भीतीदायक तरीही मित्र साप 
अक्षररंग

भीतीदायक तरीही मित्र साप

नागपंचमीच्या परंपरेमागे सापांविषयीची भीती नव्हे, तर निसर्गाशी जोडलेले कृतज्ञतेचे नाते दडलेले आहे. उंदरांवर नियंत्रण ठेवून शेतीचे रक्षण करणाऱ्या या जीवाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी चला, सापांच्या अद्भुत विश्वात डोकावूया.

नवशक्ती Web Desk

अजब निसर्ग

मकरंद जोशी

नागपंचमीच्या परंपरेमागे सापांविषयीची भीती नव्हे, तर निसर्गाशी जोडलेले कृतज्ञतेचे नाते दडलेले आहे. उंदरांवर नियंत्रण ठेवून शेतीचे रक्षण करणाऱ्या या जीवाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी चला, सापांच्या अद्भुत विश्वात डोकावूया.

आपल्या भारतीय संस्कृतीचं सगळ्यात मोठं आ वैशिष्ट्य म्हणजे ही संस्कृती निसर्गाशी असलेलं नातं जोडण्याची परंपरा निर्माण करते. पिढ्यान्पिढ्या लोक या परंपरांचं पालन करतात आणि मग निसर्गाबरोबरचा दुवा अधिकच घट्ट होत जातो. आषाढातला बैलपोळा असो किंवा कार्तिकातील तुळशी विवाह, अवतीभवतीच्या झाडांबरोबर, पाळीव प्राण्यांबरोबर जिव्हाळ्याचं नातं जोडण्याचा मार्ग म्हणजे हे असे सण-उत्सव. श्रावण महिन्यात तर जणू रोजच एक सण साजरा करून निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवसांमधला एक दिवस म्हणजे 'नागपंचमी'. या दिवशी नाग-साप यांची पूजा करण्याची प्रथा आहे. मात्र नाग-साप यांची भीती वाटते म्हणून ही परंपरा निर्माण झालेली नाही. आपल्या कृषिप्रधान संस्कृतीमध्ये नाग-साप हे शेतकऱ्यांचे आणि एकूणच माणसांचे मित्र आहेत याची जाणीव रुजलेली असल्याने, त्याच भावनेमधून त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमीचा सण सुरू झाला. आता ज्यांच्याविषयी खूप गैरसमज प्रचलित आहेत, ज्यांचं नाव ऐकल्यावर भीतीच वाटते ते नाग-साप माणसांचे मित्र कसे? त्यासाठी या सर्पाच्या अजब विश्वात जरा डोकावूया.

निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यात सुमारे एकतीस कोटी वर्षांपूर्वी या पृथ्वीवर सरीसृप म्हणजे रेप्टाइल्स हा गट निर्माण झाला. खवल्यांनी मढलेलं शरीर असलेले सरपटणारे प्राणी असं याचं ढोबळ वर्णन करता येईल. याच गटातला एक प्रमुख सदस्य म्हणजे साप. इतर सरपटणाऱ्या प्राण्यांना- सरडे, मगरी, कासव जसे मागचे आणि पुढचे मिळून चार पाय आहेत तसे सापांनाही कदाचित सुरुवातीला असावेत, मात्र उत्क्रांतीच्या रेट्यात हे पाय नाहीसे झाले आणि बिन हाता-पायांचे साप पृथ्वीवर वावरू लागले. नाही म्हणायला अजगर आणि बोआ गटातल्या सापांना मागच्या पायांचे अवशेष शिल्लक राहिलेले पाहायला मिळतात. हात-पाय नसलेल्या लांबलचक शरीराच्या सापांची ठळक वैशिष्ट्यं म्हणजे त्यांच्या डोळ्यांना पापण्या नसतात. पण त्यांच्या डोळ्यांचं संरक्षण करायला त्यावर एक पारदर्शक पडदा असतो. इतर रेप्टाइल्सप्रमाणेच साप थंड रक्ताचे प्राणी आहेत, म्हणजे त्यांच्या शरीराचे तपमान सस्तन प्राण्यांसारखे ठराविक नसतं. म्हणूनच सकाळच्या कोवळ्या उन्हात दगडावर बसून साप आपलं तपमान वाढवताना दिसतात.

सापांचा जीवनक्रम अंडी, पिल्लं आणि प्रौढ साप असा असतो. मात्र डुरक्या घोणस, फुरसं, घोणस, मंडोळ असे काही साप पिल्लांना जन्म देतात. प्रत्यक्षात यांची अंडी पोटातच उबवली जातात, बाहेर पिल्लं येतात. तर मण्यार, नाग, नागराज, धामण असे साप अंडी घालतात. सापांमध्ये वात्सल्यभाव नसतो, ते आपली अंडी एखाद्या झाडाच्या ढोलीत, खड्ड्यात घालून निघून जातात. अपवाद किंग कोब्राचा. याची मादी अडीच पानांचं तीन फूट आकाराचं घरटं जमिनीवर तयार करते आणि त्यात आपली अंडी घालून ती स्वतः उबवते.

सापांमध्ये अंडी उबताना टेंपरेचर बदललं की अंड्यातील पिल्लांचं लिंग बदलतं. साप म्हटल्यावर तो विषारीच अशी चुकीची समजूत पाहायला मिळते. प्रत्यक्षात सापांचं वर्गीकरण विषारी, निम विषारी आणि बिन विषारी असं तीन गांमध्ये करता येतं. सापांना निसगनि विष दिलं आहे ते त्यांना भक्ष्य पकडणं सोपं जावं म्हणून. मुळात ते विष म्हणजे पॉइझन नसून व्हेनम म्हणजे गरळ आहे. विषारी सापांच्या शरीरात डोळ्यांच्या खाली, घशात विषाच्या ग्रंथी असतात. जेव्हा नाग, मण्यार असे विषारी साप भक्ष्याच्या शरीरात आपले तीक्ष्ण सुळे रुतवतात तेव्हा या ग्रंथींमधून विष भक्ष्याच्या शरीरात जातं. नाग, मण्यार यांचे विष माणसांच्या आणि इतर प्राण्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतं तर फुरसं, घोणस यांचं विष रक्तात मिसळून विघटन सुरू करतं. सर्पदंशावर फक्त 'अॅन्टी व्हेनम सिरम' हेच उपयोगी ठरू शकतं. सापाचं विष घोड्याच्या रक्तात मिसळल्यावर तयार होणाऱ्या अॅन्टी बॉडीजपासून हे इंजेक्शन तयार केलं जातं. सापांविषयी- खरंतर नागांविषयी पूर्वापार रुजलेला गैरसमज म्हणजे गारुड्याच्या पुंगीवर नाग फणा काढून डोलतो. प्रत्यक्षात कोणत्याही सापाला-नागाला सस्तन प्राण्यांसारखे कान नसतात, त्यामुळे ते एअर बॉर्न साऊंड हवेच्या कंपनांनी निर्माण होणारे ध्वनी ऐकूच शकत नाहीत. नाग आपला फणा बचावासाठी, संरक्षणासाठी उभारतो, त्याला गारुड्याची पुंगी हे संकट वाटतं आणि म्हणून तो फणा उगारून पुंगी हलेल तसा आपला फणा हलवतो. साप हे रेप्टाइल्स असल्याने त्यांचं भावनांचं इंद्रिय अजिबात विकसित झालेलं नसतं, त्यांना स्मरणशक्तीही नसते, त्यामुळे सिनेमात दाखवतात तर्स लक्षात ठेवून, डूक धरून ते कोणाचाही सूड घेऊ शकत नाहीत, घेतही नाहीत. साप आपली जीभ सतत जबड्याच्या बाहेर काढताना पाहायला मिळतो. त्याच्या जबड्याची ठेवणच अशी असते की, वरचा आणि खालचा ओठ बंद केला तरी जीभ बाहेर काढायला फट राहते. साप आपल्या जीभेवर हवेतले रासायनिक कण गोळा करतो आणि ते आपल्या टाळूपाशी असलेल्या जेकबसन ऑर्गन या इंद्रियापर्यंत पोहचवतो, तिथे त्या कणांचं रासायनिक पृथक्करण केलं जातं आणि सापाला आपल्या नजीक भक्ष्य आहे, स्वजातीय साप आहे का अन्य काही आहे याचा अंदाज येतो. साप हे रेप्टाइल्स असल्याने त्यांना दुधाची चवच माहिती नसते. त्यामुळे त्यांना दूध आवडते हा सुद्धा गैरसमज आहे.

साप त्याला दूधच काय कोल्ड्रिंक दिलं तरी ते पिणारच. साप जसे कात टाकतात तसे इतर अनेक रेप्टाइल्स-सरडे, पालीही कात टाकतात. फक्त सापांना पाय नसल्याने त्यांची कात संपूर्ण रूपात सापडते. कात टाकणं ही त्यांची वाढण्याची पद्धत आहे. त्वचेवरचा जुना थर, आतमध्ये वाढलेल्या शरीरासाठी अपुरा पडू लागतो, मग दगडावर, फांद्यांवर घासून साप तो थर काढून टाकतात-त्यालाच आपण कात म्हणतो. गारुड्यांकडचे साप हे उपाशी-तहानलेले असतात, असा

अशा अनोख्या सापांना निसर्ग चक्रात एक महत्त्वाची भूमिका दिलेली आहे. शेतीचं, धान्याचं नुकसान करणाऱ्या उंदराच्या संख्येवर सापच अधिक उत्तम प्रकारे नियंत्रण ठेवू शकतात. उंदरांच्या बिळात घुसून त्यांना संपवणारा हा एकमेव प्राणी आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या सापांचं रक्षण व्हावं महणून नागपंचमी हा सण सुरू केला असावा. पुढे सापांच्या आगळ्यावेगळ्या शरीररचनेमुळे आणि जीवनक्रमामुळे त्याला अद्भूततेचं वलय लाभलं. त्या वलयामागे आहे या निसर्ग चक्राचा अविभाज्य भाग असलेला एक जीव, ज्याचं रक्षण करणं आवश्यक आहे. त्यामुळेच नागपंचमीसारख्या सणांमागची निसर्ग संवर्धनाची भावना लक्षात घ्या आणि सापांना आपले मित्र समजा.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

एसी लोकल दुरुस्ती केंद्रासाठी ३७१ कोटींचा निधी; वाणगाव येथे देखभाल केंद्राची उभारणी

LPG eKYC Last Date : अजून ई-केवायसी केली नाही? आजच करा, नाहीतर सिलिंडर मिळण्यात येणार अडचण

रस्ते अपघातात ५० टक्के पादचाऱ्यांचा मृत्यू; मुंबई रस्ता सुरक्षा वार्षिक अहवाल

एसटी प्रवाशांनाही लागणार वाचनाची आवड; नालासोपारा आगारात फिरते वाचनालय सुरु

Mumbai : ३७ हजार फेरीवाले 'नॉट रिचेबल'; QR कोड आधारित ओळखपत्रासाठी ३१ ऑगस्ट अखेरची तारीख