मोक्षपटम् !! 
अक्षररंग

मोक्षपटम् !!

सुट्टीत भावंडांसोबत खेळला जाणारा सापशिडीचा खेळ नेमका कुठून आला, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला, जाणून घेऊया या लोकप्रिय खेळाची रंजक कहाणी!

नवशक्ती Web Desk

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

सुट्टीत भावंडांसोबत खेळला जाणारा सापशिडीचा खेळ नेमका कुठून आला, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला, जाणून घेऊया या लोकप्रिय खेळाची रंजक कहाणी!

सुट्ट्या लागल्या की, एकत्र जमून खेळण्याची धूम सुरू होते. विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर आपण कधी सगळी भावंडं, मित्रमंडळ एकत्र जमतो याची वाटच पाहत असतो. उन्हात बाहेर फार खेळता येत नाही, तेव्हा मग घरी बैठे खेळ खेळायला सुरुवात होते. सापशिडी, लुडो, बुद्धिबळ, कॅरम सगळे बोर्ड गेम्स कपाटातून बाहेर निघतात. सापशिडी हा खेळ तर असा आहे की, कितीही जण एकत्र खेळू शकतात.

आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. या काळात निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातील. पण बालमित्रांनो, तुम्हाला एक गंमत माहिती आहे का..? बहुतांश बोर्ड गेम्स हे थेट सिंधू संस्कृतीच्या काळापासूनच खेळले जात आहेत? ज्याला आता तुम्ही Indus Valley Civilisation म्हणता, त्या काळात यातील बुद्धिबळ, सापशिडी हे खेळ शोधले गेले! हे दोन्ही जगप्रसिद्ध खेळ खास भारतीय मातीतून जन्माला आले आहेत.

सापशिडीचा खेळ हा ‘मोक्षपटम्’ म्हणून प्रसिद्ध होता आणि या पटावर त्यावेळी नुसतेच आकडे नव्हते, तर खूप अर्थपूर्ण असा हा खेळ होता. पाप-पुण्य म्हणजे काय, तर वाईट गोष्टी आणि चांगल्या गोष्टी आणि मोक्ष म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी केल्यामुळे मिळालेला उत्तम पुरस्कार, शाबासकी! असा सोपा अर्थ त्याचा होता. आता जसे प्रत्येक चौकोनात एक, दोन, तीन असे फक्त आकडे लिहिलेले असतात, तसे त्यावेळी प्रत्येक चौकोनात एक पाप (म्हणजे वाईट कृत्य) आणि चांगले कृत्य (पुण्य) असे लिहिलेले असायचे. पाप केले तर सापाच्या पोटातून खाली घसरायचे आणि पुण्य केले की शिडीने वर चढायचे! यामुळे त्या काळात लोकांना काय चांगले करावे आणि काय करू नये याची समज यायला मदत झाली. सुदृढ आणि एकोपा असलेला समाज निर्माण व्हायला सुरुवात झाली.

पुढे कालांतराने अनेक परकीयांनी भारतावर आक्रमणे केली आणि मग ब्रिटिशांनी जेव्हा राज्य करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना हा खेळ इतका आवडला की त्यांनी तो ब्रिटनमध्ये नेला. मग ज्याच्या त्याच्या धर्माने आपल्या सोयीनुसार त्याचे नाव ठेवले. ब्रिटनमध्ये ‘Bible Ups and Downs’ नावाने आधी हा खेळ खेळला जायचा. मग त्याचे नाव ‘Chutes (याचा उच्चार ‘शूट्स’ असा आहे) and Ladders’ ठेवले गेले. १९४३ साली मिल्टन ब्रॅडली आणि कंपनीने पहिल्यांदा या खेळाला व्यावसायिक स्वरूपात बाजारात आणले आणि मग कालांतराने ‘Snakes and Ladders’ असे याचे नामांतर होऊन त्याचा जगभर प्रसार झाला.

प्रांतानुसार चांगल्या-वाईट गोष्टींवरून वाद होऊ नये, भाषेचा प्रश्न निर्माण होऊ नये, शिवाय सर्वांना हा खेळ आपलासा वाटावा, म्हणून मग पटावर फक्त आकडे ठेवण्यात आले. जगभर हा खेळ बच्चाकंपनीमध्ये तर लोकप्रिय झालाच, पण मोठ्यांनाही तो आवडू लागला. शिवाय यात कितीही खेळाडू खेळू शकत असल्याने सुट्टीत खेळण्याचा हक्काचा खेळ झाला.

आहे ना मजा? गौरी-गणपतीच्या सुट्टीत सगळी भावंडे जमली की भारतात तयार झालेला हा खेळ ही माहिती सांगत नक्की खेळा.

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

पदपथांवरील 'आरे' स्टॉलवरही हातोडा; 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत BMC करणार कारवाई; मुंबईतील १६०३ स्टॉलधारकांवर टांगती तलवार

तुकाराम मुंढे 'इफेक्ट'मुळे सलग दूध संकलनात घट; तीन महिन्यांत सव्वा लाख लिटरची घट, भेसळखोरांनी घेतला धसका

आयआयटी मुंबईच्या ६२० संशोधकांना PHD; एकाच शैक्षणिक वर्षात गाठला संशोधनातील ऐतिहासिक टप्पा

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

JNPT येथून पहिली 'डबल-स्टॅक लाँग-हॉल' कंटेनर ट्रेन धावली; ३६० टीईयू माल घेऊन ४२२ किमीचा प्रवास वेळ वाचणार; पोर्टवरील गर्दी कमी होणार