Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आई-वडील झोपेत असताना एक वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण झाल्याचा आरोप आहे. सीसीटीव्हीत संशयित महिला दिसली असून, रेल्वे पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे.
Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद
Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : आई-वडिलांसोबत गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर आई-वडील झोपलेले असताना एका अज्ञात महिलेने चिमुकलीला उचलून नेल्याचा आरोप आहे. सकाळी जाग आल्यानंतर मुलगी जवळ नसल्याचं पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, संशयित महिलेचा शोध सुरू आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, तक्रारदार गौरी पवार (२०) या घाटकोपर पश्चिम परिसरात राहतात आणि मजुरीचं काम करतात. गुरूवारी, १५ ऑक्टोबर रोजी त्या पती आणि एक वर्षाच्या मुलीसह लातूर एक्स्प्रेसने मूळ गावी उस्मानाबादला जाणार होत्या. त्यासाठी हे कुटुंब सायंकाळी सातच्या सुमारास सीएसएमटी स्थानकात पोहोचलं. फलाट क्रमांक १२ आणि १३ जवळील मुख्य हॉलमध्ये एका बाकाजवळ ते बसले होते.

जेवायला गेले अन् ट्रेन चुकली

रात्री आठच्या सुमारास हे कुटुंब जेवणासाठी स्थानकाबाहेर गेलं. मात्र, रात्री दहाच्या सुमारास ते परत आलं, तोपर्यंत लातूर एक्स्प्रेस निघून गेली होती. त्यामुळे तिघांनीही स्थानकातच रात्र काढण्याचा निर्णय घेतला. फलाट क्रमांक १२ आणि १३ जवळील एका स्टीलच्या बाकाशेजारी ते झोपले.

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद
Nagpur : शाळकरी विद्यार्थ्यांचं कृत्य; यूट्यूबवर व्हिडीओ पाहून अल्पवयीन मैत्रिणीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

पहाटे उठून मुलीला दूध पाजलं, पण...

पहाटे चारच्या सुमारास गौरी यांना जाग आली. त्यांनी मुलीला दूध पाजलं आणि पुन्हा झोपी गेल्या. त्यानंतर सकाळी सव्वापाचच्या पुढे, सुमारे ५ वाजून २५ मिनिटांनी पोलिसांच्या शिट्ट्यांचा आवाज ऐकून त्या जाग्या झाल्या. मात्र, शेजारी झोपलेली मुलगी दिसत नव्हती. मुलगी अचानक गायब झाल्याने आई-वडील घाबरले. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर त्यांनी फलाटावर उपस्थित असलेल्या महिला पोलिसांकडे मदत मागितली.

लाल कुर्ता घातलेल्या महिलेवर संशय

तक्रार मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात लाल रंगाचा कुर्ता घातलेली अंदाजे २५ ते ३० वर्षांची महिला झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेत असल्याचं दिसल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलीचे आई-वडील झोपेत असतानाच संशयित महिलेने तिला तिथून नेल्याचा आरोप आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे.

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद
पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

अपहरणाचा गुन्हा दाखल, तपास सुरू

या प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी अज्ञात महिलेविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. चिमुकलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in