जगतवारी
मेधा आलकरी
दोन खंडांना जोडणाऱ्या इस्तंबूल शहराची सफर म्हणजे डोळ्यांना आणि रसिक मनाला मिळालेली पर्वणीच. बोस्फोरसचा नजारा, प्राचीन वास्तू, रंगीबेरंगी बाजारपेठा, मसाल्यांचा दरवळ आणि तुर्की आदरातिथ्य यामुळे ही सफर कायमची स्मरणात राहते.
एखाद्या सुंदर चित्राचा आस्वाद घ्यायचा असेल तर ते जवळून, वेगवेगळ्या कोनातून पाहण्यात जितका आनंद मिळतो, तेवढाच आनंद ते दुरून पाहण्यातही असतो. इस्तंबूल हे निसर्गचित्र, त्याचा आवाका, त्यातील प्राचीन वास्तूंचं, आधुनिक इमारतींचं सौंदर्य यांची लज्जत चाखायची असेल, तर बोस्फोरस खाडीतून बोटीनं प्रवास करणं याला पर्याय नाही. किनाऱ्यावरील उंचसखल भागावर बांधलेले उच्च अभिरुची आणि उत्तम वास्तुविद्या दर्शवणारे धनिकांचे बंगले, काही जुने किल्ले, जुने राजवाडे, दूरवर दिसणाऱ्या गगनचुंबी आधुनिक इमारती, मशिदीचे विशाल घुमट, निऑन साईनने चमकणारे जाहिरातफलक आणि या निसर्गचित्रात सर्वत्र आढळणारी हिरवाई ! दिवसाच्या कुठल्याही प्रहरी केला तरी हा विहार आनंददायीच असतो. मारमारा समुद्र आणि काळा समुद्र यांना जोडणारी ही बत्तीस किलोमीटरची खाडी. या खाडीच्या किनाऱ्यावर इस्तंबूलमधील उत्तमोत्तम चवीची आहारगृहं आहेत. खास करून गोमंतकी रसनेला तृप्त करणारी. या नौकाविहारात आम्ही जगातील चौथा लांब झुलता पूल पाहिला. इथेच आणि या बांधावर… युरोप संपतो आणि आशिया सुरु होतो. दोन खंडांना अखंड करणारा हा दुवा !
इस्तंबूलमधील प्रेक्षणीय स्थळं फिरताना थकलात, तर शरीराला तरतरी आणण्यासाठी जागोजागी ‘चायबाचे’ आहेत. टपऱ्या नव्हेत; बाचे म्हणजे बागा. चहाच्या बागा ! अशाच एका थकल्या संध्याकाळी चहाची तल्लफ आली असता आम्ही छोट्या टेकडीवरील एका चायबाचेमध्ये जाऊन पोहोचलो. तिथली छोटी मोठी बाकडी, त्यावर निवांत विसावलेली माणसं, टेबलावरील तांब्याचे चकचकीत दुमजली चंबू आणि समोर पसरलेला बोस्फोरस खाडीचा मोहून टाकणारा देखावा मनाला प्रसन्न करून गेला. खाडीच्या पलीकडील काठावर ‘डोल्माबाचे’ महाल दिमाखात उभा होता. खाडीतून बोटींची ये जा सुरु होती. कुठे मालवाहू बोटी तर कुठे छानशी शिडाची होडी ! दूरवर असलेले पूल धूसरसे दिसत होते. काठावर बसलेले काही हौशी मच्छिमार काटे पाण्यात सोडून गळाला मासा लागण्याची वाट पाहत होते. खाडीला समांतर असलेल्या छोट्या वाटेवरून जॉगिंग, सायकलिंग करण्यात तरुणाई मग्न होती. काही प्रेमी युगलं ‘बोस्फोरस आहे साक्षीला..’ म्हणत प्रेमाच्या आणाभाका घेत होती. आदल्या दिवशीच्या नौकाविहारानंतर हे सारं उंचावरून तटस्थपणे पाहण्यात एक वेगळाच आनंद जाणवत होता.
हवा थोडी सर्द, शाल अंगाभोवती लपेटून घ्यावी अशी गुलाबी थंडी! गोरीगोमटी, गोबऱ्या गालांची मुलं लाल पिवळे स्वेटर घालून गवतावर दुडूदुडू धावत होती. टर्किश चाय ही एक खास चीज आहे. चहाच्या भांड्यापासून, कपबशांपासून, तर चवीपर्यंत त्यात एक वेगळेपणा आहे. ताजतवानं करणाऱ्या या चहात दुधाला वाव नाही. चहाचं भांडं दुमजली! खालच्या चंबूत पाणी उकळायला ठेवायचं आणि वरच्या चंबूत चहाची पावडर आणि थोडंसं पाणी घालून हे चंबुद्वय गॅसवर ठेवायचं. त्यातल्या चहाचा अर्क उतरला की हे दुमजली भांडं आपल्या टेबलावर आणून देतात. कपबशा म्हणजे पारदर्शक काचेचा एक इवलासा चंबूच! भातुकलीच्या भांड्यांपेक्षा थोडा मोठा. वरच्या चंबूतील उकळलेला कोरा चहा प्रथम आपल्या कपात गाळून घ्यायचा. त्यात खालच्या चंबूतील उकळतं पाणी घालायचं. साखर घालायची आणि मग या छान तांबूस रंगाच्या कषायपेयाचे हळूहळू घुटके घ्यायचे. कप रिकामा झाल्यावर याच पद्धतीने त्यात पुन्हा पुन्हा चहा भरत राहायचा. टर्कीमध्ये चहा घेणं म्हणजे बशीत ओतून फुर्रफुर्र करत पिणं असा अरसिक अर्थ नसून, रसिकपणे घुटक्या घुटक्यांनी त्याचा आस्वाद घेणं हा होय. चायबाचेमधील हे चंबूचहापान कायम आमच्या स्मरणात राहिलं.
पर्यटकांची वर्दळ असलेलं शहर म्हणजे विक्रेत्यांना पर्वणी! इस्तंबूलमध्ये काय मिळत नाही? नाविन्यपूर्ण हस्तकलेच्या वस्तूंपासून ते ताज्या फळभाज्यांपर्यंत सर्व काही. टर्किश गालिचे तर जगप्रसिद्ध आहेत. कुठे भूमितीतले आकार आणि त्यांची मनमोहक सांगड, तर कुठे वेलबुट्ट्यांची आकर्षक गुंफण! रंगसंगतीत कधी जर्द तर कधी फिकट रंगांचा वापर. बारीक कलाकुसर असलेल्या रंगीत फरश्या बनवणं ही इथली पुरातन कला. टर्कीमधील मशिदी, महाल, हमाम, कारंजे, इतकंच काय अमीर उमरावांच्या घरातील भिंतींनासुद्धा या महागड्या फरश्या बसवलेल्या असतात. इझनीक या गावात तयार होणाऱ्या निळ्या रंगसंगतीच्या फरश्या तर फारच सुंदर आहेत.
चार हजारापेक्षा अधिक दुकानं असलेला इस्तंबूलमधील ‘कपाल चारसी’ म्हणजे ग्रँड बाजार हा एक भुलभुलय्या आहे. या बाजारात काही मोठी तर काही अगदीच खोक्यात चालवली जाणारी दुकानं आहेत. तिथे त्या गर्दीतच एखादी बँक, पोलीस स्टेशन आणि छोटीशी मशिदही! हे दुकानदार विक्रीकलेत पक्के मुरलेले. चेहरा आणि पेहराव पाहताच अचूक राष्ट्रीयत्व ओळखणारे. फ्रेंच, स्पॅनिश, अरबी, हिंदी भाषांमधील दोन चार रटलेली वाक्य ते त्या त्या गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी वापरतात. आमच्यावर सतत ‘नमस्ते’ची फुलं उधळली जात होती. लालभडक गोंडेदार आणि जरीकाम असलेल्या मोजड्या, टोप्या, तांब्यापितळेची कलाकुसर असलेली भांडी, दिव्यांच्या हुंड्या असं पारंपरिक सामान एका बाजूला, तर लेदर कोट, गालिचे, बॅगा, चिनीमातीची भांडी, भेटवस्तू असं उंची आधुनिक सामान दुसऱ्या बाजूस अशी बाजाराची विभागणी आहे. इथे घासाघीस हा मोलाचा मंत्र लक्षात ठेवावा लागतो. नाहीतर एक रुपयाची वस्तू शंभर रुपयांना गळ्यात बांधण्यात वाकबगार असलेले हे गोडबोले विक्रेते आपल्याला धुवून काढतात. भाव करण्यासाठी धजणारी जीभ मात्र हवी. अगदी सहजपणे गळ्यात हात टाकणारा टर्किश माणूस हा अगत्यप्रिय आहे; पण या बाजारात खरा कोणता आणि भामटा कोण याची पारख आपल्या खिशातील पाकिटावर लक्ष ठेवून करावी लागते.
इथल्या मसाला बाजारात पाऊल टाकल्यावर शिंकांनी बेजार केलं तरी स्वादग्रंथी आपोआप स्रवायला लागल्या. कधी नावही न ऐकलेले वेगवेगळे मसाले पाहायला मिळाले. आपल्याकडे जशी आंबापोळी आणि फणसपोळी तशी इथे जरदाळू आणि तुतीपासून बनवलेली पोळी चाखली. एका दुकानदाराने इराणमधील उत्कृष्ट दर्जाचं केशर दाखवायला आम्हाला जवळजवळ ओढतच त्याच्या दुकानात नेलं. सर्वोत्तम केशर आमच्या काश्मीरचं असा वाद घालतच आम्ही त्याच्या दुकानात शिरलो. वेगवेगळ्या देशातील केशराचे नमुने बाटल्यांमधून डोकावत होते. त्या हुशार विक्रेत्याने केशराच्या अनेक चाचण्या करून दाखवल्या आणि दहा ग्राम इराणी केशर आमच्या गळ्यात बांधलं. दिवसभर रुखरुख लागली होती. वाटलं, पुरते गंडलो आपण! पैसे अक्कलखाती जमा केले. घरी आल्यावर मात्र कुठलाही सणवार नसताना मुद्दाम श्रीखंडाचा बेत केला आणि त्यात इराणी केशर घातलं. बघता बघता तो सुंदर केशरी रंग श्रीखंडात सामावून गेला. आता गप्पांच्या ओघात कधी केशराच्या उत्कृष्टतेबद्दल विषय निघाला तर आम्ही काश्मिरी केशराबरोबरच इराणी केशरालाही आमचं बहुमोल मत देतो.
या स्पाईस मार्केटमध्ये ‘लोकूम’ नावाची, माहीम हलव्याची बहीण म्हणता येईल अशी मिठाई बघितली. ही आता टर्कीची एक ठळक ओळख झाली आहे. त्याच्यामागचा इतिहास मोठा रंजक आहे. लोकूमचा जन्मदाता अली मोहिदीन ‘गावा’कडून नशीब अजमावायला म्हणून ‘म्हमई’ला (इस्तंबूलला) आला; परंतु त्याला लिमलेटच्या गोळ्यांसारख्या कडक गोळ्या बनवण्यात रस वाटेना. एखादी नाविन्यपूर्ण स्वादिष्ट मिठाई बनवावी या ध्यासाने तो नवनवे प्रयोग करू लागला. थोडीशी नरम, चावा- गिळायला सोपी अशी वडी त्याच्या कल्पनेत होती. त्या दिशेने त्याने आपले सारे प्रयत्न सुरु केले. त्याच्या या अविरत कष्टांचं फळ म्हणजेच ही टर्किश डिलाईट नावाची मिठाई! ‘राहत लोकूम’ असं गोंडस नाव देऊन त्यानं त्या वड्या सुलतानाकडे भेटीदाखल पाठवल्या. अठरावं शतक सरत आलं होतं. सुलतानाच्या साम्राज्यात तेव्हा बरकत होती. सुलतानाला लोकूम बेहद्द पसंत पडली. राजाबरोबरच लोकूम प्रजेच्याही पसंतीस उतरली. मग काय, मोहिदीनचं नशीब फळफळलं. अली मोहिदीनच्या पुढच्या पिढ्यांनी लोकूमला नारिंगी, मधु, गुलाब वगैरे वेगवेगळे स्वाद दिले, नवनवे रंग दिले. काहींना दिलं खोबऱ्याचं आवरण, तर काहींना सुक्या मेव्याचं सारण! आजही टर्कीमध्ये लोकूम अतिशय लोकप्रिय आहे. परदेशी राहणाऱ्या टर्किश माणसाला लोकूमची वडी खायला मिळाली तर त्याला होणाऱ्या आनंदाची तुलना परदेशस्थ मुंबईकराला हापूसचा आंबा चाखायला मिळाल्यावर होणाऱ्या आनंदशीच होऊ शकते.
टर्किश प्रजा परंपरावादी, आपल्या संस्कृतीवर प्रेम करणारी, मनमिळाऊ आणि अगत्यशील ! आमच्या या इस्तंबूलभेटीत आमच्या संपर्कात आलेल्या हॉटेलरिसेप्शनिस्ट, आहारगृहातील वेटर, सहप्रवासी, विक्रेते, गाईड यांनी केलेली निरपेक्ष मदत आमच्या मनाला स्पर्शून गेली. इस्तंबूल जसा खंडांना जोडणारा दुवा तशी ही मनांना जोडणारी माणसं!
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com