नवी दिल्ली : अलिशान घरांच्या किमती वाढण्याच्या बाबतीत जागतिक स्तरावरील ४६ शहरांच्या यादीत बंगळुरू चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे, तर दिल्ली १५ व्या क्रमांकावर आहे, असे रिअल इस्टेट सल्लागार नाईट फ्रँकच्या अहवालात म्हटले आहे.
नाईट फ्रँकच्या प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स (पीजीसीआय) च्या दुसऱ्या तिमाही (एप्रिल-जून) २०२५ च्या अहवालानुसार, प्राइम हाऊसिंग प्रॉपर्टीजमध्ये २५.२ टक्के वार्षिक वाढ होऊन सेऊल प्रथम क्रमांकावर आहे. टोकियो १६.३ टक्के वाढीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि दुबई १५.८ टक्के वार्षिक वाढ होऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स हा जगभरातील ४६ शहरांमध्ये प्राइम हाऊसिंग प्रॉपर्टीच्या किमतींच्या हालचालीचा मागोवा घेणारा मूल्यांकन-आधारित निर्देशांक आहे. भारतात, बंगळुरूमध्ये प्राइम हाऊसिंग प्रॉपर्टीच्या किमतीत १०.२ टक्के वाढ झाली, मुंबई (८.७टक्के) आणि दिल्ली (३.९ टक्के).
सल्लागाराने नमूद केले की जून २०२५ पर्यंतच्या १२ महिन्यांत सरासरी जागतिक स्तरावरील आलिशान घरांच्या किमती २.३ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
जागतिक स्तरावर प्राइम घरांच्या किमतीत घट झाली असली तरी २०२५ च्या पहिल्या तिमाहीत ३.५ टक्क्यांच्या तुलनेत सरासरी वार्षिक २.३ टक्के भारतीय शहरे लवचिक राहिली आहेत, ज्यामुळे मागणी मजबूत, मर्यादित प्राइम रहिवासी पुरवठा आणि शहरी केंद्रांमध्ये सतत संपत्ती निर्मिती दिसून येते, असे सल्लागाराने सांगितले.