एक किल्ला मैत्रीचा 
अक्षररंग

एक किल्ला मैत्रीचा

निकोप स्पर्धेतून जपलेली माणुसकी आणि संकटात मित्राला साथ देणाऱ्या निस्वार्थी मैत्रीची ही एक हृदयस्पर्शी कथा

नवशक्ती Web Desk

कथा

संजय सागडे

निकोप स्पर्धेतून जपलेली माणुसकी आणि संकटात मित्राला साथ देणाऱ्या निस्वार्थी मैत्रीची ही एक हृदयस्पर्शी कथा

सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर संपून दिवाळीची सुट्टी सुरू झाल्यामुळे ‘नवभारत विद्यालया’तील मुले खूप खुश होती. दिवाळी म्हणजे धम्मालच! त्यातही या सुट्टीतील खास आकर्षण म्हणजे शहरातील ‘दुर्गप्रेमी मित्र मंडळा’च्या वतीने शालेय मुलांसाठी आयोजित होणारी भव्य ‘किल्ले बनवा स्पर्धा’. या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवणे खूप मानाचे समजले जाई; कारण या स्पर्धेचे परीक्षण नामवंत इतिहास संशोधक श्री. मुकुंद देशमुख, दुर्गपर्यटक श्री. लालजी ओहाळ व इतिहासाचे अध्यापक साठे सर करत असत. त्यामुळे स्पर्धेचा निकाल अतिशय पारदर्शक असायचा. परीक्षणात मूळ किल्ल्यातील बारकावे किती अचूक साकारले आहेत आणि पर्यावरणपूरक साहित्य वापरले आहे का? हे पाहिले जाई. तसेच तोंडी प्रश्न विचारून त्या किल्ल्याची स्पर्धकाला कितपत माहिती आहे, याचीही परीक्षा होई. अतिशय काटेकोर परीक्षण होत असल्यामुळे या स्पर्धेत यश मिळवणे मोठे खडतर असायचे.

या स्पर्धेची सूचना सूचनाफलकावर लावली होती. अजय, चिंतू, आर्यन आणि करण या चौकडीने ही सूचना काळजीपूर्वक लिहून घेतली. इतक्यात त्यांच्याच वर्गातील प्रसाद तेथे आला.

“किल्ला बनवा स्पर्धेचीच सूचना आहे ना रे मित्रांनो?” प्रसादने विचारले.

“हो, आम्ही घेतली लिहून,” असे म्हणून ही चौकडी तेथून निघाली.

“अरे तो प्रसाद आणि त्याचे पप्पा गेली दोन वर्षांपासून या स्पर्धेत सहभागी होत आहेत. मागच्या वर्षी तर अगदी थोडक्यात त्यांचा नंबर हुकला,” चिंतू म्हणाला.

“या वर्षी त्याने आणि त्याच्या पप्पानी या स्पर्धेची जय्यत तयारी केली आहे. यावर्षी ते ‘सिंधुदुर्ग’ उभारणार आहेत म्हणे,” अजयने माहिती पुरवली.

“अरे, त्याचे पप्पा इंजिनियर आहेत, त्यामुळे ते यावर्षी नक्कीच बाजी मारणार,” करण म्हणाला.

“अरे, मग आपले काय?” आर्यनने चिंता व्यक्त केली.

किल्ला तयार करण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मुलांबरोबरच जणू सारे घरच या स्पर्धेत उतरले आहे, असे वातावरण तयार झाले होते. स्पर्धेचा कालावधी आता एक दिवस उरला होता. आर्यन, चिंतू, करण आणि अजय यांचे किल्ले तयार होते. तोंडी परीक्षेसाठी किल्ल्याचा इतिहास शोधून त्यांची उजळणी सुरू होती. या सर्वांचा एकच मोठा प्रतिस्पर्धी होता, तो म्हणजे ‘प्रसाद’. प्रसादने कसा किल्ला तयार केला आहे, हे पाहण्यासाठी ही चौकडी प्रसादच्या घरी गेली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला! प्रसादच्या किल्ल्याचे काम अर्धवटच झालेले दिसत होते.

‘अरे, आता तर केवळ एकच दिवस उरला आहे आणि अजून किल्ला अपूर्णच!’

“प्रसाद... अरे प्रसाद, आहेस का घरात?” करणने हाक मारली. तशी प्रसादची आई बाहेर आली.

“कोण? अरे तुम्ही! या, या. प्रसाद थोडा आजारी होता, आजच घरी आला आहे.” इतक्यात त्याचे बाबाही बाहेर आले.

“अरे या मुलांनो,” बाबा म्हणाले.

“प्रसाद आजारी होता? आम्हाला माहीतच नाही,” अजय म्हणाला.

सारे प्रसादच्या रूममध्ये गेले. वर्गातील मित्रमंडळी पाहून त्याला आनंद झाला. “अरे तुम्ही सारे!” प्रसादचे डोळे आनंदाने चमकले.

“आम्ही तुझा सिंधुदुर्ग पाहायला आलो होतो,” चिंतू म्हणाला.

“कसला आलाय सिंधुदुर्ग! हा आजारी पडला, त्यातच सारा वेळ गेला. सिंधुदुर्गची सारी माहिती पाठ केली आहे, अगदी दवाखान्यात सुद्धा हा माहितीची उजळणी करत होता; पण आता त्याचा काय उपयोग? एका दिवसात किल्ला पूर्ण होणे अशक्य आहे,” प्रसादचे बाबा म्हणाले.

इतक्यात प्रसादच्या आईने साऱ्यांसाठी फराळ आणला. फराळ झाल्यावर “लवकर बरा हो!” असे म्हणून मुले निघाली. बाहेर आल्यावर अजय म्हणाला, “या वर्षी प्रसाद स्पर्धेत नाही असेच दिसते, मग आपल्याला चांगली संधी आहे.”

आर्यन मात्र गप्प होता. “काय झालं आर्यन, गप्प गप्प का आहेस?” चिंतूने विचारले.

तसा आर्यन म्हणाला, “मित्रांनो, आज प्रसादचा किल्ला पूर्ण झाला असता, तर त्यालाच बक्षीस मिळाले असते; कारण त्याने व त्याच्या बाबांनी पूर्ण तयारी केली होती. आजारी पडल्यामुळे त्यांना किल्ला बांधता आला नाही. प्रसादने किल्ल्याची माहिती सुद्धा छान पाठ केली आहे. तो स्पर्धेत नसताना आपण यश मिळवणे मला योग्य वाटत नाही. स्पर्धा निकोप असावी.”

“मग काय करायचे म्हणतोस?” चिंतूने विचारले.

“माझ्या मते, आपणच त्याच्या बाबांना किल्ला तयार करण्यास मदत केली तर?”

“अरे, उत्तम विचार!” साऱ्यांनीच होकार दिला.

चौकडी पुन्हा प्रसादच्या घरी आली. त्यांनी प्रसादच्या पप्पांना किल्ला बांधण्यासाठी तयार केले. या मित्रांच्या मदतीने प्रसादच्या बाबांनाही हुरूप आला. प्रसादचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. या चार मुलांचे मित्रप्रेम पाहून प्रसादच्या आईचे डोळे पाणावले आणि साऱ्यांच्या प्रयत्नातून सुंदर ‘सिंधुदुर्ग’ किल्ल्याची प्रतिकृती तयार झाली.

दुसऱ्या दिवशी परीक्षक किल्ल्याचे परीक्षण करून गेले. प्रसादने माहितीचे सादरीकरण अतिशय छान केले. अपेक्षेप्रमाणे प्रसादच्या सिंधुदुर्ग किल्ल्याने पहिला क्रमांक मिळवला. अजयचाही तिसरा क्रमांक आला. पारितोषिक वितरणासाठी ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. काकासाहेब पाटील उपस्थित होते.

पारितोषिक वितरणानंतर प्रसाद आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाला, “मला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला याचा आनंद आहे; मात्र चार दिवसांपूर्वी मी हॉस्पिटलमध्ये पडून होतो. यंदाची स्पर्धा हातची जाणार असे वाटत असतानाच माझ्या या मित्रांनी मला मदत केली. ते चारही मित्र स्पर्धेत होते, मात्र मी आजारी आहे हे समजल्यावर त्यांनी माझ्या बाबांना मदत करून किल्ल्याची प्रतिकृती पूर्ण केली. हे सारे यश त्यांचेच आहे.” असे म्हणून प्रसाद जागेवर बसला.

काकासाहेब पाटील म्हणाले, “मुलांनो, आयुष्यात अनेक स्पर्धा येत असतात; मात्र या स्पर्धेत यश मिळवत असताना माणुसकी, बंधुभाव आणि निकोप मैत्री ही मूल्ये सुद्धा जपली पाहिजेत. आज या चार मुलांनी आपल्या आजारी मित्रासाठी ‘सिंधुदुर्ग’च्या रूपाने एक मैत्रीचा अनोखा किल्लाच उभारला आहे.”

शिक्षक-श्रीवाघेश्वरी विद्यालय निरावागज, बारामती, पुणे

कोकण हापूसची आवक वाढली; दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा

जप्त केलेल्या नोटा उंदरांनी कशा कुरतडल्या? सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य

के. कविता यांचा नवा राजकीय पक्ष; 'तेलंगणा राष्ट्र समिती' नावाने वडिलांनाच दिले आव्हान

सिंधुदुर्गातील 'MH-०७' क्रमांकाच्या वाहनांना टोल नाही; पालकमंत्री नितेश राणे यांचा जिल्हावासीयांना दिलासा

ठाण्याची झणझणीत मामलेदारची मिसळ इतिहासजमा; तहसील कार्यालय परिसराच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर इमारत जमीनदोस्त