जगतवारी
मेधा आलकरी
समुद्र असूनही जिथे जीवसृष्टीचा अभाव आणि भग्नावशेष असूनही जिथे इतिहास जिवंत! जॉर्डनमधील डेड सी आणि जेराश ही दोन ठिकाणं परस्परांपेक्षा अगदी वेगळी, तरीही तितकीच विलक्षण. या दोन्हींच्या भेटीतून उलगडते जॉर्डनची अनोखी कहाणी.
'डेड सी’ हे जगातील एक आश्चर्यच आहे, अद्वितीय नैसर्गिक आश्चर्य! इतर समुद्रांपेक्षा सात पट जास्त म्हणजे तीस टक्के क्षार असलेल्या या समुद्रात जीव-जंतू, मासे, वनस्पती काहीच जिवंत राहू शकत नाही. म्हणूनच तर त्याला मृत समुद्र असं नाव पडलंय. या क्षारांच्या आत्यंतिक प्रमाणामुळे या पाण्याला खूप तरंगणशक्ती आहे. पोहता न येणाऱ्या व्यक्तीला इथे आरामात उताणं तरंगता येतं. डेड सीची नैसर्गिक खुबी जितकी अनोखी; तितकंच महत्त्वाचं त्याचं ख्रिस्ती धर्मातील स्थान! बायबलमध्ये त्याचा अरबा समुद्र, सॉल्ट सी किंवा ईस्टर्न सी असा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळात त्याला सैतानाचा समुद्र संबोधलं जायचं. अरबी लोकांकरिता मात्र हा आहे ‘लॉट’चा समुद्र! लॉट हा अब्राहमचा भाचा, सदाचारी आणि धार्मिक! सॉडम ही त्याची नगरी. त्या नगरीतील जनतेच्या दुष्टतेची शिक्षा म्हणून देवानं ती नगरी जाळून टाकायचा आदेश दिला. अब्राहमच्या आग्रहाखातर देवाने लॉटला त्याच्या कुटुंबासह नगरीतून निघून जाण्याची अनुमती दिली. जळत्या सॉडम नगरीकडे वळून न पाहण्याची देवाची अट लॉटची पत्नी पाळू शकली नाही. मोहवश तिने आपल्या जळत्या घराकडे वळून पाहिलं आणि तत्क्षणी तिचं एका क्षारस्तंभात रूपांतर झालं. पुढे येशूने या कहाणीचा अर्थ समजावून सांगितला तो असा की, ईश्वराचा आदेश झाल्यावर आपल्या ऐहिक सुखसंपत्तीचा मोह सोडून तत्काळ त्याच्या मार्गावर अग्रेसर व्हायला हवं. तसं न केल्यास माणूस आपलं चैतन्य हरवून बसतो. जडवत दगडाचा होऊन जातो.
डेड सीमध्ये तरंगणं हा एक वेगळाच अनुभव आहे. पाण्यावर उपडं पडून, मानेभोवती हवेची गोलाकार पिशवी घेऊन मजेत वर्तमानपत्र वाचतोय असे डेड सीचे कितीतरी फोटो पाहिले असले तरी प्रत्यक्षात तो काही फार आनंददायी अनुभव नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. पाण्यातील अतिक्षारामुळे निर्माण झालेल्या तरंगणशक्तीवर मात करून आधाराशिवाय उभं राहणं कठीणच! मला तर दुसऱ्यांच्या मदतीने उभं राहावं लागलं. त्यात गुडघ्यावरील जखमेवर डेड सीचं मीठ चोळलं गेलं. पाण्याचा एक थेंब डोळ्यात जाताच माझं तांडवनृत्य सुरू झालं. किनाऱ्यावरील शॉवरखाली गेल्यावरच हा थयथयाट थांबला!
पेट्राच्या वलयात थोडं दुर्लक्षित राहिलेलं, उत्तर जॉर्डनमधील रोमन भग्नावशेषांचं शहर म्हणजे ‘जेराश’! राजधानी अम्मानपासून ४८ किलोमीटर दूर असलेला हा प्रवास आपल्याला भूतकाळात दोन हजार वर्षं मागे घेऊन जातो. ग्रीक रोमनांच्या खूप आधीपासून, म्हणजे अश्मयुगाच्या उत्तरार्धात या ठिकाणी वस्ती होते असे पुरावे उत्खननात मिळत असले, तरी आज शाबूत असलेलं हे शहर ग्रीक, रोमनांचंच! इसवी सनपूर्व ३३३ मध्ये सम्राट अलेक्झांडरच्या कृपादृष्टीमुळे पूर्णत्वास पावलेली ही नगरी, रोमनांच्या राजवटीखाली समृद्ध होत गेली. जॉर्डन नदीच्या आसपासचा हा सुपीक प्रदेश धनधान्याने विपुल होताच. परंतु रोमनांच्या अस्तित्वामुळे व्यापाराचं केंद्र बनला. समृद्ध शहराला शोभणारी बांधकामं शहराचा आवाका वाढवत गेली. जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी इजिप्तहून ग्रॅनाईट मागवलं गेल्यामुळे तर त्याला आधुनिकतेचा बाज चढला. मात्र ही समृद्धी फार काळ टिकली नाही. त्याचं मुख्य कारण होतं नव्यानं अस्तित्वात आलेलं, समुद्रमार्गे होणारं दळणवळण. भूमार्गे जाणाऱ्या मालगाड्या नाहीशा झाल्या आणि त्यानंतरचा भूकंपाचा झटका व पर्शियनांचं आक्रमण यात शहराची पुरी वाताहत झाली. उरलेले अवशेष रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आणि म्हणूनच जतनही झाले. १९२५मध्ये पुराणवस्तू संशोधकांद्वारे उत्खनन सुरू झालं आणि हे ‘जेराश’ अंगावरील वाळू झटकून उभं ठाकलं.
जेराशच्या दक्षिणद्वारातून प्रवेश केला की आपण ‘ओव्हल प्लाझा’मध्ये दाखल होतो. ९०x८० मीटरचा हा मोकळा अंडाकृती चौक, ओळीने लावलेल्या खांबांनी वेढलेला आहे. उत्तरदक्षिण धावणारा एक प्रशस्त राजरस्ता प्रत्येक रोमन राज्यात असतो. त्याला म्हणतात ‘कार्डो’! रस्त्याच्या दुतर्फा नेहमीच भव्य खांब असतात. त्यावरून चालताना आपसूकच पाठीचा कणा ताठ झाला. हनुवटी वर करत, मान उंचावत, डावी भुवई ताणत, कठोर कटाक्ष टाकत एखाद्या रोमन अधिकाऱ्यासारखी मी चालत राहिले. रथांच्या सततच्या वर्दळीमुळे पडलेल्या चाकांच्या चाकोऱ्या तेथील काही दगडांवर आजही स्पष्टपणे दिसतात. कडेला पादचारी रस्ता आणि दुकानांचे चौथरेही शाबूत आहेत. आठशे मीटरचा हा रस्ता म्हणजे जेराशची शान आहे. रोमन धनिक आपल्या परिवारासोबत सैरसपाट्याला निघाले आहेत, यजमान स्त्रीहट्ट आणि बालहट्ट पुरवताहेत अशी चित्रं माझ्या मनाच्या कॅनव्हासवर रंगू लागली. दोन हजार वर्षांपूर्वी जमिनीखालून जाणाऱ्या सांडपाण्याची व्यवस्था आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी विशिष्ट अंतरावर केलेले छेद म्हणजे रोमन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. व्यापार, मालाची देवाणघेवाण करणाऱ्या बाजारपेठा इथेच वसत होत्या.
जेराश हे धार्मिक आणि सांस्कृतिक कलेचं व्यासपीठ होतं. इथल्या इमारतीत आपल्याला विविध मंदिरं, चर्च, अर्धचंद्राकृती अँफिथिएटर आणि बाजारपेठा आढळतात. जेराशमध्ये दोन अँफिथिएटर आहेत. छोट्यात १६०० प्रेक्षक बसू शकतात आणि त्याचा प्रवेश सर्वात वरच्या रांगेतून होतो. आत शिरताच खोल रंगमंचावर चाललेला कार्यक्रम दिसतो. मोठ्या अँफिथिएटरमध्ये दुप्पट प्रेक्षकांच्या आसनांची व्यवस्था आहे. यातील ध्वनिप्रक्षेपण इतकं उत्कृष्ट आहे की, सर्वात वरच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकालाही रंगमंचावर उच्चारलेला प्रत्येक शब्द स्पष्टपणे ऐकू जातो. दरवर्षी जुलै महिन्यात जॉर्डनमध्ये जेराश फेस्टिवल साजरा होतो. दूर देशातून आलेले कलाकार गायन, नृत्य, नाटिका, कसरती यासारख्या वेगवेगळ्या कला सादर करतात.
जेराशमधील थोडं उंचावर वसलेलं आर्टेमिसचं मंदिर आणि त्या मंदिरातील स्तंभ हे इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांच्या कॅमेऱ्यात आवर्जून टिपलं जाणारं छायाचित्र आहे. या संरक्षक देवतेच्या मंदिराची पडझड झाली असली तरी बारापैकी अकरा खांब अजून सुस्थितीत उभे आहेत. टेकाडावर असलेल्या मंदिराचे हे उंच खांब वारा आणि भूकंपापासून वाचून कोलमडून कसे पडले नाहीत या शंकेचं निरसन करताना तेथील गाइडने त्या ‘झुलत्या’ खांबांना आणि रोमनांच्या वास्तुविद्येला लवून प्रणाम केला. एवढे बलदंड खांब आणि झुलतात? त्याने तत्परतेनं खांबांच्या पायथ्याशी असलेल्या फटीत एक चमचा खुपसला. त्याची नंदीबैलाच्या होकारासारखी वरखाली होणारी हालचाल पाहून आम्ही थक्क झालो. म्हणजे खांब डोलतो आणि चमचा हलतो. म्हणूनच तो इतके वर्षं तग धरून राहिलाय.
जेराशमधील आणखी एक आकर्षण म्हणजे तिथला ‘रेस’ हा कार्यक्रम! रोमन सम्राटांच्या मनोरंजनासाठी मैदानात खेळल्या जाणाऱ्या तलवार युद्धाची ही लुटुपुटुची आवृत्ती. त्यांचे ड्रेस, टोप, शस्त्र, घोडे, रथ, सगळं खरं खरं. यातील सारे कलाकार निवृत्त सैनिक असल्यामुळे तलवारबाजीत निपुण. या कार्यक्रमाचं रेस हे नाव थोडं दिशाभूल करणारं आहे. रेस म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते भरधाव धावणाऱ्या घोड्यांची शर्यत. परंतु रेस हे ‘रोमन आर्मी अँड चॅरिएट एक्सपेरियन्स’चं संक्षिप्त रूप आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीसच या कार्यक्रमाचा संचालक सम्राटाच्या वेशात, स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांमधून फिरत, अस्खलित इंग्रजीत बोलत इतिहासाच्या वारूवरून आम्हाला रोमन साम्राज्यात घेऊन गेला.
तुतारी वाजली, रणशिंग फुंकल्याचा आवाज आला आणि प्रवेशद्वारातून चाळीस सैनिकांची फलटण कदम ताल करत आत शिरली. चक्रव्यूह रचला गेला आणि लुटुपुटुची लढाई सुरू झाली. कधी तलवारी एकमेकांना भिडल्याचा खण्ण आवाज तर कधी ढालीवर झेललेल्या वारांचा आवाज! योद्ध्याच्या नाकापासून गुडघ्यापर्यंतचं शरीर झाकलं जाईल इतक्या अवाढव्य ढाली समोर धरून आणि गुडघ्यात थोडं वाकून योद्धे एकमेकांना चिकटून उभे राहिले. काहींनी ढाली डोक्यावर धरल्या. या आडोशाआड ही पलटण सुरक्षित राहते. लढाई संपल्यावर सुरू झाला रोमन सम्राटाचा आवडता ग्लॅडिएटरचा खेळ. ग्लॅडिएटर हा सार्वजनिक मेळाव्याच्या ठिकाणी आपलं युद्धकौशल्य दाखवणारा प्रशिक्षित योद्धा! ‘जिंकू किंवा मरू’ असं हे घमासान युद्ध सादर होत असताना, जेराशमधील स्तंभ, रस्ते, थेटर, मंदिराचा दगड अन् दगड गतकाळाच्या भयप्रद आठवणींनी कापत असावा का? खेळात हरलेल्या योद्ध्याला साखळबद्ध करून प्रेक्षकांसमोर आणलं गेलं. त्याचं नशीब आज आमच्या हातात होतं. ‘मार दिया जाय, या छोड दिया जाय..’ असा प्रश्न प्रेक्षकांना विचारला गेला. अर्थातच रहमदिल प्रेक्षकांनी लुटुपुटुच्या लढाईतील या ग्लॅडिएटरला अंगठा उंचावून ‘बक्ष’ देण्याची विनंती केली. या नटांनी आपल्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या की क्षणभराकरिता हे नाटक आहे हे आम्ही विसरूनच गेलो होतो.
शेवटी सुरू होते रथाची शर्यत! भरधाव धावणारी रथांच्या घोड्यांची जोडी, गळ्याभोवती बांधलेला आणि पाठीवर रुळणारा शेला हवेत उडवत रथावर आरूढ रोमन योद्धा, घोड्यांच्या खुरांनी हवेत उडालेला रेतीचा लोट हे सगळं भान हरपून बघत असतानाच एका क्षणी सगळं थांबून कार्यक्रमाचा शेवट झाला. रोमन साम्राज्यात घेऊन जाणारा हा एक चित्तथरारक अनुभव!
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com