रहस्यमय पाणथळी 
अक्षररंग

रहस्यमय पाणथळी

कधी पाहिलीत का अशी जंगलं, जिथे पाण्यात उभी असलेली झाडं आपल्या मुळांनी हवेतून श्वास घेतात? या रहस्यमय पाणथळी निसर्गासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. चला, या अनोख्या निसर्गविश्वाची सफर करूया!

नवशक्ती Web Desk

अजब निसर्ग

मकरंद जोशी

कधी पाहिलीत का अशी जंगलं, जिथे पाण्यात उभी असलेली झाडं आपल्या मुळांनी हवेतून श्वास घेतात? या रहस्यमय पाणथळी निसर्गासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. चला, या अनोख्या निसर्गविश्वाची सफर करूया!

आपल्या भारत देशाला जे कमालीचं नैसर्गिक वैविध्य लाभलेलं आहे, त्यामुळे इथे जगभरातील सगळे अधिवास अर्थात इकोसिस्टिम्स पाहायला मिळतात. किनारपट्टी आणि अनेक नद्यांमुळे जल अधिवास आहे, वाळवंटामुळे वालुकामय भागातील आहे. माळराने आणि गवताळ कुरणांमुळे त्या परिसंस्थेचे नमुने आपल्याकडे आहेत. दमट पानगळी रानांपासून ते सदाहरीत पर्जन्यरानांपर्यंत अरण्यांचे विविध प्रकार असल्यामुळे तऱ्हेतऱ्हेच्या ‘फॉरेस्ट इकोसिस्टिम्स’ आहेत. त्यामुळेच महाकाय हत्तींपासून ते चिमुकल्या किटकांपर्यंत आणि गगनभरारी घेणाऱ्या पक्ष्यांपासून ते सूक्ष्म कणाहिन प्राण्यांपर्यंत शेकडो प्रकारचे प्राणी आपल्या देशात आढळतात. यातल्या काही अधिसंस्था आपल्या अगदी परिचयाच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी पुरेसे प्रयत्न केले जातात. मात्र या सगळ्यांमध्ये एक अधिसंस्था अशीही आहे जिची कदाचित फार कमी लोकांना ओळख असते. अनेकांना तर असा अधिवास आपल्या महाराष्ट्रात, भारतात अस्तित्वात आहे हेच माहिती नसतं. हा अधिवास म्हणजे मायरेस्टिका स्वॅम्प्स. नावाप्रमाणे हा भाग पाणथळ, दलदलीचा असतो. ही दलदल सागरकिनाऱ्यावरची नसते तर जिथे गोड पाण्याचे सरोवर आहे किंवा नदी वाहते आहे अशा ठिकाणी ती निर्माण झालेली असते.

हिरव्यागर्द झाडांची गच्च दाटी, शतकानुशतके वाढलेली त्यांची महाकाय खोडं, जमिनीच्या वर डोकावणारी त्यांची मुळं आणि या मुळांच्या जवळून वाहात असलेलं पाणी, झाडावरच्या पानांआड लपलेल्या पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज, वाहत्या पाण्यावर फेर धरून नाचणारे चतुर, मधूनच हुलकावणी दिल्यासारखी उडणारी फुलपाखरं या सगळ्यामुळे या दलदलींचा परिसर अधिकच रहस्यमय भासू लागतो. संशोधकांच्या मान्यतेनुसार या ‘मायरेस्टिका स्वॅम्प्स’ पृथ्वीवर सुमारे दहा कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहेत. त्यामुळे पृथ्वीवरच्या अतिप्राचीन अधिवासांपैकी त्या आहेत. अनेकदा त्यांची गणना जिवंत फॉसिल्समध्ये केली जाते. जगातल्या कोणत्याही आधुनिक काळात निर्माण झालेल्या उष्ण कटिबंधीय अरण्यांपेक्षा त्या प्राचीन आहेत. ज्या प्रदेशात भरपूर पाऊस पडतो, जमीन सखल असते, पाण्याचा निचरा लवकर होत नाही आणि वर्षभर वाहणारा पाण्याचा मोठा प्रवाह असतो अशा परिसरात हे पाणथळ भाग निर्माण होतात. अशा प्रकारे निर्माण झालेल्या पाणथळ, दलदलीच्या भागातील जैवविविधता थक्क करणारी असते. ही परिसंस्थाच कोट्यवधी वर्षांपूर्वी निर्माण झालेली असल्याने इथे आजही प्राचीन काळातल्या म्हणजे पृथ्वीवर सपुष्प वनस्पती अवतरण्याच्या आधीच्या काळातल्या वनस्पती बघायला मिळतात. या पाणथळींना ‘मायरेस्टिका’ हे नाव तिथे प्रामुख्याने आढळणाऱ्या मायरेस्टिका कुळातल्या वनस्पतींमुळेच पडलं आहे. याच कुळात जायफळ येतं. त्याच्या रानटी प्रजाती या पाणथळीच्या भागात वाढताना दिसतात. काही ठिकाणी या झाडांना ‘रामपत्री’ असंही म्हणतात. या पाणथळीच्या भागात शतकानुशतकं वाढलेले उंचच वृक्ष पाहायला मिळतात, त्यांची जमिनीलगतची मुळे उंच उंच वाढणाऱ्या झाडाला आधार देण्यासाठी अधिक सशक्त होतात आणि जणू त्या झाडाला आधार देतात. याबरोबरच झाडाच्या खोडातून बाहेर पडणारी मुळे जमिनीत न जाता, मातीच्या वर डोकावत राहतात. कारण तिथे कायम साचलेल्या पाण्यामुळे त्यांना जमिनीच्या खाली श्वसन करता येत नाही. त्यामुळे ते थेट हवेतून श्वास घेण्यासाठी बाहेर डोकावत राहतात. या पाणथळींचं एक वैशिष्ट्य म्हणजे अन्यत्र - जिथे पाणथळ परिसर नाही अशा ठिकाणची झाडे ज्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड वायू धरून ठेवतात, त्यापेक्षा इथली झाडे कितीतरी जास्त प्रमाणात वातावरणातला कार्बन शोषून घेतात. या दलदली निसर्गचक्रात एक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या एखाद्या स्पंजप्रमाणे त्यांच्या परिसरातलं जास्तीचं पाणी शोषून घेतात आणि नैसर्गिकरीत्या पुरांवर नियंत्रण ठेवतात. पाण्यातील किटकनाशके आणि अन्य रसायने गाळून ते पाणी भूगर्भात साठवायला या पाणथळींमधील वनस्पती मदत करतात. त्यामुळे जमिनीवरचा पाण्याचा प्रवाह जसा वाहता राहतो त्याचबरोबर भूगर्भातील पाण्याची पातळी ही कायम राखली जाते.

या रहस्यमय पाणथळींमधली जैवविविधता हेच सांगते की पक्षी, जलचर, उभयचर आणि किटकांच्या अनेक जातींचे हे आश्रयस्थान आहे. बेडकांच्या विविध प्रजाती जशा इथे सुखाने नांदतात त्याचप्रमाणे सहसा न दिसणारा उभयचर प्राणी म्हणजे ‘सिसीलियन’ अर्थात ‘देवगांडूळ’ सुद्धा या परिसरात हमखास आढळतो. रेप्टाइल्सच्या गटातील मलबार पीट व्हायपर या सापाप्रमाणेच काही पाणथळींच्या भागात किंग कोब्रा हा भारतातील सर्वात लांब विषारी सापही पाहायला मिळतो. दक्षिण भारतातल्या काही पाणथळींच्या भागांमध्ये फुलपाखरांच्या ६ कुळांमधल्या सुमारे २०६ जातींची नोंद झालेली आहे. इथल्या उंच आणि गच्च झाडांवर लायन टेल मकाव आणि धनेशासारखे स्थानिय पर्यावरणाला उपयुक्त असलेले प्राणी-पक्षी आढळतात.

आपल्या भारतात हे रहस्यमय पाणथळीचे भाग महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि कर्नाटकात पाहायला मिळतात. कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यातल्या या पाणथळींचा तपशीलवार अभ्यास १९९९ मध्ये करण्यात आला. केरळमधील कोल्लम जिल्ह्यातल्या या पाणथळींचा अभ्यास २००७ मध्ये करण्यात आला. केरळमधील या दलदलींच्या भागातून २०१३ मध्ये बेडकाची एक नवीन प्रजाती नोंदवण्यात आली आहे. त्याच्या शास्त्रीय नावात त्याच्या अधिवासाचा मायरेस्टिकाचा उल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ही अधिसंस्था कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळते. हेवळे-बांबर्डे गावाजवळ आणि दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल बागमवाडी येथे संशोधकांनी या पाणथळी शोधून काढल्या आहेत. सुदैवाने महाराष्ट्रात आणि केरळमध्ये या पाणथळी देवराई म्हणजे परंपरेनं जतन केलेल्या पवित्र रानाचा भाग असल्याने त्यांचे अस्तित्व टिकून राहिलेले दिसते. आता तर हेवळे-बांबर्डे गावाजवळच्या या परिसराला ‘बायोलॉजिकल हेरिटेज साइट’ म्हणून संरक्षण देण्यात आले आहे.

मात्र हे प्राचीन अधिवास धोक्यात आलेले आहेत. एकतर त्यांचं अस्तित्व अनेक वर्षे ठळकपणे उघड न झाल्याने त्यांचं महत्त्वच कळलं नव्हतं. त्यात भर पडली ती मानवी हस्तक्षेपाची. या पाणथळींच्याच परिसरात वाढणाऱ्या जायफळांसाठी इथल्या वनस्पतींवर होणारं मानवी आक्रमण असो किंवा वाढत्या शहरीकरणामुळे आकुंचन पावणारा या दलदलींच्या भोवतालचा जंगलाचा भाग असो. त्याबरोबरच या परिसरात रबर, केळी, साग याची लागवड मोठ्या प्रमाणावर होऊ लागली, जास्तीत जास्त भूभाग भातशेतीसाठी वापरायला सुरुवात झाली आणि एक नैसर्गिक परिसंस्था धोक्यात आली. शेतीची वाढती गरज आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे या दलदलींना होणारा नैसर्गिक पाणीपुरवठा खंडित होऊ लागला. वाहतं पाणी बंधाऱ्यांनी अडवलं तर भूगर्भातलं पाणी शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर उपसलं जाऊ लागलं. वाहतुकीसाठी नव्याने निर्माण केलेले रस्ते आणि मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड या गोष्टीही या पाणथळींसाठी घातक ठरल्या आहेत. त्यामुळेच या रहस्यमय दलदली वाचवण्यासाठी आता शासकीय स्तरावर आणि स्थानिकांकडून पावलं उचलली जात आहेत. कोट्यवधी वर्षे निसर्गातील जलचक्र चालवणाऱ्या या पाणथळींचं रहस्य जतन करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई