दुसरी बाजू
प्रकाश सावंत
एकेकाळी जगभरात एक कोटी गजराजांचे अधिराज्य होते. आता आफ्रिकेत चार लाख, आशियात अवघे ४० हजार हत्ती उरलेत. जंगलतोड, आक्रसलेले गवताळ प्रदेश, शिकार, शेतकरी-हत्ती यांच्यातील संघर्ष यातून हत्तींची संख्या रोडावत चालली आहे. त्यांचे अधिवास, स्वातंत्र्यच नव्हे, तर अस्तित्वही कमालीचे धोक्यात आले आहे. १२ ऑगस्टच्या 'जागतिक हत्ती दिना'च्या पार्श्वभूमीवर हत्तींचे जतन व संवर्धन करण्याचे खडतर आव्हान उभे ठाकले आहे. दुसरीकडे, कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीण महादेवी ऊर्फ माधुरीच्या वादग्रस्त स्थलांतरणावरून जनक्षोभ उसळल्याने महाराष्ट्रातील सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
देशातील विविध मंदिरे अथवा मठातील भाविकांशी मूकसंवाद साधणाऱ्या, डोक्यावर सोंड ठेवून त्यांना आशीर्वाद देणाऱ्या, त्यांनी देऊ केलेला चारा आपुलकीने खाणाऱ्या हत्तीशी लोकभावना जोडल्या गेल्या आहेत. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी नावाची हत्तीणही अशीच भाविकांची लाडकी बनली. तथापि, तिची नीट देखभाल होत नसल्याचे कारण पुढे करून तिला गुजरातमधील 'वनतारा' या खासगी अभयारण्यात हलविण्यात आले. या घटनेनंतर स्थानिक भाविक रडले. संतप्त झाले. त्याविरोधात कोल्हापुरात मोर्चे निघाले. हा जनक्षोभ तीव्र झाल्यानंतर माधुरीला पुन्हा नांदणीत आणण्याची तयारी सुरू झाली आहे. आता या घटनेमागे प्राणिमात्रांविषयी विशिष्ट जनसमूहाची भूतदया किती हा एक प्रश्नच असला तरी माधुरीच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी कुणालाही टाळता येणार नाही. या घटनेचे प्रतिध्वनी सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय वर्तुळात उमटत असून त्यातून केवळ माधुरीच्याच नव्हे, तर देशभरातील, जंगलांमधील हत्तींच्या स्वातंत्र्याचा, अधिवासाचा व अस्तित्वाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मुळात, हत्ती हा शांत, निवांत व अतिशय भावनाशील प्राणी. जंगलात आपल्याच मस्तीत रममाण होणारा. कुटुंबवत्सल. किमान सात-आठ, तर कमाल वीस-पंचवीसच्या संख्येने कळपात वावरणारा. आपल्या कळपातील सर्वात ज्येष्ठ हत्तीणीच्या आदेशानुसार चालून मातृसत्ताक पद्धतीचा अनोखा आविष्कार घडविणारा. अकराव्या वर्षानंतर पौगंडावस्थेत आलेले नर हत्ती आपला कळप सोडून पुढे एकटे अथवा अन्य नर हत्तींसोबत राहतात. कळपातील सर्वच हत्ती लहान बछड्यांचा काळजीपूर्वक सांभाळ करतात. कधी कधी नर हत्तीही आपल्या कळपावर लांबून देखरेख करीत असतात, हे विशेष.
आपल्या धिप्पाड शरीरयष्टीच्या तुलनेत हत्तीचे डोळे अगदीच बारीक. त्यांचे लांबलचक अणकुचीदार सुळे उरात धडकी भरवणारे. दूरवरचा आवाजच नव्हे, तर जमिनीवरची कंपनेही टिपणारे त्यांचे सुपाएवढे कान म्हणजे निसर्गाची अद्भूत किमयाच. साधारणतः सव्वातीन-साडेतीन मीटर उंचीच्या हत्तींचे वजन अंदाजे पाच-सहा टन भरते. त्यांचे आयुष्य उणेपुरे ६५-७० वर्षांचे. सतत अठरा तास गवत, वनस्पती खाणारा नि चार तास निद्रा घेणारा हत्ती म्हणजे अजबच रसायन.
जीवसृष्टीच्या अन्नसाखळीचा दुवा बनलेल्या हत्तीची स्मरणशक्ती अफाट, आताच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होणारी. स्पर्श, गंध, दृष्टी अन् आवाजातून संवाद साधणाऱ्या त्यांच्या जाणिवा अफलातूनच म्हणता येतील. प्रखर बुद्धिमत्ता, अंगभूत चातुर्य अन् अजस्त्र शक्ती हेच हत्तींचे बलस्थान. हत्तींना पूर्वीच्या राजदरबारीसुद्धा होते मानाचे पान. गजलक्ष्मी तर मूर्तिमंत समृद्धी, संपन्नताच जणू. एकेकाळी हत्तीवरून होणाऱ्या लढाया म्हणजे वीरश्रीचे, शौर्याचे आगळे प्रतीक. हत्तीच्या अंबारीतून मिरवणूक म्हणजे प्रतिष्ठा, मानसन्मान. हत्तीवरून साखर वाटणे म्हणजे आनंद सोहळाच. त्यामुळेच उत्साह, जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमालाही आहे हत्तीचे बळ.
जगात सर्वाधिक हत्ती आफ्रिका खंडात आहेत. हत्तींचा बालेकिल्ला असलेल्या बोत्स्वाना देशात तब्बल १ लाख ३० हजार हत्ती आहेत. त्याखालोखाल झिम्बाब्वेमध्ये १ लाख, टांझानियात ६० हजार, केनियात ३५, ५००, दक्षिण आफ्रिकेत २४ हजार, भारतात १७ हजार, श्रीलंकेत ७५०० हत्ती आहेत. आफ्रिका खंडाच्या तुलनेत भारत, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, म्यानमार, इंडोनेशियातील हत्तींचे अस्तित्व अधिक धोक्यात आले आहे.
अलीकडच्या काळात हत्तींच्या शिकारीचे प्रमाण कमी झाले असले तरी ते पूर्णपणे थांबलेले नाही. जंगले, गवताळ प्रदेश कमी झाल्याने हत्ती नागरी वस्त्यांमध्ये उच्छाद मांडू लागले आहेत. उभी शेती नष्ट करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यातूनच उभ्या राहिलेल्या मानव-हत्ती यांच्यातील संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार हत्तींना नागरी वस्त्यांपासून दूर ठेवण्यासाठी मधमाश्यांचे कुंपण उभारण्याचा पर्याय स्वीकारला जात आहे. हत्तींच्या आगमनाची वर्दी गावकऱ्यांना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा, ड्रोनचा वापर केला जात आहे. हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी धडक कृती दले तैनात केली जात आहेत.
प्राणीमार्गाच्या संरक्षणासाठी जमीनदारांसोबत करार केले जात आहेत. पीकहानी टाळण्यासाठी विमा योजना राबविण्यात येत आहेत. दुसरीकडे हत्ती वाचविण्यासाठी केवळ कायदे वा गस्त पुरेशी नाही. त्यासाठी हत्तींचे अधिवास संरक्षित राहायला हवेत. त्यांच्या मार्गिका सुरक्षित राहायला हव्यात. तसेच, ते मानवी सहजीवनाचाच एक भाग आहेत, ही भूमिकाही वाढीस लागायला हवी. निसर्गाची अन्नसाखळी टिकविण्याबरोबरच हवामान बदलाचे संकट थोपविण्यात मोलाची भूमिका बजावणारे हत्ती निसर्गनिर्मित जंगलातच अधिक शोभून दिसतात. ते राहिले तर जंगल राहील. त्यांना मंदिर, मठात साखळदंडाने बांधून त्यांचे नैसर्गिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याची गरजच काय?
prakashrsawant@gmail.com