इराणी माणसाचा DNA कोणता? 
अक्षररंग

इराणी माणसाचा DNA कोणता?

अमेरिकेसारखी बलाढ्य महासत्ता आणि इस्रायलसारखा युद्धखोर देश यांच्यासमोर इराण फारसा टिकाव धरू शकणार नाही, अशी डोनाल्ड ट्रम्प व बेंजामिन नेतन्याहू यांची धारणा इराणने पार खिळखिळी करून सोडली. युद्धात इराणचे अतोनात नुकसान झाले. मात्र तरीही हार न मानता इराणने अमेरिका व इस्रायल यांनाही जोरदार धक्का दिला. इराण जबर जखमी झाला असेल तर हे दोन्ही देशही सोलवटले गेले.

नवशक्ती Web Desk

विचारपान

संदीप प्रधान

अमेरिकेसारखी बलाढ्य महासत्ता आणि इस्रायलसारखा युद्धखोर देश यांच्यासमोर इराण फारसा टिकाव धरू शकणार नाही, अशी डोनाल्ड ट्रम्प व बेंजामिन नेतन्याहू यांची धारणा इराणने पार खिळखिळी करून सोडली. युद्धात इराणचे अतोनात नुकसान झाले. मात्र तरीही हार न मानता इराणने अमेरिका व इस्रायल यांनाही जोरदार धक्का दिला. इराण जबर जखमी झाला असेल तर हे दोन्ही देशही सोलवटले गेले.

तब्बल ३९ दिवसांच्या घनघोर युद्धानंतर इराण-इस्रायल आणि अमेरिका युद्धात दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झाला. अमेरिकेसारखी बलाढ्य महासत्ता आणि इस्रायलसारखा युद्धखोर देश यांच्यासमोर इराण फारसा टिकाव धरू शकणार नाही, अशी डोनाल्ड ट्रम्प व बेंजामिन नेतन्याहू यांची धारणा इराणने पार खिळखिळी करून टाकली. युद्धात इराणचे अतोनात नुकसान झाले. मात्र तरीही हार न मानता इराणने अमेरिका व इस्रायल यांनाही जोरदार धक्का दिला. इराण जबर जखमी झाला असेल तर हे दोन्ही देशही सोलवटले गेले. महासत्तेपुढे टिकाव धरण्याची, जिद्दीने लढत राहण्याची ही प्रेरणा इराणी माणसाला नेमकी कुठून मिळते? स्वतःचे अतोनात नुकसान होत असतानाही धीर न सुटू देता युद्धभूमीत पाय रोवून उभ्या राहणाऱ्या इराणी माणसाचा डीएनए कोणता आहे? याचे कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे.

एकीकडे लढवय्या इराणी माणूस, तर दुसरीकडे देशावरील प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला, ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईमुळे खोखला झालेला, बेरोजगारीने पछाडलेला अमेरिकन माणूस हा युद्ध थांबवा याकरिता रस्त्यावर उतरून निदर्शने करीत होता. युद्धामुळे अमेरिकेत वाढलेल्या भरमसाट महागाईमुळे अमेरिकन माणूस कावला होता. केवळ स्वतःच्या फायद्याचाच विचार करणाऱ्या अमेरिकन माणसाला युद्ध, त्यातून होणारा हिंसाचार, मृत्यू, महागाई, गरिबी या साऱ्याचेच वावडे असल्याने इराणी माणसांसमोर अमेरिकन माणूस टिकाव धरू शकला नाही का? युद्धामुळे त्याचे मनोबल खच्ची झाले का? या व अशा प्रश्नांची आता चर्चा होणे स्वाभाविक आहे.

इराणी माणसाच्या लढवय्या असण्याचे मूळ इराणच्या ४५०० वर्षे जुन्या संस्कृतीत आहे. संस्कृतीच्या दृष्टीने इराणी माणूस समृद्ध आहे. इराणी संस्कृती ही गौतम बुद्धाच्या काळापासून अस्तित्वात आहे, असे पुरातत्त्व शास्त्रज्ञ पुरुष दलाल यांचे मत आहे. इराणमध्ये एकच भाषा बोलली जाते. इराण हा शैक्षणिकदृष्ट्या बराच पुढारलेला आहे. इराणमधील अनेक महिला या द्विपदवीधर आहेत. अगदी इंजिनिअर, डॉक्टर आहेत. इराणमध्ये महिला, मुलांवर अत्याचार, अमली पदार्थांचे सेवन याबाबत झीरो टॉलरन्स आहे. इराणमध्ये तेलाचे साठे सापडल्यानंतर ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीने तेल उत्पादन काढण्याच्या निमित्ताने इराणला लुटण्यास सुरुवात केली. त्यावेळी इराणमध्ये मोहम्मद मोसादेक हे पंतप्रधान होते. इराणमध्ये लोकशाही राजवट होती. मोसादेक यांनी खनिज तेलाचे राष्ट्रीयीकरण करण्याची योजना आखली होती. मोसादेक यांनी ब्रिटिश कंपनीच्या तेल व्यवहारांचे अत्यंत कठोर परीक्षण सुरू केल्याने मोसादेक यांची राजवट उलथवून टाकण्याची योजना आखली गेली. मोसादेक यांना तुरुंगात डांबले. इराणमधील सिक्रेट पोलिसांच्या अत्याचाराला, अचानक लोक गायब होण्याला जनता कंटाळली. जनतेने उठाव केला. त्यातून मग लोकशाही इराणची सूत्रे धार्मिक नेते खोमेनी यांच्याकडे गेली. इराणला ठेचायचे याकरिता इस्रायल गेल्या २० वर्षांपासून प्रयत्नशील होता. मात्र जॉर्ज बुश, बराक ओबामा, जो बायडेन यांनी इस्रायलच्या या प्रयत्नांना धूप घातली नाही. ९० दशलक्ष लोकसंख्या असलेला इराण वाळवंट आणि डोंगराळ प्रदेशांचा देश आहे. इराणमधील लष्कर ३१ तुकड्यांत विभागलेले असून प्रत्येक लष्करी तुकडी ही स्वतंत्र आहे. अमेरिकेकडे तंत्रज्ञान व पैशांचे पाठबळ आहे. इराणकडे त्याची कमतरता असल्याने त्यांनी आपले सर्व कौशल्य मिसाईल्स निर्मितीत ओतले. इराणकडे १५ ते २० प्रकारची वेगवेगळी मिसाईल्स असून सहा ते आठ वर्षांपूर्वी त्यांनी हायपर व्हेलॉसिटी मिसाईल्सची तसेच ड्रोन्सची निर्मिती केली. आपली मिसाईल्स व ड्रोन सक्षम आहेत किंवा कसे, याची चाचणी घेण्याकरिता इराणने युक्रेनविरुद्धच्या युद्धात ते रशियाला विकले. इराणकडील ही शस्त्रे तुलनेने स्वस्त असून त्यांची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता व पर्यायाने विध्वंसक क्षमता जास्त आहे. अमेरिकेची अँटी मिसाईल्स यंत्रणा ही महागडी आहे. ड्रोन आणि मिसाईल्स यांचा मारा करून इराणने अमेरिकेच्या आजूबाजूच्या देशांमधील एअरबेसचे नुकसान केले. यामुळे चवताळलेल्या अमेरिकेने इराणमधील इस्पितळे, शाळा यांना लक्ष्य केले. लहान मुले मारली. जिनिव्हा कन्व्हेन्शन धाब्यावर बसवत युनेस्कोने हेरिटेज साइट म्हणून मान्यता दिलेल्या वास्तू बेचिराख केल्या. हे युद्ध आणखी काही दिवस सुरू राहिले असते तर अमोनिया, हेलियम गॅस यासह अनेक गोष्टींची टंचाई निर्माण होऊन अनेक देशांमधील कृषी अर्थव्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था लुळीपांगळी झाली असती, याची इराणला कल्पना होती. इराणमधील न्यूक्लीअर प्लांटवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असता तर हाहाकार उडाला असता. त्यामुळे इराण आपल्या तुटपुंज्या शस्त्रास्त्रांसह लढत राहिला. अखेरीस अमेरिकेत युद्धाच्या विरोधात लाखो लोकांचे मोर्चे निघू लागले. ट्रम्प हे इस्रायलच्या मागे फरफटत जात असल्याची भावना अमेरिकन नागरिकांच्या मनात बळावली. हे इराणच्या पथ्यावरच पडले.

अल्पईवाला म्युझियमचे क्युरेटर केरमान फटाकिया यांच्या म्हणण्यानुसार, इराण किंवा पर्शियन साम्राज्य सायरस द ग्रेटने उभे केले. ३३० बीसीमध्ये अकैमेनियन साम्राज्याचा अलेक्झांडरकडून पराभव झाला. राजप्रासादाची जाळपोळ झाली. ग्रंथ जाळले गेले. त्यानंतर सासानियन साम्राज्याचा उदय झाला. या पर्शियन साम्राज्याने ७०० वर्षे राज्य केले. त्यानंतर इराणमध्ये अरब राजवट आली असली तरी इराणी माणसाने आपली पर्शियन ही ओळख जपली आहे. त्यामुळे आखाती देशांमधील इराणची वेगळी ओळख आहे. आपल्या इराणी असण्याचा इराणी माणसाला अभिमान आहे. अनेक युद्धे, आक्रमणे यातून इराणी माणूस तावूनसुलाखून निघाला आहे. आर्थिक निर्बंधांचे चटके सहन करूनही इराणी माणूस डगमगलेला नाही. इराणमध्ये कित्येक वर्षांपासून बसस्टॉप वातानुकूलित आहेत. इराणने पायाभूत सुविधांच्या निर्मितीत चांगली प्रगती केली आहे. प्रत्येक व्यक्तीला लष्करी प्रशिक्षण अनिवार्य असल्याने राष्ट्रवादाची भावना तीव्र आहे. इराणमध्ये उत्तमोत्तम विद्यापीठे आहेत. संस्कृती, शिक्षण यांची संपन्नता आणि संघर्षाचा प्रदीर्घ अनुभव हीच इराणी माणसाची ताकद आहे.

पार्सियाना मासिकाचे माजी संपादक जहांगिर पटेल म्हणतात की, हजारो वर्षांची इराणी संस्कृती नष्ट करण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा अत्यंत चुकीची होती. कुठलीही संस्कृती अशी नष्ट करता येत नाही. इराण म्हणजे व्हेनेझुएला नव्हे. इराणला ओळखण्यात ट्रम्प कमी पडले व तोंडघशी पडले. लोकप्रियता घसरणीला लागलेल्या ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध उकरून काढले खरे, पण त्यांचा मुखभंग झाला.

pradhansandeep19@gmail.com

विंडफॉल कर आता दुप्पट; दरवाढ तत्काळ प्रभावाने लागू

'ट्रिलियन डॉलर' साठी न्याययंत्रणेत बदल हवेत; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्ट मत

महिला सहकाऱ्याकडे एकटक पाहणे गुन्हेगारी स्वरूपाचे नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Mumbai : पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी २३.८९ कोटी भरा! HC चे 'सहारा स्टार'ला आदेश; चार आठवड्यांचा कालावधी

अखेर थेट भेट; अमेरिका-इराणची बैठक सुरू, पहिली फेरी झाली