सागराच्या खोलीचं चॅलेंजर डीप! 
अक्षररंग

सागराच्या खोलीचं चॅलेंजर डीप!

मार्गारेट मांजर मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा, परवा पुन्हा शाहरुखच्या मन्नत बंगल्याजवळच्या बँडस्टँडला गेले होते. तिथे त्यांना समुद्राच्या लाटांकडे बघण्यात खूप मज्जा येई. किना-याकडे येणाऱ्या लाटा ते दोघेही मोजत बसत.

नवशक्ती Web Desk


बालमैफल
सुरेश वांदिले

मार्गारेट मांजर मावशी आणि रॉबिन्सन उंदीर मामा, परवा पुन्हा शाहरुखच्या मन्नत बंगल्याजवळच्या बँडस्टँडला गेले होते. तिथे त्यांना समुद्राच्या लाटांकडे बघण्यात खूप मज्जा येई. किना-याकडे येणाऱ्या लाटा ते दोघेही मोजत बसत.

तिकडे मनुष्यप्राणी मोठ्या संख्येने समुद्र बघायला येत. काहीजण समुद्रासमोरच्या बाकांवर बसत. काहीजण दगडांवर जाऊन बसत तर काहीजण समुद्राच्या पाण्यात जाऊन खेळत. तिथे येणारी ही मंडळी पुडक्यातलं काही ना काही बकाबका खात. खाणं झालं की ते पुडके तसेच फेकून देत.

त्यात शिल्लक राहिलेले पॉपकार्न, शेंगदाणे, चिप्स असं काहीबाही रॉबिन्सन आणि मार्गारेटला खायला मिळे. अशी चंगळ करता येत असल्यानेच ते दोघेही, मालकीनबाई बाहेरगावी गेल्या की पुन्हापुन्हा इकडे येत.

आज खादाडी करत करत समुद्राच्या लाटा मोजत असताना, रॉबिन्सनला दूरवर एक जहाज जाताना दिसलं. ते अगदी ठिपक्यासारखं दिसत होतं. थोड्यावेळाने जहाजाचा ठिपका दिसेनासा झाला.

“बापरे!” मामाच्या तोंडून उत्स्फूर्तपणे निघून गेलं.

“काय झालं रॉबू?” मावशीने विचारलं.

“अगं, ते जहाज समुद्रात बुडालं ना.”

“अरे, रॉबू ते जहाज बुडालं नाही तर इथून खूप दूर निघून गेलं.”

“पण काय गं मावशे, जहाज जसं पाण्यावरून चालू शकतं तसं आपणही चालू शकू का?”

“रॉब्या, आपण काय किंवा हा मनुष्यप्राणी काय—कुणालाच समुद्रावर चालता येत नाही. समुद्र फार खोल असतो. इथे किनाऱ्यावर वाळू असल्याने मनुष्यप्राणी थोडाफार चालू शकतो. आपणसुद्धा पळापळी करू शकतो. पण जसंजसं किनाऱ्यापासून दूर जाऊ, तशी समुद्राची खोली वाढतच जाते. वाळू संपते. मग केवळ सर्वत्र पाणीच पाणी असते.”

“मावशे, अगं या उपदव्यापी मनुष्यप्राण्याने समुद्र जास्तीत जास्त खोल किती असेल याचा नक्कीच शोध घेतला असेल ना?”

“तुला रे त्याच्याशी काय घेणंदेणं?”

“मावशे, तुला ठाऊक नाही असं या जगात काहीतरी आहे का? म्या ‘ढ’च्या ज्ञानात भर पडेल म्हणून विचारलं.”

मार्गारेट मावशीला मामाने लोणी लावलं. आपल्या कौतुकाने मावशी खुश झाली. आधी तिने वर आकाशाकडे पाहिलं, मग समुद्राच्या पाण्यावर नजर रोखली. डोळे मिटून काहीतरी आकडेमोड केली.

काही वेळाने तिने तिचा उजवा पाय टाळीसाठी मामासमोर केला. मामाने डाव्या पायाने प्रतिसाद दिला.

“म्हणजे मावशे, तुला समुद्राची खोली कळली म्हणायची.” मावशीचा गालगुच्चा घेत रॉबिन्सन म्हणाला.

“बरोबर ओळखलस रॉब्या तू. अरे, मी माझ्या मेंदूला समुद्राची खोली झर्रदिशी शोधायला सांगितलं.”

“मग, तुमचे मेंदूराव काय म्हणतात?” मामाने नाटकी स्वरात विचारलं.

“ते म्हणतात, जगात पाच महासागर आहेत. आपल्यासमोर असलेला अरबी समुद्र हा हिंद महासागराचा एक भाग आहे. या पाचही महासागरांची खोली सर्वत्र काही सारखी नसते.”

“मग?”

“मनुष्यप्राण्याने जेव्हा याचा शोध घेतला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की प्रशांत महासागरातील ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यूगिनीच्या उत्तरेस आणि फिलिपाइन्स या देशाच्या पूर्वेला असलेला मॅरियाना ट्रेंच हा भाग सर्वात खोल आहे.”

“हे या मनुष्यप्राण्यास कधी कळलं?”

“अरे, १९५१ साली इंग्लंडच्या ‘एच.एम.एस. चॅलेंजर’ या सर्वेक्षण जहाजाने मॅरियाना ट्रेंचमधील खोली मोजली.”

“किती भरली ही खोली?”

“तब्बल १० हजार ९८४ मीटर, म्हणजे साधारणत: ११ किलोमीटर! या भागास आता ‘चॅलेंजर डीप’ या नावानं ओळखलं जातं.”

“ओह माय ओशन!”

“खरंय. अरे, पृथ्वीवरील ८८४८ मीटर उंचीचा एव्हरेस्ट पर्वत या ठिकाणी आरामात मावू शकतो. शिवाय त्याच्या माथ्यावरून दोन किलोमीटरपेक्षा अधिक खोल पाणी वाहू शकतं.”

“ओह माय एव्हरेष्ट!”

“अरे, पुढे १९६० मध्ये अमेरिकेतील जॅक पिकार्ड आणि डोनाल्ड वाल्श हे दोन नौसैनिक त्या ठिकाणी पोहोचले.”

“ते बुडाले नाहीत का?”

“अरे, या खोलीमध्ये बुडणार नाही असं ‘ट्रायेस्टे’ नावाचं बॅथीस्कॅफ—पाणबुडीसारखं उपकरण—वापरलं त्यांनी. त्यात बसून या दोघांनी इतक्या खालचा तळ पाहिला.”

“काय दिसलं त्यांना?”

“त्यांना दिसलं की इतक्या खोलवर बरेच सूक्ष्मजीव आरामात राहतात. ते काही बुडत नाहीत. या दोघांनी पुन्हा एकदा या भागाची खोली मोजली. तेव्हा ती १०.९ किलोमीटर असल्याचं आढळलं.”

“याचा अर्थ महासागराची जास्तीत जास्त खोली ११ किलोमीटरच्या आसपास असल्यावर शिक्कामोर्तबच झालं म्हणायचं.” मामा छाती फुगवून म्हणाला.

“हो रे, माझ्या इंटेलिजेंट मामू.” लाडाने रॉबिन्सनची मिशी ओढत मावशी म्हणाली.

“मावशे मावशे, एक आयडिया डोक्यात आलीय.”

“काय?”

“मावशे, आपल्यालाही बॅथीस्कॅफमधून इतक्या खोलवर जाता येऊन चॅलेंजर डीप इथेच राहता आलं असतं, तर मालकीनबाईंच्या दररोजच्या जाचातून नि कटकटीतून सुटका मिळाली नसती का?”

“रॉब्या, मग मन्नतमध्ये राहणाऱ्या तुझ्या टॉबिन्सन चुलतभावामार्फत बॅथीस्कॅफ मिळवून देण्याचा निरोप पोहोचव की शाहरुखपर्यंत.”

मावशी डोळे मिचकावीत म्हणाली. टॉबिन्सची उंची, रुंदी नि खोली तेवढी नसल्याचं रॉबिन्सनला ठाऊक होतं. त्यामुळे त्याने एक उसासा टाकला आणि तो पुन्हा समुद्राच्या लाटा मोजू लागला.

ज्येष्ठ बालसाहित्यिक

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती