Photo : Freepik
अक्षररंग

पत्रांची जादू

Hi friends! कसे आहात? सुट्ट्यांमध्ये कुठल्या गावाला जाणार आहात? गावाला जाणार असाल तर तिकडे गेल्यावर मला एखादं खुशालीचं पत्र पाठवा हं. अगदी पोस्टकार्ड पाठवलं तरी चालेल...

नवशक्ती Web Desk

खुल जा सिम सिम

ज्योती कपिले

Hi friends!

कसे आहात? सुट्ट्यांमध्ये कुठल्या गावाला जाणार आहात? गावाला जाणार असाल तर तिकडे गेल्यावर मला एखादं खुशालीचं पत्र पाठवा हं. अगदी पोस्टकार्ड पाठवलं तरी चालेल. अरे! हे काय? असं हसू नका. तुम्हाला वाटत असेल की, मी ‘पत्र लिहा’ असं तुम्हाला का सांगत असेन तेही मोबाईल, ई-मेल आणि सोशल मीडियाच्या जमान्यात! पण मित्रांनो, आलं का काही तुमच्या लक्षात? बरोब्बर! नेहमीप्रमाणे माझा प्रश्न आजच्या विषयाला धरून असावा हे तुम्हाला एव्हाना समजलं असेलच. पण त्याआधी मला जरा एका कोड्याचं उत्तर द्या बरं.

कधी आनंदाचे, कधी दुःखाचे

कधी अपेक्षित, कधी अनपेक्षित

कधी गावातून, कधी शहरातून

कधी देशातून, कधी परदेशातून

गावोगाव चालू असतं ह्याचं मिरवणं..

तिकीट लावून ऐटीत,

लाल गाडीतून फिरणं

सोशल मीडियामुळे

आता याला विचारत नाही कुणी

काळजाचा तुकडा

हा फारच आहे गुणी!

ओळखा कोण? बरोब्बर ‘पत्र!’...

जरी आज काळानुपरत्वे पत्राचं स्वरूप बदललं असलं तरीही पत्र हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पत्राची महती अवर्णनीय असते. कधी कधी आपल्याला समोरासमोर जे बोलता येत नाही किंवा बोलू शकत नाही ती बाब समोरच्याला लिहून वाचायला देणं आपल्याला जास्त सोप्पं पडतं. आपले विचार वाचल्यावर त्या व्यक्तीला ती गोष्ट जास्त चांगली समजते आणि यामुळे पत्राचा खूप चांगला वापर अनेक मान्यवरांनी केला आहे. त्यापैकी एक आहेत ते म्हणजे सर्वांचे लाडके साने गुरुजी. ज्यांचं संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होय. त्यांनी लिहिलेलं ‘श्यामची आई’ हे गोष्टीचं पुस्तक तुम्ही वाचलेलं असेलच. त्यांनी जवळजवळ ऐंशी पुस्तकं लिहिलेली असून त्यापैकी एक ‘सुंदर पत्रे’ नावाचं पुस्तक त्यांनी आपल्या सुधा नामक पुतणीला लिहिलेल्या पत्रांचं पुस्तकरूपी संकलन आहे. एक दोन नाही, तर बेचाळीस पत्रं या पुस्तकात समाविष्ट आहेत. अर्थात ही पत्रं त्यांनी लौकिकार्थाने सुधाला लिहिली असली तरी ती तिने तिच्या मित्रमंडळींसोबत वाचावी असं साने गुरुजींना अपेक्षित होतं आणि आता तर ही पत्रं सगळ्यांसाठी पुस्तक रूपाने उपलब्ध आहे. एक सांस्कृतिक ऐवज बनला आहे.

या पुस्तकात असं काय आहे याची तुम्हाला उत्सुकता असेलच.. तर साने गुरुजींनी सुधाच्या गुणांचे कौतुक करून तिला प्रोत्साहन तर दिले आहेच, पण सुधाला चार समजुतीच्या गोष्टीही सांगितल्या आहेत.

शिवाय पत्राद्वारे भावी पिढीला मागे पडत जाणारे महाराष्ट्रातील मंगळागौरीसारखे सण, गाव संस्कृती, कलाजीवन, गावातील निसर्ग, पाऊस, माणसाच्या मनातील सूक्ष्म कंगोरे, जीवनाचे दर्शन इतकेच नव्हे, तर गवताच्या पातीपासून मनुष्यापर्यंत साऱ्या सृष्टीवर प्रेम करायला लावणारी ही पत्रं आहेत.

‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हीच मोलाची शिकवण साने गुरुजींनी सगळ्या जगाला दिली आहे.

१५ ऑगस्ट १९४८ रोजी साने गुरुजींनी (संस्थापक) ‘साधना’ साप्ताहिक सुरू केलं तर ‘साधना’ साप्ताहिकातून प्रकाशित झालेल्या ‘सुंदर पत्रे’ या सदराच्या पुस्तकाद्वारे १९५० मध्ये साधना प्रकाशनाची सुरुवात झाली. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत समाजवादी विचारवंत नानासाहेब गोरे यांनी लिहिले आहे की, ‘आपल्या मनाला या पत्राद्वारे साने गुरुजींनी संयमाचे बांध घातले. सुंदर भावनांचं पाणी त्यात खेळवलं. सद्विचारांचं बी पेरलं आणि मग त्यात पिकलेल्या भरघोस पिकाची वानगी उदार शेतकऱ्याप्रमाणे घरोघर पोचवली! सुधाला लिहिलेल्या शेवटच्या पत्रात ‘पेरते व्हा’ असे ओरडणाऱ्या पक्ष्याचा उल्लेख केलेला आहे, नानासाहेब गोरे म्हणतात, ‘गुरुजींनी तुला-मला शेवटी जणू सांगितलं आहे की, ‘पेरते व्हा! पेरते व्हा’ पेरा, मुबलक पेरा, सर्वत्र पेरा, निवडक पेरा, म्हणजे सगळीकडे सुगीच सुगी होईल!’ ही वैचारिक पेरणी चांगल्या विचारांची, आचारांची आहे. वाचणारी मुलं ही नेहमीच चांगल्या विचारांची धनी असतात. मित्रांनो, मला वाटतं आता तुमच्या मनावर पत्राचं महत्त्व अधोरेखित झालं असेल. २४ डिसेंबरला साने गुरुजींची जयंती झाली. आपण त्यांचे विचार अंगिकारावे, पुढे न्यावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आता पटापट तुम्ही घरातील मोठ्यांना पत्राद्वारे हे साने गुरुजींचे ‘सुंदर पत्रे’ पुस्तक मला वाचायला पाहिजे आहे असं पत्राद्वारे कळवून तर बघा; जादू झाल्यागत घरचे मोठे तुमच्यावर खुश होतील आणि तुम्हाला साने गुरुजींची भरपूर पुस्तकं आणून देतील. मात्र इतक्यात न थांबता तुम्ही अधूनमधून पत्र लिहीत रहा. कोणी आपलं काम केलं तर आपण पटकन बोलून जातो थँक यू, पण हे थँक यू एका छोट्याशा कागदावर लिहून त्या व्यक्तीच्या हातात द्या. त्याचा परिणाम बघा आणि आम्हालाही तो अनुभव

शेअर करा. शेअरिंग इज ऑलवेज केअरिंग! n

बालसाहित्यिक व लेखक

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी