अक्षररंग

भाषेचं सामर्थ्य कळलेला लेखक

गंगाराम गवाणकर या लेखकाला बोलीभाषेचं सामर्थ्य कळलं आणि त्यांनी ते ताकदीने वापरलं. वस्त्रहरण नाटकाच्या अफाट यशाचं श्रेय गंगाराम गवाणकर यांच्या मालवणी बोलीभाषा ताकदीने वापरण्याच्या प्रतिभेलाही आहे. प्रतिकूल परिस्थितीत मालवणी भाषा जिवंत ठेवण्याचं श्रेय गंगाराम गवाणकर यांच्याकडे जातं.

नवशक्ती Web Desk

नोंद

प्रवीण बांदेकर

गंगाराम गवाणकर या लेखकाला बोलीभाषेचं सामर्थ्य कळलं आणि त्यांनी ते ताकदीने वापरलं. वस्त्रहरण नाटकाच्या अफाट यशाचं श्रेय गंगाराम गवाणकर यांच्या मालवणी बोलीभाषा ताकदीने वापरण्याच्या प्रतिभेलाही आहे. प्रतिकूल परिस्थितीत मालवणी भाषा जिवंत ठेवण्याचं श्रेय गंगाराम गवाणकर यांच्याकडे जातं.

जवळपास आठ हजारहून अधिक प्रयोग झालेल्या मालवणी बोलीभाषेतल्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या यशात निर्माता मच्छिंद्र कांबळी यांचाही मोठा वाटा असला, तरी ‘वस्त्रहरण’ या नाटकाची संहिताही तितकीच दमदार आणि लवचिक होती, हेही मान्य करायला हवे. मालवणी ही खरंतर सिंधुदुर्ग या एकाच जिल्ह्यात बोलली जाणारी मराठीची बोली. पण बोलीभाषेतील एका नाटकाचे इतके प्रयोग व्हावेत, हे अचंबित करणारे आहे.

या नाटकाच्या निमित्ताने मालवणी बोलीची ओळख सर्वदूर होऊन मुख्य धारेतील अनेक कथा-कादंबऱ्या, नाटके, मालिका, सिनेमा यांतून मालवणीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. मालवणी माणूस चारचौघात मोठमोठ्याने मालवणी गजाली मारायला सहसा संकोचत नाही. वस्त्रहरणच्या लोकप्रियतेनंतर आणि त्यात पु.लं.च्या कौतुकाच्या शब्दांची भर पडल्यानंतर तर अ-मालवणी लोकांनाही मालवणी बोलायला भाग पाडणारी परिस्थिती निर्माण झालेली दिसते. आमच्या ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकरांका ऐकलात ना? समोर पंतप्रधान येवं दे नाय तं राष्ट्रपती, दादा आपला मालवणी बोलूचा सोडनत नाय! झक मारीत मग समोरचा माणूस मालवणी हेल काढायला लागतो.

मला या सगळ्याचं श्रेय गंगाराम गवाणकरांच्या ‘वस्त्रहरण’ला द्यावंसं वाटतं.

मालवणीसारख्या मराठीच्या बोलीभाषा तर सोडूनच द्या, पण मुख्य प्रवाहातील मराठी भाषेचाही ज्या वेगाने संकोच होऊ लागलाय, ते पाहता गवाणकरांसारख्या लेखकांचं मोल लक्षात येऊ शकतं.

मराठी मराठी करणारे शिक्षक-प्राध्यापक-पत्रकार-लेखक-राजकारणी आज जी मराठी भाषा सार्वजनिक ठिकाणी वापरतात, ती कुठची, कसली मराठी आहे? अभिजात भाषा म्हणून अभिमान बाळगावा, अशी भाषा यांच्या मुखातून येते आहे का? उर्वरित महाराष्ट्र जाऊ दे, मी माझ्या मालवणी मुलखापुरतं बोलतो. ज्या नाथ पै, मधु दंडवतेंचं नाव आम्ही वारंवार घेतो, त्यांचा वारसा चालवणाऱ्या माझ्या जिल्ह्यातील अपवाद म्हणूनही एकाही राजकारण्याला मराठी नीट वापरता येत नाहीए. हिंदी, इंग्रजी दूरची गोष्ट. बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा सांगणारे पत्रकार असोत की केशवसुत-साने गुरुजी-आरती प्रभूंचा वारसा सांगणारे साहित्यिक, कुणाला भाषेचं सामर्थ्य कळलंय? कुणाला कशाचं काय पडलंय!

गवाणकरांसारखे लेखक म्हणूनच मला थोर वाटतात. बोलीची सगळी क्षमता हेरून तिला अशी कलाकृतीसाठी वापरणं सोपं नक्कीच नाही. गवाणकरांनंतर इतक्या वर्षांत त्याच ताकदीचा दुसरा मालवणी लेखक का झाला नसावा, याचं उत्तर यातूनच आपसूक मिळू शकतं.

काळ सोकावला की सगळ्यात आधी सामान्य माणसं जी भाषा बोलतात ती भाषा मरते, असं न्गुगी वा थिवांग म्हणालेला. आमची भाषा मारायला नि काळाला सोकावू द्यायला दुसरं कुणी नाही, आम्ही करंटेच कारणीभूत आहोत. आम्हालाच आत्महत्या करायची हौस असेल, तर गवाणकर असोत की आणखी कुणी, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे, हाच आमचा मराठी बाणा राहील, हे नक्की!

ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार.

दुबईत अडकलेल्या भारतीयांना दिलासा; मध्यपूर्व तणावानंतर उड्डाणाला सुरुवात, प्रवासी मुंबईत दाखल, Video

मध्यपूर्व संघर्षानंतर महाराष्ट्र सरकारकडून व्हॉट्सॲप हेल्पलाइन सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य...

"कृपया मला मदत करा…"; विशाखा सुभेदारांचा मुलगा अडकला कुवेतमध्ये, अभिनेत्रीला अश्रू अनावर; Video

Mumbai : लोकलला बांधून नेलं होळीचं झाड; विरार ते माहीम जल्लोषमय प्रवास, कोळी बांधवांची अनोखी परंपरा चर्चेत; Video

Iran vs Israel-US War : सौदीच्या रियाधमध्ये इराणी ड्रोनचा अमेरिकन दूतावासावर हल्ला, भीषण आगीचा Video व्हायरल