अपयशाकडून यशाकडे 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

अपयशाकडून यशाकडे

प्रयोग अयशस्वी झाला... आता बाळू काय करणार?

नवशक्ती Web Desk

कथा

एकनाथ आव्हाड

प्रयोग अयशस्वी झाला... आता बाळू काय करणार?

बाळू शाळेतून घरी आला, तेव्हा तो एकदम गप्प गप्पच होता. बाहेरच्या खोलीत शमी, आई, बाबा सारेच बसले होते. पण तो कुणाशीच काही बोलला नाही. रोज शाळेतून घरी आल्याबरोबर शाळेतल्या गमतीजमती सांगणारा बाळू आज मात्र घरात एक अक्षरही न बोलता सरळ अभ्यासाच्या आतल्या खोलीत निघून गेला.

बाबांना आठवलं, अरे हो! आज तर सकाळीच तो ‘विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन व स्पर्धे’साठी केवढी तयारी करून शाळेत गेला होता. बहुतेक तिथंच काहीतरी झालं असावं. या विचाराने बाबा उठून आतल्या खोलीत गेले. पाहतात तर काय, बाळू खाटेवर बसून छताच्या आड्याकडे एकटक पाहत होता. कसल्याशा विचारात गढून गेला होता.

“बाळू, काय रे, काय झालं?” वडिलांचे शब्द अचानक त्याच्या कानावर पडले. बाळूची तंद्री मोडली. समोर बाबा उभे असल्याचे पाहताच त्याचे डोळे भरून आले. गळ्याशी आवंढा आला. आज शाळेत काय घडलं, ते त्याला पटकन सांगताही येईना.

बाबांनी त्याच्या पाठीवरून हळुवार हात फिरवला. आपल्या हाताने त्याचे अश्रू पुसत ते म्हणाले, “काय झालं, बाबांना सांग बघू. आपण मिळून त्यावर काहीतरी मार्ग शोधू.”

बाळू म्हणाला, “बाबा, माझा नंबर हुकला हो! आज आंतरशालेय विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन व स्पर्धा होती. या स्पर्धेत शाळेच्या वतीने मी विज्ञानाचा प्रयोग मांडला होता. शाळेने केवढ्या विश्वासाने माझं नाव दिलं होतं! पण ऐनवेळी माझा प्रयोगच यशस्वी झाला नाही. प्रयोग चाललाच नाही. माझी मेहनत कमी पडली बाबा!”

बाळूला पुन्हा हुंदका फुटला. आई आणि शमीही आत आल्या. बाळूची अवस्था पाहून त्यांना

वाईट वाटलं.

बाबांनी विचारलं, “बाळू, तुझा प्रयोग का चालला नाही, हे तुला समजलं का?”

“नाही बाबा! मी कितीतरी वेळा त्याची तयारी केली होती. घरी प्रयोग व्यवस्थित चालत होता. पण स्पर्धेच्या वेळी काय झालं, तेच कळलं नाही.”

“मग आपण पुन्हा एकदा प्रयोग करून पाहूया का?” बाबांनी विचारलं.

बाळू काही बोलला नाही. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. इतकी मेहनत करूनही अपयश का आलं? दुसऱ्यांदा प्रयत्न केला तर पुन्हा असंच झालं तर? त्याच्या या प्रश्नांची उत्तरं त्यालाही सापडत नव्हती.

तेवढ्यात शमी म्हणाली, “बाबा, डॉ. अब्दुल कलाम यांनाही अपयश आलं होतं ना? मी त्यांच्याबद्दल एका पुस्तकात वाचलंय.”

“होय शमू! त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट आज तुम्हाला सांगतो,” बाबा म्हणाले.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सात वर्षांच्या परिश्रमानंतर भारताचं पहिलं उपग्रह प्रक्षेपण यान, एसएलव्ही-३ तयार केलं. यानाचं प्रक्षेपण झालं, तेव्हा सगळेच आनंदात होते. यानाने पहिला टप्पा व्यवस्थित पार केला. पण दुसऱ्या टप्प्यात बिघाड झाला. यान नियंत्रणाबाहेर गेलं आणि समुद्रात कोसळलं. सात वर्षांचे परिश्रम वाया गेल्यासारखे वाटत होते.

कलाम खूप अस्वस्थ झाले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. अशा वेळी इस्रोचे अध्यक्ष प्रा. सतीश धवन यांनी आत्मविश्वासाने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. पुढील एका वर्षात भारताचा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे स्थापित केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कलाम पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. १८ जुलै १९८० रोजी एसएलव्ही-३ यानाचं पुन्हा प्रक्षेपण करण्यात आलं. यावेळी यानाने सर्व टप्पे व्यवस्थित पार केले आणि रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे स्थापित झाला.

पुन्हा पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी कलामांनी प्रा. सतीश धवन यांना बोलण्याची विनंती केली. मात्र, धवन यांनी कलामांकडे माइक दिला. अपयशाच्या वेळी स्वतः पुढे येऊन जबाबदारी स्वीकारणारे धवन यशाच्या वेळी आपल्या सहकाऱ्याला पुढे करत होते. कलामांनी हा अनुभव मनात कायमचा जपून ठेवला.

बाबांची गोष्ट ऐकून बाळू विचारात पडला. अपयश आलं म्हणून प्रयत्न थांबवायचे, की नेमकी चूक शोधून पुन्हा प्रयत्न करायचा? कलामांच्या पहिल्या प्रयत्नात अपयश आलं होतं, पण त्यांनी काम सोडलं नव्हतं.

मग आपण तरी एका स्पर्धेतील अपयशाने एवढं निराश का व्हावं?

बाळू उठून उभा राहिला. “बाबा, मी माझा प्रयोग पुन्हा करून पाहणार! यावेळी कुठे चूक होते, ते नीट तपासणार. गरज पडली तर शिक्षकांची मदतही घेणार. पुढच्या स्पर्धेत नक्की भाग घेईन!”

शमीने लगेच जोरात टाळ्या वाजवल्या. “वाह रे आमचा छोटा कलाम!”

आई-वडिलांनी बाळूकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत आता अश्रू नव्हते, तर नव्या प्रयत्नांची चमक होती.

जीवन वाटेत उभे राहुनी

थांबू नको तू मागे पाहुनी

संकटे येऊ दे कितीही धावुनी

प्रयत्नाने ये विजय घेऊनी

ध्येय पूर्ण होऊ दे मुला

पाहू दे रे गगनी तुला.

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

Mumbai : फटाके फोडणाऱ्यांवर नोडेल अधिकाऱ्यांची नजर; पोलीस व पालिकेचे पथक तैनात, १९१६ हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन

मुंबईकरांना मिळणार ४०० नवे लोखंडी कचरा डबे; एका डब्यासाठी पंधराशे रुपये अधिक मोजणार

IIT Bombay Student Suicide Case : आत्महत्येची सीबीआय चौकशी करा! साहिल वाकोडेच्या पालकांची न्यायालयात याचिका

Mumbai : १४ ट्रॅक्शन सबस्टेशन्सची उभारणी अंतिम टप्प्यात; बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात पाच, तर गुजरातमध्ये ९ सबस्टेशन्स

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजारांचे सानुग्रह अनुदान; आशा सेविकांना सहा हजार रुपये, दिवाळीपूर्वी रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होणार