अक्षररंग

जागतिक बुद्धिबळ दिन : चला, जग जिंकूया...

गेल्या काही वर्षात बुद्धिबळाने झपाट्याने प्रगती केली आहे आणि यामध्ये भारताचे सर्वाधिक मोलाचे योगदान आहे. २० जुलै या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाच्या निमित्ताने भारत या क्रीडा प्रकारात एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे, याविषयीचा आढावा घ्यायला हवा. बुद्धिबळाचा इतक्या वर्षांचा प्रवास मी एक प्रकारे जगलो आहे.

नवशक्ती Web Desk

विशेष

प्रवीण ठिपसे

गेल्या काही वर्षात बुद्धिबळाने झपाट्याने प्रगती केली आहे आणि यामध्ये भारताचे सर्वाधिक मोलाचे योगदान आहे. २० जुलै या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाच्या निमित्ताने भारत या क्रीडा प्रकारात एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे, याविषयीचा आढावा घ्यायला हवा. बुद्धिबळाचा इतक्या वर्षांचा प्रवास मी एक प्रकारे जगलो आहे.

भारताची बुद्धिबळातील गेल्या दहा वर्षांतील प्रगती बघितली तर आपण वरच्या स्तराला पोहोचलो आहोत, हे दिसून येते. म्हणजे ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा खेळायला सुरुवात केली त्यावेळी फिलीपिन्स आणि इराण वगैरे हे देश आपल्यापेक्षा पुढे होते. इराणचे इंटरनॅशनल मार्केट पण आपल्यापेक्षा खूप पुढे होते. आपल्याकडे मात्र बुद्धिबळ या खेळाला शासनाचा कोणताचं सपोर्ट नव्हता. १९६२ पासून १९७४ पर्यंत एकाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सरकारने पाठवले नव्हते. या परिस्थितीमध्ये खूप अडचणी येत होत्या आणि आपला देश या खेळात मागे पडला होता. मी जेव्हा बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली तेव्हा पहिली टुर्नामेंट मी १९७१ मध्ये खेळलो आणि देशासाठी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतासाठी १९७५ साली खेळलो होतो. १९७७ मध्ये पहिले पदक मिळाले.

त्यानंतर अवघ्या १८ वर्षांतच जगही जिंकता येते, हे दोम्माराजू गुकेशने दाखवून दिले. युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने शेवटच्या आणि १४व्या डावात चीनचा जगज्जेता डिंग लिरेन याला धूळ चारत बुद्धिबळाच्या पटावर सर्वात युवा जगज्जेता होण्याचा मान पटकावला. रशियाच्या गॅरी कास्पारोव्ह (२२व्या वर्षी) यांचा गेल्या १४ वर्षांपासूनचा विक्रम मोडीत काढत गुकेशने नव्या अध्यायाची नोंद केली. विश्वनाथन आनंद याच्यानंतर जगज्जेता होण्याचा मान पटकावणारा गुकेश हा भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला होता. हा इतक्या वर्षांचा बुद्धिबळाचा प्रवास फार संस्मरणीय असा आहे.

आपल्या देशातला बुद्धिबळाचा प्रवास कसा झाला बघा. आधीच्या पिढ्यांपेक्षा आम्हाला थोडंसं अधिक वर जाण्याची संधी मिळाली. १९८३ साली मला एशियनमध्ये गोल्ड मेडल मिळाले. अशाप्रकारे ८०च्या दशकात थोडीशी प्रगती झाली. १९८४ मध्ये विश्वनाथन आनंदने जेव्हा वर्ल्ड कॅडेडमध्ये चॅम्पियनशिप आणि सब ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली, त्यावेळी योगायोगाने मी त्याचा प्रशिक्षक होतो. त्यावेळी मी भारतीय चॅम्पियन होतो आणि तो सब ज्युनियर चॅम्पियन होता. मी त्याचा प्रशिक्षक म्हणून गेलो होतो. त्यावेळी हे पदक जिंकणारा आनंद हा पहिलाच भारतीय ठरला होता. जागतिक लेव्हलला डॉमिनेट करायला आनंदचा काळ यावा लागला. १९८७ मध्ये आनंद वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन झाला. त्यावेळी त्याला सगळीकडे, अगदी बीबीसीवरही दाखविण्यात आले. ‘फर्स्ट एशियन चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड’ असा त्याचा उल्लेख होत होता. म्हणजे तोवर बुद्धिबळाच्या कुठल्याही कॅटॅगिरीमध्ये एशियन माणूस चॅम्पियन झाला नव्हता. या प्रगतीमुळे पुढचे दशक वेगळे झाले. तीन-चार वर्षांमध्येच म्हणजे १९९० च्या शेवटच्या कालखंडातच आनंद जगातला पाच खेळाडूंमध्ये जाऊन पोहोचला. म्हणजेच तो एका जागतिक लेवलवर जाऊन पोहोचला. शिवाय ती जागा त्याने बराच काळ कायम ठेवली. जुलै ९७ मध्ये आनंदने मला ओव्हरटेक केले. गुकेशने आनंदला जुलै २०२३ मध्ये पाठी टाकले. म्हणजे जवळपास ३५ ते ३७ वर्षे आनंद भारताचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू होता.

२०१२मध्ये आनंदने भारताकडून अखेरची जागतिक स्पर्धा जिंकली. त्यानंतर १२ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणून गुकेशने जगभरात पुन्हा एकदा भारताचा तिरंगा फडकावला. एक गोष्ट गुकेशला अन्य बुद्धिबळपटूंपेक्षा वेगळी करते. ती म्हणजे त्याचा व्यावसायिकपणा. पराभव झाला किंवा सामन्यात पिछाडीवर असला, तरी त्याच्या चेहऱ्यावरून ते कोणीही ओळखू शकत नाही. जोपर्यंत सामना पूर्णपणे जिंकत नाही, तोपर्यंत तो आनंद व्यक्त करणेही टाळतो. बाहेरच्या विश्वात काय चालू आहे, अथवा आपला प्रतिस्पर्धी कसे हावभाव करत आहे, याकडे तो लक्ष देत नाही. त्याचे लक्ष फक्त बुद्धिबळाच्या पटावर असते. वर्षानुवर्षे आपल्या खेळात अधिक सुधारणा कशी करता येईल, यावरच गुकेशचा भर असतो.

भारताकडे गुकेशव्यतिरिक्त आर. प्रज्ञानंद, विदीत गुजराथी, दिव्या देशमुख, वंतिका अगरवाल, तानिया सचदेव असे असंख्य गु‌णवान बुद्धिबळपटू आहेत. बुद्धिबळ खेळाचा ऑलिम्पिकमध्ये कधी समावेश होईल, हे सांगू शकत नाही. मात्र चेस ऑलिम्पियाड आणि जागतिक स्पर्धांमध्ये यापुढेही भारतीय खेळाडू आपला दबदबा राखतील, हे मी ठामपणे सांगू शकतो.

२०२४-२५ हे वर्ष भारतीय बुद्धिबळाचे कायापालट करणारे वर्ष ठरले. वर्षाच्या सुरुवातीलाच नागपूरच्या दिव्या देशमुखने कनिष्ठ गटाचे जागतिक जेतेपद मिळवले. त्यानंतर कँडिडेट्स स्पर्धेसाठी आपले ३ खेळाडू पात्र ठरले. त्यातून मग गुकेशने जागतिक लढतीची पात्रता मिळवली. सप्टेंबरमध्ये दुहेरी चेस ऑलिम्पियाड सुवर्णपदक पटकावून आपली ताकद संपूर्ण विश्वाला दाखवून दिली. मग गुकेशने १४ फेऱ्यांच्या कडव्या संघर्षानंतर लिरेनला चीतपट केले. त्यामुळे भारताचे बुद्धिबळातील वर्तमान व भविष्य फार उज्ज्वल असल्याची खात्री पटते.

कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेणे हा एक नवा प्रघात; CAG च्या अहवालात ताशेरे

भारत-पाकिस्तान युद्धात ५ विमाने पाडण्यात आली; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; भाषिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

...तर 'मविआ'त राहण्यात अर्थ नाही; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा

गुगल, 'मेटा 'ला ED ची नोटीस; अवैध ऑनलाईन सट्टेबाजी ॲप प्रकरण