अक्षररंग

डोळस लेकरू रुजत जाणारं शिक्षण

शिक्षणाचं खरं यश गुणपत्रिकेत नाही, तर एखाद्या लेकराच्या विचारांत आणि कृतीत उमलतं. ईश्वरीसारखं डोळस लेकरू भेटलं, की शिक्षकाच्या सेवेचा खरा अर्थ शांतपणे समोर उभा राहतो.

नवशक्ती Web Desk

शिक्षणगुज

युवराज माने

शिक्षणाचं खरं यश गुणपत्रिकेत नाही, तर एखाद्या लेकराच्या विचारांत आणि कृतीत उमलतं. ईश्वरीसारखं डोळस लेकरू भेटलं, की शिक्षकाच्या सेवेचा खरा अर्थ शांतपणे समोर उभा राहतो.

कधी कधी शिक्षकाला स्वतःच्या शिकवण्याचं उत्तर परीक्षेत नाही, तर एखाद्या लेकराच्या छोट्याशा कृतीत शांतपणे मिळतं. असा एक क्षण ईश्वरीच्या रूपानं माझ्या आयुष्यात आला… आणि शिक्षणाचं खरं सार नव्यानं उमगलं. आनंद कधी टाळ्या वाजवून येत नाही. तो बहुतेक वेळा शांत क्षणात, साध्याशा कागदावर आणि बंद ओंजळीत अलगद विसावतो. शिक्षणाचं खरं यश गुणपत्रिकेत दिसत नाही; ते लेकरांच्या विचारांत, कृतीत आणि त्यांच्या डोळ्यांत उमलतं. लेकरं डोळस झाली, तर शिक्षणाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या असं समजावं. गुरुजी आणि विद्यार्थी- हे नातं केवळ अभ्यासाचं नसतं; ते विश्वासाचं असतं. इथे प्रश्न-उत्तरांपेक्षा मनाची देवाणघेवाण असते. दोन दशकांच्या सेवेत असंख्य चेहरे भेटले, अनेक हुशार विद्यार्थी आले; पण क्वचितच एखादं लेकरू गुरुजींच्या आयुष्यात ऊर्जा बनून येतं. ईश्वरी तशीच आहे. ती वर्गात आली की फक्त हजेरी लागत नाही, तर चैतन्य पसरतं. तिच्या उपस्थितीने गुरुजींनाही स्वतःकडे नव्यानं पाहावंसं वाटतं. आपण जे शिकवतोय ते समजतंय का यापेक्षा, ते मनात उतरून कृतीत येतंय का- हा प्रश्न तिच्यामुळे वारंवार मनात येतो. शाळेच्या प्रत्येक उपक्रमात ती केवळ सहभागी नसते, तर प्रेरणा बनते. नेतृत्व तिच्या आवाजात नसून वागण्यात दिसतं. ती पुढे जाते म्हणून नव्हे, तर इतरांना सोबत घेते म्हणून पुढारी ठरते. वर्गात सर्वात जास्त चमकणारे डोळे ईश्वरीचेच. ते चमकणं हुशारीचं नसून ‘गुरुजी आपल्याकडे पाहत आहेत’ या विश्वासाचं असतं. गुरुजी सांगतील ते काम ती करतेच; पण काम म्हणून नाही- मनापासून. काम पूर्ण झाल्यावर ती नजर विचारते- ‘बरोबर केलं ना?’ आणि गुरुजींची एक मान तिच्यासाठी सर्वात मोठं बक्षीस ठरते.

काल मात्र… ईश्वरीनेच गुरुजींना शिकवलं. एका साध्याशा कागदावर फेब्रुवारी महिन्याचं तिचं स्वतःचं नियोजन तिने माझ्या हातात दिलं. कागद साधा होता; पण विचार प्रगल्भ होते- ‘एक समस्या निर्माण झाली, तर त्यातून बाहेर पडणं म्हणजे आकाश निरभ्र करणं.’ सातवीतल्या लेकराच्या मनात असा विचार… हा प्रश्न नव्हता- तो अभिमान होता. कारण हा विचार तिच्या अनुभवातून आणि गुरुजींच्या बोलण्यातून मनात रुजलेला होता.

गुरुजींनी सांगितलेली कामे पूर्ण करणे. ही आज्ञाधारकता नव्हती; तर नात्याची जबाबदारी होती. ‘स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला डाग न लागू देणे.’ हे वाक्य संस्कारांचं प्रतिबिंब होतं आणि मग ती ओळ- ‘आता गुरुजींसोबत या शाळेत दोनच महिने राहिले आहेत; म्हणून जास्तीत जास्त त्यांच्या सोबत राहणे.’ त्याक्षणी गुरुजी हरवले… फक्त एक माणूस उरला- भावनांनी भरलेला.

कारण ते दोन महिने फक्त वेळ नव्हते; तर आयुष्यभर पुरतील असे क्षण होते. ईश्वरीसाठी गुरुजी फक्त शिक्षक नव्हते; ते तिच्या विचारांचे मार्गदर्शक होते आणि गुरुजींसाठी ईश्वरी फक्त विद्यार्थिनी नव्हती; ती त्यांच्या सेवेचं उत्तर होती. आईवडिलांना मदत, अक्षर सुधारणा, इंग्रजी वाचन, सुट्टी न घेण्याचा संकल्प, प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याची जिद्द… आणि शेवटची ओळ- ‘गुरुजींनी सांगितलेल्या सर्व गोष्टी काळजाच्या कुपीत जपून ठेवणे.’ तेव्हा जाणवलं- आपण जे शिकवतो ते शब्दांत नाही, तर माणसांत उतरवत असतो. ईश्वरीसारखी लेकरं गुरुजी घडवत नाहीत; ती गुरुजींनाही घडवतात.

आपल्या शिकवण्याला अर्थ देतात, सेवेला समाधान देतात. गुरुजींचं काम फक्त शिकवणं नसतं; तर एखाद्या लेकराच्या मनात स्वतःवर विश्वास पेरणं असतं. तो विश्वास उगवला, लेकरं डोळस झाली की, शिक्षण यशस्वी झालं असं समजावं. असे क्षण सर्टिफिकेटवर मिळत नाहीत; पण तेच क्षण गुरुजींच्या आयुष्याचं खरं पारितोषिक असतात. हा आनंद ओंजळीत मावत नाही; म्हणूनच तो काळजाच्या कुपीत जपलेला असतो.

शिक्षणगूज संदेश : शिक्षण हे पाठांतरात नसतं; ते लेकरांच्या विचारांत, कृतीत आणि संवेदनशीलतेत रुजतं. जेव्हा विद्यार्थी स्वतःचं नियोजन करतो, स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जबाबदारी घेतो आणि गुरुजींच्या शब्दांना जीवनमूल्य बनवतो- तेव्हा समजावं की, शिक्षण मनात खोलवर रुजलं आहे. लेकरं डोळस झाली, तर शिक्षण यशस्वी झालं- हा प्रत्येक शिक्षकाच्या प्रवासाचा खरा अर्थ आणि खरा आनंद आहे.

लेखक, प्रयोगशील शिक्षक आहेत. ‘आनंदाचं झाड’ या टोपणनावाने ते शिक्षणातील अनेक बाबींवर लेखन करतात

yuvrajmane892@gmail.com

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; कुर्ला ते वाशी मार्गावर ब्लॉक

Mumbai Hit-and-Run : मिठीबाई कॉलेजजवळ भरधाव दुचाकीची १५ वर्षीय मुलीला धडक; चालक फरार, CCTV फुटेज व्हायरल

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, ९ कामगार जखमी, Video

Thane : वर्षभर रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग; ७०८ पदांसाठी १ आणि २ सप्टेंबरला परीक्षा

Mumbai : ५० फेलोच्या जागेसाठी बीटेक, डॉक्टरांचे अर्ज; ५० जागांसाठी ४५०० जणांचे आवेदन, महापालिकेत कंत्राटी भरती