अजब निसर्ग
मकरंद जोशी
पृथ्वीवरील सजीवतेचं मुख्य रहस्य म्हणजे पाणी आणि सागरातील अद्भुत जीवसृष्टी. महासागरातील रंगीबेरंगी मासे, अनोखे प्राणी आणि कणाहीन जीवनाचे वैविध्य आपल्या नजरेआड अद्भुत जग उलगडते.
आपल्या पृथ्वीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ‘पाणी’. आपल्या सगळ्या ग्रहमालेत फक्त पृथ्वीवरच पाणी आहे आणि म्हणूनच पृथ्वीवरच सजीव सृष्टी पाहायला मिळते. भौगोलिकदृष्ट्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ७०% भाग हा पाण्याने अर्थात सागराने व्यापलेला आहे. आपण आपल्या राजकीय आणि व्यावहारिक सोयीसाठी या महासागरांना आणि सागरांना वेगवेगळी नावे दिली आहेत. याच सागरामध्ये पृथ्वीवरचा पहिला सजीव जन्माला आला. त्यामुळे सागराच्या पोटातली दुनिया कमालीची अद्भूत आहे, कारण निसर्गाने आपले अनेक पहिलेपणाचे प्रयोग याच सागरातील जीवसृष्टीवर केले. साहजिकच सागरातील जीवसृष्टीमध्ये कमालीचं वैविध्य आढळतं. सागरात नांदणाऱ्या सुमारे सव्वादोन लाख प्रकारच्या जीवांची नोंद आजपर्यंत झालेली आहे आणि लाखो जीवांची नोंद होणे बाकी आहे. या जीवांची विभागणी अर्थातच व्हर्टिब्रेट्स (कणावान) आणि इनव्हर्टिब्रेट्स (कणाहीन) या दोन गटात करण्यात आली आहे. सागरातील कणावान प्राण्यांच्या गटात मासे, रेप्टाइल्स, सस्तन प्राणी असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सामावलेले आहेत. शार्क, व्हेल्स, सील, वॉलरस, स्टिंग रे, समुद्री कासवे, पेंग्विन हे सगळे सागरातले व्हर्टिब्रेट्स आहेत. या सगळ्यांमध्ये सर्वात मोठा गट अर्थात माशांचा आहे. जगभरात मिळून सुमारे ३३००० प्रकारचे मासे आढळतात. सुमारे त्रेपन्न कोटी वर्षांपूर्वीचे माशाचे जे जीवाश्म सापडलेलं आहे, त्यामुळे तेव्हा माशांना जबडेच नव्हते हे लक्षात येतं. त्यानंतर दहा कोटी वर्षांनी जबडा असलेले मासे उत्क्रांत झाले. माशांमधली विविधता त्यांच्या आकारापासून सुरू होते, फक्त ८ मिलिमीटर लांबीच्या माशापासून ते महाकाय ५२ फुटांच्या माशापर्यंत वेगवेगळ्या आकाराचे मासे जगभरातल्या समुद्रात पाहायला मिळतात. थंड रक्ताचे मासे पाण्यातील ऑक्सिजन आपल्या कल्ल्यांद्वारे मिळवतात आणि अंडी घालून नवीन पिढी जन्माला घालतात. माशांमधला सर्वात अनोखा भिडू म्हणजे समुद्र घोडा. हा कास्थिमाशांच्या गटातला असा सभासद आहे, ज्याचे रंगरूप पारंपरिक माशांशी अजिबात मिळतंजुळतं नाही. जगभरातील उष्ण हवामानाच्या प्रदेशातील उथळ समुद्रांमध्ये सी हॉर्स आढळतो. याचे डोके जमिनीवरच्या घोड्यासारखे दिसते आणि हा इतर माशांसारखा आडवा तरंगत नाही तर सरळ उभा राहतो. म्हणून याला सागरातील घोडा म्हणतात. आपल्या लांब आणि लवचिक शेपटीने समुद्र घोडा स्वतःला सागरी वनस्पतीला जखडून ठेवतो. समुद्र घोडा आपला रंग बदलू शकतो आणि भोवतालच्या परिसराशी एकरूप होऊन स्वतःचा बचाव करतो. यांचे प्रजनन अगदीच अनोख्या पद्धतीने होते. नराच्या अंगावर एक पिशवी असते, मिलनाच्यावेळी मादी या पिशवीत साधारण हजार ते दीड हजार अंडी घालते. पुढे सुमारे चाळीस दिवस नर ती अंडी सांभाळतो, त्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर नराचे बाळंतपण संपते.
सागरातल्या काही आगळ्यावेगळ्या माशांबद्दल सांगायचं तर त्यात खोल समुद्रात राहणाऱ्या ॲन्गलर फिशचा उल्लेख करायलाच हवा. या माशाला ‘ॲन्गलर फिश’ असं नाव मिळालं आहे. कारण या माशांच्या माद्यांच्या अंगावर पाठीच्या कण्यातला एक पर (फिन) एखाद्या लांब तारेसारखा वाढतो, या तारेच्या टोकाला प्रकाशमान बॅक्टेरियांची लहानशी पिशवी असते, या पिशवीच्या मदतीने ॲन्गलर मासे इतर लहान माशांना आकर्षित करतात आणि ते जवळ आले की त्यांचा चट्टामट्टा करतात. समुद्रतळाच्या अंधारात भक्ष्य शोधण्यापेक्षा ही युक्ती अधिक सोयीस्कर असते. या ॲन्गलर माशांमध्ये नर मादीपेक्षा आकाराने फारच लहान असतात. शिवाय त्यांच्या डोक्यावर मादीप्रमाणे इतर माशांना आकर्षित करायला तार नसते. मग हे नर मासे आपल्या तीक्ष्ण घ्राणेंद्रियाच्या मदतीने गंधावरून समुद्रतळाच्या काळोखात मादीचा शोध घेतात. मादी सापडली की, आपले दात तिच्या शरीरात खुपसून ते तिला लटकू लागतात. मादीला चिकटलेला असा नर मग हळूहळू तिच्याशी एकरूप होऊ लागतो. आता त्याला भक्ष्य शोधण्यासाठी डोळ्यांची गरज नसते, त्याचे डोळे नाहीसे होतात. मादी जे भक्ष्य खात असते त्यावर त्याचा गुजारा होऊ लागतो.
सागरातील या जीवसृष्टीत इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे कणाहीन प्राण्यांचे प्रमाण ९५% आहे. ऑक्टोपस, स्क्विड, कोरल्स, खेकडे, स्टार फिश, जेलीफिश, स्पॉन्ज हे सगळे सागरातील इनव्हर्टिब्रेट्स आहेत. समुद्रातील कणाहीन प्राण्यांमध्ये कमालीचे वैविध्य आढळून येते. त्यांची विभागणी ३० समूहांमध्ये केली आहे. पृथ्वीवरील प्राण्यांमध्ये सागरातले कणाहीन हे सर्वात पहिले उत्पन्न झालेले प्राणी मानले जातात. अनेक सागरी कणाहीन प्राणी हे पाणी शुद्ध करण्याचे काम करतात. अनेक सागरी कणाहीन प्राणी इतर जीवांना आवश्यक, पोषक असे घटक-कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस याचा प्रसार करण्याचे काम नैसर्गिकपणे करतात.
या कणाहीन प्राण्यांच्या गटात एक खतरनाक शिकारी आहे. हा महासागराच्या तळाशी, वाळूत दडून राहत असल्याने आणि आकाराने अगदी लहान असल्याने नजरेस पडत नाहीत. हा शिकारी म्हणजेच ॲटलँटिक महासागरच्या तळाशी राहणारा ‘बॉबिट वर्म’. नावाप्रमाणेच हा वर्म म्हणजे अशा अपृष्ठवंशीय अर्थात कणाहीन प्राण्याच्या गटात येतो ज्यांचे शरीर लांबुळके आणि हाता-पायाविना असते. ब्रिस्टल वर्मच्या गटात मोडणारा हा प्राणी उबदार सागरी परिसंस्थेत पाहायला मिळतो. त्याच्या शिकार करण्याच्या पद्धतीवरून त्याला सँड स्ट्रायकर असेही म्हणतात. समुद्राच्या तळाशी वाळूत लपून बसणाऱ्या या प्राण्याला डोळे नसतात, पण त्याची उणीव त्याच्या पाच ॲन्टेना भरून काढतात. वाळूत लपून बसलेल्या या प्राण्याचं पात्यासारखं धारदार तोंड बाहेर असतं आणि आपल्या पाच ॲन्टेनांनी तो आसपासच्या गोष्टींचा वेध घेत असतो. सागरतळाशी असलेल्या जीवांपैकी एखाद्या माशाचा जर या ॲन्टेनाला स्पर्श झाला तर ताबडतोब हा प्राणी अतिशय वेगाने आपल्या धारदार तोंडात त्या माशाला पकडतो. कधी कधी त्याचा आवेग इतका जोरदार असतो की माशाचे चक्क दोन तुकडे होतात. आपल्या कचाट्यात सापडलेल्या माशाच्या शरीरात तो एक प्रकारचे विषारी द्रव्यही सोडतो, ज्यामुळे त्या माशाच्या आतल्या अवयवांचे विघटन होऊ लागते आणि याला तो मासा पचवायला सोपं जातं. हा शिकारी जसा वेगवेगळ्या प्रकारच्या माशांचा फन्ना उडवतो तसाच हा समुद्रातली अल्गेही आणि कुजणारे पदार्थही खातो. त्यामुळे याला मिश्राहारी मानले जाते.
सागरतळाची दुनिया खरोखरच अजबगजब आहे. आपल्या नजरेआड असलेल्या या दुनियेतील आणखी काही अनोख्या जीवांची ओळख पुढच्या भागात करून घेऊया. (अपूर्ण)
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com