बालोद्यान
एकनाथ आव्हाड
सोमवारी सकाळी शाळा भरली. बाई वर्गात आल्या आल्या म्हणाल्या, “मुलांनो, सर्वांनी इकडे लक्ष द्या. एक महत्त्वाची सूचना तुम्हा सर्वांना सांगायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना लोकनृत्य स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आताच माझ्याकडे नावं द्यायची आहेत.”
तेवढ्यात दारातून आवाज आला, “बाई वर्गात येऊ?”
त्यांनी दाराकडे पाहिलं तर दारात दीप्ती नवले उभी. बाईंनी काहीसं रागातच विचारलं, “काय गं, ही काय वेळ झाली तुझी शाळेत येण्याची? शाळा भरण्याची वेळ कितीची आहे आपली?”
“सकाळी साडेसातची.”
“मग आता किती वाजलेत माहितीये? साडेआठ झालेत. तू चक्क एक तास उशिरा आलीस शाळेत.”
“उद्यापासून मी वेळेवर येईन बाई,” दीप्ती आर्जवाने म्हणाली.
“हे तुझं रोजचंच आहे. जा, बस जा जागेवर.”
दीप्ती जागेवर बसली. बाई पुन्हा म्हणाल्या, “बरं चला, मला सांगा पटापट कोण कोण नृत्य स्पर्धेत भाग घेणार आहे ते.”
नृत्यस्पर्धा म्हटल्याबरोबर दीप्तीचे डोळे लकाकले. तिने पटकन आपला हात वर केला. “बाई, मला घ्यायचाय नाचाच्या स्पर्धेत भाग.”
“अगं, एकतर तू शाळेत वेळेवर येत नाहीस. शिवाय मध्ये मध्ये तू दांडीसुद्धा मारतेस. मग कसं घ्यायचं तुला स्पर्धेत? शिवाय शाळा सुटल्यावर स्पर्धेच्या तयारीसाठी शाळेत जास्त वेळ थांबावंसुद्धा लागेल.”
“मी आता घरी नाही राहणार बाई आणि नाचासाठी जास्त वेळ शाळेत थांबेनसुद्धा.”
चव्हाण बाईंनी दीप्तीचं नाव लिहून घेतलं. “आज शाळा सुटल्यावर थांब हं,” असंही तिला सांगितलं.
शाळा सुटल्यानंतर नृत्यस्पर्धेत भाग घेणारी सर्व मुलं शाळेच्या सभागृहात जमली. नृत्य शिकवणाऱ्या विवेक पांचाळ सरांनी मुलांना काही नृत्यप्रकार करून दाखवले. मुलांना तशा पद्धतीने नाचायला सांगितले. ज्यांना व्यवस्थित नृत्य जमलं त्यांना लोकनृत्य स्पर्धेसाठी त्यांनी निवडलं. दीप्तीनेही नाचून दाखवलं. तिचीही निवड झाली. आपल्याला नृत्यस्पर्धेसाठी निवडलं याचा तिला खूप आनंद झाला. कारण दीप्तीला नृत्याची प्रचंड आवड होती.
दीप्ती आता सहावीच्या वर्गात शिकत होती. तिचं हस्ताक्षर सुंदर होतं, ती अभ्यासातही बऱ्यापैकी चांगली होती. एकच गोष्ट तिची चव्हाण बाईंना खटकायची, ती म्हणजे ती शाळेत नियमित आणि वेळेवर यायची नाही. या नृत्यस्पर्धेमुळे एक गोष्ट चांगली घडली, दीप्ती वेळेवर शाळेत यायला लागली. तिच्या मनात भीती होती की, जर आपण गैरहजर राहिलो किंवा वेळेवर शाळेत आलो नाही तर बाई आपल्याला नृत्यस्पर्धेतून बाहेर काढतील. चार-पाच दिवस छान गेले. दीप्ती वेळेवर शाळेत आली. वर्गशिक्षिका चव्हाण बाईंनाही बरं वाटलं. बऱ्याचदा घरी राहणारी, वेळेवर शाळेत न येणारी दीप्ती नृत्यामुळे का होईना शाळेत वेळेवर यायला लागली, हे किती छान झालं.
एक आठवडा झाला असेल. हजेरी घेताना चव्हाण बाईंच्या लक्षात आलं, दीप्ती आज शाळेत आलीच नाही. बरं, बाईंनी त्यांचा फोन नंबर तिला दिला होता, ‘काही अडचण आली तर फोन कर’ असं सांगून पण तिचा फोनही आला नाही. एक धडा शिकवून झाला. सकाळी साडेआठ वाजता दीप्ती धावतच शाळेत आली. “बाई वर्गात येऊ?”
बाईंनी विचारलं, “काय गं, का उशीर झाला तुला आज? आणि म्हणाली होतीस ना, यापुढे शाळेत उशिरा येणार नाही म्हणून.”
दीप्ती म्हणाली, “बाई, आजीला आज बरं नव्हतं. त्यामुळे सकाळी घरी पाणी मलाच भरावं लागलं. म्हणून शाळेत यायला आज उशीर झाला. आमच्याकडे सकाळीच पाणी येतं बाई.”
“तुझी नेहमीच काहीतरी कारणं असतात. बस जागेवर. पण तू आता नृत्यात भाग घेऊ नकोस. तुझ्या अशा वागण्यामुळे आपला नृत्याचा संघ बाद व्हायला नको.”
दीप्ती जागेवर जाऊन बसली. नकळत तिचे डोळे भरून आले. तिची आवडीची गोष्ट तिच्याकडून काढून घेतली आहे असं तिला वाटलं. ती आर्जवाने बाईंना म्हणाली, “बाई, यापुढे शाळेत नाही उशिरा येणार मी. पण मला नाचाच्या स्पर्धेतून काढू नका.”
तिचा रडवेला चेहरा पाहून बाईंना वाईट वाटलं. त्या म्हणाल्या, “बघ हं, ही शेवटची संधी तुला. यापुढे घरी राहिलीस किंवा शाळेत उशिरा आलीस, तर नाचाच्या स्पर्धेतून काढून टाकणार तुला.”
“हो बाई.” आपले डोळे पुसत हसऱ्या चेहऱ्याने दीप्ती म्हणाली. तिथून पुढे दीप्तीला शाळेत यायला कधीच उशीर झाला नाही की कधीच ती घरीही राहिली नाही.
पांचाळ सर नृत्याच्या स्पर्धेची जोरदार तयारी करून घेत होते. मदतीला चव्हाण बाईसुद्धा होत्याच. ना. धो. महानोर यांच्या ‘आम्ही ठाकर ठाकर, या रानाची पाखरं’ या गाण्यावर मुलांनी चांगलाच ठेका धरला होता. या सगळ्यांमध्ये दीप्तीचा नाच मात्र उठून दिसत होता. देहभान हरपून दीप्ती नाचायची. पांचाळ सर तिच्या नाचाचं अनेकदा कौतुक करायचे. चव्हाण बाईसुद्धा तिला शाबासकी द्यायच्या.
एकदा चव्हाण बाई सकाळी सातला शाळेत आल्या आणि पाहतात तर काय, दीप्ती त्यांच्या आधीच शाळेच्या गेटवर येऊन उभी. बाई तिच्याकडे पाहून हसल्या. “लवकर आलीस.” असंही म्हणाल्या.
शाळेचे वॉचमन दामोदर काका म्हणाले, “अहो बाई, हल्ली ही रोजच सकाळी साडेसहालाच येऊन बसते शाळेत.”
बाईंनी विचारलं तिला, “का गं, एवढ्या लवकर का येतेस शाळेत?”
“बाई, आजी आणि मी पहाटे पाचलाच उठून घरचं पाणी भरतो. मग आजी कामाला जाताना मला शाळेत सोडून जाते.”
चव्हाण बाईंच्या लक्षात आलं की, आजी कामाला निघून गेल्यावर दीप्ती घरातली सगळी कामं आवरत असेल म्हणून तिला शाळेत यायला उशीर होत असेल. लवकरच स्पर्धेची तारीख जाहीर झाली. मुलांची छान तयारी झाली होती. एकदाचा स्पर्धेचा दिवस उजाडला. दीप्ती आणि स्पर्धेतील इतर मुलंही सकाळपासूनच खूप उत्साहात होती. स्पर्धेच्या ठिकाणी सगळी मुलं पोहोचली. मुलांसोबत चव्हाण बाई आणि पांचाळ सरही होतेच. स्पर्धेत मुलांनी सादर केलेल्या ठाकर नृत्याला प्रथम क्रमांक मिळाला आणि दीप्तीला उत्कृष्ट नृत्याचं वेगळं बक्षीसही मिळालं. आनंदी आनंद झाला.
स्पर्धेतील एका परीक्षकांनी दीप्तीच्या नृत्याचं विशेष कौतुक केलं आणि टीव्हीवरील एका नृत्यस्पर्धेसाठी तिचं नाव सुचवलं. चव्हाण बाईंनी आणि पांचाळ सरांनी दीप्तीला टीव्हीवरील स्पर्धेपर्यंत नेलं. आता पुढील कामगिरी दीप्तीची होती. तिने वेगवेगळ्या टप्प्यात, वेगवेगळ्या प्रकारांत नृत्य सादर करून सगळ्यांना आवाक केलं आणि तिथेही तिने उत्कृष्ट नृत्यांगनेचं बक्षीस पटकावलं. ‘नृत्य बिजली’ हा किताब मिळवला.
दीप्तीला बक्षीस घेताना पाहून चव्हाण बाईंच्या मनात एक विचार पटकन चमकून गेला. पांचाळ सरांना त्यांनी तो बोलून दाखवला. म्हणाल्या, “शाळेच्या एका नृत्यस्पर्धेने दीप्तीच्या शालेय जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. दीप्तीने अतिशय अभिमानास्पद अशीच कामगिरी आज केलीय. शाळेच्या यशात तिने आज आणखी एक शिरपेच खोवलाय.”
दीप्ती बक्षिसाचा चषक हातात घेऊन चव्हाण बाईंकडे धावत आली. बाईंना, सरांना तिने मनोभावे नमस्कार केला आणि चषक बाईंच्या हाती देत ती म्हणाली, “बाई हे सगळं तुमच्यामुळेच झालंय. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलात त्याचं हे फळ.”
आता बाईंचे डोळे नकळत भरून आले होते आणि पांचाळ सर हे दृश्य मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत होते.
eknathavhad23@gmail.com
साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक.