अक्षररंग

अनोखी शांतता आणि अक्षय ऊर्जा

प्रवास, भटकंती यातून निसर्गाचं अनोखं रूप जसं दिसतं तसंच तिथल्या स्थानिक संस्कृतीचीही ओळख होते. स्वतःशीच नव्याने भेट होते. २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन. या दिनानिमित्त मालदीवच्या अथांग समुद्राची एक झलक.

नवशक्ती Web Desk

भटकंती

प्रल्हाद जाधव

प्रवास, भटकंती यातून निसर्गाचं अनोखं रूप जसं दिसतं तसंच तिथल्या स्थानिक संस्कृतीचीही ओळख होते. स्वतःशीच नव्याने भेट होते. २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन. या दिनानिमित्त मालदीवच्या अथांग समुद्राची एक झलक.

मालदीवमधील अथांग समुद्र... मेच्या शेवटच्या आठवड्यात पाहिला. पण आताही डोळ्यासमोर तसाच आहे. डोळे शांत करणारी ती निळाई तशीच मनात घर करून बसली आहे.

मालदीव हे समुद्रातील बेटांसाठीचं जगप्रसिद्ध ठिकाण. ते पाहायला जायचं, असं अचानक ठरलं. मुंबई ते मालदीव हा सुमारे अडीच तासांचा विमान प्रवास. प्रयत्नपूर्वक खिडकीजवळची आसनं मिळवली. त्यामुळे मालदीव क्षेत्रात शिरताना खाली विशाल निळ्या समुद्रातील ती 'पाचूची बेटं' मनःपूत पहायला मिळाली. सगळी मिळून हजार-पंधराशे बेटं आहेत. त्यातील अनेक अजूनही निर्जन आहेत. पाचूची मूठ मोकळी करावी तशी ती छोटी छोटी हिरवी बेटं वरून दिसत होती.

मालदीवला जाण्यासाठी व्हिसाची गरज नसते. तिथे पोहोचल्यावर पर्यटकांना तो एअरपोर्टवरच मिळतो. आम्ही माले एअरपोर्टला उतरलो आणि सारे सोपस्कार आटोपून दूर नांगरून ठेवलेल्या आमच्या जहाजाकडे जाण्यास निघालो. 'कर्मा' या संस्थेने हौशी पर्यटकांसाठी जगभर साखळी निवासस्थानांचं जाळं निर्माण केलं आहे. त्यांनीच आमची ही सहल आयोजित केली होती.

छोट्या बोटी उभ्या होत्या. त्यातील एका बोटीने आम्ही आजूबाजूच्या बेटांवर फिरणार होतो, तर दुसरी बोट आम्हाला अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी होती.

आमचं जहाज चार मजल्यांचं होतं. खाली रेस्टॉरंट, वर प्रशस्त मोकळा डेक. मध्ये राहण्यासाठी खोल्या. देशविदेशातील मिळून आम्ही वीस पर्यटक होतो. व्यवस्था पाहण्यासाठी प्रशिक्षित आणि तज्ज्ञ कर्मचारी होते. त्यात सहल प्रमुख, गाईड, कॅप्टन, बोटीचा व्यवस्थापक, स्वयंपाकी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी होते.

आम्ही निघालो तेव्हा भारत-पाकिस्तान युद्धाचे वातावरण होते. त्यामुळे मनात धाकधूक होती. सुदैवाने काही अडथळा आला नाही. अशा प्रवासाला निघायचे म्हणजे थोडाफार धोका पत्करावा लागतोच. पण त्यातूनही शिकायला मिळते.

जहाजावर पोहोचलो. गुगलवरून आमचं लोकेशन पाहिलं. कोचीन, श्रीलंका, लक्षद्वीप, मालदीव असा ढोबळ भूगोल दिसत होता. जगाच्या एका टोकाला अथांग समुद्राच्या मधोमध आमचं जहाज उभं होतं. भयचकित करणारी ही अनुभूती होती. सभोवती क्षितिजापर्यंत टेकलेला समुद्र, स्वच्छ निळ्याशार पाण्याच्या अविरत लाटा, ढगांनी भरलेलं तर कधी निरभ्र आकाश, सुसाट वारा आणि त्यात अखंडपणे डोलणारे आमचे जहाज... अशा ठिकाणी आपण येऊ अशी कल्पना मी स्वप्नातही कधी केली नव्हती.

आमच्या आधीच्या जलप्रवासाविषयी बोलायचे तर मी मुंबईहून अलिबागला जाताना मुंबई ते मांडवा (आणि परत) असा प्रवास अनेकदा केला आहे. तो जेमतेम तासाभराचा. भिगवण येथे उजनीच्या 'बॅक वॉटर' मध्ये सलग सोळा कि.मी. आणि तापोळ्याला कृष्णा-कोयना-सोळशीच्या त्रिवेणी संगमावर बावीस कि.मी. असा जलप्रवास केला आहे. पण माले येथे सलग चार दिवस आणि चार रात्री जहाजावरून केलेला तो आयुष्यातला सर्वात मोठा जलप्रवास ठरला.

सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आम्ही डेकवर जायचो. सभोवती इतका अथांग समुद्र आणि डोक्यावर आकाशाचा असा विशाल घुमट प्रथमच पाहत होतो. तिथे नुसते पडून राहणं, लाटांचा आवाज ऐकणं, बेफाम वारा राहण्याची उत्तम व्यवस्था होती. खाण्यापिण्याची चंगळ होती. चहा-कॉफी दिवसभर आणि बार उशिरा रात्रीपर्यंत सुरू असायचा. जेवणासाठी प्रशिक्षित कुक होते. आंतरराष्ट्रीय मेन्यू असायचा. जेवणात ट्यूना मासा हे नवं आकर्षण होतं. गाण्यांची, खेळांची, मासेमारीची सगळी साधनं उपलब्ध होती.

जहाजावरच स्नॉर्कलिंगचे सामान, कयाकिंगच्या बोटी आणि पोहण्याचा तरंगता तलाव होता. या साऱ्याचा बहुतेक सगळ्यांनी भरपूर आनंद घेतला. बारच्या बाहेर जहाजाच्या कठड्याला टेकून सरबताचे घोट घेत, हौशी पर्यटकांची गाणी ऐकत आम्ही पती-पत्नी गप्पा मारत बसायचो. बोटीच्या बाजूने लाइटकडे आकर्षित होऊन एक सहा-सात फूट लांबीचा, फताड्या तोंडाचा तपकिरी शार्क फेऱ्या मारायचा. आम्ही त्याची वाट बघत बसायचो.

मी दिवसभर आकाशाची आणि पाण्याची वेगवेगळी रूपं पाहात बसायचो. ढगांचे बदलते रंग, सूर्यास्त, सूर्योदय, चांदणे, हवेचे संगीत ऐकत राहायचो. धकाधकीच्या, गुंतागुंतीच्या, हर्ष-विमर्षाच्या सुसाट जगण्यातून थोडा विसावा मिळावा म्हणून आलो होतो. त्या पार्श्वभूमीवर एक अनोखी शांतता आणि ऊर्जा देणारा हा अनुभव एक आगळी तृप्ती देऊन जात होता.

शेवटच्या दिवशी आम्ही माले शहरात मुक्काम केला. तेथील विविध उद्यानं, वस्तू संग्रहालयं, स्मारकं पाहिली. 'माले-चायना मैत्री ब्रिज' पाहिला. माले शहर मुंबईच्या तुलनेत खूपच महागडे आहे. एका ठिकाणी आम्ही चौघांनी चहा घेतला. त्यासाठी हजारावर रुपये मोजावे लागले. तेथे मुंबईचा एक मराठी मुलगा वेटर म्हणून काम करत होता. त्याला आम्ही तेथील खाणेपिणं, कपडेलत्ते, भेटवस्तू आणि खरेदीविषयी विचारलं. तेव्हा तो म्हणाला, "येथील बहुतेक सगळ्या वस्तू मुंबईहून आयात होतात. तुम्ही जो ट्यूना मासा खाल्ला तोसुद्धा मुंबईहून पॅकिंग होऊन आलेला असतो." ते ऐकून आम्ही चांगलेच चकित झालो.

निसर्गाच्या सान्निध्यात आल्यावर आपले कर्तृत्व किती छोटं आहे याची माणसाला जाणीव होते आणि पुन्हा नव्या उमेदीने जीवनाला सामोरं जाण्याची प्रेरणाही त्याला मिळते... परतीच्या प्रवासात हाच विचार मनात प्रबळ होत होता.

pralhadjadhav.two@gmail.com

Mumbai-Pune Missing Link : 'उद्घाटन झालं, पण मार्ग बंदच!' पुणे-मुंबई लेन सुरू न झाल्याने सोशल मीडियावर प्रवाशांचा संताप

'चार्जिंग पॉइंट की कचराकुंडी?' मनालीतील सार्वजनिक सुविधेची काही तासांतच दुर्दशा; सोशल मीडियावर संताप

तुमच्याही मोबाईलवर अचानक मोठा इमर्जन्सी अलर्ट आला? घाबरू नका; सरकारकडून देशभरात चाचणी सुरू, वाचा सविस्तर माहिती

Mumbai : विद्याविहारमधील पोहोच रस्त्यांच्या कामात झाडांचा अडथळा; महाराष्ट्र वन विकास महामंडळाची नियुक्ती, १ कोटी ९९ लाख रुपये मोजणार

Pune : सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; हत्या करुन शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला मृतदेह