दुसरी बाजू
प्रकाश सावंत
पुण्यातील ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राने गेल्या चार दशकांपासून ३० हजारांहून अधिक रुग्णमित्रांवर व्यसनमुक्तीचे उपचार करून समाजापुढे एक आगळा आदर्श निर्माण केला आहे. तेथील काही व्यसनपीडितांनी आपल्या जीवनाचा डाव अर्ध्यावरच सोडून नकारात्मक शोकांतिकेला कवटाळले आहे, तर बहुसंख्यांकांनी व्यसनांनाच कायमचा निरोप देत आपल्या प्रबळ इच्छाशक्तीची सकारात्मक प्रचिती आणून दिली आहे. आजच्या ‘जागतिक तंबाखूविरोधी दिना’च्या पार्श्वभूमीवर ‘मुक्तांगण’च्या संचालक मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी संवाद साधला असता, त्या अगदी भरभरून बोलल्या.
मुक्तांगण’च्या आजवरच्या वाटचालीला उजाळा देताना मुक्ताताई म्हणाल्या, सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिता अवचट आणि प्रसिद्ध लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या एका मैत्रिणीच्या मुलाला १९८४ मध्ये ‘ड्रग्ज’चे व्यसन जडले होते. त्यांनी त्याला घरीच ठेवून उपचार केले. या समस्येबद्दल समाजात कोणतीही माहिती नाही किंवा पुनर्वसन केंद्र उपलब्ध नाही याची जाणीव होताच, डॉ. अवचट यांनी मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले डॉ. आनंद नाडकर्णी यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला आणि वर्तमानपत्रात ‘गर्दच्या वेढ्यात’ ही लेखमाला लिहिली. त्याचे पुढे पुस्तकही झाले. ते वाचून ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनिताबाई देशपांडे यांनी दिलेल्या भरीव आर्थिक देणगीतून ‘मुक्तांगण’ पुनर्वसन केंद्राची स्थापना झाली ती २९ ऑगस्ट १९८६ रोजी. साहित्यिक आणि सामाजिक जाणिवांचा हा संगम एका नव्या परिवर्तनाची नांदी ठरला.
पुण्याच्या आळंदी रोडवरील विश्रांतवाडी येथील जवळपास दोन एकरच्या परिसरात ‘मुक्तांगण’ विसावले आहे. या ठिकाणी एकाच वेळी १५० रुग्णांवर उपचार करण्याची सोय आहे. रुग्णांसाठी येथे एक महिन्याचा निवासी अभ्यासक्रम व उपचार पद्धती असते. ज्यामध्ये दर बुधवारी प्रवेश आणि महिना पूर्ण झाल्यावर शुक्रवारी डिस्चार्ज दिला जातो. दर आठवड्याला साधारण २५ रुग्णांची नवीन बॅच संस्थेत दाखल होते. या ठिकाणी मुख्य समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन्स, परिचारिका यासह ६० जणांचा समर्पित स्टाफ कार्यरत आहे. ‘मुक्तांगण’ हे केवळ उपचार केंद्र राहिले नसून, बनले आहे.
‘मुक्तांगण’च्या प्रारंभीच्या काळातील एक प्रसंग काळजाला घरे पाडणारा आहे. संस्थेत काम करणाऱ्या एका लेखनिकाने ‘मुक्तांगण’च्या मदतीने दारू पूर्णपणे बंद केली होती. तथापि, त्यांचे सिगारेटचे व्यसन छुप्यारीतीने सुरू होते. त्यांना स्वत:चा जबडादेखील पूर्णपणे उघडता येत नव्हता. एकदा संस्थेत कॅन्सर जनजागृती शिबिर भरविले गेले. त्यात तपासणी केली असता त्यांना अत्यंत प्रगत स्टेजचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच, वयाच्या पन्नाशीत त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन छोट्या मुली होत्या. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण कुटुंबच पोरके झाले. या घटनेने संस्थेला हा मोठा धडा दिला, तो म्हणजे दारू आणि ड्रग्जप्रमाणेच तंबाखूच्या छुप्या आणि घातक व्यसनाविरुद्धसुद्धा तितक्याच ताकदीने लढणे गरजेचे आहे.
मुंबईतील एका प्रसिद्ध सर्जनचे उदाहरणही असेच वेदनादायी आहे. ते डॉक्टर स्वतः अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करत असताना एकाग्रतेसाठी तोंडात तंबाखूची चिमूट ठेवून सर्जरी करीत होते. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व दुष्परिणामांची पूर्ण माहिती असूनही त्यांना तंबाखूचा मोह काही सोडता आला नव्हता. परिणामी, वयाच्या अवघ्या चाळीशीमध्ये त्यांना तोंडाचा कॅन्सर झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. व्यसन हे ज्ञान, पद, प्रतिष्ठा किंवा पैशाचा विचार करत नाही, हेच यातून लक्षात घेणे गरजेचे.
पुण्यातील एका रुग्णाचे उदाहरण अत्यंत प्रेरणादायी आहे. वयाच्या चाळीशीत असताना ते दारू, सिगारेट, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या गंभीर समस्यांनी ग्रस्त होऊन ‘मुक्तांगण’मध्ये दाखल झाले होते. सुरुवातीला काहीशा अनिच्छेने आलेल्या या रुग्णाने उपचार पूर्ण केले आणि घरी गेल्यावर सर्वप्रथम दारू बंद केली. नंतर त्यांनी सिगारेट आणि तंबाखू देखील स्वत:हून सोडली. आज वयाच्या ७५ व्या वर्षी ते अत्यंत फिट आहेत. जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ असते, तेव्हाच व्यसनमुक्तीसाठी आत्मबळ मिळते ते असे.
‘मुक्तांगण’ने आता व्यसनांच्या समस्येच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार केला आहे. या संस्थेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. शालेय वयातील मुलांमध्येच व्यसनाधिनतेबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे हा या ऐतिहासिक कराराचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत मुलांसाठी टेलिफोनिक समुपदेशन हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे. याशिवाय, पुण्याच्या शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन आणि राज्यभरातील शाळांमध्ये ऑनलाइन माध्यमांतून तसेच यूट्यूब व्हिडीओच्या सहाय्याने व्यापक जनजागृती केली जाणार आहे. लहान वयातच मुलांना व्यसनाचे दुष्परिणाम समजले, तर ते व्यसनांच्या आडवाटेला कधीही जाणार नाहीत.
आपल्या अवतीभवती व्यसनांचा आभासी भुलभुलय्या तयार झाला आहे. व्यसनांच्या बाजारातील दारू, तंबाखू, चरस, गांजा, गुटखा, ड्रग्ज, ई-सिगारेट अशी कितीतरी नावे जितकी गोंडस आणि आकर्षक वाटतात, पण तितकीच ती जीवघेणी ठरतात. चंदेरी, सोनेरी चमचमत्या पॅकेजिंगमध्ये येणारे हे व्यसन केल्याने मनाला धुंदी नव्हे, तर मेंदूला गुंगी येते. व्यसनाचा हा पहिला घोट कडवट असतो व तो जगणेही करतो अगदी बेचव.
‘मुक्तांगण’मध्ये उपचारासाठी येणारे अनेक रुग्ण सुरुवातीला म्हणतात की, ‘आम्ही दारू किंवा ड्रग्जसारखे मोठे व्यसन सोडायला आलो आहोत, मग तुम्ही आम्हाला तंबाखू किंवा सिगारेटसारखे छोटे व्यसन सोडायला का सांगत आहात?’ खरे तर, व्यसनामध्ये छोटे किंवा मोठे असे काहीच नसते; सर्वच व्यसने असतात तितकीच प्राणघातक. एखाद्याला श्वासनलिकेचा किंवा घशाचा कॅन्सर असेल, तर रुग्णाला श्वास घ्यायला आणि अन्न किंवा पाणी गिळायलासुद्धा प्रचंड त्रास होतो. तोंडाचा कॅन्सर झाल्यास अनेकदा शस्त्रक्रिया करून जबडा किंवा गालाचा भागसुद्धा कापून काढावा लागतो. या जिवंतपणीच्या मरणयातनाच नव्हे तर दुसरे काय? व्यसन आयुष्यात चोरपावलांनी प्रवेश करते आणि बघता बघता संपूर्ण जीवनच मातीमोल करून टाकते. व्यसनाच्या झुल्यावर झुलणाऱ्या माणसाला वास्तवाचे भान उरत नाही; कारण त्या झुल्याला नसतो जागृतीचा किनारा कधीही.
अलीकडच्या काळात तरुणाईमध्ये ‘ई-सिगारेट’ किंवा ‘हुक्का’ यांसारख्या आधुनिक व्यसनांची क्रेझ एका फॅशनसारखी वाढली आहे, जी अत्यंत चिंताजनक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या जीवघेण्या व्यसनाला अत्यंत ‘कूल’ आणि ‘ट्रेंडी’ मुखवटा चढवून बाजारात आणले आहे, ज्याच्या जाळ्यात शाळकरी मुले सहज अडकत आहेत. कमी हानिकारक किंवा धूरविरहित असल्याचा गाजावाजा करून नव्या पिढीला आकर्षित केले जात असले, तरी ई-सिगारेट आणि हुक्का हे फुफ्फुसांना निकामी करणारे कर्दनकाळ ठरत आहेत. तंत्रज्ञान कितीही बदलले किंवा कितीही आकर्षक मुखवटा चढवला, तरी व्यसनांचा अतिरेक हा शेवटी जीवघेणाच ठरतो, हे नवशिक्या तरुणाईने समजून-उमजून घेऊन सतर्क राहायला हवे.
आजकाल कॉर्पोरेट क्षेत्रात आणि उच्चभ्रू वर्तुळातील महिलांमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे अत्यंत गंभीर चित्र समोर येत आहे. खेड्यापाड्यातील किंवा निम्न आर्थिक स्तरातील महिलांमध्ये तंबाखू, मशेरी किंवा विडीचे जुने व्यसन अजूनही कायम आहे, तर शहरी भागात कॉर्पोरेट कार्यालयांबाहेर असणारे ‘स्मोकिंग झोन’ नकळतपणे धूम्रपानाला आणि पाश्चात्य अंधानुकरणाला प्रोत्साहन देत आहेत. महिलांमध्ये धूम्रपानामागे एक विचित्र गैरसमज असा पसरला आहे की, सिगारेट ओढल्यामुळे भूक कमी होते आणि त्यामुळे वजन नियंत्रित ठेवून ‘झिरो फिगर’ राखता येते. भूक कमी होते हे जरी तांत्रिकदृष्ट्या खरे असले, तरी वजन कमी करण्याचा हा मार्ग अत्यंत आत्मघातकी आहे. कारण त्यामुळे वजनासोबतच आरोग्याचा, प्रजोत्पादन क्षमतेचा आणि संपूर्ण आयुष्याचाही प्रश्न होतो अधिकच बिकट.
माणूस जेव्हा व्यसनांच्या आहारी जातो, तेव्हा तो माया, ममता, नाती विसरायला लागतो आणि एक दिवस साऱ्यांनाच कायमचा गमावून बसतो. व्यसनामुळे केवळ त्या व्यक्तीचीच नव्हे, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाची, मित्रमंडळींची आणि सगेसोयऱ्यांची समाजात असणारी इभ्रत धुळीस मिळते. व्यसनाशी मैत्री करणे म्हणजे एकप्रकारे वेदना, दुःख आणि थेट मृत्यूशी गाठ पक्की करण्यासारखे आहे. व्यसनाचा हा जो पंथ आहे ना, तो जात, धर्म आणि प्रांताच्या पलीकडचा एक भयभीषण ‘मरणपंथ’ आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे, जे लोक व्यसने विकतात ते गडगंज श्रीमंत होत जातात आणि जे लोक या व्यसनाच्या आहारी जातात ते आजाराने खंगतात नि दारिद्र्यात खितपत पडतात कायमचे. व्यसनाची संगत ही एखाद्या काळ्याकुट्ट अंधाररात्रीसारखी असते, जिला नात्यागोत्याच्या, ज्ञानाच्या आणि प्रगतीच्या उजेडाचे असते प्रचंड भय.
व्यसनांच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे आत्मपरीक्षण. जी माणसे स्वत: अंतर्मुख होतात. सुधारणेची कास धरतात, तीच व्यसनांच्या दलदलीतून सहीसलामत बाहेर पडू शकतात. त्यांचे मनोबल उंचावते. गमावलेला आत्मविश्वास नि आत्मसन्मानसुद्धा पुन्हा मिळतो. व्यसनमुक्तीचा हा लढा घराघरात, मनामनात पोहोचवायला हवा. कारण आपले जीवन तंबाखूच्या एका क्षुल्लक चिमटीपेक्षा किंवा सिगारेटच्या एका फसव्या झुरक्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुंदर, अमूल्य व अतुल्य आहे. हे ज्याला कळले, त्यालाच सुख म्हणजे नेमके काय असते, आनंद काय असतो ते कळते. ‘मुक्तांगण’सारख्या स्वयंसेवी संस्थांनी दाखवलेली ही प्रकाशवाट व्यसनांनी अंध:कारलेले प्रत्येकाचे जीवन उजळवून टाको, हीच सदिच्छा!
prakashrsawant@gmail.com