

नवी मुंबई : रविवारी (दि. २५) खारघरमध्ये घराबाहेर पडणार असाल, तर आधी वाहतुकीतील बदल जाणून घ्या. खारघर हाफ मॅरेथॉनमुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी काही रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ५ ते ९ या वेळेत हे निर्बंध असतील. मॅरेथॉनच्या मार्गावरील रस्त्यांची एक बाजू धावपटूंसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने दोन्ही दिशांना प्रवास करावा लागणार आहे.
मॅरेथॉन सकाळी ६ वाजता सुरू होणार
दिव्यांग मुलांच्या मदतीसाठी फिट मिलर्स फाउंडेशन ट्रस्टतर्फे या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ६ वाजता खारघरच्या सेंट्रल पार्क येथून मॅरेथॉनला सुरुवात होईल. यामध्ये ५ किलोमीटर, १० किलोमीटर आणि २१ किलोमीटर अशा तीन प्रकारच्या धावण्याच्या स्पर्धा होणार आहेत.
कोणत्या भागांतील वाहतुकीवर परिणाम होणार?
मॅरेथॉनमुळे सेंट्रल पार्क, ग्रीन हेरिटेज सर्कल, मुर्बीगाव, विनायकशेठ चौक, बी. डी. सोमाणी चौक, जे. कुमार सर्कल, फुटबॉल स्टेडियम, पापडीचा पाडा, तळोजा जेल रोड आणि ओवेगाव चौक परिसरातील वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सकाळी ५ ते ९ या वेळेत वाहतुकीतील बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
५ किलोमीटर मॅरेथॉनचा मार्ग
सेंट्रल पार्क येथून धावपटू ग्रामविकास भवन सिग्नल, ग्रीन हेरिटेज सर्कल आणि सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकापर्यंत जातील. तेथून यू-टर्न घेऊन इस्कॉन मंदिरमार्गे पुन्हा सेंट्रल पार्क येथे परततील.
१० किलोमीटर मॅरेथॉनचा मार्ग
१० किलोमीटरच्या मॅरेथॉनमधील धावपटू सेंट्रल पार्क येथून मुर्बीगाव स्मशानभूमी, विनायकशेठ चौक, बी. डी. सोमाणी चौक आणि जे. कुमार सर्कलमार्गे पुढे जातील.
त्यानंतर फुटबॉल स्टेडियम, गामी आणि पापडीचा पाडा पोलिस चौकीमार्गे अमन दूत मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचतील. तेथून यू-टर्न घेऊन पुन्हा सेंट्रल पार्क येथे परततील.
२१ किलोमीटर मॅरेथॉनचा मार्ग
२१ किलोमीटरच्या मॅरेथॉनचा मार्ग तळोजा जेल रोड, ओवेगाव चौक आणि गुरुद्वारा परिसरापर्यंत असेल. सेंट्रल पार्क बसथांब्याजवळ यू-टर्न घेऊन धावपटू त्याच मार्गाने परततील.
वाहनचालकांसाठी काय व्यवस्था?
नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅरेथॉनच्या मार्गावरील रस्त्यांची एक बाजू धावपटूंसाठी राखीव असेल. दुसऱ्या बाजूने वाहनांना दोन्ही दिशांनी ये-जा करता येईल.
मॅरेथॉन सुरळीत पार पडावी, वाहतूककोंडी होऊ नये आणि अपघात टाळता यावेत, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
या वाहनांना निर्बंधांतून सूट
पोलिसांची वाहने, अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका, सरकारी वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.
महत्त्वाचं : रविवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी ५ ते ९ या वेळेत खारघरच्या सेंट्रल पार्क आणि आसपासच्या भागांतून प्रवास करणार असाल, तर वाहतुकीतील बदल लक्षात घेऊनच घराबाहेर पडा.