विशेष
श्रीराम शिधये
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा रोवून भारताने जगाला आपल्या अवकाश सामर्थ्याची झलक दाखवली. चांद्रयान-३च्या ऐतिहासिक यशाला आज तीन वर्षे पूर्ण होत असताना, भारतीय अवकाश संशोधनाची ही झेप केवळ अभिमानाची नाही, तर नव्या पिढीला आकाशापलीकडची स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारी आहे. ‘भारतीय अवकाश दिना’निमित्त भारताच्या या थक्क करणाऱ्या अवकाशयात्रेचा घेतलेला हा मागोवा...
तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी, म्हणजे २३ ऑगस्ट २०२३ रोजी, भारताचं 'चांद्रयान-३' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणं गेलं, त्यातून विक्रम लँडर आणि रोव्हर गाडी अलगदपणे चंद्राच्या भूमीवर उतरली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान यशस्वीपणे उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला. इस्रोने (भारतीय अवकाश संशोधन संस्था) मिळविलेल्या या यशानं साऱ्याच भारतीयांची मान ताठ केली. त्या पराक्रमाची आठवण ठेवण्यासाठी आजचा दिवस हा 'भारतीय अवकाश दिन' म्हणून साजरा केला जातो. तरुण विद्यार्थ्यांनी अवकाश विज्ञानामध्ये रस घ्यावा, त्यामध्ये करीअर करावं, सामान्यजनांमध्ये अवकाश संशोधनाबाबत सजगता निर्माण व्हावी यासाठी हा दिवस देशभर पाळला जातो. त्यानिमित्ताने एक मध्यवर्ती कल्पना ठरविली जाते. यंदाच्या तिसऱ्या भारतीय अवकाश दिनाची मध्यवर्ती कल्पना आहे, 'विकसित भारताकडे : नवनिर्मिती, सहयोग आणि जागतिक अंतराळ नेतृत्वाची आकांक्षा.' ही कल्पना समोर ठेवून आज देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यातूनच पुढची पिढी या विषयामध्ये काम करण्यास पुढे येईल, अशी आशा आहे.
ही आशा फुकाची नाही. याचं कारण भारताने अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आजवर लक्षणीय कामगिरी केली आहे. इतकी की, एकेकाळी भारताला क्रायोजेनिक इंजिनाचं तंत्रज्ञान देण्यास नकार देणाऱ्या, भारताचं यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोचल्यानंतर न्यूयॉर्क टाइम्समध्ये भारताची खिल्ली उडविणारं व्यंगचित्र प्रसिद्ध करणाऱ्या या अमेरिकेने भारतापुढे सहकार्याचा हात पुढे केला आहे. अमेरिकेच्या 'नासा' या संस्थेनं आपल्या आगामी चांद्रमोहिमांमध्ये सहभागी होण्यासाठी भारताला निमंत्रण दिलं आहे. यामागं इस्रोनं आजवर केलेलं कामच आहे. चांद्रयान-३चं यश तर निर्विवादपणं लक्षणीयच होतं. त्या यशानं भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं आपल्या इतिहासात एका नवीन झगझगीत यशाचा अध्याय लिहिला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर चंद्राच्या भूमीवर आपलं यान उतरवणारा भारत हा जगातला चवथा देश ठरला! या यशामुळं दुसऱ्या ग्रहावर यशस्वीपणं जाण्यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान आपल्याकडं आहे हे अधोरेखित झालंच, पण अशा मोहिमांसाठी आवश्यक असणारा आत्मविश्वासही मिळाला. अशी क्षमता असणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या रांगेत आता भारत जाऊन बसला आहे. आज अमेरिका, रशिया, चीन आणि जपान हे देश अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यांच्याशी अवकाश संशोधनाबाबत भारताला आता सन्मानानं, बरोबरीच्या नात्यानं बोलणी करता येतील.
ज्या चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाच्या निमित्तानं आजचा दिवस साजरा केला जातो, त्या मोहिमेसाठी इस्रोनं तीन उद्दिष्ट्यं ठेवली होती. १.चंद्राच्या भूमीवर आपला विक्रम लँडर अलगद उतरवणं, २.चंद्रावर प्रज्ञान रोव्हर ही गाडी चालवणं आणि ३.चंद्रावर वैज्ञानिक प्रयोग करणं. या तीनही गोष्टींमध्ये इस्रोला यश मिळालं. चंद्रावरचा एक दिवस, (म्हणजे पृथ्वीवरचे १४ दिवस), काम केल्यानंतर प्रज्ञान रोव्हरला 'निद्रिस्त' करण्यात आलं. त्यानंतर विक्रम लँडरचं इंजिन १२ दिवसांनी पुन्हा सुरू करण्यात आलं. ते सुरू केल्यानंतर लँडर हे चंद्राच्या जमिनीपासून ४० सेंमी वर उचलण्यात आलं. इतकंच नाही, तर त्यानं त्या उंचीवर राहून एक छोटा प्रवास केला. म्हणजे ते जिथं उतरलं होतं, त्या जागेपासून ते ३० ते ४० सेंमी दूर गेलं आणि पुन्हा एकदा अलगद चंद्राच्या भूमीवर उतरलं. चंद्राच्या भूमीवर विसावलेल्या विक्रम लँडरनं हवेत मारलेली ही उडीच होती. ती मारण्यापूर्वी त्याचे रॅम्प आणि उपकरणं बंद करण्यात आली होती. नवीन जागेवर विक्रम लँडर उतरल्यानंतर ती पुन्हा चालू करण्यात आली. त्या उपकरणांनी आपलं कामही सुरू केलं आणि घेतलेल्या नोंदी पृथ्वीकडं पाठवून दिल्या. हे सारं करण्याइतकं अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडं आहे. त्यामुळेच साऱ्या जगाचं लक्ष भारताकडं वळलं. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात आता भारत हा आपला एक स्पर्धक आहे, याची जाणीवही अमेरिका, रशिया, जपान आणि चीन यांना झाली!
अर्थात हे यश एकाएकी मिळालेलं नाही, याची जाणीवही आपण आजच्या दिवशी ठेवायला हवी. या साऱ्यायाच्या मागं डॉ. विक्रम साराभाई, डॉ. होमी भाभा आणि या दोन्ही शास्त्रज्ञांच्या मागं ठामपणं उभे राहणारे त्यावेळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आहेत, हे आपण विसरता कामा नये. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दहा वर्षांनी, त्यावेळच्या रशियानं आपला 'स्पुटनिक १' हा कृत्रिम उपग्रह दि. ४ ऑक्टोबर १९५७ या दिवशी अवकाशात पाठविला होता. त्यामुळं तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये रशियानं अमेरिकेच्याही पुढं मजल मारल्याचं जगाला समजलं. तिथपासून रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये तंत्रज्ञानातील प्रगतीबाबत आणि अवकाश संशोधनाबाबत स्पर्धा सुरू झाली.
अशी स्पर्धा आर्थिकदृष्ट्या बलवान असणाऱ्या देशांत असणं स्वाभाविकच मानलं जात होतं. पण डॉ. विक्रम साराभाई यांच्या दूरदृष्टीला भारतानंही प्रगत तंत्रज्ञान अवगत करून घेतलं पाहिजे, हे जाणवलं होतं. त्यामुळंच 'स्पुटनिक १'च्या यशानंतर भारतानंसुद्धा अवकाश संशोधनामध्ये उतरायला हवं, हे त्यावेळच्या सरकारला डॉ. साराभाई यांनी पटवून दिलं. केम्ब्रिज विद्यापीठामधून विज्ञानाची पदवी घेतलेल्या नेहरू यांना विज्ञानाचं महत्त्व चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळंच त्यांनी डॉ. साराभाई यांची कल्पना मान्य केली. भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांनीसुद्धा डॉ. साराभाई यांच्या कल्पनेला पाठिंबा दिला. १९६२ सालामध्ये अवकाश संशोधनासाठी 'इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च'ची स्थापना भारत सरकारनं केली.
ही संस्था स्थापन झाली, त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळून १५ वर्षंच झाली होती. भारत अनेक बाबतींत कमालीचा मागासच होता. पण देशाला सर्वच बाबतींत पुढं नेण्याचं स्वप्नं पाहणाऱ्या पंडित नेहरू यांनी विक्रम साराभाई यांच्यावर अंतराळ संशोधनाची जबाबदारी टाकली आणि त्या क्षेत्रात काम करण्याचं भारतानं निश्चित करून टाकलं. तिरुअनंतपूरमजवळच्या थुंबा इथं भारताचं पहिलं अग्निबाण प्रक्षेपण केंद्र उभं राहिलं. दि. २१ नोव्हेंबर १९६३ या दिवशी भारताचा पहिला अग्निबाण आकाशात झेपावला. भारताच्या अवकाश संशोधनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुढं, १९६९ सालामध्ये, इस्रोची (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन- इस्रो- भारतीय अवकाश संशोधन संस्था) स्थापना करण्यात आली. म्हणजेच भारतानं अवकाश संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली त्याला आता ६३ वर्षं झाली आहेत. या काळात तीन युद्धं झाली. १९७२चा भयानक दुष्काळ आला. दोन पंतप्रधानांच्या हत्या झाल्या. पण अवकाश कार्यक्रमांची दमदार वाटचाल सुरूच राहिली. एकेकाळी आपल्याला आपला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी दुसऱ्या देशाची मदत घ्यावी लागत होती. आज भारत इतर देशांचे कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडत आहे आणि परकीय चलनामध्ये कमाईही करत आहे. आपलं स्वतःचं अवकाश स्थानक बांधण्याची तयारी करत आहे. येत्या काळातल्या अवकाश मोहिमांसाठी लागणाऱ्या अधिक शक्तिशाली अग्निबाणांसाठी लागणारा फलाट (लाँचिंग पॅड) उभारत आहे. चांद्रमोहिमा आखत आहेच, पण चंद्राच्या पल्याडचं अवकाशही आपल्याला खुणावत आहे. आजच्या अवकाश दिनाच्या निमित्तानं या साऱ्याची उजळणी करणं नवीन पिढीसाठी प्रेरक आहे.
लेखक ज्येष्ठ पत्रकार व विज्ञान अभ्यासक आहेत.