दुसरी बाजू
प्रकाश सावंत
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉंगिंग : द जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रातील प्रेमाचा अर्थ दोन व्यक्तींमधील भावनिक नात्यापुरता मर्यादित राहत नाही. तो प्रेयसी-पत्नीच्या सहजीवनात, सुनेच्या कौटुंबिक नात्यात, आईच्या ममतेत, तसेच सार्वजनिक जीवनातील कर्तव्य आणि जबाबदारीच्या विविध स्वरूपांतून व्यक्त होत राहतो. या भूमिका स्वतंत्र असल्या, तरी त्यांना जोडणारा समान धागा म्हणजे आपुलकी. जीवनात विश्वास, समर्पण आणि त्याग यांचा आधार असेल, तर नाती काळाच्या कसोटीवर टिकतात, हाच या आत्मचरित्राचा मतितार्थ आहे.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे ‘बिलॉंगिंग : द जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले असले तरी त्यावरून देशात वादाचे नवेच वादळ उठले आहे. त्यामुळे या आत्मचरित्राने आठवडाभरातच जवळपास दोन लाख प्रतींच्या विक्रीचा टप्पा गाठला आहे. ५०१ पानांचे हे आत्मचरित्र सात भागांत विभागले असून इटलीत जन्मूनही भारताला आपली कर्मभूमी मानणाऱ्या सोनिया गांधी यांची ही जीवनकहाणी हृदयस्पर्शी झाली आहे. हे आत्मकथन कधी उत्कंठा वाढवते, कधी मनाचा थरकाप उडवते, तर कधी काळीज पिळवटून टाकते. राजबिंडे व्यक्तिमत्त्व असलेल्या राजीव गांधी यांच्या पहिल्या भेटीचा रोमांचकारी अनुभव, इंदिरा गांधी यांच्या पहिल्या भेटीत झालेली ‘माणुसकीची भेट’ या अक्षरचित्रांतून अक्षरश: जिवंत झाली आहे. तसेच, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतरचा शोकाकुल प्रसंग, या धक्क्यातून गांधी कुटुंब कसे सावरते, या जीवनप्रवासातून बरेच काही शिकण्यासारखेही आहे.
‘एकत्र चालूया, एकत्र बोलूया, मनांचे सूर एकरूप होऊ देत. ध्येय एक असू दे, हृदयांत सामंजस्य नांदू दे, विचार एकत्र येऊ देत; जेणेकरून आपण एकात्मतेने आणि परिपूर्णतेने सहजीवन जगू’ हे ऋग्वेदातील सुक्त म्हणजे एकता, सहअस्तित्व, परस्पर आदर आणि सामूहिक प्रज्ञेचा नितांतसुंदर आविष्कार आहे. तोच या आत्मकथनातून व्यक्त झाला आहे. या आत्मकथनात प्रेम हे केवळ दोन व्यक्तींमधील आकर्षण किंवा भावनिक बंध राहिलेले नाही. त्याला कुटुंब, संस्कृती, समाज आणि देश यांची व्यापक परिमाणे प्राप्त झाली आहेत. ‘बिलॉंगिंग’ या शीर्षकाचा भावार्थही त्यातून हळुवारपणे उलगडत जातो. आपलेपण जन्मानेच मिळते असे नाही; ते अनुभवातून, नात्यांतून, स्वीकारातून आणि समर्पणातूनही निर्माण होऊ शकते. एखाद्या भूमीशी जोडले जाणे म्हणजे केवळ तेथे राहणे नव्हे, तर त्या भूमीच्या सुख-दुःखाशी स्वतःला जोडून घेणे, हेही या जीवनप्रवासातून अधोरेखित होते. सोनिया गांधी यांचा मातृभूमी ते कर्मभूमी हा प्रवास अथांग प्रेम, अविरत संघर्ष आणि सुख-दुःखाच्या पलीकडची विलक्षण अनूभूती आहे.
सोनिया या गांधी घराण्याचा अविभाज्य भाग होऊन गांधी घराणे म्हणूनच जगल्या. इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची राजकीय धडाडी, करारी नेतृत्वाचा दरारा आणि कुटुंबातील माया-ममता या दोन परस्परविरोधी भासणाऱ्या पैलूंचाही त्यांनी अनुभव घेतला. सार्वजनिक जीवनात पोलादी भासणाऱ्या व्यक्तींच्या खासगी आयुष्यातही भावनिक नात्यांची नाजूक वीण असते, याची जाणीव अशा अनुभवांतून होते.
गांधी कुटुंबाच्या जीवनप्रवासात दुःखाचे डोंगर उभे राहिले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्या या सोनिया गांधी यांच्या वैयक्तिक जीवनाला हादरवून टाकणाऱ्या घटना होत्या. कुटुंबातील दोन कार्यकर्तृत्ववान व्यक्तींचे अशा प्रकारे अकाली जाणे म्हणजे भावनिक जग उद्ध्वस्त होण्यासारखे होते. तथापि, अशा प्रसंगी स्वतःला सावरणे, पुढे जगण्याचा अर्थ शोधणे आणि जीवनातील उरलेल्या जबाबदाऱ्यांना सामोरे जाणे, हा प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनातील संघर्ष असतो. हाच संघर्ष या आत्मकथनाचा आत्मा बनला आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कुटुंबीयांनी इटलीला परतण्याचा आग्रह केला, तरी सोनिया गांधी यांनी भारत सोडला नाही. त्यांच्या या निर्णयाकडे राजकीय भूमिकेच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे. ज्या देशात प्रेम, कुटुंब, संघर्ष आणि दुःख यांचे अनुभव मिळाले, त्या देशाशी त्यांनी आपले नाते कायम ठेवले, ही या जीवनप्रवासाची भावनिक बाजू आहे.
वैयक्तिक जीवनातील आघातानंतर राजकारणापासून दूर राहिलेल्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसजनांच्या आग्रहाखातर पक्षाची जबाबदारी स्वीकारली. एका व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर राजकीय परिस्थितीने जबाबदारीचे ओझे टाकले, तेव्हा त्यांनी त्यापासून पळ काढला नाही. पंतप्रधानपदासह सर्वोच्च पदे स्वीकारण्याची चालून आली असतानाही त्यांनी ती आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांकडे सोपवली. हा निर्णय सत्ताकेंद्रित राजकारणाच्या नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळा होता. पक्षाध्यक्षपद सोडतानाही त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. आजारपण आणि वैयक्तिक अडचणींशी सामना करताना त्यांनी इच्छाशक्ती कायम ठेवली. राजकारणात पद मिळवणे हे कर्तृत्वाचे मोजमाप मानले जाते. मात्र, पद न स्वीकारणे किंवा पदाचा त्याग करणेही नेतृत्वाला वलयांकित करते.
सोनिया गांधी यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा वारंवार उपस्थित झाला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी विदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित केल्याने त्यांना वेदना झाल्या, त्या व्यथित झाल्या आणि रडल्या. सार्वजनिक जीवनात व्यक्तीला अनेकदा कठोर टीकेला सामोरे जावे लागते; परंतु टीकेच्या पलीकडे एक संवेदनशील मनही असते, याची जाणीव अशा प्रसंगातून होते. यातील महत्त्वाचा पैलू म्हणजे मनातील वेदना कधी द्वेषात रूपांतरित होऊ न देणे. पुढे त्याच व्यक्तींना राजकीय आघाडीत पुन्हा सामावून घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. या प्रसंगातून क्षमाशीलता, राजकीय समंजसपणा आणि मनाच्या मोठेपणाची ओळख पटते. मतभेद असणे स्वाभाविक आहे; परंतु मतभेदांना वैयक्तिक वैर किंवा सूडाचे स्वरूप न देणे ही जीवनसंस्कृती आहे. प्रेमात स्वार्थ आणि अहंकार वाढला, तर नाते कमकुवत होते; पण विश्वास, आपुलकी, त्याग आणि समर्पण यांचा आधार असेल, तरच ते नाते काळाच्या कसोटीवर टिकते.
प्रेमाचे मूल्य कठीण प्रसंगी घेतलेल्या निर्णयांतून सिद्ध होते. दुःख सहन करूनही नात्यांशी निष्ठा ठेवणे, टीकेनंतरही मनातील कटुता वाढू न देणे आणि स्वतःच्या वेदनांपलीकडे जाऊन जबाबदारी स्वीकारणे, या गोष्टी प्रेमाच्या व्यापक अर्थाला आकार देतात. सोनिया गांधी यांच्या जीवनप्रवासातील भावनिक धागे या अर्थाने वाचकाला केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देत नाहीत, तर प्रेम आणि त्याग या मूल्यांचा विचार करायला लावतात.
सोनिया गांधी यांचे राजकीय विचार, भूमिका आणि नेतृत्व यांच्याशी सहमत किंवा असहमत असण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. लोकशाहीमध्ये टीका आवश्यक आहे; तीच राजकीय विचारांना धार देते. मात्र, टीका आणि अवहेलना यांत फरक असतो. एखाद्या व्यक्तीच्या विचारांचा विरोध करताना तिच्या वैयक्तिक जीवनातील संघर्ष, भावनिक अनुभव आणि मानवी संवेदनशीलता यांना नाकारण्याची गरज नसते. व्यक्ती अथवा त्याच्या आत्मचरित्राकडे राजकीय चष्म्यातूनच पाहणे, त्याची खिल्ली उडवणे किंवा लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे अवमूल्यन करणे, यामुळे पुस्तकातील विचारांशी संवाद साधण्याची संधीच हरवते. स्वतंत्र विचारांचा आदर, मतभेदांची स्वीकारार्हता आणि व्यक्तीच्या अनुभवांचे वस्तुनिष्ठ आकलन ही प्रगल्भ समाजाची लक्षणे आहेत. राजकीय विरोध असू शकतो; परंतु मानवी अनुभवांविषयी संवेदनशीलता हरवली, तर राजकारण विचारांचे न राहता केवळ विद्वेषाच्या ध्रुवीकरणाचे माध्यम बनते.
आपण एखाद्या व्यक्तीला तिच्या राजकीय भूमिकेवरून नाकारतो की तिच्या जीवनातील अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न करतो, यावरच आपल्या समाजाची वैचारिक प्रगल्भता अवलंबून आहे. इतिहास केवळ सत्तेचा नसतो; तो माणसांच्या मनाचाही असतो. “प्रेमानेच मला वारंवार मार्ग दाखवला आहे; प्रेमानेच प्रत्येक वेळी माझी साथ दिली आहे,” हा विचार या आत्मकथनातील भावविश्वाचा केंद्रबिंदू ठरतो. प्रेमाचा विस्तार व्यक्तीपासून कुटुंबापर्यंत, कुटुंबापासून देशापर्यंत आणि देशापासून माणुसकीपर्यंत होत राहिला, तर आपुलकीचे हे संचितच जीवनाला खऱ्या अर्थाने समृद्ध करते, हेच या आत्मचरित्राचे सार आहे.
prakashrsawant@gmail.com