ना प्राणी ना वनस्पती : मग कोण? 
अक्षररंग

ना प्राणी ना वनस्पती : मग कोण?

पावसाळ्यात अचानक उगवलेल्या अळंब्या पाहिल्या की त्या वनस्पती आहेत की काही वेगळे, असा प्रश्न अनेकांना पडतो. निसर्गातील फंगी किंगडमचा हा अनोखा प्रतिनिधी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे आणि जीवनचक्रामुळे विज्ञानजगताला नेहमीच आकर्षित करत आला आहे.

नवशक्ती Web Desk

अजब निसर्ग

मकरंद जोशी

पावसाळ्यात अचानक उगवलेल्या अळंब्या पाहिल्या की त्या वनस्पती आहेत की काही वेगळे, असा प्रश्न अनेकांना पडतो. निसर्गातील फंगी किंगडमचा हा अनोखा प्रतिनिधी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे आणि जीवनचक्रामुळे विज्ञानजगताला नेहमीच आकर्षित करत आला आहे.

निसर्गाच्या अफाट पसाऱ्यात जशी काटेकोर विभागणी केलेली पाहायला मिळते त्याप्रमाणे दोन वेगवेगळ्या घटकांची भिन्न भिन्न वैशिष्ट्ये ठळकपणे पाहायला मिळतात, तसेच काही वेळा संभ्रमात टाकणारे घटकही पाहायला मिळतात. सर्वसाधारणपणे वनस्पती आणि प्राणी यांची शरीररचना भिन्न असते, दोघांची अंतर्गत रचनाही वेगळी असते आणि काही मुख्य फरक असतात की जे वर्गीकरणासाठी महत्त्वाचे ठरतात. पण याच निसर्गात काही अजब गोष्टी अशाही आहेत की ज्यांना कोणत्या वर्गात धरायचं किंवा कोणत्या गटात बसवायचं ते पटकन कळत नाही. याचं एक झकास उदाहरण म्हणजे अळंबी अर्थात मशरूम्स. मांसाहार न करणारे शाकाहारी लोक मशरूम्स आवडीने खातात, पण म्हणून मशरूम्स वनस्पतींच्या गटात येत नाहीत. त्या प्राणी तर नक्कीच नाहीत, मग मशरूम्स आहेत तरी काय?

वनस्पतींमध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य असते, ज्याच्यामुळे त्या सूर्यकिरणांच्या मदतीने स्वतःचे अन्न तयार करून वाढू शकतात. अळंब्यांमध्ये हे हरितद्रव्य नसते. कसे असेल? कारण अळंबी काही वनस्पतींसारखी स्वतंत्र जिवंत गोष्ट नाही. त्या फंगी म्हणजे बुरशीची पुनरुत्पादन करण्याची सोय आहेत. पण मग बुरशी तरी काय आहे? तर प्राणी आणि वनस्पतींपेक्षा वेगळी रचना, वैशिष्ट्ये असल्याने बुरशीचा जीवसृष्टीत स्वतंत्र विभाग- फंगी किंगडम मानला जातो. मात्र त्यांच्यात काही साम्य स्थळे आहेत, प्राण्यांप्रमाणेच फंगी म्हणजे बुरशी हेट्रोटोफ प्रकारात येते, म्हणजे फंगी देखील स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. तसेच त्या वनस्पतींप्रमाणे प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. फंगी या आपलं अन्न मिळवण्यासाठी भोवतालच्या वातावरणात काही पाचक द्रव्ये सोडतात आणि त्याद्वारे आवश्यक ती पोषक द्रव्ये विरघळून मिळवतात. फंगींकडे निसर्गाने विघटन करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. आपल्या साध्या डोळ्यांना न दिसणाऱ्या फंगी म्हणजेच बुरशीच्या पुनरुत्पादनाचे काम मशरूम्स म्हणजे अळंब्या करतात. बहुतेक सगळ्या फंगी या जमिनीखाली असतात, पण बिज प्रसारासाठी त्यांना जमिनीवर यायची गरज भासते. त्यासाठीच निसर्गाने मशरूम अर्थात अळंबीची योजना केली आहे.

त्यामुळे तुलनाच करायची तर झाडांसाठी फळे जितकी महत्त्वाची असतात तितकीच अळंबी बुरशीसाठी महत्त्वाची असते. अर्थात बुरशीच्या सगळ्या प्रकारांना अळंब्या फुटत नाहीत, पण तरी अळंबी हे प्रमुख साधन मानता येईल. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर सगळ्या फंगी मशरूम्स नसतात, पण सगळ्या मशरूम्स फंगी असतात. मशरूम हे नाव मुख्यतः त्याच अळंब्यांना वापरलं जातं ज्यांना देठ असतो, त्या देठावर एक टोपीसारखा भाग असतो आणि त्या टोपीच्या खालच्या(आतल्या) भागात गील्स म्हणजे वर्तुळाकार पद्धतीचे पातळ पडदे असतात. हे वर्णन आहारात समाविष्ट असलेल्या बटन मशरूमशी मिळतजुळतं आहे. मात्र यापेक्षा वेगळी रचना असलेल्या मशरूम्सना ‘बोलेट’, ‘पफबॉल’,’स्टिंक हॉर्न’, ‘मोरेल’ अशी नावे आहेत. मशरूम्स प्रसिद्ध आहेत त्या एका रात्रीत अचानक उगवून वर येण्यासाठी. अळंब्यांच्या या झटपट वाढण्यावरून मराठीत त्यांना ‘कावळ्याची छत्री, कुत्र्याची छत्री’ म्हणतात, तर हिंदीत चक्क ‘कुकुरमुत्ता’ म्हणतात. मराठीतही झपाट्याने निर्माण होऊन तितक्याच जलद गतीने नाश पावणाऱ्या गोष्टींसाठी ‘कुत्र्याच्या छत्र्यांसारखे उगवलेले’ असा शब्दप्रयोग केला जातो.

आता ही झटपट वाढणारी मशरूम तयार कशी होते? तर बुरशी ज्या ठिकाणी म्हणजे लाकडाच्या ओंडक्यात, जमिनीच्या खाली, कुजलेल्या पानांवर वाढलेली असते, त्या पदार्थावर दोन मिलीमीटरपेक्षाही लहान आकाराचे दाणे निर्माण होतात. हे दाणे बुरशीच्या तंतुमय भागात तयार होतात आणि झपाट्याने वाढू लागतात. वाढत असतानाच त्यांचे देठ, टोपी हे भाग विकसित होऊ लागतात. पफबॉल मशरूम्समध्ये देठ नसते, थेट चेंडूसारखे गोल वाढत जातात. मशरूम्सची वाढ अतिशय वेगाने होते, कारण त्यांना बुरशीचा बिज प्रसार करायचा असतो. मशरूमच्या टोपीच्या खालच्या भागात जो पातळ पडद्यासारखा भाग असतो तिथे बुरशीच्या बिया म्हणजे ‘स्पोअर्स’ तयार होतात जे वाऱ्यावर, पाण्यातून पसरवल्या जातात. बुरशीला वाढण्यासाठी दमट, ओली जागा लागते. त्यामुळे पावसाळ्यात अळंब्या मोठ्या प्रमाणावर उगवलेल्या पाहायला मिळतात. अळंब्यांचे आयुष्यही अल्पच असते. काहीवेळा तर रात्रीत उगवलेल्या अळंब्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत कोमेजूनही जातात. भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशांमध्ये पावसाळा हा मशरूम्ससाठी अनुकूल ऋतू असल्याने, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर मशरूम्स उगवलेल्या पाहायला मिळतात. युरोपसारख्या शीत कटिबंधातील प्रदेशांमध्ये ऑटम किंवा फॉल म्हणजे शिशिर ऋतूमध्ये मशरूम्स उगवलेल्या पाहायला मिळतात.

आज जगभरात चायनिज, कोरियन, जपानी, युरोपियन भोजनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशरूम्स वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात. आपल्याकडे सुपर मार्केट्सपासून अगदी भाजी मार्केटपर्यंत ज्या मशरूम्स सहज उपलब्ध होतात त्या मुख्यत्वे बटन मशरूम्स प्रकारातील असतात. त्याशिवाय धिंगरी किंवा ओयस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मशरूम्सही भारतात मोठ्या प्रमाणावर मिळतात. या दोन्ही प्रकारच्या मशरूम्सची नियंत्रित वातावरणात आणि स्वच्छ, निर्जंतुक पद्धतीने मशरूमची शेती केली जाते. त्यामुळे अशा प्रकारे लागवड केलेल्या अळंब्या वर्षभर खायला उपलब्ध होतात. मात्र मशरूम्समध्ये जशा खाण्यासाठी योग्य मशरूम्स असतात त्याचबरोबर काही विषारी, घातक प्रकारही आढळून येतात. या विषारी अळंब्या ओळखणं हे माहितगाराचंच काम आहे. कारण फक्त लाल, शेंदरी, काळ्या रंगाच्या मशरूम्स विषारी असतात असं नाही. शिवाय एकाच वर्गात (जीनसमध्ये) चांगल्या आणि विषारी मशरूम्स दोन्ही आढळतात. माणसांप्रमाणेच निसर्गात ही लिफ कटर मुंग्या, वाळवी, ॲम्ब्रोसिया बिटल्स असे कीटक मशरूमची लागवड करताना पाहायला मिळतात.

भारतातील सुमारे १२०० मशरूम्सची नोंद झाली आहे, तर जगभरात सुमारे १४००० जातींची नोंद झाली आहे. सुदैवाने भारतात आढळणाऱ्या अळंब्यांपैकी फार थोड्या विषारी असल्याचे आढळून आले आहे. २०१५ साली सिक्कीमच्या टेकड्यांवर बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला नऊ नव्या मशरूम्स आढळून आल्या. भारतात काश्मीर, हिमाचल प्रदेशच्या पहाडांमध्ये उगवणारी फक्त निसर्गतःच उगवणारी ‘मोराल’ किंवा गुच्छी ही अळंबी सर्वात महाग असते. तिच्या दर्जानुसार वीस हजार ते चाळीस हजार रुपये किलो दराने विकली जाते. या अळंबीची लागवड होऊ शकत नाही. आपल्याला रानात फिरताना, शेताच्या कडेवर किंवा अगदी घराच्या लाकडी दरवाज्यावर अचानक दिसणाऱ्या अळंब्यांची दुनिया अशी मोठी आणि अद्भूत आहे. गरमा गरम मशरूम सुपचे घुटके घेताना किंवा मशरूम मसालासारखा चटपटीत पदार्थ खाताना तुम्ही निसर्गातील फंगी किंगडमचा हिस्सा असलेल्या आणि स्वतःची ओळख असलेल्या एका अनोख्या गोष्टीचा आनंद घेताय हे विसरू नका.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन

Thane : झेडपीच्या शाळांकडे पालकांचा ओढा; इयत्ता पहिलीत ८ हजार २८० विद्यार्थ्यांचा प्रवेश

कोस्टल रोड प्रकल्पातील बोगदा 'फायर प्रूफ'; 'वॉटर मिस्ट टर्बाइन' वाहन तैनात करणार; BMC करणार ६ कोटी ३२ लाख रुपये खर्च