सापही अंधश्रद्धेच्या विळख्यात 
अक्षररंग

सापही अंधश्रद्धेच्या विळख्यात

काहींनी त्यांना दानव ठरवून त्यांचे 'नागबळी' घेतले आहेत, तर काहींनी सापांना कर्मकांड व अंधश्रद्धेच्या स्वार्थी विळख्यात अडकवून त्यांचा अक्षरशः बाजार मांडला आहे. म्हणूनच 'साप साप म्हणून भुई थोपटण्याचे' अथवा 'पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचे' सोडून सापांच्या प्रजातींकडेही विज्ञान, पर्यावरण व मानवतावादी दृष्टिकोनातून पाहण्याची नितांत गरज आहे.

नवशक्ती Web Desk

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आणि शेतकरी मित्र असलेल्या सापांच्या प्रजातीविषयी अलीकडे समज कमी आणि गैरसमजाचे 'फुत्कार'च अधिक टाकले जात आहेत. काहींनी त्यांची 'नागपंचमी' करून त्यांना देवत्व बहाल केले आहे. काहींनी त्यांना दानव ठरवून त्यांचे 'नागबळी' घेतले आहेत, तर काहींनी सापांना कर्मकांड व अंधश्रद्धेच्या स्वार्थी विळख्यात अडकवून त्यांचा अक्षरशः बाजार मांडला आहे. म्हणूनच 'साप साप म्हणून भुई थोपटण्याचे' अथवा 'पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचे' सोडून सापांच्या प्रजातींकडेही विज्ञान, पर्यावरण व मानवतावादी दृष्टिकोनातून पाहण्याची नितांत गरज आहे.

सापांच्या अद्भुत विश्वाविषयी रायगड जिल्ह्याचे मानद वन्य जीवरक्षक व अलिबागचे वन्यप्राणी अभ्यासक डॉ. प्रसाद दाभोळकर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी 'अलिबाबाच्या गुहे' प्रमाणे सापांच्या आगळ्यावेगळ्या दुनियेची अनोखी सैरच घडवून आणली. त्यांच्याशी झालेल्या संवादातून सापांविषयीचे गैरसमज तर दूर झालेच, शिवाय सापांच्या प्रजातींविषयीची चिंता व भीतीही दूर पळून गेली. तसेच, या संवादातून साप हे निसर्गाचे सच्चे सोबती व शेतकऱ्यांचे मित्र असल्याची भावना अधिक दृढ झाली.

निसर्गात सापांचे कार्य समजून घेणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात सापांच्या ३५० ते ४०० प्रजाती आढळतात. संपूर्ण कोकणपट्ट्यात साधारण ५० च्या आसपास, तर एकट्या रायगड जिल्ह्यात ४५ प्रजातींची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे बहुतांश साप हे बिनविषारी किंवा निमविषारी असतात. आपल्याकडे माणसाला घातक ठरू शकतील अशा विषारी सापांच्या प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार आणि फुरस या चारच प्रमुख प्रजाती असल्याची माहिती त्यांनी दिली.

सापांचे आयुष्यमान आणि त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये अत्यंत रंजक असल्याचे सांगून ते म्हणाले, 'सर्वसाधारण साप १० ते १५ वर्षे जगतात, तर राजनाग व अजगरासारखे मोठे साप २० ते ३० वर्षांपर्यंत जगू शकतात. हरणटोळ आणि राजनाग सोडल्यास इतर बहुतांश सापांची दृष्टी अधू असते. सापांना हात, पाय, नाक किंवा कान नसतात; ते जमिनीवरून येणारी कंपने त्यांच्या जबड्याच्या हाडाद्वारे अनुभवतात. हवेतील गंधाचे। कण गोळा करण्यासाठी ते वारंवार जीभ बाहेर काढतात आणि तोंडाच्या वरील 'जॅकोब्सन्स ऑर्गन' या अवयवाद्वारे त्या गंधाचे अवलोकन करतात. सापांना मानवी डोळ्यांसारख्या पापण्या नसल्यामुळे ते कधीही डोळे मिटू शकत नाहीत, झोपतानाही त्यांचे डोळे उघडेच असतात.

डोळ्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्यावर पारदर्शक पडदा असतो. साप अन्न चावून खात नाहीत, तर शिकार थेट अख्खी गिळतात. त्यांची पचनक्रिया अत्यंत मंद असल्याने एकदा मोठी शिकार केल्यानंतर ते कित्येक आठवडे किंवा महिने काहीही न खाता जिवंत राहू शकतात.

समुद्रामध्ये आढळणाऱ्या सापांच्या प्रजातींमध्ये काही विशेष भिन्नता दिसून येते, त्यांची शेपटी वल्ह्यासारखी चपटी असून त्याचा उपयोग पोहण्यासाठी होतो. पोवळा या विषारी सापाच्या शरीराखालील व शेपटीकडचे खवले नारंगी असतात आणि तो शत्रूला घाबरवण्यासाठी शेपटी गोल फिरवतो, मात्र त्याचा मानवाला धोका नसतो. हरणटोळ किंवा खाडीतील काही निमविषारी सापांचे विष केवळ पाली, सरडे, बेडूक किंवा खेकडे यांना सुस्त करण्यासाठी वापरले जाते, ते मानवी शरीराला अपाय करत नाही. याउलट समुद्रात आणि किनारपट्टीवर आढळणारे सर्वच समुद्री साप विषारी असतात. कोकणात हुक नोस्ड सी स्नेक हा सहज आढळणारा समुद्री साप आहे, ज्याच्या तोंडावर आकड्यासारखा खवला असतो. याशिवाय यलो बेलीड, मेनी टूथ आणि शॉज सी स्नेक अशा समुद्री सापांच्या प्रजातीही दिसून येतात.

पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि शेतीचे रक्षण करण्यात सापांचे अमूल्य योगदान आहे. उंदरांसारख्या प्राण्यांना भक्ष्य करून ते शेतातील अन्नधान्याची नासाडी रोखतात आणि प्लेग तसेच लेप्टोस्पायरोसिससारख्या भयंकर रोगांचा प्रसार थांबवण्यास मदत करतात, अन्नसाखळीत ते लहान प्राण्यांची संख्या मर्यादित ठेवतात आणि स्वतः सर्पगरुड, मुंगूस, धनेश व बगळे यांसारख्या पक्षी-प्राण्यांचे खाद्य बनतात. त्यामुळे सापांची संख्या घटल्यास निसर्गाची संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण होतो.

साप मानवी वस्तीत येण्याची कारणे दोन. एक म्हणजे भक्ष्य शोधणे आणि दुसरे निवारा शोधणे, घराच्या आसपास ओला कचरा किंवा टाकाऊ अन्न टाकल्यास त्यावर कीटक येतात. हे कीटक खायला पाली व बेडूक येतात आणि धान्याच्या वासाने उंदीर येतात, जे सापांचे नैसर्गिक खाद्य आहे. तसेच पावसाळ्यात व थंडीत उबदार जागा मिळवण्यासाठी आणि उन्हाळ्यात थंडाव्यासाठी साप अडगळ, लाकडांचे सरपण किंवा कुंड्यांच्या मागे आसरा घेतात. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हा घराभोवती सापांचा वावर टाळण्याचा योग्य उपाय आहे. शेतात जाताना काठीने गवत चाचपणे, पावसाळ्यात शूज घालण्यापूर्वी तपासणे आणि रात्री टॉर्चचा वापर करणे या साध्या सवयींमुळे सर्पदंश सहज टाळता येऊ शकतो. बंदिस्त जागांमध्ये रात्री जमिनीवर झोपण्याऐवजी पलंगाचा वा खाटांचा वापर करणे आणि मच्छरदाणी लावणे यानेही अपघात टळू शकतात. दुर्दैवाने सर्पदंश झाल्यास पीडिताला धीर देऊन शांत ठेवणे, जखम पाण्याने धुणे आणि तत्काळ रुग्णालयात नेऊन 'अँटी-स्नेक व्हेनम' लस देणे हाच त्याचा जीव वाचवण्याचा एकमेव प्रभावी उपाय आहे.

गेल्याच आठवड्यात विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यासारख्या घनदाट जंगल असलेल्या भागातील एका शासकीय आश्रमशाळेत तीन निष्पाप विद्यार्थिनींचा सर्पदंश होऊन मृत्यू ओढवल्याची घटना उघडकीस आली आहे. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपायला सांगण्याऐवजी त्यांच्यासाठी पलंग किंवा खाटा उपलब्ध करून दिल्या असत्या आणि त्या ठिकाणी मच्छरदाण्या लावल्या असत्या तर ही दुर्घटना टाळता येणे शक्य होते. तथापि, या आश्रमशाळेसाठी खाटा उपलब्ध करण्याचा निर्णय होऊनही तो प्रत्यक्षात आला नसेल, तर त्यास सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणाच कारणीभूत ठरतो; परंतु या साऱ्यात त्यात साप नाहक बदनाम झाले आहेत.

नागपंचमीच्या दिवशी नाग या अनुसूची-१ मधील अत्यंत संरक्षित प्राण्याला पकडून त्याचे पूजन करणे किंवा प्रदर्शन मांडणे ही प्रथा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. बत्तीस शिराळासारख्या ठिकाणी आजही संशोधनाच्या नावाखाली किंवा कायद्यातील पळवाटा शोधून सापांना पकडले जाते आणि त्यांचे प्रदर्शन घडवले जाते, जे प्राणी संरक्षणाच्या दृष्टीने चुकीचे आहे. याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ले होण्याचे प्रकारही तितकेच निषेधार्ह आहेत.

नागपंचमीच्या नावाखाली चालणारे कर्मकांड आणि सापांचा छळ ही एक मोठी सामाजिक व पर्यावरणीय समस्या आहे. नाग हा अनुसूची-१ मधील अत्यंत संरक्षित प्राणी असून त्याला पकडणे, त्याचे प्रदर्शन मांडणे किंवा छळ करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. नागपंचमीच्या आधी गारुडी सापांना पकडतात, त्यांचे दात उपटतात किंवा तोंड शिवून त्यांना उपाशी ठेवतात. साप पूर्णपणे मांसाहारी प्राणी असल्याने त्याच्या शरीरात दुधाचे पचन होत नाही. अतिशय भुकेलेला साप नाइलाजाने दूध पितो, पण ते दूध त्याच्या फुफ्फुसात जाऊन संसर्ग होतो आणि सापाचा तडफडून मृत्यू होतो. नागपंचमीचा खरा अर्थ नागांना दूध पाजून मारणे नसून निसर्गातील या घटकाचे कार्य समजून घेऊन त्यांना मोकळेपणाने जगू देणे हा आहे. अंधश्रद्धा सोडून शास्त्रीय, वन्यप्रेमी आणि पर्यावरणस्नेही दृष्टिकोन स्वीकारल्यास मानव आणि निसर्गाचे सहजीवन अधिक समृद्ध होऊ शकेल.

prakashrsawant@gmail.com

RRB Recruitment 2026 : रेल्वेत ३,९९३ पदांसाठी मेगाभरती; अर्ज प्रक्रिया सुरू, पात्रता काय? जाणून घ्या

शाहरुख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला FDA चा दणका; 'विमल इलायची' जाहिरातीप्रकरणी नोटीस

LPG eKYC Last Date : अजून ई-केवायसी केली नाही? आजच करा, नाहीतर सिलिंडर मिळण्यात येणार अडचण

Nalasopara : वाढदिवसाच्या केकमध्ये मृत पाल? चिमुकल्यांसह ११ जण रुग्णालयात, परिसरात खळबळ

एसी लोकल दुरुस्ती केंद्रासाठी ३७१ कोटींचा निधी; वाणगाव येथे देखभाल केंद्राची उभारणी