अक्षररंग

व्हाट्स ॲप भुताटकी!

अलेक्सा गोर्जी आणि अलेक्झांडरची चांगलीच मैत्री झाली होती. गोर्जी त्याच्याशी गप्पा करायची. त्याला गोष्टी सांगायची. तोही तिच्याशी कधी कुंईकुंई करत, तर कधी भूईंई... भौऊउ... करत बोलायचा. असा दोघांचा संवाद सुरु असताना, एके दिवशी शेजारचे ब्रम्हेकाका तेजोमयीच्या घरी आले.

नवशक्ती Web Desk

बालमैफल

सुरेश वांदिले

अलेक्सा गोर्जी आणि अलेक्झांडरची चांगलीच मैत्री झाली होती. गोर्जी त्याच्याशी गप्पा करायची. त्याला गोष्टी सांगायची. तोही तिच्याशी कधी कुंईकुंई करत, तर कधी भूईंई... भौऊउ... करत बोलायचा. असा दोघांचा संवाद सुरु असताना, एके दिवशी शेजारचे ब्रम्हेकाका तेजोमयीच्या घरी आले. त्यांना हे दृश्य बघून आधी धक्काच बसला. काही वेळाने त्यांना ही भुताटकी वाटली. एक यंत्र, डॉगीशी बोलतं काय, डॉगी या यंत्राला प्रतिसाद देतो काय, हे सगळं काही त्यांच्या पचनी पडलं नाही. ते आल्या पावली‍ माघारी वळले.

“अहो काका, काही काम होतं का?” तेजोमयीनं लगेच विचारलं. पण ब्रम्हेकाका काहीही न बोलताच घाईघाईत निघून गेले. ब्रम्हेकाका घरी आले तेव्हा, तेजोमयीचे बाबा आतल्या खोलीत काहीतरी काम करत होते, तर आई स्वयंपाकखोलीत होती. तेजोमयीने आत जाऊन, ब्रम्हेकाका दारातून कसे माघारी वळले, हे दोघांनांही सांगितलं.

“या ब्रम्हेंच्या नाकाला काहीतरी वेगळा वास आलेला दिसतो.” बाबांनी नाक उडवत प्रतिक्रिया दिली.

“कसला वास बाबा?” तेजोमयीने आश्चर्यचकित होत विचारलं.

“अगं, आपल्या घरी काहीतरी गडबड असल्याची त्यांना पक्की खात्री वाटली असेल, म्हणूनच ते आल्या पावली माघारी वळले.” आई म्हणाली.

“पण, त्यांना दारातूनच कसं काय कळलं असणार? घरात तरी यायचं होतंना.” तेजोमयी म्हणाली.

“ते आले तेव्हा, अलेक्झांडर काय करत होता?” बाबांनी विचाारलं.

“गोर्जी, त्याच्याशी बोलत होती नि तो तिच्याकडे बघून मान हलवत होता.” तेजोमयीनं सांगितलं.

“झालं कल्याण! या ब्रम्ह्यांना यात नक्कीच भुताटकी वाटली असणार. यंत्र बोलतं नि अलेक्झांडर ऐकतो म्हणजे काय? भुताटकीच्या पलिकडे, ब्रम्हे हे बघूच शकत नाहीत.” बाबांनी प्रतिक्रिया दिली.

******

बाबा म्हणाले अगदी तसंच झालं. ब्रम्हेकाकांनी सोसायटीच्या व्हाट्सॲप ग्रुपवर, तेजोमयीच्या घरी कशी भुताटकी आहे, याचं रसभरीत वर्णन करणारी पोस्ट टाकली. भुताटकीला प्रोत्साहन देणाऱ्या या कुटुंबाला सोसायटीतून हाकलून लावलं पाहिजे, अन्यथा सर्वांनाच, त्यांच्या घरातील भुताचा त्रास होऊ शकतो, असंही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं. ही पोस्ट, त्यांनी इतर सोसायटींच्या ग्रुपमध्येही टाकली. त्यामुळे ती व्हायरल होत होत, नजिकच्या पोलिस ठाण्यातील, पोलिस निरीक्षकांपर्यंत पोहचली.

असल्या पोस्टमुळे बरीच गडबड होऊ शकते. गोंधळू उडू शकतो, हे पोलीस निरीक्षक देशपांडे यांच्या तत्काळ लक्षात आलं. ते लगेच तेजोमयीच्या सोसायटीत पोहचले. ही‍ पोस्ट ब्रम्हेंच्या नावे असल्याने ते थेट ब्रम्हेंच्या सदनिकेत पोहचले.

असे, अचानक पोलीस निरीक्षकाला घरी आल्याचे बघताच, ब्रम्हेंचे पाय लटपटू लागले. त्यांची बोबडी वळली. ते, त त प प.. करु लागले.

“अहो, तुम्ही घाबरता कशाला, मी अद्याप काहीही केलं नाही तुम्हाला, साधा प्रश्नही विचारला नाही.” देशपांडेसाहेब ब्रम्हेंना म्हणाले.

“त त तु तुम्ही आमच्या घरी कसे काय?” ब्रम्हेंनी कसंबसं विचारलं. तेव्हा देशपांडेसाहेबांनी त्यांना, व्हॉट्सॲपवरील त्यांच्या नावे फिरत असलेली पोस्ट दाखवली.

“म्हणजे भू भू ताट की.” ब्रम्हे कसेबसे बोलले.

“कसलं भूत ब्रम्हेसाहेब? तुम्ही स्वत: बघितलं का हे भूत?”

“हो हो साहेब. मी स्वत: बघितलं.”

“मग, तुम्हाला भूतबाधा कशी काय झाली नाही?” देशपांडेसाहेब हसू दाबत म्हणाले.

“म म्हणजे साहेब, तु तुम्ही काहीबाही काय बोलता. सोसायटीत ज्यांच्याकडे भूत आहेत, तिकडे न जाता, म मा माझीच उलटतपासणी करता आहात.” ब्रम्हे किंचित धिटाइने म्हणाले.

“ब्रम्हेसाहेब, तुम्ही भूत बघितलं म्हणजे काय बघितलं?” देशपांडेसाहेबांनी जरा करड्या आवाजात विचारलं.

“मी खोटं, बोलतो असं म्हणायचय का साहेब?”

“ब्रम्हेसाहेब, तुम्ही भूत बघितलं म्हणजे काय बघितलं? एव्हढचं विचारलं. त्याचं उत्तर द्या. तुम्ही खरं बोलता की खोटं बोलता, ते नंतर ठरवू.” देशपांडेसाहेब आणखी करड्या आवाजात बोलले. ब्रम्हे थरथर कापू लागले.

“स साहेब चला, मी‍ तुम्हालाच ते भूत दाखवतो.” असं बोलून ब्रम्हेंनी, देशपांडेसाहेबांना तेजोमयीच्या घरी नेलं. आपल्या घरी पोलीस इन्स्पेक्टर आल्याचे बघून आईबाबा आणि तेजोमयीला आश्चर्य वाटलं. सोबत ब्रम्हेंना बघून बाबांच्या लक्षात सगळा प्रकार आला. त्यांनी देशपांडे साहेबांना आत बोलावलं.

“स साहेब आत जाऊ नका. ती बघा दोन भूतं!” ब्रम्हे, अलेक्झांडर आणि गोर्जीकडे बोट दाखवत म्हणाले. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत देशपांडे आत आले. गोर्जीने त्यांना नमस्कार केला. आलेल्या व्यक्तीशी सगळेजण अदबीने बोलताहेत, हे बघून अलेक्झांडरनेही शेपूट हलवून देशपांडेसाहेबांकडे प्रेमानं बघितलं.

“ब्रम्हेसाहेब, तुम्हाला या दोघांमध्ये कुठे भूत दिसलं ते सांगा.” दारातच उभ्या असणाऱ्या ब्रम्हेंना, देशपांडेसाहेबांनी दरडावून विचारलं.

“साहेब हे यंत्र, या कुत्र्याशी बोलताना मी बघितलं.”

“कुत्रा नाही, आमचा लेक आहे तो.” आई ब्रम्हेंवर रागावली.

“या यंत्राशी, यांचा हा हा कु, न ना ही, ले लेक बोलतो. ही भुताटकी नाही का साहेब?” ब्रम्हेंचं त त प प सुरुच होतं.

“अहो ब्रम्हेसाहेब, तुमच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीस, यंत्रमानव म्हणजे भूत वाटावा म्हणजे कमालच झाली. कोणत्याही शेपूटवाल्या दोस्तांशी प्रेमानं बोललं, त्यांना समजावून सांगितलं, तर त्यांना ते कळतं. याला भुताटकी नाही म्हणत.”

“पण, स स साहेब…”

“ब्रम्हे, सुशिक्षित माणसंच जर भुताटकी-बिताटकीवर विश्वास ठेवायला लागली, या गोष्टींना व्हाट्सॲपवरुन पसरवू लागली तर, समाजात किती गोंधळ उडेल, भीतीचं वातावरण निर्माण होईल. याचा फायदा संधीसाधू लोक घेतील. हे तरी लक्षात घ्यायला हवं की नाही तुम्ही.”

“प प पण, साहेब..”

देशपांडेसाहेबांनी दंडूका खाली आटपून ब्रम्हेंना बोलू दिलं नाही. त्यांचा हात पकडून खोलीच्या आत आणलं. “जे काही थोड्यावेळापूर्वी व्हॉटसॲपर लिहिलं, ती मोठ्ठीच चूक आपल्या हातून घडली. त्यामुळे क्षमा मागतो. भूतबित काही नसल्याची, आपली खात्री पटली आहे. सर्वांना मानसिक त्रास झाला असल्यास क्षमा असावी.”, असा संदेश पोस्ट करायला लावला.

ब्रम्हेंचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

ज्येष्ठ बालसाहित्यिक

कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेणे हा एक नवा प्रघात; CAG च्या अहवालात ताशेरे

भारत-पाकिस्तान युद्धात ५ विमाने पाडण्यात आली; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; भाषिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

...तर 'मविआ'त राहण्यात अर्थ नाही; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा

गुगल, 'मेटा 'ला ED ची नोटीस; अवैध ऑनलाईन सट्टेबाजी ॲप प्रकरण