डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
चुलीवर भाजलेला बांगडा, ताज्या कुरल्यांचा रस्सा, घरच्या परसातील भाज्यांचं खतखतं आणि पानांतून दरवळणारा गोमंतकीय स्वयंपाक... गोव्याची चव अनुभवायची असेल तर पंचतारांकित हॉटेलपेक्षा एखादं अस्सल कुळागर अधिक काही सांगून जातं. चोडण बेटावरील या भटकंतीत केवळ पदार्थांची चव घेतली नाही, तर त्या प्रत्येक घासामागची परंपरा, माती आणि माणसांशी असलेलं नातंही अनुभवता आलं.
समुद्रकिनारे, गाजणारे लाटांचे आवाज आणि पर्यटकांची गर्दी... गोव्याचं हे नेहमीचं रूप आपण सगळेच जाणतो. पण यावेळी माझी गोव्याची भटकंती जरा वेगळी, शांत आणि निसर्गाच्या अगदी जवळ नेणारी होती. ही भटकंती होती 'सोल ट्रॅव्हलिंग' सोबत गोव्याची समृद्ध संस्कृती, प्राचीन मंदिरं आणि बेटावरची अप्रतिम खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी. माझा हा प्रवास सुरू झाला पोंडा येथील 'सिरेंडिपिटी' नावाच्या एका अत्यंत सुंदर व्हिलामधून. हिरवळीने नटलेलं गार्डन, शांतता आणि मन प्रसन्न करणारा निवांतपणा इथे अनुभवता आला. संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात व्हिलाच्या बागेत फिरतानाच दुसऱ्या दिवशीच्या मोहिमेची उत्सुकता मनात ताणली गेली होती. कारण दुसऱ्या दिवशी मी निघणार होते 'शराव आयलँड'कडे ज्याला स्थानिक मराठीत 'चोडण' असेही म्हणतात.
पणजीजवळच असलेलं हे हिरवंगार बेट म्हणजे निसर्ग आणि शेतीसंस्कृतीचा एक अद्भुत संगम आहे. एक तासाचा प्रवास करून आम्ही चोडण बेटावर पोहोचलो, तिथल्या स्थानिक संस्कृतीची सफर घडवण्यासाठी 'सोल ट्रॅव्हलिंग' चे सहकारी आणि स्थानिक मार्गदर्शक रजत सोबत होते.
बेटावरील भटकंतीची सुरुवात झाली एका प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिराच्या दर्शनाने. मंदिरात प्रवेश करतानाच झाडाखाली 'घोळेश्वर' किंवा 'देवचार' देवाचे छोटे स्थान दिसले. देवचाराची मूर्ती हातात मशाल, दंडुका, खांद्यावर कांबळ, डोक्याला फेटा आणि अंगात धोतर-कोट अशा वैशिष्ट्यपूर्ण रूपात दगडात कोरलेली होती. त्यानंतर आम्ही मुख्य मंदिरात जाऊन 'सातेरी देवी'चं दर्शन घेतलं. गोव्यात आणि कोकणात सातेरीची अनेक मंदिरं आढळतात. मुळात ही भूमीची पूजा असून, वारुळाची पूजा करण्याची जुनी परंपरा यामागे आहे. सातेरी म्हणजेच 'Goddess of Fertility'. मंदिरात गोव्याचे मूळ आणि पारंपरिक वाद्य 'घुमट' पाहायला मिळालं. मडक्याच्या तोंडावर कातडं मढवून बनवलेल्या या वाद्याचा 'धिन' आणि 'ताक' हा नाद कानावर पडताच अंगावर काटा येतो.
सातेरी देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मोर्चा वळवला आजच्या जेवणाच्या तयारीकडे. खाडीवरून ताजे मासे खरेदी केले. मासे ताजे आहेत की नाही हे ओळखण्याची गोव्यातील रीत म्हणजे माशांचे गिल्स एकदम लालबुंद रंगाचे आणि वरची त्वचा चकाकणारी असावी.
आम्ही ताजे बांगडे खरेदी केले आणि पोहोचलो कवठणकर काकांच्या 'कुळागरा 'मध्ये. कुळागरात पोहोचताच सर्वप्रथम झाला पारंपरिक नाश्ता. अळसाणे (जे चवीला थोडे चवळीसारखे असतात), मऊशार नीर डोसे (घावणे किंवा पोळे), गोव्याचा प्रसिद्ध पोयी पाव आणि ओव्याच्या पानांची कुरकुरीत भजी असा मस्त बेत होता. नाश्त्यानंतर आम्ही शेताच्या भागात फिरलो. तिथे मानवी बुद्धिमत्तेचा सुंदर नमुना असलेलं 'मानस' पाहायला मिळालं. खाडीचं पाणी शेतात किंवा तळ्यात अडवून, ऋतूनुसार पाणी नियंत्रणात ठेवणं आणि माशांचे संवर्धन करणं यासाठी या पारंपरिक लाकडी दरवाजांचा वापर पूर्वीपासून केला जातो. तिथेच पाणथळीत आम्ही जाळी लावून ताज्या कुरल्या (खेकडे) पकडल्या.
दुपारच्या जेवणासाठी शाकाहारी पदार्थात गोव्याचा खास पारंपरिक पदार्थ 'खतखतं' बनवायचा होता. त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आम्ही कुळागरातील परसातूनच गोळा केल्या. कच्ची केळी, पपई, हिरव्या मिरच्या आणि हळदीची पानं. खतखतं या पदार्थांमागे एक सुरेख सामाजिक परंपरा आहे. चतुर्थीच्या सणाला सर्व मंडळी एकत्र येतात, तेव्हा प्रत्येकजण घराबाहेरून एक-एक भाजी घेऊन यायचा. कोणाचाही मान मोडू नये म्हणून सगळ्या भाज्या एकत्र उकळून, त्यात भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण, गूळ आणि मसाले घालून हे खतखतं शिजवलं जातं.
स्वयंपाकाची खरी गंमत कुळागराच्या सान्निध्यात आणि चुलीसमोर अनुभवता आली. आम्ही बनवले भरले बांगडे ज्याला गोव्यात 'रशल बांगडा' म्हणतात. मिरच्या, लसूण, आलं, चिंच, हळद यांचा चवदार मसाला तयार करून तो बांगड्यांमध्ये भरला. नंतर हे बांगडे हळदीच्या आणि केळीच्या पानांत गुंडाळून खापरावर दोन्ही बाजूने कोळशाच्या धगीवर भाजून घेतले.
पूर्वी भात कापणी झाल्यावर मच्छिमार आणि शेतकऱ्यांमध्ये धान्य व माशांची देवाणघेवाण व्हायची; त्या परंपरेतून हा पदार्थ उगम पावला, दुसरीकडे चुलीवरच्या मोठ्या भांड्यात ताज्या कुरल्या, मिरच्या, आमसूल आणि हळद घालून उकळायला ठेवल्या.
दुपारी जेव्हा जेवणाचं ताट वाढलं गेलं, तेव्हा समोर होता एक समृद्ध गोमंतकीय मेजवानीचा नजराणा ! ताटात भात, वेर्त्यांची कढी, आंबाड्याचं सासव, चुलीवर पानांत भाजलेले भरले बांगडे, फ्राय केलेले मासे, कुरल्या, खतखतं, पातोळी आणि मुळ्याची भाजी होती.
खापरावर आणि हळदीच्या पानांत भाजलेल्या बांगड्याला चुलीच्या धुराचा जो मंद आणि मस्त फ्लेवर आला होता, तो अप्रतिम होता. खतखत्यातील गुळाचा गोडवा नि मसाल्यांची सुरेख सांगड जिभेवर रेंगाळत राहिली. कुळागराच्या थंडगार सावलीत, निसर्गाच्या सान्निध्यात बसून पारंपरिक पद्धतीचं हे जेवण जेवणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. पक्ष्यांच्या किलबिलाटात घेतलेला हा प्रत्येक घास म्हणजे निसर्गाची एक अनोखी भेटच वाटत होती.
समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांमध्ये आणि पबच्या संगीतात हरवणाऱ्या पर्यटकांना या शांत, सुस्तावलेल्या गोव्याची ओळखच नसते. पण खरी गंमत तर इथे आहे- जिथे मातीचा गंध, चुलीचा धूर आणि गावकऱ्यांचं प्रेम एकत्र येतं. शेवटी काय, पोट तर रोजच भरतं, पण मन तृप्त करणारी भटकंती ही अशीच असते । त्यामुळे पुढच्या वेळी गोव्याचा बेत आखताना बीचेस तर जरूर फिरा, पण तिथून थोडं वाट बदलून या बेटांवर नक्की या आणि गोव्याचा हा हळवा, लज्जतदार कोपरा एकदा तरी मनापासून जगून पाहा!
ट्रॅव्हल ब्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com