प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
उपवास म्हटलं की देवपूजेइतकीच आठवण येते ती साबुदाणा खिचडी, वडे, राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि फराळाची. श्रद्धा आणि चव यांचा सुंदर संगम म्हणजेच मराठी माणसाचा 'साग्रसंगीत' उपवास.
धार्मिक कारणांसाठी उपवास करणं ही भारतीयांची श्रद्धा आहे, प्रथा आहे. महाराष्ट्रात आषाढी आणि कार्तिकी एकादशी, चतुर्थी, महाशिवरात्र यांसारख्या निमित्ताने उपवास धरला जातो.
उपवास म्हणजे विशिष्ट काळासाठी अन्न किंवा पेये (किंवा दोन्ही) ऐच्छिक रीतीने वर्ज्य करणं होय. शारीरिक, धार्मिक, वैद्यकीय किंवा आत्मिक हेतूंसाठी ही प्रथा पाळली जाते.
उप समीपम्। वासः निवासः।
भगवत्समीपे वासो उपवासः।
अर्थात ‘उपवास’ या शब्दाची फोड ‘उप+वास’ अशी आहे, ज्याचा अर्थ ‘ईश्वराच्या जवळ राहणं’ असा होतो.
कित्येकजण आराध्य देवतेनुसार आठवड्यातून एकदा सोमवार, गुरुवार किंवा शनिवार या दिवशी असे वर्षभरही उपवास करीत असतात. रोजच्या जेवणातल्या पदार्थापेक्षा वेगळ्या वस्तूंपासून बनविलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी आवडीने खाल्ले जातात. उपवासाचा मूळ हेतू- पोटाला विश्रांती देणं दूरच राहून ‘एकादशी दुप्पट खाशी’ अशी वस्तुस्थिती असते. उपवासाचे पदार्थच तितके चविष्ट असतात हे त्यामागचं खरं कारण. त्यामुळे उपवास नसतानासुद्धा साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा यासारखे पदार्थ हल्ली हॉटेलांमधूनही खूपच लोकप्रिय झालेले आहेत.
उपवासाचा फराळ म्हणजे उपवासाच्या दिवशी (उदा. एकादशी, महाशिवरात्र, नवरात्र) खाल्ले जाणारे हलके, सात्विक आणि ऊर्जा देणारे अन्न. यामध्ये सामान्यतः धान्य (गहू, तांदूळ) वगळून बटाटा, साबुदाणा, शेंगदाणे, वरई आणि फळं यांचा वापर केला जातो.
उपवासामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि वजन नियंत्रणात राहायला मदत होते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
तसेच, उपवासामुळे पेशींची दुरुस्ती जलद गतीने होते आणि मानसिक शांतता लाभते. तर, काल आषाढी एकादशीच्या मंगल मुहूर्तावर ‘साग्रसंगीत’ उपवासाचं हाणून हा लेख मी लिहायला घेतला.
उपवास म्हटलं की मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी ही आलीच. खिचडीचा पहिला घास मुखात जाताच समजते साबुदाणा नीट भिजलाय... त्याला उगळलाय असे म्हणतात. खिचडीत दाण्याचं कूट आणि उकडलेल्या बटाट्याचे छोटे काप हवेतच. खिचडी हा उन उन खाण्याचा प्रकार आहे. थंड झालेली खिचडी अजिबात चांगली लागत नाही. काही वेळा ती गिच्च होते आणि त्याचा गोळा होतो. छान फळफळीत लुसलुशीत खिचडी मन आणि जीभ मोहून टाकते.
त्यानंतर रताळ्याचा किंवा बटाट्याचा कीस. पूर्वी रताळी लहान लहान मिळायची. त्याच्या पातळ चकत्या कापून ओला नारळ गूळ, अर्थात गुळचुनात त्या टाकून हा उपवासाचा चविष्ट गोड पदार्थ बनायचा. आदल्या दिवशी आई अख्ख्या शेंगदाण्याचे आणि शेंगदाण्याच्या कुटाचे असे लाडू करून ठेवायची. उपवासाच्या दिवशी अधूनमधून एखादा दाढेखाली टाकायचा. सगळ्यांचा फारच आग्रह झाला तर साबुदाणा वडे बनायचे. कुरकुरीत वडे आणि सोबत दही किंवा दही शेंगदाणा चटणी. थोडक्यात काय, एकादशी आणि दुप्पट खाशी हे मी तरी प्रत्यक्षात आणत असे. कडक वगैरे उपवास करून कशासाठी शरीराला, पोटाला आणि जिभेला त्रास द्यायचा आणि भुकेने पोट दाबत बसायचे? उपवासाच्या पदार्थांची चित्र डोळ्यांसमोर आणून तोंडाला सुटणारे पाणी गिळत राहायचे? त्यापेक्षा रोज जे खात नाही ते रिचवून (उपवासाचे) मस्त साजरा करायचा उपवास.
दुपारी राजगिरा पिठाच्या पुऱ्या, बटाट्याची मस्त शेंगदाणे घालून केलेली उपवासाची भाजी, शेंगदाण्याची खमंग आमटी किंवा ओल्या खोबऱ्याचं करमणं आणि वरी भात. सोबत छान विरजलेले दही असा आहार घेऊन आणि त्यानंतर छोटंसं सफरचंद किंवा दोन वेलची केळी.
उपवासाच्या दिवशी ऑफिसमध्ये जातानाही मी हे सगळे पदार्थ माझ्या टिबल डेकर डब्यात भरून नेत असे. आमच्याकडे काही स्टाफ पारसी होता. सकाळपासून माझ्या बोलण्यातून आज माझं fasting आहे, हे ऑफिसभर झालेले असायचे. लंच टाइम झाला की माझा डबा घेऊन मी डायनिंग रूममध्ये जायचो. Fasting करणारा मी, काय खातोय पाहायला कुणी पारसी कुतूहलाने आत यायचा आणि माझा डबा आणि विविध पदार्थ पाहून त्याला काही कळेनासे व्हायचे. म्हणायचा,
"ए इडियट, तुजा fasting हाय ना? मंग किटी खाते तू...?"
मी शांतपणे सांगायचो, की अरे हे सगळं उपवासाचेच आहे.
डोक्याला हात लावून तो चालता व्हायचा.
अनेकजण उपवास करतात आणि दिवसभर पोटावर हात फिरवत, तोंड वेडेवाकडे करत आपल्या उपवासाचं जाहीर प्रदर्शन करत राहतात. आता झेपत नाही तर कशाला करायचा? पण सांगायला गेलं तर म्हणणार,
"असं कसं? आमच्या घरात वर्षानुवर्षाची परंपरा आहे उपवासाची. शांत, प्रसन्न वाटतं उपवास केल्यावर."
अरे पण हे तुझ्या चेहऱ्यावरून, देहबोलीतून दिसत नाहीय त्याचं काय??
काही तर निराहार उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी होतात आडवे. पित्त चढतं, अशक्तपणा वाटू लागतो, कुणाचं BP वाढतं आणि यांच्या उपवासाचा त्रास घरातल्या इतरांना होतो. आपल्याला कितीही वाटलं तरी शरीराने साथ दिली पाहिजे ना? असो,
तर वर सांगितलेल्या उपवासाच्या पदार्थांशिवाय खमंग काकडी, साबुदाण्याचं थालीपीठ, साबुदाण्याची खीर, लापशी, वरीची खांडवी याशिवाय साबुदाण्याच्या बटाट्याच्या कुरवड्या, रताळ्याची कचोरी, केळ्याचं दही, हिरवी मिरची घालून केलेलं रायतं अशा अनेक पदार्थांनी उपवासाचा दिवस सजायचा.
आमच्या ऑफिसमध्ये एक तरुण मुलगा नवरात्रात नऊ दिवस फक्त एकवेळ जेवून उपवास करायचा. दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नसे, तरीही त्याच्या चेहऱ्यावर जराही त्रास दिसत नसे. इतरांनाच त्याची काळजी वाटायची, तो मात्र छान हसत खेळत काम करत असायचा.
पण माझ्या मते, या सगळ्यापेक्षा, उपवासाच्या दिवशी अंघोळ आटोपली की घरच्या देवांची छान साग्रसंगीत आणि मनापासून पूजा करावी, मनोभावे नमस्कार करावा आणि मग...दिवसभर झेपेल तसा उपवासाच्या पदार्थांचा समाचार घ्यावा. देवही खुश आणि आपणही. म्हणजे धार्मिक दृष्टीने करत असू तर व्यवस्थित देवाचं करून, मग उपवासाच्या पदार्थांचा समाचार घेतोय हे समाधान आणि घरातल्या उपवासकर्त्यांना साथ म्हणून आणि रोजच्या खाण्यात बदल म्हणून करत असू, तर तेही साध्य होतंय.
तेव्हा उपवास जरूर करावा पण......"साग्रसंगीत......"
kprasad1959@gmail.com