विचारपान
संदीप प्रधान
एकेकाळी सायंकाळी मुंबई, पुण्यात एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी अशी नेत्यांची मांदियाळी जमायची. मग एकमेकांच्या टोप्या उडवणे, शालजोडीतील हाणणे, चिमटे काढणे-कोपरखळ्या लगावणे याची जुगलबंदी सुरु व्हायची. अशा वेगवेगळ्या राजकीय भूमिका असलेल्या नेत्यांचे मैत्र जपणारे महाराष्ट्र हे राज्य होते यावर आता विश्वास बसणार नाही इतकी मैत्री मातीमोल झाली आहे. एकमेकांच्या छाताडावर बसणाऱ्या सर्व नेत्यांना 'मैत्री दीना'च्या शुभेच्छा...
केंद्रात भाजपचे सरकार होते व त्या पक्षाचा एका बड्या प्रभावशाली नेत्याने राज्यसभेच्या निवडणुकीकरिता अर्ज केला. महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील एका वजनदार नेत्याने रात्री उशिरा त्या भाजप नेत्याला फोन करुन त्याच्याकडील एका पदाचा राजीनामा दिला का ? अशी विचारणा केली. आँफिस आँफ प्रॉफिटमुळे छाननीत उमेदवारी अर्ज बाद ठरु शकतो हे त्या वजनदार नेत्याने निदर्शनास आणल्यावर दिल्लीत सूत्रे हलू लागली. त्यावेळी ए.पी.जे. अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होते. रात्री बाराच्या सुमारास झोपी गेलेले राष्ट्रपती भवन जागे झाले. भाजपच्या त्या नेत्याचा राजीनामा मागील तारखेने जमा करुन मंजूर केला गेला. राष्ट्रपती भवनाचा शिक्का पडलेले ते पत्र घेऊन दिल्लीवरुन पहाटेच्या विमानाने एकजण मुंबईत दाखल झाला. आता भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेला व तेव्हा महाराष्ट्रातील नेता असलेला एकजण मुंबई विमानतळावर त्या पत्राची वाट पाहत होता. पत्र हातात पडताच विधान भवनाच्या सचिवांना सकाळीच विधान भवनात दाखल होण्याची सूचना दिली गेली. सकाळी सहा वाजता विधान भवन सचिवांच्या कार्यालयात ते पत्र त्या नेत्याच्या अर्जासोबत जोडले गेले. मग सारेच आपापल्या घरी गेले आणि दुपारी एक वाजता अर्ज छाननीच्यावेळी हजर झाले. छाननीवेळी विरोधी उमेदवाराच्या प्रतिनिधींनी आँफिस आँफ प्रॉफीटचा मुद्दा उपस्थित केला. मात्र राजीनामा पत्र पाहून ते गप्प बसले. विरोधी पक्षातील त्या वजनदार नेत्याने भाजपच्या त्या प्रभावशाली नेत्याला असा एकप्रकारे मैत्रीचा हात दिला होता. फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने खूप वर्षांपूर्वी एैकलेली ही गोष्ट पुन्हा आठवली.
महाराष्ट्रातील मराठी मनावर १९६० ते २०१० पर्यंत दोन अत्यंत प्रभावी नेते अधिराज्य गाजवत होते. त्यांची नावे स्व. बाळासाहेब ठाकरे तसेच शरद पवार आहेत. त्यांनी जाहीर सभेत एकमेकांवर 'मैद्याचे पोते' यापासून '१४ इंचाची छाती असलेला नेता', अशी शेलक्या शब्दांत टीका केली असली तरी खासगी जीवनात हे दोघे एकमेकांचे घट्ट मित्र होते. या दोघांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभी एक मासिक सुरु केले होते. प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाच्या चरणी हे मासिक ठेवून दोघांनी सुरुवात केली. मात्र त्याला यश आले नाही, अशी कबुली या दोघांनी दिली होती. महाराष्ट्राची, मराठी माणसाची अस्मिता हा या दोघांच्या राजकीय मैत्रीतील समान धागा होता. माजी मुख्यमंत्रीद्वय विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे या 'दो हंसो का जोड्या'चे मैत्र सारेच जाणतात. जेव्हा या दोघांच्या मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट चढला नव्हता तेव्हा काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्री निवडीच्यावेळी आपण दोघे कसे कायमचे सूचक व अनुमोदक असायचो हे ते हसतमुखाने सांगायचे. २००४ ची विधानसभा निवडणूक सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली गेली. शेतकऱ्यांना वीजबिल माफी दिल्याने पुन्हा काँग्रेसचे सरकार येऊनही शिंदे यांच्याएैवजी देशमुख मुख्यमंत्री झाल्याने या दोघांच्या मैत्रीत खटास आली. पण उभयतांनी कधीही परस्परांवर टोकाची टीका केली नाही. सुशीलकुमार शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे यांचेही मधूर संबंध होते. शिंदे निवडणुकीला उभे असताना प्रचाराला शेजारच्या मतदारसंघात गेलेल्या ठाकरे यांचे हेलिकॉप्टर अचानक खराब झाल्याने शिंदेंच्या विरोधात ठाकरे प्रचाराला जाऊ शकले नाही. मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर मनाने खचलेले बाळासाहेब हे शिंदे यांच्या घरातील लग्नाच्यानिमित्ताने प्रथम घराबाहेर पडले होते.
विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे हे अनुक्रमे काँग्रेस व भाजपचे नेते. मात्र त्यांच्यातील दोस्ताना जगजाहीर होता. देशमुख लातूरचे तर मुंडे बीडचे. विलासराव नेहमी मुंडे यांना चिमटे काढायचे की, तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून उत्तम काम करत असल्याने मतदार तुमच्या पक्षाला विरोधात बसवतात. मुंडे हे देशमुख यांची टोलेबाजी हसतमुखाने घ्यायचे. मुंडे यांनी शरद पवार यांच्या विरोधात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावरुन राळ उठवली तेव्हा त्यांना देशमुखांनी रसद पुरवली, अशी कुजबुज होती. मुंडे यांचे भाजपमधील प्रतिस्पर्धी नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेते असताना देशमुख यांच्यावर विधान परिषदेत सूत गिरणीच्या गैरव्यवहारावरुन आरोप केले होते. तेव्हा गडकरी यांचे विदर्भातील मित्र रणजित देशमुख यांनी त्यांना कागदपत्रे पुरवली, असे खुद्द विलासराव बोलले होते. मुंडे-गडकरी यांच्यात काही काळ विळ्या-भोपळ्याचे नाते असल्याने की काय नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात उत्तम दोस्ती राहिली आहे. विकास हा दोघांच्या नात्याला घट्ट बांधणारा धागा राहिला. अजित पवार हेही विकासाच्या बाबतीत गडकरी यांच्यासोबत भेटीगाठी घेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील आणि भाजप आ. राज पुरोहित हे गव्हर्मेंट लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना हॉस्टेलवर एकत्र राहत असल्यापासूनच मित्र. राजकारणात या दोन्ही पक्षातून विस्तव जात नसला तरी हे दोघे अगदी उघडपणे एकमेकांना भेटायचे आणि मैत्री जपायचे. जळगावचे सुरेशदादा जैन यांच्या विरोधात भाजपच्या एकनाथ खडसे यांनी षड्डू ठोकले होते. जैन-खडसे यांच्यात भ्रष्टाचारावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. तेव्हा जैन यांची बाजू मांडण्याकरिता त्यांचे कर सल्लागार मैदानात उतरले. त्यांचे नाव अरुण साठे. साठे हे भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे बंधू.
पतंगराव कदम आणि चिमणराव कदम या दोन कदमांची पावले नेहमीच मैत्रीच्या रस्त्यावरुन पडली. या मैत्रीचा दीर्घकाळ साक्षीदार राहिलेल्या पतंगरावांच्या ड्रायव्हरने बंगला बांधला व त्याला 'रंगपतंग' असे नाव दिले. शेकापचे नेते अँड. दत्ता पाटील यांच्यासोबत शरद पवार यांचा दोस्ताना मत्स्यप्रेमातून तयार झाला होता. पवार यांना जिताडं खायची असली की, ते पाटलांच्या घरी आवर्जून जायचे. बँ. ए. आर. अंतुले आणि पवार यांच्यातील संघर्षाला पाटील-पवार यांच्या दोस्तीमुळे अधिक धार चढली होती. शिवसेना आणि समाजवादी यांच्यात काही काळ गुळपीठ होते. कालांतराने त्यांचे फटाटले. मात्र मधू दंडवते व बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध चांगले राहिले. दंडवते रेल्वेमंत्री असताना एक कार्यकर्ता ठाकरे यांच्याकडे गेला व त्याने आपले काम करण्याकरिता दंडवते यांना फोन करण्याची विनंती केली. ठाकरे यांनी दंडवते यांना फोन करुन त्याचे काम करायला सांगितले आणि ते झालेही. समाजवादी साथी जॉर्ज फर्नांडिस आणि ठाकरे यांच्यातही असाच घट्ट दोस्ताना होता. उभयतांनी परस्परांवर टीका केली तरी दोस्ती पक्की होती. मुंबई ठप्प करण्याची ताकद या दोघांमध्येच होती.
आता टोकदार किंवा विरोधी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना शत्रूंच्या यादीत टाकले जाते. मात्र आणीबाणीच्या काळात एका संपादकांनी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यावर टीकेचा भडीमार केला. साहजिकच काँग्रेसनी त्या वृत्तपत्राच्या जाहिराती बंद केल्या. काँग्रेस नेते वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत ही गोष्ट गेल्यावर त्यांनी महिनाभराचा वृत्तपत्राचा खर्च निघेल एवढ्या जाहिराती देण्याचे आदेश त्यांच्या ताब्यातील राज्य सहकारी बँकेला दिले. आता एकाच सत्ताधारी पक्षात असलेले दोन नेते अशी परस्परविरोधी भूमिका घ्यायला धजावणार नाहीत. उलटपक्षी त्या वृत्तपत्राला टाळे कसे लागेल याकरिता मिळून दंडबैठका काढतील.
मनोहर जोशी, प्रमोद नवलकर आणि सुधीर जोशी हे तिघे एकमेकांचे जानीदोस्त होते. हे तिघे भेटण्याकरिता १० वाजून ४७ मिनिटे किंवा ११ वाजून १७ मिनिटे अशी वेळ ठरवायचे आणि बरोबर त्याचवेळी तिघेही पोहोचायचे. मनोहर जोशी आणि शरद पवार हेही महाराष्ट्रातील मैत्रीचे एक ठळक उदाहरण होते. जोशींनीच पवार यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनचा रस्ता दाखवला. त्यामुळे पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे प्रमुख झाले. पवार विरोध या समान धाग्यामुळे की काय कुणास ठावूक पण शंकरराव चव्हाण आणि बाळासाहेब विखे-पाटील हे एकमेकांचे पक्के मित्र होते. पवारांना सत्तेच्या पदापासून रोखण्याकरिता या दोघांनी खेळी केल्या. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांची मैत्री जगजाहीर आहे. पवार यांच्या सांगण्यावरुन पोलीस दलातील नोकरी सोडून निवडणूक लढवलेल्या शिंदे यांच्यावर पराभवामुळे मोठे संकट आले होते. पण पुढे विजयी उमेदवाराचे आकस्मिक निधन झाले व शिंदे यांचे नशिब फळफळले.
सध्या राजकारणात देवेंद्र फडणवीस-गिरीश महाजन, पार्थ पवार-विक्रम काकडे, आदित्य ठाकरे-वरुण सरदेसाई, प्रसाद लाड-प्रविण दरेकर अशा काही मित्रांच्या जोड्या दिसतात. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील पक्षातीत मैत्र पार लोप पावले आहे. राजकारण शिवराळ, कमरेखाली वार करण्याची स्पर्धा असलेले झाले आहे. एकेकाळी सायंकाळी मुंबई, पुण्यात एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी अशी नेत्यांची मांदियाळी जमायची. मग एकमेकांच्या टोप्या उडवणे, शालजोडीतील हाणणे, चिमटे काढणे-कोपरखळ्या लगावणे याची जुगलबंदी सुरु व्हायची. अशा वेगवेगळ्या राजकीय भूमिका असलेल्या नेत्यांचे मैत्र जपणारे महाराष्ट्र हे राज्य होते यावर आता विश्वास बसणार नाही इतकी मैत्री मातीमोल झाली आहे. एकमेकांच्या छाताडावर बसणाऱ्या सर्व नेत्यांना 'मैत्री दीना'च्या शुभेच्छा...
pradhansandeep19@gmail.com