नवलनगरी
सोनाली कोलारकर-सोनार
रोज सकाळी दुधाबरोबर खाल्ले जाणारे कॉर्नफ्लेक्स एका चुकलेल्या प्रयोगातून तयार झाले, हे तुम्हाला माहीत आहे का? चला, या कुरकुरीत शोधाची रंजक कहाणी ऐकूया.
मित्रांनो, परीक्षा सुरू असताना हमखास दुपारी झोप येते, सारखी भूक पण लागते आणि परीक्षा संपली रे संपली की झोप गायब ! पण भूक मात्र दुप्पट लागते. घरातील मोठ्या माणसांचे सुरू होते, 'अरे, सारखे काय डबे हुडकत असता रे दिवसभर !' अर्थात यात लटका राग असतो! डबे हुडकले जाणार हे आधीपासून माहीत असल्यानेच चविष्ट पदार्थ डब्यात भरून ठेवलेले असतात. अभ्यास करताना पण सारखं काही तरी तोंडात टाकायला लागतं तेव्हा हे खुशखुशीत पदार्थ मदतीला धावून येतात आणि मोठ्या लोकांनी पण शिताफीने असे पदार्थ डब्यात भरलेले असतात, की खाताना मजा तर येईल पण ते पौष्टिक पण असतील. केळीचे चिप्स, चकली, खमंग मुरमुरा आणि हो केलॉग्स-कॉर्नफ्लेक्स आणि बरंच काही!
काय काय फ्लेवर्स निघाले आहेत या केलॉग्समध्ये हो ना! यम्मी ! पण मजा सांगू का ? आता आपल्याला वाटतं की, केलॉग्स कंपनीने अगदी खास संशोधन करून हे कॉर्नफ्लेक्स तयार केले असतील आणि मग पद्धतशीरपणे बाजारात आणले असतील. तर छे छे ! तसं काहीच झालं नाही. अगदी अचानक केलॉग्स भावंडांना या चविष्ट फ्लेक्सचा शोध लागला. म्हणजे काय झालं, ही फार जुनी पार १८९४ सालातील गोष्ट आहे. विलियम आणि जॉन केलॉग्स मिशिगन येथे एका दवाखान्यात काम करत होते. जॉन तिथला चीफ मेडिकल ऑफिसर होता, तर विलियम मॅनेजर होता. या दवाखान्यात रुग्णांना खास पौष्टिक असे शाकाहारी पदार्थ कोणते खाऊ घालता येतील यावर जॉन विशेष संशोधन करत होता. इथून बाहेर पडताना रुग्ण कसा तंदुरुस्त होऊन बाहेर पडेल यावर जॉन सतत विचार आणि संशोधन करायचा. विलियम जरी मॅनेजर होता तरी त्याला पण या संशोधन क्षेत्रात भावामुळे मोठा रस निर्माण झाला. त्यांनी एकदा ब्रेडला चांगला पर्याय काय निर्माण करू शकू यावर प्रयोग करायचे ठरवले. गव्हाचे पौष्टिक पदार्थ त्यांना रुग्णांना उपलब्ध करून द्यायचे होते. त्यांनी गव्हाला मस्त उकळी दिली आणि त्याचा चांगला गोळा बनवायला घेतला. पण तो जेव्हा मळायला घेतला तेव्हा काही नीट मळला गेला नाही आणि त्याचे छानसे मोठे तुकडे मात्र तयार झाले.
मग या तुकड्यांनाच त्यांनी बेक केल आणि चाखून पाहिलं. एकदम मस्त स्वादिष्ट लागत होते. मग हे स्वादिष्ट आणि भरपूर पौष्टिक असे 'ग्रॅनोज फ्लेक्स' त्यांनी रुग्णांना चाखायला दिले. हा नवा सुटसुटीत आणि चवदार पदार्थ रुग्णांना इतका आवडला की, तिथून बाहेर पडताना रुग्णांनी तो 'घरी न्यायला विकत द्याल का?' म्हणून मागणी केली. मग विलच्या डोक्यात एक कल्पना आली की, आपण गव्हाच्या ऐवजी जर मका (कॉर्न) वापरला तर ? थोडा गुळचट आणि अजून मस्त लागेल.
आणि १९०६ ला चक्क केलॉग्स कंपनीची स्थापना होऊन एक दीड लाख कॉर्नफ्लेक्सची पाकिटं विकली म्हणे ! मग जोमाने या विल आणि जॉन केलॉग्स भावंडांनी तांदूळ आणि इतरही धान्याच्या कोंड्यापासून देखील पौष्टिक फ्लेक्स तयार केले. विलने मग काही उत्पादनात साखर टाकायचे ठरवले आणि जॉनने साखर काय पौष्टिक नसते, हे मला मान्य नाही म्हणत कंपनीला टाटा केला. विलने मग कंपनीचे नव्याने बारसं केलं आणि १९२२ च्या आसपास 'डब्ल्यू. के. केलॉग्स कंपनी' आपल्याला चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता पुरवते आहे ते आजपर्यंत ! आहे न मजा ? तेव्हा चांगले प्रयोग करत राहायचे.
असाच एखादा नवा पौष्टिक पदार्थ शोधून काढू या. अट एकच, तो चविष्ट पदार्थ खाताना आम्हाला विसरायचं नाही !!
पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक
sonalikolarkarsonar @gmail.com