जगतवारी
मेधा आलकरी
एका बाजूला ‘साऊंड ऑफ म्युझिक’मधील प्रेमाची सुरेल कहाणी, दुसरीकडे निसर्गाच्या कुशीत विसावलेलं स्वप्नवत शहर आणि अचानक अंगावर कोसळणारे पाण्याचे फवारे! ऑस्ट्रियातील साल्झबर्गचा प्रवास म्हणजे सिनेमाच्या पडद्यावरून प्रत्यक्ष आयुष्यात प्रवेश करण्याचा आणि बालपण पुन्हा जगण्याचा एक अविस्मरणीय अनुभव!
यौवनाच्या आरंभकाळी ‘साऊंड ऑफ म्युझिक’ सिनेमातील प्रेमकथेनं माझ्या मनावर गारुड केलं होतं. इंग्रजी सिनेमा म्हणजे लंडनमधला असंच समीकरण तेव्हा डोक्यात होतं. पुढे कधीतरी साल्झबर्ग या शहरातली ट्रॅप कुटुंबाची ही सत्यकथा असल्याचं वाचनात आलं. युरोप पर्यटनाची सुरुवात म्हणूनच आम्ही या रोमँटिक शहरापासून करायची असं ठरवलं.
साल्झबर्ग शहरी आमचा चार रात्रींचा मुक्काम होता. या शहरात पर्यटकांना भावतील अशी बरीच आकर्षणं आहेत. येथील बहुतांश नागरिक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या पर्यटनाशी संबंधित आहेत. या भूमीला विधात्याने असीम सृष्टीसौंदर्य बहाल केलं आहे. शहरातून सालझाच नावाची नदी वाहते. नदीच्या अलीकडे नवं शहर आणि पलीकडे जुनं शहर वसलंय. जुन्या शहरात होहेनसाल्झबर्ग नावाचा मोठा किल्ला आहे. पहिल्याच दिवशी आम्ही ‘साऊंड ऑफ म्युझिक’ नावाने चालणारा अतिशय लोकप्रिय असा टूर घेतला. मला इथले गाईडेड टूर आणि त्यांचे ते स्मार्ट, हसतमुख, बहुभाषी, व्यवस्थित पोषाखातले, आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे, स्थळ-काळ-इतिहासाची इत्यंभूत माहिती असणारे, विनोदी, हजरजबाबी आणि वक्तशीर गाईड खूपच आवडले.
साऊंड ऑफ म्युझिकमधील ‘डो अ डियर’ या प्रसिद्ध गाण्याचं चित्रीकरण झालेल्या मीराबेल गार्डनमध्ये पाऊल ठेवलं आणि फुलांनी बहरलेल्या त्या कलात्मक बागेने आम्ही मोहून गेलो. असं वाटत होतं हिरव्या गालिच्यावर लाल रंगाची रांगोळी रेखाटली आहे. मध्यभागी असलेलं कारंजं आणि सभोवताली पसरलेली हिरवाई भव्य किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होती. चालत चालत आम्ही सालझाच नदीपाशी येऊन पोहोचलो. ही अगदी युरोपियन रंगरूपाची नदी. हिरवट घाऱ्या डोळ्यांचा रंग. असं वाटलं ग्लेशियर वितळून वाहायला लागलाय. सालझाच या जर्मन शब्दाचं ‘सॉल्ट रिव्हर’ हे इंग्रजी भाषांतर आहे. नदी गोड्या पाण्याचीच आहे; पण पूर्वी या नदीवरून मिठाचं दळणवळण होत असे म्हणून हिला खारी नदी म्हणत असत. पलीकडच्या काठावरील चर्चचे मनोरे, कॅथीड्रलचा हिरवा घुमट आणि उंच डोंगरावर वसलेला होहेनसाल्झबर्ग किल्ला आम्हाला खुणावू लागला. नदीवरील पादचारी पूल पार करून आम्ही या जुन्या शहरात प्रवेश केला.
साल्झबर्गवर आर्च बिशपांचं राज्य होतं. दहाव्या शतकापासून बांधायला घेतलेला हा किल्ला सोळाव्या शतकात पूर्ण झाला. आर्च बिशपांच्या कितीतरी पिढ्या इथे वास्तव्यास होत्या. किल्ल्याच्या सर्वोच्च बिंदूवरून साल्झबर्ग शहराचा नयनमनोहर देखावा दिसतो. आमच्या या टूर गाईडने सिनेमातील नायिका मारिया हिच्यासारखा पारंपरिक ऑस्ट्रियन वेश परिधान केला होता. घेरदार पिनाको फ्रॉक, समोर कमरेला लेसची किनार असलेला चौकड्यांचा एप्रन. दंडाशी थोड्या फुगीर असलेल्या ब्लाऊजच्या बाह्या कोपरापाशी आणि मनगटापाशी घट्ट होत गेलेल्या. गळ्याभोवती, बाह्यांवर, फ्रॉकच्या घेरावर आणि एप्रनवर नाजूक फुलांचं हनिकोंबचं भरतकाम. एक ठिकाण पाहून आम्ही बसमध्ये बसलो की ही ‘मारिया’ सुरेल आवाजात साऊंड ऑफ म्युझिकमधली गाणी गाऊ लागायची. या टूरची गंमत अशी होती की बसमधून उतरलो की आम्ही सिनेमातील कृष्णधवल दुनियेत प्रवेश करायचो आणि कथानकाबरोबरच त्या त्या ठिकाणांच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यायचो. वूल्फगँगसी आणि मोंडसी सरोवरं अतिशय नयनरम्य आहेत. उंच पर्वतराजींच्या कुशीत विसावलेला शांत निळा जलाशय अन् त्यात विहरणाऱ्या शिडाच्या होड्या!
‘ट्रॅप व्हिला’ पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना, बसमधून उतरल्यावर मारियाने एक बॉम्बच फोडला. ती म्हणाली की सिनेमातलं ट्रॅप कुटुंबीयांचं ते राहतं घर अस्तित्वातच नाही मुळी. फ्रॉइनबर्ग पॅलेसचा दर्शनी भाग आणि लिओपोल्डस्क्रोन कॅसलचा मागील भाग मिळून आपल्याला ‘ट्रॅप व्हिला’ भासवला जातो. ‘आय एम सिक्सटीन गोइंग ऑन सेवेंटीन’ हे निरतिशय सुंदर गाणं ज्या काचेच्या खिडक्या असलेल्या अष्टकोनी ‘गझीबो’मध्ये शूट झालंय ते आहे हेलब्रुन पॅलेसच्या बगिच्यात. अशी ही आभासी दुनिया!
सिनेमाच्या सुरुवातीला वरून दाखवलेला सरोवराजवळील फ्युस्कल कॅसल पाहण्यासाठी गेलो. हा किल्ला शिकारीच्या वेळी वापरण्यात येणारा उन्हाळी राजनिवास. तेथील डोंगरावरून खाली घसरत येण्यासाठी एक वर्तुळाकार घसरगुंडी केली आहे. पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या लाकडी घसरगाडीवर बसून खाली घसरत येण्याचा मजेशीर अनुभव आम्ही घेतला. आपापली घसरगाडी हातात घेऊन आम्ही रांगेत उताराजवळ उभे होतो. उतरण सुरू झाली आणि अर्ध्यावर जातोय तोच समोरची एक गाडी अडकली. मागची गाडी त्यावर आपटली. त्या धक्क्यानं वेग घेऊन थोडावेळ भेलकांडत मग पुन्हा ‘रुळावर’ येत दोन्ही गाड्या एकापाठोपाठ घसरू लागल्या. सगळ्यांची हसता हसता पुरेवाट झाली. आमच्या अंतर्मनातील दटावून गप्प बसवलेलं बालक असं मनमोकळेपणाने बागडू लागलं.
या सुखान्तिकेतील ‘ग्रँड वेडिंग’ जिथे पार पडतं, त्या मोंडसी कॅथीड्रल या शेवटच्या ठिकाणी पोहोचलो. आपला पायघोळ पांढराशुभ्र वेडिंग गाऊन बोटांच्या चिमटीत पकडून, त्याला किंचित वर उचलत कॅथीड्रलमधील अल्टारच्या पायऱ्या चढणारी मारिया मला दिसू लागली. अगदी शेवटी टूर संपताना आमच्या गाईडनं ‘योलुलु’ गाऊन दाखवलं. पर्यटकांनी तिच्या आवाजात आपला आवाज मिसळला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. हे एकप्रकारचं यॉडलिंगच म्हणायचं. मला बंगाली बायका शुभकार्याच्यावेळी जीभ वळवून ‘ओळूळू’ असा सामूहिक आवाज काढतात त्याची आठवण झाली. ऑस्ट्रियामधील ही ओलूलू म्हणजे पर्वतांची एकमेकांशी बोलायची भाषा. पक्ष्यांच्या शिट्ट्या, प्राण्यांची गुरगुर या संवादभाषा माहीत होत्या; पण पर्वतशिखरंही एकमेकांशी बोलतात हे ऐकून मजा वाटली.
जुलै-ऑगस्ट या महिन्यांमध्ये युरोपात बऱ्याच ठिकाणी साडेआठ-नऊच्या सुमारास ‘संध्याकाळ’ होते. अशाच एका संध्याकाळी हेलब्रून पॅलेसमधील ‘ट्रीक फाऊंटन’ शो बघायला बाहेर पडलो. फाऊंटन शो म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर वृंदावन गार्डनमधील, स्वरलहरींच्या उतार-चढावावर खाली-वर जाणारी, रंगीत झोतांमुळे रंगबेरंगी दिसणारी कारंजी येतात. हा प्रकार मात्र भन्नाटच होता. फाऊंटन शब्दाच्या आधी लागलेलं ‘ट्रीक’(फसवे) हे विशेषण आमच्या मनातून निसटलं असावं बहुदा. हेलब्रुन पॅलेस आणि हे फव्वारे बांधण्याची कल्पना ज्या राजाच्या डोक्यातून निघाली त्याचं नाव प्रिन्स आर्च बिशप मार्कुस सिट्टीकस (१५७४- १६१९). या महालात आपल्याला पाण्याच्या शक्तीवर चालणारं यांत्रिक थेटर पाहायला मिळतं. सोबत असलेला गाईड आम्हाला त्या यंत्रांची इत्यंभूत माहिती पुरवत होता. पंधराव्या शतकात विकसित केलेल्या त्या जलशक्तीचा महिमा पाहून अचंबित झालेले आम्ही गाईडशी बोलत बोलत महालाच्या बाहेर आलो आणि भिंतीवरील हरणाच्या मुखवट्याच्या नाकातोंडातून एक जोरदार फव्वारा अचूक आमच्या अंगावर आला. आत्ता कुठे ट्रीक शब्दाचा अर्थ आमच्या ध्यानी आला. आ-उ चे चित्कार खळाळणाऱ्या हास्यात मिसळून जात होते. पुढे तर एका दरवाजातून बाहेर पडताना आमच्या डोक्यावर या फवाऱ्यांची कमान उभी राहिली आणि एखाद्या मान्यवरासारखे आम्ही त्यामधून चालत बाहेर पडलो. हे सगळं मार्कुसच्या काळापासून चालत आलंय. तो आपल्या पाहुण्यांना चहापाण्याला किल्ल्यामधील बागेत नेत असे. त्यासाठी त्यानं एक दगडी आयताकृती टेबल आणि भोवताली बसण्यासाठी जमिनीतच दगडी स्टुलं जडवली आहेत. पाहुणे त्यावर बसले की थोड्या वेळानंतर तो अवखळ फव्वारा स्टुलाच्या मध्यभागी असलेल्या छिद्रातून उडत असे. बेसावध पाहुण्यांचं हे असं स्वागत! तसा मार्कुस हा कडक राज्यकर्ता आणि पक्का चर्चमन; परंतु त्याच्या आत कुठेतरी एखादं खोडसाळ बाळ लपलेलं असावं. त्या बालकाच्या खोड्या म्हणजे हे ट्रीक फाऊंटन!
अचानक कुठूनतरी चाल करणारे फव्वारे हे इथलं सर्वात मोठं आकर्षण! एका तासाच्या या टूरमध्ये शेवटी शेवटी आम्ही खूप सावध झालो होतो. गुदगुल्यांचा खेळ खेळणारं बालक असतं पाहा, हसून हसून त्याला उचकी लागलेली असते. ‘आला रे, आला रे..’ करणारे आईचे हात आता डाव्या काखेत किंवा कमरेपाशी येणार असं त्याच्या बालमनाला वाटत असतानाच आई त्याला हुलकावणी देऊन गळ्यापाशीच गुदगुल्या करते आणि मग ते पुन्हा खदखदून हसू लागतं. आमचंही तसंच होत होतं. गाईड देत असलेली माहिती ऐकण्यासाठी अंदाज घेत, जमिनीवर पडलेलं पाणी पाहत, आम्ही आमच्या परीनं सुरक्षित कोरड्या जागेवर उभं राहायचो. भिंतीवरील मुखवटे न्याहाळायचो. पण प्रत्येक वेळी हा फव्वारा आपल्याला चकमा देतो. अनपेक्षित जागेवरूनच वार करतो पठ्ठा! ‘द राईज अँड फॉल ऑफ द क्राऊन’ हा कारंज्याच्या पाण्याच्या धारेवर तोलला जाणारा मुकुट हे तिथलं शेवटचं प्रात्यक्षिक पाहण्यात क्षणभर गुंगून गेलेल्या मला इथे फवाऱ्यानं चारी मुंड्या चीत केलं. इतर ठिकाणी तुषारांनी थोडीशी ओली झालेली मी इथे नखशिखांत भिजले.
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com