अक्षररंग

दोन उंदरांची गोष्ट

एकदा काय झालं गावखेड्यातील शेतात राहणाऱ्या उंदराला त्याच्या शहरात राहणाऱ्या चुलत उंदरानं मौजमजा करायला बोलावलं. गावात एक टेशन होतं. रात्री एक मालगाडी थांबायची. गावाकडला उंदीर त्यात चढला.

नवशक्ती Web Desk

ललित

डॉ. आनंद जोशी

एकदा काय झालं गावखेड्यातील शेतात राहणाऱ्या उंदराला त्याच्या शहरात राहणाऱ्या चुलत उंदरानं मौजमजा करायला बोलावलं. गावात एक टेशन होतं. रात्री एक मालगाडी थांबायची. गावाकडला उंदीर त्यात चढला. सकाळी उतरवून घ्यायला त्याचा शहरी भाऊ आला होता. उजाडलं. उपनगरात गाडी सायडिंगला थांबली. गावठा उतरला. गटाराच्या बाजूला उभा राहिला. तेवढ्यात शहरी आलाच.

"काय लागली का झोप ?" शहरी.

"अरे कसली झोप, सारखा खडखडाट" गावठी

"चल चल, शहरात सगळं टायमावर, जवळच कचराकुंडी आहे, तिथं सकाळी फ्रेश कचरा टाकतात, कालचा ! न्यारी न्याहारी होऊन जाईल बघ तुझी."

गावठी उडालाच. दोघं खाता खाता शहरी बोलत होता, "अरे इथं रस्ताभर कचरा असतोच, पण जवळ एक हाटेल आहे. तिथून नाईटची मेजवानी येऊन पडते, खा पटपट, जलेबी, चिकन मटणाचे तुकडे.."

शेतखाडीतल्याला इतकं मौप खायची सवय नव्हती, त्यानं झटकन खाल्लं. भुईखालची मुळं खाऊन त्याचे दात झालेले टणक, त्याच्या दातांकडं बघून पोशाखीला हेवाच वाटला.

"चल, लवकर पळूया इथून, का ते सांगतो, अरे हाटेलला एकदा आग लागली होती, शॉर्टसर्किट झालेलं, आपल्या भाईबंदांनी वायर कुरतडली म्हणून आपल्यावर उगाचच आरोप, सापळे लावले आहेत इथं." नगरकरी.

"हे लोक लई हुशार, दुसऱ्यावर खापर फोडण्यात", गावढेकरीने जोड दिली.

दोघेही पळाले. गावरानी केव्हाच पुढे, दुसरा मागून धापा टाकत आला. त्याच्याकडे पहात हसत शेतावर घावणारा म्हणाला, "अरे असलं खाऊन तुझ्या पोटाचा झाला आहे नगारा, तू काय धावणार, तुझा झालाय झकास बाबुराव."

"खराय, आम्ही कधी पळतच नाही, कधी तीन चाकी, तर कधी चार चाकी कालीपिली. गप आणि आता समोर बघ. त्या चारचाकी कालीपिलीचा ड्रायवार दरवाजा उघडा टाकून बसलाय. मागच्या सिटखाली जाऊन गप्पा छाटत बसू आरामात, जाऊ लांब."

दोघे अलगद मागच्या सिटखाली बसले. तेवढ्यात एक पॉश तरुणी आली; गॉगलबिगल लावून, ती 'फौंटन' म्हणाली आणि चारचाकी पळू लागली. थोड्याच वेळात गाडी थंड झाली.

"अरे, थोडी थंडी वाजते." गावकरी म्हणाला.

"चारचाकी ऐसी आहे, इथं सगळं ऐसी असतं; एअरकंडिशन. आपल्याला जायला खूप वेळ लागेल, शहराच्या टोकाला. इथं अंतर तासात मोजतात, मैलात नाही. दोन मैल जायला सुद्धा कधी दोन तास लागतात. बऱ्याच गप्पा होतील."

"ठीकाय बाबा."

"तर तुला काय सांगत होतो, गोडधोड, तळलेलं खाण्यानं हॉर्ट खराब होतं, म्हणून मी सुद्धा हे बंद करणार आहे", शहरी पोटावर हात फिरवित म्हणाला.

"हे तुला कसं कळलं?" गावकरीचा प्रश्न. "काही दिवसांपूर्वी पेपर कुरतडत असताना मला हे कळलं. हे प्रयोग उंदरांवर केले आहेत, असं चक्क लिवलं होतं त्यात, म्हंजे आपल्यावरच ना! हा दोन पायावरचा महा हुशार. आपल्या गोन्या भाईबंदाना पालघाल असं खायला घालतात. मग

त्यांना लॅबोरेटरीत पळवतात आणि ठार मारून हॉर्ट वगैरे तपासतात. फोटो छापला होता", शहरी.

"मग त्याचं आपल्याला काय?" गावंढळ,

"अरे, गोरे काय आणि काळे काय, आपण सगळे उंदीर सारखेच. हे बघ; आपल्याला थानं आणि या दोन पायावरच्याला म्हणजे माणसाला पण थानं, म्हंजे माणूस आणि आपण सेम सेम, सारखे, याचा अर्थ आपल्याला जे रोग होतात तेच माणसाला पण होतात. आपल्यावर प्रयोग करून, औषधं शोधून हा माणूस शहाणा होतो आणि त्याची आयुष्याची दोरी लांबते. आपण आहो तसेच रहातो." शहरी हुशार ज्ञान वाटत होता.

"असं महणतोस?" गावकरी चकित.

"तुम्ही गावाकडं वाचतबिचत नाही ना. म्हणून तुम्हाला कल्पना नाही. आपण आता उतरू तिथं एक मोठी इमारत आहे. खूप पुस्तकं आहेत तिथं; जुनी नवी. मी गेलो तिकडं म्हंजे बरीच पुस्तकं कुरतडतो. त्यात लिवलेलं असतं त्याला ग्यानबिन म्हणतात. पण या माणसानं ते ग्यान 'पवित्र' करून टाकलं मांजे खर्चिक करून टाकलं. त्यामुळं ते त्याच्याच प्रजातीतील बहुजनांकडे पोचलंच नाही. मग कसली समता आणि कसला बंधुभाव." शहरी रागात.

कालीपिली थांबली. ते दोघे दरवाजा उघडल्याबरोबर झटदिशी बाहेर पळाले. चारपाच माणसे रस्त्याच्या कडेला उभी होती. रस्त्यावर कटिंग चायचे प्लास्टिक ग्लास आडवे पडले होते. त्यातला चहा दोघांनी ओरपला. जरा तरतरी आली. जवळच असलेल्या झाडाखाली दोघे निवांत बसले.

"अरे, मग त्या नव्या जुन्या पुस्तकात काय लिवलंय ते सांग" ग्रामनेत्र डोळे विस्फारून म्हणाला.

"सांगतो ऐक" शहरी म्हणाला "अरे कातळोबानं म्हणजे निसर्गानं उंदीर, घुशी, माकडं अशा सगळ्या प्राण्यांना परिपूर्ण बनवलं. गेली लाखो वर्षे आपण उंदीर; उंदीरच राहिलो, माकडं माकडं राहिली. पण माणसाला निर्मितानाच अपूर्ण ठेवला. म्हणून त्याला पूर्णतेची ओढ लागली. गेली लाखो वर्षे माणसाची ही ओढ पूर्ण झालेली नाही. माणूस या जमातीचा-प्रजातीचा गेली लाखो वर्षे विकास चालूच आहे आणि चालू राहणार आहे. माणूस मुळातून म्हणजे आतून बदलला का? हा सवाल काही पुस्तकातून लिवलेला आहे. त्याचा जबाब अजून मिळालेला दिसत नाही. माणूस पुस्तकं वाचायला शिकला खरा, पण माणूस दुसरा माणूस वाचायला शिकला नाही, असं एका बाप माणसानं लिहून ठेवलंय. जितकी विषमता माणसामाणसात आहे, तेवढी निसर्गातील इतर प्राण्यात दिसत नाही, म्हणजे थोडीफार विषमता आपल्यात सुद्धा असते हे मान्य, पण इतकी नाही. बरं ते राहू दे. गावाकडं कसं चाललाय ते सांग", शहरीला आता गाव आठवलं.

शेतखेड्यात राहणारा म्हणाला, "गावाकडे काही ठीक नाही गड्या. कधी सुका तर कधी ओला दुष्काळ. शेताखाली आपल्या नात्यागोत्यातील पंधरा कुटुंब मुलाबाळांसह बिळात रहात होती. प्रत्येक बिळाला जोडणारे गोल रस्ते होते. अन्न साठवण्यासाठी छोटीशी कोठारं होती. कॉलनीतून वर जायला फक्त एकच रस्ता होता. एक टेहळक्या सतत नजर ठेवून असायचा. कोणी सरपटत येताय का बघायचा. वरतून कोणी चालत काय, पण पंख फडफडवत गेलं तरी आमचे कान टवकारायचे. नांगरल्या वीण भुई खाली राहणारे आम्ही, आमचे कान लई तिखट. महिन्यापूर्वी ढगफुटी झाली. आमच्या कानांना कळलं की पाणी येतंय. पण ते इतक्या जोरात आलं की आपली हजारो चिल्लीपिल्ली वाहून गेली. सुकी जागा शोधायला मोठे धावले, चेंगराचेंगरी झाली, पाचपन्नास असेच हकनाक मेले. जीवाला मोलच राहिलं नाही बघ. आता आम्ही नवीन जागा शोधून परत बिळं-कोठारं बांधत आहोत, परत घरं मुलाबाळांनी गजबजतील. असं हाय बघ." नगरवासीचे डोळे पाणावले. तो म्हणाला, "अरे दोस्ता, तू मोठा साहित्यिक झालास रे. काही दिवसांपूर्वीच मी एक गोष्ट कुरतडली 'द बरो' नावाची. काय गोष्ट लिवलीय रे. आपल्या भुईबंधूंबद्दलच हाय. तू सांगितली तशीच भुईखालची आरास. लेखकाचं नाव होतं काफ्का ! त्याची सगळी माहिती कुरतडली. अरे काफ्का, म्हणजे बाप माणूस. जीव सोडण्याआधी काही दिवसच आधी त्यांनी ही गोष्ट लिवली. तो गेल्यानंतर ती प्रकाशित झाली. काय म्हणतात ना संशोधन वगैरे, मोठे मनोवैज्ञानिक, विचार करणारे लेखक वगैरे वगैरे अजून विचार करतायत या गोष्टीवर. पण माझ्या गावाकडच्या मित्रा, आज मला ती गोष्ट खरी कळली. आज मला कळलं, भुईखाली अंधार आहे असं वाटलं तरी तो काळा फलक असतो ज्यावर आपण भुईबंधू आपलं जीवन कोरतो." येवढं बोलून शहरी थांबला.

तिन्हीसांजा होत होत्या. दोघे रेल्वे यार्डाकडे धावले. समोरुन काळं मांजर येत होतं. दोघं पळाले. धप्प आवाज झाला. मी दचकून जागा झालो. हातातून ऑक्सफर्ड इसाप फेबल्स खाली पडलं. वाचता वाचता मला डुलकी लागली. इसापनं त्याची ही आधुनिक गोष्ट मला सांगितली. 'गोष्ट सांगायची असते' असं माझा एक गोष्टीवेल्हाळ लेखक मित्र नेहमी म्हणत असे, त्याची आठव झाली. इसापनी सांगितली तशी ती गोष्ट मी वाचक मित्रांना सांगितली.

वैद्यकीय व्यावसायिक व विज्ञान लेखक

BMC त सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक; पूर्णकालिक तत्त्वावरील पदासाठी १२ अर्ज दाखल; १० व १२ नोव्हेंबर रोजी होणार मुलाखत

१ ते १९ डिसेंबर या संसदेचे कालावधीत हिवाळी अधिवेशन

एसटीच्या तिकीट महसुलात सरासरी दैनंदिन तूट; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला; २७ वर्षांपासून फरार असल्याने विशेष न्यायालयाने दिला झटका

एअर इंडिया विमान अपघात, तुमच्या मुलाचा दोष नाही; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट