श्रावण - हरवलेल्या संस्कृतीची पाऊलवाट  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

श्रावण - हरवलेल्या संस्कृतीची पाऊलवाट

शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी, सवलती इत्यादींविषयीच्या असूयाजनित जाणिवा, शेरेबाजी शेतकऱ्यांच्या संघटित आंदोलनांच्या वेळी किंवा सरकारच्या कृषिविषयक उदार धोरणांच्या घोषणेनंतर कानावर पडते. कृषिसंस्कृति विषयक जाणिवांची अवहेलना कृषिप्रधान व्रतवैकल्यं आणि सण उत्साहाने साजरे करणारी जनता करते यात एक वेगळा विरोधाभास निर्माण झालेला दिसतो.

नवशक्ती Web Desk

विशेष

हेमंत राजोपाध्ये

चंद्रसूर्याच्या गतीवर चालणाऱ्या कालगणनेच्या पद्धती, भारतीय महिने यांची स्मृति (ज्यांना त्याचं औचित्य माहिती आहे अशांनाच तेही बहुधा) केवळ उत्सवांच्या निमित्ताने लक्षात राहाते. ग्रामीण शेतकरी अजूनही नक्षत्रे इत्यादि पाहून कृषिनियोजन करत असले तरी शेती करणे विविध कारणांनी कठीण होत असल्याने शेती रिअल इस्टेट व्यावसायिकांना विकण्यासाठीच उरते की काय अशीही रास्त भीती जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी, सवलती इत्यादींविषयीच्या असूयाजनित जाणिवा, शेरेबाजी शेतकऱ्यांच्या संघटित आंदोलनांच्या वेळी किंवा सरकारच्या कृषिविषयक उदार धोरणांच्या घोषणेनंतर कानावर पडते. कृषिसंस्कृति विषयक जाणिवांची अवहेलना कृषिप्रधान व्रतवैकल्यं आणि सण उत्साहाने साजरे करणारी जनता करते यात एक वेगळा विरोधाभास निर्माण झालेला दिसतो.

'काळ’, ‘समय’ ही भारतीय तत्त्वज्ञानातच नव्हे, तर जगातील सर्वच संस्कृती आणि लोकव्यवहारांमध्ये महत्त्वाची मानली गेलेली संकल्पना आहे. प्राचीन मानवाने आपापल्या भौगोलिक भागातील पर्यावरणीय परिस्थितीनुसार निसर्गात होणारे बदल, या बदलाच्या अभिव्यक्तीचे विविध रंग, रूपे आणि त्यांचे मानवी जीवनानुकूलत्व लक्षात घेतलं, त्यानुसार जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींना नियोजनबद्ध केलं. काळाची विभागणी केली. ऋतू, वर्ष, महिने, दिवस इत्यादी एकके लावून ही कालगणना जगभर आकाराला आली.

प्राचीन वैदिक साहित्यामध्ये ‘धर्म’ या संकल्पनेविषयी मांडणी करताना ‘ऋत’ या शब्दाचा उल्लेख वारंवार होतो. ‘ऋत’ हा शब्द ‘ऋ’ ह्या गतिवाचक धातूपासून बनला आहे. सृष्टिनियमांचे, वैश्विक व्यवस्थेचे संचालन व संतुलन आणि सत्यनिष्ठ नैतिक मार्गाचे नियमन करणारे तत्त्व ‘ऋत’ ह्या नावाने वेदात प्रतिपादित केले गेले आहे. सूर्य-चंद्राची गती, वायु, जल, आकाश, प्रकाश आणि अन्य नैसर्गिक व्यवस्थांची नियमितता व गतिशीलता यांवर मानवी आणि अन्य सजीव सृष्टीचे संचालन होत असते. या नियमन तत्त्वाला वैदिक ऋषींनी ‘ऋत’ असे संबोधले. ‘ऋतुचक्र’ हा याच प्रक्रियेचा एक मनोहर घटक. त्यामुळेच की काय नैसर्गिक तत्त्वांवर आधारलेल्या वैदिक आणि पुढच्या काळातील व्यापक अधिक गुंतागुंतीच्या स्वरूपात परिणत झालेल्या हिंदू धर्मातील सणउत्सव हे या ऋतुचक्रावर बेतले गेल्याचे दिसून येते.

‘ऋतू’ या पर्यावरणीय-भौगोलिक तत्त्वाचा या परिसरातील जीवनावर होणारा थेट परिणाम भारतीय किंवा दक्षिण आशियाई मनामध्ये हजारो वर्षांपासून रुजलेला आहे. म्हणूनच या शब्दाचं आकर्षणही विशेष आहे. हे आकर्षण ऐतिहासिक किंवा इतिहासपूर्व काळापासून या समाजात दृढमूल असल्याचे शेकडो पुरावे सिंधुसंस्कृतीतील पुरातत्त्वीय अवशेषांपासून ते प्राचीन वैदिक, बौद्ध, जैन साहित्य, संस्कृत-प्राकृत आणि द्राविड भाषांतील साहित्य, मध्ययुगीन भारतीय व पर्शियन दरबारी कवी, लोकजीवनात रुजलेली लोकप्रिय गीते आणि आधुनिक काळातील भारतीय चित्रपट-जाहिरातींपर्यंत उपलब्ध आहेत.

मोसमी पाऊस हे दक्षिण आशियाचे वैशिष्ट्य. चार महिन्यातल्या पावसावर संबंध वर्ष काढणाऱ्या महाकाय लोकसंख्येला वाटणारे पावसाचे आकर्षण धार्मिक, सांस्कृतिक जाणिवांशी एकरूप होऊन त्या पावसाला देवतेचे स्थान/महत्त्व आलं. वेदांपासून विचार केला तर त्या जाणिवांनुसार आकाशरूपी पिता आपलं ओज पृथ्वी मातेच्या गर्भात पेरतो, श्रावणमासी ही धरती आणि अवघी सृष्टी या गर्भतेजाने लाजूमुरडू लागते, पांढुरक्या झालेल्या मातीमध्ये काळीशार सर्जनशीलता दाटून हिरवेगार सुफलन करण्यासाठी एखाद्या बाळंतीण बाईसारखी अवघी सृष्टी नाजूक-हलके लाजरेपण घेऊन वावरू लागली की श्रावण आल्याची खूण पटते.

वसंत ऋतूप्रमाणेच कवींच्या लेखनात श्रावणालाही स्वतंत्र ऋतूसारखा दर्जा मिळतो आणि त्याची कल्पना वसंत ऋतूप्रमाणेच ‘ऋतुराज’ अशी केली जाते. ‘तांबूस, कोमल पावले’ टाकत येणारा ‘हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण’ इथल्या माणसांच्या मनाला आकर्षित करत आला आहे. मानवी जीवनातील सर्व रस हे भवतालच्या वातावरणाच्या स्थितीत एकरूप होऊन जातात. आषाढमहिन्याच्या आरंभीची प्रेयसीच्या विरहाने व्याकूळ झालेल्या कालिदासाच्या मनातील हुरहूर घेऊन जसे ‘गडद निळे मेघ’ भरून येतात तसा श्रावणात घननीळा बरसतो. जन्माष्टमीच्या उत्साहाप्रमाणेच सौंदर्यासक्त, संवेदनशील रसिक मने या महिन्यात उल्हसित होतात.

बहुतकरून सौर आणि चांद्र अशा दोन्ही गतींवर बेतलेल्या भारतीय कालगणनेनुसार चंद्र हा ‘श्रवण’ नक्षत्राच्या जवळ येत असल्याने या महिन्याला ‘श्रावण’ असे नाव मिळाले अशी सर्वसाधारण मान्यता आहे. प्राचीन भारतीय शिक्षणपद्धतीनुसार साधारणतः आषाढ पौर्णिमेला (गुरुपौर्णिमा) चातुर्मासाच आरंभ होऊन संन्यासी, भिक्षू, ब्रह्मचारी मंडळी आपला संचार थांबवून एका विशिष्ट जागी अडीच किंवा चार महिने निवास करत. बौद्ध धर्मात, पाली भाषेत याला वस्सावास (संस्कृत: वर्षावास) म्हणत. जैन धर्मातील साधू संत देखील याकाळात चातुर्मास पालन करतात. अशा जमलेल्या मेळाव्यात किंवा गुरुगृहात पावसाळी आहारविषयक, विहारविषयक नियमांसोबतच अध्ययन, चिंतन, मनन आणि प्रवचनाचे कार्यक्रम होत. मौखिक पद्धतीत गुरुमुखातून आलेलं ज्ञान कानावर पडले की त्याची संथा घेत ग्रंथांचे पाठांतर, पुढे अर्थआकलन आणि निर्णयनाच्या चर्चा झडत साधू, भिक्खू, श्रमणादि मंडळी या उपदेशाचे श्रवण करत, ते कंठस्थ करण्याची प्रक्रिया पसुरू होई. म्हणूनच या महिन्याच्या श्रावण या नावामागे हादेखील तर्क असण्याची शक्यता आहे.

आज मात्र श्रावण महिन्याची ओळख मुख्यत: व्रतवैकल्ये आणि धार्मिक विधिनिषेध पाळण्याचा महिना इतकीच उरली आहे. आषाढामधील पेरणी, अन्य कृषिकार्ये किंवा शेतीशी संबंधित तत्त्वे पूर्णतः विस्मरणात गेली आहेत. गुरुपौर्णिमा ही विद्यारंभाची तिथी ही कल्पना मागे पडून शाळेतल्या शिक्षकांना गिफ्ट देणे आणि आपापल्या आध्यात्मिक गुरूच्या मंदिरात एका दिवसाची गर्दी करण्यापुरती कॉस्मेटिक स्वरूपात शिल्लक आहे, तसेच काहीसे श्रावण महिन्याचे आणि आणि अन्य व्रतवैकल्यांचेही झाले आहे. शेतकऱ्यांचा मित्र मानला गेलेल्या नाग किंवा सर्पकुलाविषयीची कृतज्ञता नागटोपलीत ठेवून फ्लॅटोफ्लॅटी जाणाऱ्या गारुड्यांपुरती किंवा विवक्षित शहरांत सर्पकुलीन सजीवांना पकडून एका दिवसाची झगमग साजरी करण्यापुरती उरली आहे. राखीपौर्णिमा हा बिगरमराठी सण मराठी आणि संबंधित भारतीय भावविश्वाचा भाग झाला आहे. त्यामागे अवाढव्य अर्थव्यवहारांची समीकरणे उभी आहेत. या बदलत्या सांस्कृतिक व्यवहारात नारळी पौर्णिमेचा या मातीतील उत्सव मात्र विस्मरणात गेल्यासारखा वाटतो. शेतात कष्टणाऱ्या बैल आणि शेतकऱ्यांना सशक्त आहार म्हणून केली जाणारी पुरणपोळी आणि कृषिसंस्कृतीतील देवतांच्या आरतीसाठी बनवले जाणारे पुरण यांचे मुख्य प्रयोजन असलेली श्रमिक संस्कृती जवळपास संपली किंवा तिचे स्वरूप बदलले असल्याने पुरण सहज पचवू शकत असलेली उदरेही कमी झाली. जरा-जीवंतिका यांसारख्या बालग्रहरूप देवतांची संततीविषयक भीती आधुनिक काळात कमी झाल्याने या पूजा मागे पडल्या. माहेरवाशिणी, त्यांचे खेळ वगैरे प्रथा झपाट्याने संपू लागल्या आहेत. ही सर्व यादी स्मरण रंजनात्मक हळहळीतून दिलेली नसून आदिम काळापासून चालत आलेल्या कृषिप्रधान संस्कृतीच्या ऱ्हासाची आणि संबंधित जाणिवांच्या अस्ताच्या नोंदीसाठीचे पुरावे किंवा आठवण म्हणून दिली आहे.

चंद्रसूर्याच्या गतीवर चालणाऱ्या कालगणनेच्या पद्धती, भारतीय महिने यांची स्मृति (ज्यांना त्याचं औचित्य माहिती आहे अशांनाच तेही बहुधा) केवळ उत्सवांच्या निमित्ताने लक्षात राहाते. ग्रामीण शेतकरी अजूनही नक्षत्रे इत्यादि पाहून कृषिनियोजन करत असले तरी शेती करणे विविध कारणांनी कठीण होत असल्याने शेती रिअल इस्टेट व्यावसायिकांना विकण्यासाठीच उरते की काय अशीही रास्त भीती जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी, सवलती इत्यादींविषयीच्या असूयाजनित जाणिवा, शेरेबाजी शेतकऱ्यांच्या संघटित आंदोलनांच्या वेळी किंवा सरकारच्या कृषिविषयक उदार धोरणांच्या घोषणेनंतर कानावर पडते. कृषिसंस्कृति विषयक जाणिवांची अवहेलना कृषिप्रधान व्रतवैकल्यं आणि सण उत्साहाने साजरे करणारी जनता करते यात एक वेगळा विरोधाभास निर्माण झालेला दिसतो.

भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक ही चारही घटक वैयक्तिक आणि सार्वजनिक मानसिक, आर्थिक आणि राजकीय जाणिवांवर थेट परिणाम करत असतात, किंबहुना हे सारे घटक एकमेकांवर परस्पर परिणाम करत असतात. मात्र हे घटक एकमेकांवर कसे परिणाम करतात याविषयी म्हणावी अशी सजगता आपल्या समाजात नाही. ही सजगता विशिष्ट रोमॅंटिक भावमधुरता, कोरडी कर्मकांडे, त्यातून निर्माण झालेल्या श्रद्धा आणि धर्मव्यवहारांच्या पावित्र्याला दिलेली ओंगळ सार्वजनिक-राजकीय बजबजपुरी यांत झाकोळून किंवा जवळपास हरवून गेली आहे.

या सर्व गोष्टींचा विचार केला की मन उद्विग्न होतं. अशावेळी पागोळ्यांवरुनी थेंब थेंब हे पडती धरणीवरती, अशी निसर्गाची ही सुंदर रूपे साजरी होतसे वरती असे लिहून ठेवणारे श्रावणमासी मानसी हर्ष दाटणारे बालकवी आठवतात. त्याच्या रसाळ, आनंदवर्षेने ओथंबलेल्या मनःचक्षूसमोर खेळणारा निसर्ग आठवतो. क्षणात शिरशिर करून जाणाऱ्या सरीला बाजूला सारून त्वचेला मोहरवून टाकणारा ऊनपावसाचा खेळ आजही गावाशहरांत जाणवला की आपल्या मनातील आदिम निसर्गप्रेम दाटतं. शहराबाहेर पडलं की कधीतरी आकाशात बालकवींनीच शब्दचित्रित केलेल्या ‘कल्पसुमांच्या माळेसारख्या बलाकमाला’ दिसतात. ते पाहून मनात दडलेला, झाकोळ आलेला उपजत प्राकृतिक आनंद, उत्साह ओसंडून वाहू लागतो. हा आनंद मनाला उभारी तर देतोच, पण उरलेल्या संबंध वर्षात आवश्यक असलेल्या अन्नपाण्यासारख्या गोष्टींप्रमाणेच नवी उमेद देऊन जातो. दैनंदिन त्रिविध तापांनी पोळलेल्या मनांवर श्रावणसरींचा हा असा शिडकावा पडतो. अल्पसंतुष्ट राहायचे व्रत घेतलेल्या या भारतीय मनांमध्ये “या महिन्या-दीड महिन्यातील शिडकाव्यांच्या उत्साहावरच आपल्याला संपूर्ण वर्ष काढायचे आहे,” ही खोलवर रुजलेली जाणीव मूळ धरू लागते. अर्थात, क्षणिक उत्सवांच्या या शिडकाव्याने खोलवरच्या प्रश्नांवरची तहान मात्र भागत नाही; उलट त्यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टीच कधीकधी बोथट होते. त्यामुळे श्रावण दरवर्षी येतो आणि आपल्या करुणामृताने आपल्याला सुखावून जातो.

लेखक संस्कृत, भारतीय धर्म आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत.

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

JNPT येथून पहिली 'डबल-स्टॅक लाँग-हॉल' कंटेनर ट्रेन धावली; ३६० टीईयू माल घेऊन ४२२ किमीचा प्रवास वेळ वाचणार; पोर्टवरील गर्दी कमी होणार

Mumbai : महापौर बंगल्यात काय बदल केला? ठाकरे सेना, काँग्रेस करणार पाहणी

आता कांदाही रडवणार; कांदा दरातील तेजी दोन महिने कायम राहण्याचा अंदाज

Mumbai : महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांची केशव सृष्टीतील शैक्षणिक सहल वादात