शेतकरी दिनविशेष
रानमाणूस प्रसाद गावडे
२३ डिसेंबर हा शेतकरी दिन केवळ शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचा नाही, तर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि निसर्गाशी जडलेल्या नात्याचा गौरव करण्याचा आहे. शाश्वत शेती, पर्यावरण आणि अन्नसुरक्षेसाठी शेतकऱ्यांचे योगदान अमूल्य आहे.
आज शेतकरी दिन साजरा करताना आपल्याला फक्त अन्ननिर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची संधी नाही, तर त्यांचा अनुभव, ज्ञान आणि निसर्गाशी केलेल्या समन्वयाचा गौरव करण्याचीही संधी आहे. शेती ही फक्त उत्पादनाची प्रक्रिया नसून, संस्कृती, आरोग्य आणि पर्यावरणाचा पाया आहे.
औद्योगिक शेतीने उत्पादन वाढवले, पण त्यासोबत जैवविविधता नष्ट झाली, पाणी आणि मातीचे संकट निर्माण झाले. त्याउलट, पारंपरिक शेतीत निसर्गाचा आदर राखला जातो. छोटा शेतकरी अनुभवावर आधारित पिकांची निवड करतो, पाणी आणि जमिनीची काळजी घेतो, आणि स्थानिक अन्न उत्पादन करतो, जे पोषणमूल्यांनी समृद्ध असते.
गावच्या लोकांवर जमिनी विकायची वेळ येऊ नये असं वाटत असेल, तर त्या जमिनीतून मिळणाऱ्या पिकाला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. शेती ही केवळ अन्ननिर्मितीची प्रक्रिया नाही, तर ती संस्कृती, पर्यावरण आणि समाजरचनेचा पाया आहे. आज शेतीसमोरील संकट समजून घ्यायचं असेल, तर 'पारंपरिक की आधुनिक?' या प्रश्नापेक्षा कोणती शेती माणूस आणि निसर्ग या दोघांनाही टिकवते? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो.
छोटा शेतकरी आजही जल, जंगल आणि जमीन वाचवत शेती करतो. तो मातीचा रंग, पावसाची वेळ, बियाण्याची ताकद आणि पाण्याचा प्रवाह यांचा अनुभवावरून अंदाज घेतो. मात्र आधुनिक व्यवस्थेत शेतीचं मूल्यांकन केवळ उत्पादनाच्या आकड्यांवर केलं जातं. लाखो टन धान्य तयार करणारी शेती यशस्वी मानली जाते, आणि कमी उत्पादन देणारी, पण पर्यावरणपूरक शेती दुय्यम ठरवली जाते. या मोजमापामुळे छोट्या शेतकऱ्याची शेती ही शेतीव्यवस्थेतून हळूहळू हद्दपार होत गेली.
औद्योगिक शेतीने अन्ननिर्मितीचा वेग वाढवला, पण त्याची किंमत निसर्गाने चुकवली. मोठ्या प्रमाणात एकाच पिकासाठी हजारो एकर जमीन सपाट केली गेली. जंगलं तोडली गेली, डोंगर फोडले गेले, नद्यांचं पाणी वळवून शेतीसाठी वापरलं गेलं. परिणामी पाणी धरून ठेवणारी नैसर्गिक यंत्रणा मोडली. भूजल पातळी घसरली, नद्या ऋतुनुसार कोरड्या पडू लागल्या आणि काही ठिकाणी पूर व दुष्काळ एकाच प्रदेशात आलटून पालटून दिसू लागले. रासायनिक खतं आणि कीटकनाशकांनी उत्पादन वाढवलं, पण माती निर्जीव झाली, अन्नाची पोषणमूल्यं कमी झाली आणि आरोग्याचे प्रश्न वाढले.
याच्या उलट, सह्याद्री आणि समुद्राच्या कोंदणात वसलेल्या कोकणात शेतीची एक वेगळी परंपरा विकसित झाली. इथे एकरानं शेतजमिनी नाहीत, कारण डोंगर सपाट करून किंवा जंगल तोडून शेती केली गेली नाही. डोंगरांच्या खाचरात झऱ्याचं पाणी गुरुत्वाकर्षणाच्या आधारे वापरलं गेलं. नद्यांच्या काठावर पावसाने वाहून आणलेल्या सुपीक गाळावर मळे तयार झाले. पाणथळ वायंगणात, खाडीकिनारी खाजणात आणि भरडावर जमिनीच्या भौगोलिक रचनेला धक्का न लावता शेती केली गेली. भात, नाचणी, भुईमूग, पावटा, कुळीथ अशी विविध पीकपद्धती विकसित झाली.
या शेतीत उत्पादन कमी होतं, पण अन्न स्थानिक, ऋतुनिष्ठ, जैवविविध आणि पोषणमूल्यांनी समृद्ध होतं. हेच अन्न खाऊन पिढ्यानपिढ्या लोक निरोगी राहिले. आज्जी–आजोबांनी नव्वदीपर्यंत श्रमाचं आणि समाधानाचं आयुष्य जगलं. ही शेती निसर्गाशी संघर्ष करणारी नव्हती, तर निसर्गाशी संवाद साधणारी होती.
औद्योगिक शेतीने एकसुरी पीकपद्धती वाढवली. एका पिकावर अवलंबून राहिल्यामुळे जैवविविधता नष्ट झाली. स्थानिक बियाणं बाजूला पडलं आणि शेतकरी बी, खत, औषध, पाणी यासाठी पूर्णपणे बाजारावर अवलंबून झाला. शेती हळूहळू स्वावलंबी न राहता खर्चिक आणि जोखमीची बनली. कर्ज, अस्थिर बाजारभाव आणि उत्पादन खर्च यामध्ये छोटा शेतकरी अडकत गेला.
मग शेती सक्षम होणार कशी? कारण पारंपरिक आणि आधुनिक यांच्यात संघर्ष नाही. पारंपरिक ज्ञानाला आधुनिक साधनांची योग्य साथ मिळाली, तरच शेती टिकू शकते. पारंपरिक शेती ही मागासलेली नसून अनुभवातून तयार झालेली शाश्वत प्रणाली आहे. तिला आज गरज आहे आधुनिक बाजार समजुतीची, मूल्यवर्धनाची, ब्रँडिंगची आणि थेट ग्राहक जोडणीची. छोट्या शेतकऱ्याच्या गावठी, निसर्गपूरक उत्पादनाला ओळख मिळाली, त्याला योग्य किंमत मिळाली आणि त्यामागची कथा लोकांपर्यंत पोहोचली, तर ही शेती सक्षम होऊ शकते.
कोकणात येणाऱ्या पर्यटकांना केवळ दृश्य पर्यटन नको, तर खाद्यसंस्कृतीतून स्थानिक अन्नाचा अनुभव द्यायला हवा. यामुळे शेतकरी, पर्यटन आणि पर्यावरण यांचं नातं मजबूत होऊ शकतं. गावठी बियाणं, माती आणि पाणी वाचवणारी शेती हीच भविष्यात अन्नसुरक्षेची खरी हमी ठरू शकते.
शेती म्हणजे केवळ उत्पादन नाही. ती संस्कृती आहे, आरोग्य आहे आणि जल–जंगल–जमीन यांचं संतुलन आहे. आज शेती मोजायची असेल, तर उत्पादनाच्या आकड्यांपेक्षा अन्नाची गुणवत्ता, शेतकऱ्याची प्रतिष्ठा आणि पर्यावरणाची सहनशक्ती या निकषांवर मोजावी लागेल. जिथे जंगल टिकतं, पाणी जपलं जातं आणि शेतकरी सन्मानाने जगतो, तिथेच खरी शेती सक्षम होते.
शाश्वत जीवनशैलीचे अभ्यासक