखावणारा होता की, विनीतचे डोळे आनंदाने चमकले. मैदानातल्या मुलांनी आधी या चकचकीत कपड्यातल्या मुलाला पाहिलं, पण मुलांमध्ये कसला आलाय भेदभाव? एका मुलाने विनूच्या अंगावर पाणी उडवलं आणि विनूही हसत हसत त्यांच्यात सामील झाला.

विनू चिखलात पडला, उठला, पावसाच्या पाण्यात, चिखलात उड्या मारल्या. त्या छोट्या पिल्लाला त्याने कडेवर घेतलं, त्या पिल्लाने त्याच्या गालाचा पापा घेतला. विनू आयुष्यात पहिल्यांदाच मनापासून पोट धरून हसत होता. त्याचा तो आवाज, तो आनंद गगनात मावेनासा झाला होता.

नेमकी याच वेळी विनूची आई काही फाईल्स विसरल्यामुळे ऑफिसमधून अचानक घरी परत आली. घरात पाऊल ठेवताच तिला शांतता जाणवली. विनू आणि उमा मावशी दोघंही घरात नव्हते. घाबरून तिने गॅलरीकडे धाव घेतली आणि खाली पाहिलं.

खालचं दृश्य पाहून ती थबकली आणि विचारात पडली. तिचा विनू, जो नेहमी स्वच्छ, टापटीप राहायचा, तो आज डोक्यापासून पायापर्यंत चिखलाने माखला होता. पण त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य होतं, ते तिने आजवर कधीच पाहिलं नव्हतं. तो त्या मुलांशी गप्पा मारत होता, पावसात चिंब भिजत नाचत होता. विनू नेहमीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंदी दिसत होता.

ते दृश्य पाहता पाहता आई भूतकाळात हरवून गेली. तिला तिचं स्वतःचं बालपण आठवलं. ती गावी कशी पावसात भिजायची, विहिरीत उड्या मारायची, होड्या सोडायची, पावसाचं पाणी जमा करायची. किती समृद्ध होतं ते बालपण! आईच्या डोळ्यांत सुखाचे आणि एका अपराधी भावनेचे अश्रू दाटून आले. तिने स्वतःशीच विचार केला, ‘श्रीमंतीच्या आणि हायजिनच्या या खोट्या चौकटीत आपण विनीतला कोंडून ठेवलं. आपण त्याला भौतिक सुखं खूप दिली, पण जे खरं बालपण असतं, जी निसर्गाची मजा असते, ती तर आपण त्याच्याकडून हिरावूनच घेतली ना! पैशाने सगळंच विकत घेता येतं, पण हा निखळ, निरागस आनंद नाही.’

काही वेळाने विनू आणि उमा मावशी घरी परत आले. दारातच मॅडमला उभं पाहून उमा मावशी घाबरल्या, आता काही खरं नाही. विनीतनेही घाबरून मान खाली घातली, त्याला वाटलं आता आईचा मोठा ओरडा पडणार.

पण तिथे काही वेगळंच घडलं. आईने विनीतला ओरडण्याऐवजी तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. ती उमा मावशींकडे बघून म्हणाली, “उमाताई घाबरू नकोस. चांगलं केलंस त्याला खाली घेऊन गेलीस.”

मग आई विनूच्या जवळ गुडघ्यावर बसली आणि म्हणाली, “खूप मजा आली ना बाळा? कधी कधी खेळत जा हा त्या मुलांसोबत!”

विनूला आपल्या कानांवर विश्वासच बसेना. उमा मावशी आणि विनीत दोघेही एकमेकांकडे अचंबित होऊन बघत राहिले. विनीतच्या चेहऱ्यावरचा अविश्वास क्षणात नाहीसा झाला आणि त्याने धावत जाऊन आईला घट्ट मिठी मारली.

नेहमी कपड्यांवर डाग पडल्यावर ओरडणारी, सॅनिटायझर घेऊन मागे फिरणारी आई आज स्वतःच्या महागड्या सिल्कच्या साडीचा विचार न करता, त्या चिखलात माखलेल्या, ओल्याचिंब विनूला स्वतःच्या काळजाशी घट्ट कवटाळून होती. बाहेर पाऊस पडतच होता आणि घरात मात्र एका आईच्या मनातील वात्सल्याचा आणि समजुतीचा नवा पाऊस सुरू झाला होता.

krantip183@gmail.com

Mumbai : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीस्वारांना भेट; पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

अविश्वास ठरावासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यकच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाला दिलासा

बनावट दाखल्यांचा घोटाळा उघडकीस; महसूल विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल